माणूस आणि माणसाचे मन बुध्दाच्या धम्माचा केंद्रबिंदू

सर्वसाधारणत: माणसाचा जन्म आपल्या आई वडिलांच्या पोटी होतो. तसा राजा शुध्दोधन व महामाया यांच्यापोटी सिध्दार्थ गौतमाचा जन्मा हा महामाया आपल्या माहेरी देवदाह नगरीला जातना लुम्बिनी वनात शालवृक्षाखाली झाला राजघराण्यात सिध्दार्थ गौतम वाढत असताना एक घटना घडली शाक्य आणि कोलीय यांच्यात रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद उत्पन्न झाला.
शाक्य संघाच्या नियमाप्रमाणे शाक्यांच्या विरोधात जाणे हे शिक्षेस पात्र होते हे सिध्दार्थ गौतमाला माहित होते. तरी सुध्दा स्वकीयांच्या विरोधात सिध्दार्थ गौतम गेला कारण कोलीयांच्या विरूध्द युध्द करणे हे सिध्दार्थ गौतमाला मान्य नव्हते. म्हणून शवेटी गृहत्यागाचा निर्णय झाला व वयाच्या 29 व्या वर्षी रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय यांच्यात युध्द होऊ नये म्हणून सिध्दार्थ गौतमाने गृहत्याग केला.
माणसा-माणसातील राष्ट्रा-राष्ट्रातील कलह का होतो या कलहाचे कारण काय? मी आणि माझे फक्त मलाच हवे इतरांना नको हा भाव या विश्वात आहे. एका युध्दाने दुस·या महायुध्दाची बिजे पेरली जातात. हे मोठे दु:खदायक आहे.यावर काही मार्ग सापडेल का याची चाचपणी घेत सिध्दार्थ गौतमाचा प्रवास सुरू झाला. कपिलमुनी, आलारकालाम, उद्दकरामपुत्त आदी ऋषींच्या आश्रमात राहून ते ज्ञान समजून घेत असत.
आश्रमातील ज्ञान समजून घेतल्यावर सिध्दार्थ गौतम त्या ऋषींना प्रश्न विचारी तुमच्याकडे एवढेच ज्ञान आहे पुढे आणखी काही आहे ? तेव्हा ते ऋषी म्हणायचे आमच्याकडे जेवढे होते ते झालं तेव्हा सिध्दार्थ गौतमाला वाटे की माणसाच्या दु:खाला या तत्वाज्ञानाचा काय उपयोग ? आणि मग तो पुढे मार्गस्थ होई. शेवटी कडक तपश्चार्य केली शरीराला क्लेष दिला अगदी मृत्यु येईल एवढी काया क्षीण झाली पण या मार्गाने काही उपयोग नाही म्हणून (गया) उरुवेला येथे नेरंजना नदीच्या काठावर बोधिवृक्षाखली चिंतनासाठी बसला.
सहा आठवडे चिंतन केल्यानंतर वैशाख पोर्णिमेला पिंपळवृक्षाखली ज्ञानाची प्राप्ती होऊन ते सम्यक सम्बुध्द झाले. जगामध्ये दु:ख आहे, त्याला कारण आहे ते दूर करता येते ते दूर करण्याचा उपाय आहे. या मानवी दु:खवर उपाय शोधून काढला म्हणून बुध्दत्व, बुध्द ही सिध्दार्थ गौतमाची स्वत:ची उपलब्धी आहे.याच भूमित ही ज्ञान प्राप्ती झालेमुळे ‘बुध्द’ हे या भारताचा गौरव आहे. म्हणून तर आज जग बुध्द विचाराचा स्विकार करताना दिसत आहे.
भगवान बुध्दाने आपल्या तत्वज्ञानात ‘माणूस’ केंद्रबिंदू मानला आणि माणसाचे मन हे प्रमुख आहे. हा नवा विचार मांडला. लोक कल्याणाचा सुगम मार्ग भगवान बुध्दाने प्रशस्त केला. माणसाला दु:खमुक्तीसाठी स्वत: पुरूषार्थ केला पाहिजे त्यासाठी ‘अत:दिपभव’ अर्थात स्वत: प्रकशित व्हा, म्हणजेच ज्ञानी व्हा हा विचार अनुभवाने दिला. भगवान बुध्दाने दिलेला नैतिक विचार आहे. अर्थात धम्मामध्ये नैतिकेला प्राधान्य दिलेले आहे.
भगवान बुध्दाचा धम्मा हा एक जिवन मार्ग ओ. या मार्गामध्ये माणसाच्या सुखाचा विचार आहे. पण माणूस सुखाच्या नादात दु:खाला जवळ करतो हे आज आपण पहात आहोत. परंतु भगवान बुध्दानी ‘मध्यम’ मार्गाची शिकवण देवून ‘सुखी’ समाज निर्माण करण्याचा विचार दिला. माणूस हा समाजशील प्राणी आहे.म्हणून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे यालाच बुध्दानी ‘धम्म’ असे म्हटलेले आहे.
भगवान बुध्दाचा धम्म सर्वप्रकारच्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीमध्ये जगभरातल्या लोकांनी स्विकारला त्याच कारण बुध्दाचा हा विचार प्रत्येक माणसाला आपला वाटतो.त्याच कारण माणसाच्या कल्याणाचा विचार बुध्दाएवढा कुणीच सांगितला नाही. इथे पुजेचं, अभिषेकचं, तिर्थाटनाच, स्नानाच, स्वर्गाचे प्रलोभन नाही, नरकाच भय नाही. बुध्दान सांगितलं अत्त दिप भव स्वयं प्रकाशित व्हा ! अर्थात ज्ञानी व्हा मी मार्गदाता आहे. मी मोक्षदाता नाही. सदाचरणाने माणसाला महानता प्राप्त होते म्हणून संसारीक जिवनात जगताना किमान पंचशीलाच पालन केल्यास माणूस सुखी झाल्याशिवाय राहत नाही.
हिंसेच समर्थन कुणीही शहाणा माणूस करत नाही. हिंसेमुळे माणूस दु:खी होतो. चोरीच समर्थन कुणीही करत नाही. व्यभिचाराच समर्थन कुणीही करत नाही. खोट बोलणे कुणालाच आवडत नाही. नशापाणी करणे हे मानवी हिताच आहे असे कुणीच म्हणत नाही. जे वाइट आहे त्यात माणसाचे अकल्याण आहे ते न करण माणसाच्या हिताच आहे. हे पंचशील बुध्दानी जे सांगितले ते जगातल्या कुठल्याही माणसाने स्विकारावीत अशीच आहेत.
आज समाजात भ्रष्टाचार, बलात्कार, खुन, मारामारी, चो·या फसवा-फसवी आदी घटना घडताना आपण पाहतो. वाईट दुष्कर्मामुळे समाज मन व्याकुळ होताना आपण पाहतो आणि हळहळतो एका माणसाकडून दुसरा माणूस सुखी होण्यापेक्षा एका माणसाकडून दूसरा माणूस दु:खी होणे हे काही समाज हिताच नाही. म्हणून भगवान बुध्दाने सब्बे सत्था सुखी होन्तू सर्व समाजाच्या सुखाचा विचार मांडला. म्हणून माणसाचं मन निर्मळ होणे गरजेचे आहे. त्यासाठी धम्मपदामध्ये बुध्द म्हणतात.
सर्व काही गोष्टी प्रथम मनामध्ये उत्पन्न होतात.मन हेच प्रमुख आहे. मनोमय आहे.जेव्हा माणूस मलिन मनाने बोलतो वा कार्य करतो तेंव्हा दु:ख त्याच्या पाठीमागे तसेच धावते जसे बैलाच्या पाया मागे गाडीचे चाक धावत असतात. जेव्हा एखादा माणूस निर्मळ मनाने बोलतो किंवा कार्य करतो तेव्हा त्याच्या सोबत सुख असे राहते जसे आपल्या सोबत कायम असणारी सावली. माणसाचे काया वाचा मन यामध्ये माणसाचे मन प्रमुख आहे. शरीराचा प्रत्येक भाग हा मनात उत्पन्न होणा·या चांगल्या वा वाईट गोष्टीची कृती फक्त करत असतो. म्हणून आज तुरूंग अपूरे पडत आहेत. गुन्हेगारी वाढत आहे. ती रोखण्याचे सामाथ्र्य फक्त बुध्दाच्या धम्मात आहे.
समाज काही गोष्टीच्या भोवती सातत्याने फिरत राहतो. जसे यश-अपयश, स्तुती – निंदा, सुख-दु:ख, जय-पराजय यशाने माणसे माणसे हुरूळन जातात तर अपयशाने खचतात, माणसाला स्तुती प्रियवाटते, निंदा अप्रिय वाटते, सुख हवे असते तर दु:ख नको असते. माणसाला सतत विजय आवडत असतो. पराजय नकोस वाटतो. म्हणून बुध्दाने माणसाला समभावात अथवा तटस्थ पणे जिवनाकडे बघण्याचा विचार दिला. सावधपणाने, संयमाने, जागृततेने जीवन जगण्यात माणसाचे हित-सुख दडलेले आहे हा विचार भगवान बुध्दाने या देशाला शिकवला.
भगवान बुध्दाचा कार्यकारणभावाचा सिध्दांत म्हणजे शुध्द विज्ञानवादी विचाराची स्पष्टता आहे. कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. अचानक, चमत्कार या गोष्टींना बुध्द विचारात थारा नाही. ‘जे काही अस्तित्वात येते ते सर्व बदलणा·या जरा जीर्ण होणा·या आणि मरण धर्मी स्वभावाचे आहे’ हे अनित्य आहे. बदलणारे आहे (कायम) नित्य काही राहत नाही. निर्माण होणे आणि नष्ट होणे हा निसर्गाचा स्थायीभावन आहे. हे सत्य केवळ भगवान बुध्दानीच मांडले.
बुध्द मोक्षाचे आश्वासन देत नाही. निर्दोष जीवन जगून निर्वाण मिळवण्याचा सदाचरणाचा मार्ग सांगतात. निर्वाण मृत्युनंतर नाही, तर याच जन्मी लोकांच्या कल्याणार्थ निर्दोष जीवन जगणे होय. बुध्द इहलोकवादी जीवनावर भर देतात. कारण इथलेच जगणे वास्तव आहे. काही पंरपरा या परलोक वाद मानतात. मृत्युनंतरच्या जीवनाची चिंता काय कामाची? आजच वास्तव जगण सुखी कस होईल यावरच भगवान बुध्दाने विचार दिले.
जन्म शालवृक्षासाठी, ज्ञानप्राप्ती पिंपळवृक्षाखाली, महापरिर्वाण शालवृक्षाखाली म्हणजे जन्मापासून महापरिनिर्वाणापर्यत निसर्गाच्या खुल्या वातावरणात राहून निगर्साचा अनुभव घेत विज्ञानवादी विचार या जगाला दिला. 45 वर्ष पायी फिरून 80 व्या वर्षापर्यंत या देशातल्या प्रत्येक माणसाला बुध्द विचार देत राहीले. या सर्व घटनांच्या पाऊल खुणा भारताच्या इतिहासामध्ये आजही दिसतात. वैशाखा पोर्णिमा भगवान बुध्दाच्या जीवनामध्ये जन्म, ज्ञानप्राप्ती, परिनिर्वाण एवढया घटनांची साक्षीदार आहे. म्हणूनच बुध्द पोर्णिमा म्हणून वैशाखा पोर्णिमा जगभर साजरी केली जाते.
आज जगाला भेडसावणारे प्रश्न आहेत. दहशतवाद, आंतकवाद, नक्षलवाद, जातीयवाद, सांप्रादायीक दंगे, यावर उपाय केवळ बुध्दाच्या विचारातच आहे. म्हणून बुध्द विचाराची नैतिकता समाजात रूजणे समाजहिताचे आहे त्यासाठी ज्ञानी आणिनिर्मळ मनाचा माणूस निर्माण होणे यातच माणसांचे आणि जगाचे कल्याण आहे.
बुध्द जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
समाजभुषण
केशव कांबळे
बौध्द नगर, लातूर
मो.नं.9421455799
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत