देशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

बहुजन समाज कृतघ्न आहे काय?- प्रा. हरी नरके

प्रा. डाॅ हरी नरके सरांचा हा 2019 मध्ये लिहलेला लेख

महात्मा जोतीराव फुले शेतकरी, व्यापारी, ग्रंथप्रकाशक, ग्रंथविक्रेते, आयुक्त आणि एका मोठ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. सचोटीने, अपार मेहनतीने आणि रात्रंदिन काम करून त्यांनी संपत्तीची निर्मिती केली. ती सगळी संपत्ती त्यांनी वंचित, दलित, बहुजन आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी खर्चून टाकली. त्यांना पक्षाघाताचा [ पॅरलिसिस ] आजार झाला तेव्हा त्यांच्याकडे औषधपाण्यालाही पैसे नव्हते. डॉ. विश्राम रामजी घोले आणि भवाळकर या मित्रांनी त्यांना थोडीफार मदत केली. मामा परमानंद यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांना वैद्यकीय मदतीसाठी आवाहन केले. महाराज परदेशात असल्याने मदत यायला उशीर झाला, तोवर औषधपाण्याविना २८ नोव्हेंबर १८९० ला जोतीरावांचे निधन झालेले होते.

त्यांनी ब्राह्मण विधवेच्या दत्तक घेतलेल्या मुलाला डॉक्टर केलेले होते.

त्याने पुढे सैन्यात देशविदेशात नोकरी केली. १८९७ च्या प्लेगच्या साथीत रूग्णांना मदत करीत असताना प्लेग होऊन सावित्रीबाई १० मार्च १८९७ ला गेल्या. डॉ. यशवंतही १९०५ सालच्या प्लेगच्या साथीत काम करताना गेला.

त्याच्या मुलीकडे आणि पत्नीकडे उदरनिर्वाहासाठी काहीही नसल्याने त्यांनी जोतीराव- सावित्रीबाईंची पुस्तके रद्दीत विकली. दागिने आणि भांडीकुंडी विकून संपली. शेवटी त्यांनी जोतीराव- सावित्रीबाईं घर शंभर रूपयांना विकले. दोघीजणी खडकमाळ आळीच्या फूटपाथवर राहू लागल्या. पुढे मुलीचे एका सापत्य विधूराशी लग्न झाले. सून मात्र रामेश्वराच्या दारात भिक मागुन जगत होती. १९३३ मध्ये ती गेली तेव्हा पुणे नगरपालिकेने तिचा बेवारस म्हणून अंत्यविधी केला.

त्याकाळात सत्यशोधक चळवळ जेधे जवळकरांच्या ताब्यात होती. केशवराव जेधे कोट्याधिश होते. त्यांच्या जेधे मॅन्शन या भव्य वाड्यापासून हाकेच्या अंतरावर जोतीराव- सावित्रीबाईंची सून भिक मागून जगली आणि फूटपाथवर बेवारस म्हणून मेली तेव्हा कोणीही मदतीला आले नाही. त्यावेळी अनेक बहुजन श्रीमंत होते पण त्यांच्याकडे दानत नव्हती. तशी ती आजही नाही. निवडणुकीवर आणि धार्मिक कार्यांवर कोट्यावधी रूपये सहज उधळणारे बहुजन लोक सामाजिक कामासाठी दमडीही खर्चायला पुढे येत नाहीत.

जोतीराव फुले “पुणा कमर्शियल ॲण्ड कॉट्रक्टींग कंपनी”चे मॅनेजिंग डायरेक्टर होते. कंपनीने बोगदे, पूल, इमारती, राजवाडे, धरणं, कॅनाल, रस्ते बांधले. बांधकामांसाठी वाळू, खडी, चुना पुरवला. पुस्तकप्रकाशन व विक्री केली. भाजीपाला पुण्याहून मुंबईला पाठवून विकला. सोन्याचे दागिने बनवण्याच्या मुशी [मोल्ड्स] विकल्या. अनंत व्यवसाय यशस्वीपणे केले. मुबलक संपत्ती कमावली. पण ती सगळीच मुलींच्या शाळा, वसतीगृहे, विधवांसाठीचे बालहत्त्या प्रतिबंधक गृह, शेतकरी, दलित-वंचित-बहुजनांवर खर्च केली.

स्वत:साठी पैसुद्धा शिल्लक ठेवली नाही.

ज्यांच्यासाठी ते आयुष्यभर झटले, राबले त्या बहुजनसमाजाला जोतीरावांना औषधोपचारांसाठी मदत करावी असे का बरे वाटले नाही? त्यांच्या सुनेला मदत करायची दानत जेधे-जवळकरांमध्ये का नव्हती? बहुजन समाजाला कृतघ्नतेचा शाप आहे काय? वंचित बहुजन समाज कृतज्ञता बुद्धीला पारखा आहे काय?

-प्रा.हरी नरके, ११ एप्रिल २०१९

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!