
तथागत बुद्धाने जातीव्यवस्था विध्वंसनाचा समतेचा आणि निरीश्वरवादी सत्यशोधनाचा माणूस केंद्रबिंदु ठेवणारा विचार देवून बदलेली समाजव्यवस्था,बुद्धाच्या महापरिनिर्वानानंतर ब्राह्मणांनी काशाय वस्रे पांघरुन केलेल्या अपप्रचारातुन ब्राह्मणी धर्मियांनी बुद्ध तत्वज्ञान विपर्यस्त करतांनाच विषमतेची पेरणी,यज्ञसंस्थेची पुर्नमांडणी आणि बौद्धांचे संहार यातुन नामशेष केली.
अनेक बौद्ध स्थळांचा विध्वंस करीत असतांना जगात गेलेले बौद्ध तत्वज्ञान भारतात पुन्हा परतु नये;या साठी शंकराचार्याने चार दिशांना शंकराचार्यांच्या चार पीठांची स्थापना केली.
परंतु,ब्राह्मणी समाजव्यवस्थेच्या रक्षणासाठी हिंसक होऊन बुद्ध विचारांचा विनाश करणार्या ब्राह्मणांवर धर्मरक्षणापेक्षाही नेहमीप्रमाणेच लोभाने मात केली आणि ते परस्परांना नामशेष करण्यासाठी अनेक परकिय राजांसाठी पायघड्या अंथरु लागले.
अनेक परकियांकडुन त्यांनी स्वत:च त्यांच्या धर्मस्थळांचीही लुट करवली.त्यांच्या परकीय शासन व्यवस्था इथे प्रस्थापित केल्या.त्यातुनच शिवाजीपुर्व काळात इथे दिल्लीचे मोगल,गोवळकोंड्याचा कुतुबशहा,आदिलशहा,निजामशहा आदी अनेक परकियांचे स्वागत करणार्या , परकियांना आपल्या बहिणी-मुली नजर करणार्या इथल्या राजे-महाराजे आणि धर्मसत्तेचा इथल्याच प्रजेबाबतचा दृष्टीकोन मात्र कायम शोषण आणि पीळवणूक करण्याचाच होता.
या पीळवणुक-शोषणातून भेदाभेद केल्या जाणार्या समुहातील पिडीतांनी मोठ्या प्रमाणावर केलेले धर्मांतरही त्यांना मान्य होते.शिवाजी सारख्या राजाचीही या शोषण-पीळवणूकीतुन सुटका नव्हती.
याच काळात व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीज आणि इंग्रजांचेही स्वागत इथल्या राजसत्तेने आणि धर्मसत्तेने मुस्लिम राजांच्या केलेल्या स्वागता इतक्याच उतावळेपणाने केले.
या आक्रमकांपैकी इतर आक्रमकांनी आपल्या सत्तेचा जेव्हढा पसारा पसरवला नव्हता,त्याहीपेक्षा देशभरातील सर्व राजेमहाराजांना गुलाम करत इंग्रजी सत्तेचा पसारा देशभरात पसरला.शिवाजीचे राज्य बळकावणार्या पेशव्यांनी याच काळात आपल्या जातीय अत्याचारांची सीमा अस्पृश्यांकडुन चढत्या भाजणीने शुद्र आणि कायस्थ-देवज्ञ ब्राह्मणांपर्यंत पसरवत नेली.ब्राह्मणांसारखे राहतात म्हणून अनेक सारस्वत,देवज्ञ ब्राह्मणांचे कुल्ले कापुन धींड काढल्या जात असतांनाच ब्राह्मण स्त्रियांवरही अनन्वीत अत्याचार सुरु झाले.या अत्याचारांतुनच इंग्रजांच्या शासन-न्यायव्यवस्थेची पाळेमुळे देशभरात पक्की होवू लागली.
इंग्रजांनी इथल्या शुद्र आणि अस्पृश्यांना शिक्षण,सैन्य,कारभाराच्या संध्या उपलब्ध करुन देण्यास सुरवात केल्यानंतर मात्र कारभाराच्या नाड्या हातातुन जाण्याच्या भयाने पछाडलेल्या इथल्या हिंदु-मुस्लिम राजांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यास सुरवात केली.
या गुलाम राजांच्या आणि उच्च जातीयांच्या बंडाला स्वातंत्र्य लढा म्हणता येणे शक्य होते काय?
