जळगावात १० एकरांवर दीक्षाभूमी, ५ कोटींचा खर्च

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिनिमित्त नागपूर शहरात दीक्षाभूमी विकसित करण्यात आलेली आहे. अगदी त्याच धर्तीवर जळगावात दहा एकर जागेवर महापालिकेच्यावतीने प्रति दीक्षाभूमी साकारली जाणार आहे. नियोजित दीक्षाभूमीचे आराखडे, खर्च इतर बाबींसाठी वास्तुविशारदाची नियुक्ती केली जाणार आहे. महापौर जयश्री महाजन यांनी हा प्रस्ताव आणला असून येणाऱ्या महासभेत तो ठेवला जाणार आहे.
पिंप्राळा भागात घरकुल परिसरात महापालिकेची ३० एकर जागा आहे. त्यातील १० एकर जागेत ही दीक्षाभूमी साकारली जाणार आहे. अंदाजित पाच कोटी रुपयांचा खर्च त्यासाठी अपेक्षित आहे. वास्तुविशारदाकडील अंदाजपत्रकात प्रत्यक्ष खर्च स्पष्ट होईल. जळगाव शहर तसेच पिंप्राळा परिसरात मागासवर्गीय समाजाची संख्या लक्षात घेता याच भागात ही दीक्षाभूमी साकारणे आवश्यक आहे. शिवाय महापालिकेची जागाही या भागात आहे. पिंप्राळ्यात साकारण्यात येत असलेले शिवरायांचे स्मारक व आता दीक्षाभूमी यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
नागपूरची दीक्षाभूमी ऐतिहासिक महत्त्वाची असून या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर गेली ६० वर्षे हे ठिकाण केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील बौद्ध धर्मीयांसाठी पवित्र मानले जाते. देशातील बोधगया या शहराव्यतिरिक्त केवळ दीक्षाभूमीवरच बोधिवृक्ष आहे. याच धर्तीवर जळगावात दीक्षाभूमी साकारली जाणार आहे.
नागपूरनंतर जळगावची दीक्षाभूमी ऐतिहासिक असेल असा प्रयत्न असल्याचे महापौरांनी सांगितले. पुढील महासभेपर्यंत खर्चाला देखील मान्यता दिली जाईल. सभागृहाची मुदत संपण्याआधी सर्वच आवश्यक त्या परवानग्या घेऊन विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.
पिंप्राळा भागात महापालिकेच्या मालकीच्या १० एकर जागेत दीक्षाभूमी साकारण्याचा प्रस्ताव आहे. नागूपरच्या धर्तीवरच येथे सुविधा निर्माण केल्या जातील. त्यामुळे मोठ्या संख्येने राष्ट्रीय पर्यटक, भाविक आणि अभ्यासक या ठिकाणी भेट देतील यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे. दीक्षाभूमीचे आराखडे व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी येणाऱ्या महासभेत वास्तुविशारदाची नियुक्ती केली जाईल. दीक्षाभूमीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल.
-जयश्री महाजन, महापौर,
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत