जाहिरातीवर क्यूआर कोड न छापल्याने ७४ बिल्डरवर महारेराची कारवाई.

गृहप्रकल्पांच्या जाहिराती करताना त्यात क्यूआर कोड प्रसिद्ध न केल्याने ७४ विकासकांवर महारेराने कारवाई केली आहे. राज्यात अशाप्रकारची एकूण १०७ प्रकरणे समोर आली असून, २५ प्रकरणांची सुनावणी झाली आहे. त्यातील सहा प्रकरणांत दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणात सुनावणी, दंडवसुली प्रक्रिया सुरू आहे. त्यासह अन्य ३३ विकासकांना कारणे दाखवा नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महारेराने १ ऑगस्टपासून गृहप्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये क्यूआर कोड छापणे बंधनकारक केले आहे. आता त्याचे पालन न करणाऱ्या विकासकांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. महारेरामार्फत मुद्रित माध्यमांसह ऑनलाइन, फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम आदी माध्यमांवर जाहिराती करताना क्यूआर कोड वापरणे बंधनकारक आहे. त्यात ऑनलाइन, फेसबुकवरील जाहिरातीत क्यूआर कोड न वापरण्याचे प्रमाण जास्त असल्याचे महारेरास आढळून आले आहे. यासंदर्भात विकासकांना नोटीस देण्यात आल्या असता त्यातील काहींनी अशा जाहिराती दिलेल्या नसल्याचे नमूद केले आहे. तेव्हा, त्यांच्या संमतीवाचून याप्रकारे जाहिराती करणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याच्या सूचना विकासकांना देण्यात आल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत