
लेख : २२ एप्रिल – जागतिक वसुंधरा दिन
बंधू-भगिनींनो,जैविक विविधता ही पृथ्वीवरील मानव,वृक्षवल्ली,वन्य
पशुपक्षी,जलचर प्राणी या सर्वांच्या जीवनाचा मूळ आधार आहे.या पार्श्वभूमीवर जैविक विविधता जपणे,सांभाळणे अन् तिचे संवर्धन करणे हे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे.वास्तवात वनस्पती हा जैविक विविधतेचा एक महत्वपूर्ण घटक असून,आपल्या
अन्नसाखळीतला महत्वाचा दुवा आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून जनजागृतीच्या उद्देशाने २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.यातून पृथ्वी, जल,वायू,अग्नी व आकाश या पंचतत्त्वांचे रक्षण अन् संवर्धन करण्याचा संदेश जगातील नागरिकांना दिला जातो.या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारचे पर्यावरण विभाग जनजागृती करून वृक्षारोपण आणि पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासंबंधी नागरिकांना आवाहन करते.
जगातील विविध देशांमध्ये केमिकल इंडस्ट्रीमुळे जल,वायू,वनस्पती,जलचर प्राणी यांचे होत असलेल्या नुकसानीमुळे
पर्यावरणवाद्यांनी रोष व्यक्त करत आंदोलने केली,रॅली काढल्या.अन् अशा बेकायदेशीर केमिकल कारखान्यांविरुद्ध कडक कायदे करून निर्बंध लादण्यासंदर्भात मागणी जोर धरू लागली.अन् पुढे यासंदर्भात सॅन फ्रासिस्को येथे युनोस्कोची आंतरराष्ट्रीय परिषद भरून
पर्यावरणवाद्यांनी वसुंधरा बचाव चा नारा दिला.तसेच वसुंधरा बचाव दिन जगभरात साजरा करण्यासंदर्भात कल्पना मांडण्यात आली.या कल्पनेला सर्वानुमते मान्यता मिळून संयुक्त राष्ट्रसंघाचे सिनेटर गेलोर्ड नेल्सन यांच्या पुढाकाराने २२ एप्रिल हा दिवस १९७० सालापासून वैश्विक पातळीवर वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर देशांमध्ये गांभीर्याने पर्यावरण रक्षण व
संवर्धन या विषयावर ठोस उपाययोजना केल्या जाऊ लागल्या.त्याची फलश्रुती म्हणजे २२ एप्रिल २०१६ रोजी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासंदर्भात पॅरिस करार झाला.इतकेच नव्हे तर,पुढील काळात २२ एप्रिल २०२० या जागतिक वसुंधरा दिनी एंड प्लास्टिक
पॉल्युशन हे घोषवाक्य जाहीर केल्याने प्लास्टिक उत्पादन,विक्री व वापरावर स्थायी स्वरूपाचे निर्बंध घालण्यात आले.अशा रितीने प्लास्टिकच्या दुष्परिणामांची नागरिकांना जाणीव होत गेल्याने प्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तूंचा वापर कमी होऊन कापडी पिशव्यांचा वापर करण्यावर नागरिकांकडून पसंदी मिळणे,ही पर्यावरण संवर्धनाची नांदी आहे.
विशेष म्हणजे २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सारी मुंबई पाण्यात तुंबली होती.त्यामागील मुख्य कारण म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्या व अन्य वस्तू पाण्याच्या प्रवाहांमध्ये जागोजागी चोकअप झाल्याने सर्वत्र पाणी तुंबले आणि त्यामुळे सारे जनजीवन ठप्प होऊन जानमालचे मोठे नुकसान झाले होते.या पार्श्वभूमीवर तत्कालिन राज्य सरकारने प्लास्टिक उत्पादन व वापरावर बंदी आणली.या गंभीर घटनेपासून बोध घेऊन केंद्र-राज्य सरकार अन् नागरिक यांनी सांघिक जबाबदारी समजून वसुंधरा बचावासाठी जे जे करणे आवश्यक आहे,ते ते करावे,जेणेकरून पुढच्या पिढ्या आनंददायी,सुरक्षित व सुखाने जीवन जगू शकतील.वसुंधरेचं सौंदर्य वृध्दिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून शाळा-कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी युद्धपातळीवर वृक्षारोपण मोहीम राबविली पाहिजे.त्याप्रमाणेच प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन/संवर्धन करण्याची सामाजिक जबाबदारी स्वीकारावी.जेणेकरून वसुंधरेप्रती असलेलं आपलं उत्तरदायित्व सिद्धीस येईल.
जागतिक वसुंधरा दिनाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत जैविक विविधतेचे रक्षण व संवर्धन करण्यासंदर्भात युद्धपातळीवर पावलं उचलली जात आहेत,ही दिलासा देणारी गोष्ट आहे.आपल्या पुढच्या पिढींना आनंदी व आरोग्यदायी जीवन जगता यावे,या प्रांजळ उद्देशाने मानवाला जैविक विविधता जपायलाच हवी.त्याशिवाय दुसरा तरणोपाय नाही.तात्पर्य,जगातील प्रत्येक लहान-मोठ्या देशाने प्रदूषणावर निर्बंध घालण्यासाठी कठोर कायदे करून पृथ्वी अर्थातच वसुंधरेच्या संवर्धनासाठी ठोस पावलं उचलणे काळाची गरज आहे,त्यातूनच मानवजात सुरक्षित राहू शकेल.
वसुंधरा ही आपली जननी आहे,तिने मानवात कुठलाही भेदभाव न करता,सर्वांना आपल्या कुशीत सामावून घेतलं आहे.महत्वाचे म्हणजे वसुंधरेने तुम्हा-आम्हास सर्वांना शुद्ध हवा अर्थातच प्राणवायू,स्वच्छ व शुद्ध वातावरण,धनधान्य,
फळे-फुले दिली आहेत.कृतज्ञतेच्या भावनेतून मानवाने नद्या-नाले,समुद्र,
जंगलं,अरण्ये,वृक्षवल्ली,
पर्वते ह्या वसुंधरेच्या कवचकुंडलांचे जतन व संवर्धन केले पाहिजे,जेणेकरून तिला माझी वसुंधरा म्हणणे साध्य होऊन जागतिक वसुंधरा दिन साजरा करणे खऱ्या अर्थानं सार्थक होईल. आपणा सर्वांना जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लेखक-रणवीर राजपूत,ठाणे
गवर्नमेंट मिडिया,माहिती व जनसंपर्क,महाराष्ट्र शासन
……………………………………..
संपादक महोदय
कृपया आपल्या वृत्तपत्रात सदर लेख २२ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध करावा,ही विनंती.🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत