महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

काहींच्या सुखासाठी बहुंची बंदीशाळा? – नामंजूर !

रणजित मेश्राम

सदुसष्ट वर्षांपूर्वी नागपुरात जे धर्मांतर घडले त्या घडण्याला अंधारयुगातून सूर्योदय असे महत्त्व आहे! एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे एवढ्यापुरतेच ते मर्यादित नाही. या धर्मांतराला जीवन परिवर्तनाची विलक्षण मानसिक अनुभूतीची न हलणारी बैठक आहे. अडीच हजार वर्षापूर्वी मिळालेल्या कल्याण ज्ञानाचे भगवान बुद्धांनी सारनाथ येथे पहिल्या पाच शिष्यांना केलेले धम्मज्ञान दान हे पहिले ‘धम्मचक्र प्रवर्तन’ होते. त्यानंतर सम्राट अशोकाचा काळ वगळता आधुनिक काळातील या धर्मांतराला ‘धम्मचक्र प्रवर्तन’ असे मानले जाते. या प्रवर्तनाचे मुख्य कर्ते व ज्ञानदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर !

डॉ. आंबेडकर हे महामानव असले तरी माणूसच होते एका माणसाच्या बळावर कोट्यवधी माणसांच्या व पिढ्यांच्या जीवन परिवर्तनाचा निर्णयक्षण येणे असे जगात क्वचितच घडले असेल. प्रत्यक्षात ते घडले, अन् यशस्वीही झाले । बाबासाहेबांनी १९१७ च्या साऊथबेरो कमिशनला साक्ष देऊन सार्वजनिकतेला प्रारंभ केला. पहिल्या दिवसापासून त्यांनी मुक्तिवाट धरली. अनेक पातळ्यांवर बंद दारे उघडत उघडत ते निश्चितीकडे निघाले. हिंदू धर्मात राहून तुमचा उत्कर्ष होईल काय?’ हा प्रश्न त्यांनी सातत्याने विचारला. ‘तुम्ही आज जे दुःखी आहात, ते दुःख मानवनिर्मित कसे, हे आधी समजून घ्या ! गेल्या जन्मीचे पातक, अदृश्य शक्ती, ईश्वरकोप, पुढचा जन्म असे काहीही नसते सारे मानवनिर्मित आहे. काहींच्या सुखासाठी बहुंची बंदीशाळा अशी ही कठोर कैद आहे!’- हे बाबासाहेबांनी पटवून दिले. आणि सांगितले, ‘इथून सुटता येते. मार्ग एकच- हिंदूधर्म सख्य सोडावे लागेल! तसे झाले, तरच बुद्धिशी सख्य, तार्किकतेशी गट्टी संधीची संधी, विकासाचे सुख, समतेचा निवारा, स्वातंत्र्याचा श्वास तुम्हाला मिळेल!’
जो धर्म दैन्यावस्था देतो तिथे रहावे काय, अशी बाबासाहेबांची विचारणा होती.

धर्म माणसासाठी की, धर्मासाठी माणूस ?- हळूहळू लोकांना हे पटायला लागले. पावलापावलांवर ईश्वराला स्मरणारी व भिणारी साधी माणसे या कठोर क्षणावर येणे साधे नव्हते ! १३ ऑक्टोबर १९३५ ला येवले मुक्कामी (नाशिक जिल्हा) झालेल्या सभेत बाबासाहेब सर्वांसमक्ष म्हणाले, ‘हिंदू धर्मात जन्माला येणे हे माझ्या हाती नव्हते. पण, हिंदू म्हणून मी मरणार नाही ! पुणे कराराच्या धक्क्यानंतर बाबासाहेबांच्या या घोषणेने हिंदू धर्म सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले देशभर खळबळ मानी विरोध

दलितांनी मनावर घेतले. काळ उत्कंठतेच्या उच्चांकावर होता. बाबासाहेबांनीही अजिबात उसंत घेतली नाही. जागोजाग धर्मांतर परिषदा लागल्या. बाबासाहेब विस्ताराने धर्मातरामागची भूमिका स्पष्ट करीत होते. आता बाबासाहेब कोणता धर्म घेणार याकडे उत्सुकता लागली. धर्मातर घोषणेचे पडसाद इतर धर्मियांमध्येही उमटले. आपला धर्म स्वीकारण्याची विनंती घेऊन मुस्लीम, ख्रिस्ती, शीख, बौद्ध आदी धर्माचे नेते बाबासाहेबांना भेटू लागले. बाबासाहेबांनी सर्व धर्मांचा खोलवर अभ्यास करणे आधीच सुरू केले होते. त्यांचा धर्मांतराचा निर्णय केवळ हिंदू धर्माच्या रागातून आलेली प्रतिक्रिया इतका मर्यादित नव्हता. धर्मत्यागामागे जीवनाच्या पूर्णतेची पूर्तता हे खरे उद्दिष्ट होते ! भारतीय संस्कृतीशी सांगडही हवी होती. ते सर्व कुठे मिळेल याचा शोध बुद्धाजवळ येऊन थांबला ।

२४ मे १९५६ रोजी नरेपार्क मुंबई येथे भगवान बुद्धाच्या २५०० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तच्या आयोजनात बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचे स्पष्ट केले. तारीख आली. ठरली. दसरा १४ ऑक्टोबर, १९५६ । स्थळासंदर्भात आधी मुंबईचा विचार झाला होता. नंतर नागपूर निवडले. या धम्मदीक्षेला ५ लाख लोक हजर होते. आधी महास्थवीर चंद्रमणी यांनी बाबासाहेबांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली, नंतर बाबासाहेबांनी उपस्थितांना धम्मदीक्षित केले. धम्मदीक्षेच्या या प्रमुख कार्यक्रमात बाबासाहेबांनी छोटेखानी भाषण केले. प्रमुख भाषण मात्र १५ ऑक्टोबरला सकाळी १० ते १२ यादरम्यान झाले. या महत्त्वपूर्ण भाषणात बाबासाहेबांनी धम्मस्वीकाराची संपूर्ण स्पष्टता केली. १६ ऑक्टोबरला चंद्रपूरला धम्मदीक्षा झाली. नंतरची दीक्षा मुंबईला १६ डिसेंबरला ठरलेली होती. पण, अचानक आभाळ फाटले. ६ डिसेंबरला दिल्ली येथे बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. ७ डिसेंबरला चैत्यभूमी, मुंबई येथे अंत्यसंस्कार झाले. याप्रसंगी जडमनाने धम्मदीक्षा देण्यात आली

असा हा धर्मातराचा प्रवास सोडणे आणि स्वीकारणे या हिंदोळ्यावर सोडणे विस्मरणात सरत गेले. स्वीकारणे विकसित होत गेले. विस्तारित होत गेले. नवे बंध फुलले. देश-विदेशातील बौद्धांशी नवे नाते जुळले. धर्मांतरानंतरची धम्मधारा वाहती राहिलेली आहे!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!