या समाजव्यवस्थेकडुन मिळणार्या पशुतुल्य वागणुकीमुळेच इंग्रजांच्या अस्पृश्य सैन्याने भीमा-कोरेगावमध्ये पेशव्यांचे सैन्य कापुन काढण्याचे शौर्य गाजवले होते.
याच काळात जोतिराव गोविंदराव फुलेंसारख्या समाज सुधारकांनी स्रिया आणि अस्पृश्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे आणि आपला पाणवठाही खुला करुन दिला होता.माणसामाणसात भेदाभेद करणार्या ब्राह्मणी देव,धर्म,धर्मग्रंथांविरोधात मोठी मोहिम राबवली होती.जातपातविरहीत नव्या समाजव्यवस्थेची मांडणी सुरु केली होती.
एका बाजुला हिंदुधर्मातील अस्पृश्यापासुन ते ब्राह्मणांपर्यंतचा इंग्रजांच्या ख्रिस्तिधर्माकडे चाललेला ओघ;तर दुसरीकडे इंग्रजीसत्तेचे कारभारी म्हणून असलेले ब्राह्मणी वर्चस्व संपुन गुलाम बहुजन-अस्पृश्यांच्या हातात कारभार जाण्याच्या भयातुनच इंग्रजांविरुद्धचा असंतोष वाढत होता.
या भयगंडातूनच हिंदु राजे आणि मुस्लिम राजांच्या इंग्रज सत्तेविरोधातील बंडाची बीजे पेरली गेली होती.
दुभंगलेल्या बहुजन जाती आणि अस्पृश्य जाती फुलेंच्या सत्यशोधक चळवळीमुळे ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात एकवटू लागल्या होत्या.ब्राह्मणी व्यवस्थेने लादलेली धार्मिक कर्मकांडे ठोकरू लागल्या होत्या.
जोतिराव फुलेंच्या निधनानंतर ब्राह्मणांनी आणि टिळकांनी पुन्हा सामाजिक बदलांना अवरोध उत्पन्न केला.सामाजिक बदलांबाबत कर्मठ असलेले टिळक शुद्र हिंदुंमधुन मुस्लिम झालेल्या बॅ.जीनांबाबत मात्र पुर्ण पुरोगामी होते.त्यातुनच टिळकांनी मुस्लिमांना अधिकार देणारा लखनौ करार बॅ.जीनांबरोबर केला होता;तर बॅ.जीनांनी टिळकांविरोधातील खटला लढवला होता.
ही मैत्री इतकी घट्ट होती की,अस्पृश्यतेच्या समर्थक ब्राह्मण टिळकांच्या प्रेताला पहिला खांदा मुस्लिम जीना आणि वैश्य गांधींनी दिला होता.
गांधी उदयानंतर उच्चवर्गीय हिंदुंच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्याचे केंद्र ब्राह्मण टिळकांकडुन वैश्य गांधींकडे पोहचले.
गांधींनी या स्वराज्य आंदोलनाचा असंतोष उच्च वर्गाकडून बहुजन आणि अस्पृश्यांपर्यंत झीरपवला,धर्मव्यवस्थेने गुलाम ठरवलेल्या महिलांनाही त्या स्वातंत्र्य लढ्यात गांधींजींनी उतरवले;हे या लढ्याचे मोठे यश असले तरी त्यामुळे अस्पृश्य आणि स्रियांबाबतच्या समाजाच्या वर्तणुकीत बदल होत होता काय?
या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ हेच होते.
या काळातच इंग्रजी सत्तेमुळे आणि जोतीबा फुलेंनी बहुजन-अस्पृश्यांमध्ये केलेल्या जागृतिमुळे शिक्षणाची ओढ वाढू लागली होती. शिकून सैन्यातला शिक्षक झालेल्या सुभेदार रामजी सकपाळांनी आपल्या लाडक्या भीमाला शिकवण्याचा वीडा उचलला. भीमराव आंबेडकरांसारखे त्या काळातील भारतातील सर्वाधिक उच्चशिक्षित आणि जागतिक पातळीवरील विद्वान नेतृत्व अस्पृश्यांच्या मानवी हक्क लढ्याला लाभले.
हे केवळ अस्पृश्यांच्या लढ्याचेच यश नव्हते;तर गांधीच्या देशपातळीवरील नेता ह्या प्रतिमेलाही मोठा पर्याय धर्म-समाजव्यवस्थेत चेहरा नसलेल्याअस्पृश्य समाजातुनच निर्माण झाला होता.त्या चेहर्याचे नाव होते;डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर.
गांधीजी ज्यावेळी स्वातंत्र्य लढ्याला सार्या भारतियांच्या सार्वत्रिक लढ्याचे स्वरुप द्यायचा अटापीटा करीत होते.त्यावेळी डाॅ.आंबेडकर अस्पृश्यांवर उच्चवर्गीय हिंदुंनी हजारो वर्ष लादलेल्या पशुतुल्य गुलामी विरोधात मानवी स्वातंत्र्याचा लढा उभारत होते.
साहजिकच शंभर सव्वाशे वर्षाच्या इंग्रजी सत्तेविरोधात लढणार्या गांधी आणि गांधीभक्तांसाठी डाॅ.आंबेडकर देशद्रोहीच नव्हते काय?
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रहानंतर अवघ्या दहा महिन्यांतच अस्पृश्यतेच्या आणि स्री गुलामीच्या धार्माज्ञा देणार्या मनुस्मृतीची चवदार तळे सत्याग्रह परिसरातच भरवलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेने गंगाधरशास्री सहस्रबुद्धे या ब्राह्मणाच्याच हाताने दहन करणे म्हणजे गांधींच्या राजकिय नेतृत्वालाच नव्हे;तर एकुणच हिंदु धर्मालाही मोठे अव्हान नव्हते काय?
त्याहीपुढे जावुन गांधींची राष्र्टीय चळवळ;” सायमन कमिशन परत जा!”अशी निदर्शने करीत असतांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कमिशन समोर अस्पृश्यांच्या प्रश्नांचे निवेदन देतात.
गांधींनी पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला असतांना हा अस्पृश्यांचा नेता त्या परिषदेला निघतो;हे सवर्णांच्या स्वातंत्र्य लढ्याविरोधातले वर्तन नव्हते काय?
आता मोदी अनुयायी जसे त्यांचे विचार न स्वीकारणार्यांना देशद्रोही ठरवून टाकतात.अगदी तस्सेच गांधी अनुयायांनीही डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या अस्पृश्य जागतिक विद्वानास देशद्रोही ठरवुन टाकले.ते ज्या जहाजाने गोलमेज परिषदेला चालले होते.तेथे त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा “देशद्रोही देशद्रोही” म्हणून उद्धार केला.
बाबासाहेबांनी मात्र त्या गोलमेज परिषदेतच इंग्रजी सत्तेच्या केंद्रात जावून इंग्रजांना खडसावले;”इंग्रज येण्याअगोदर भारतात अस्पृश्यांना जी पशुतुल्य वागणुक भेटत होती.तिच्यामध्ये इंग्रज सत्तेने काहीही बदल न झाल्याने इंग्रजांनी भारतातुन चालते व्हावे.”
बाबासाहेबांनी मांडलेली ही परखड भूमिका स्वातंत्र्य आंदोलनातील गांधीजींसह कोणताही नेता तो पर्यंत घेऊ शकला होता काय?
पर्यायाने ज्या गांधी अनुयायांनी बाबासाहेबांना देशद्रोही ठरवुन काळे झेंडे दाखवले होते.त्या गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनाही;”डाॅ.आंबेडकर;तुम्हीच खरे देशभक्त अहात.”हे स्वीकृत करावे लागले होते.
बाबासाहेबांचे “खरे देशभक्त” म्हणून कौतुक करणार्या गांधींची दुसर्या गोलमेज परिषदेतील भूमिका पुन्हा बदलली.त्यांनी आपणच भारतातील अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी असुन डाॅ.आंबेडकर इंग्रज सत्तेचे प्रतिनिधी असल्याचा कांगावा केला.
पण,गांधी अनुयायांनी गांधींच्या जयघोष करत भारतातील अस्पृश्यांवरील केलेल्या हल्ल्यांच्या बातम्या असलेली वृत्तपत्रेच बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेसमोर ठेवुन गांधी आणि त्यांच्या अनुयायांच्या अस्पृश्यांबाबतच्या मानवताद्रोही भूमिकेची लक्तरे जगाच्या वेशीवर या परिषदेत काढली.
डाॅ.आंबेडकरांच्या अस्पृश्यांबाबतच्या मागण्यांना मुस्लिम आणि शिखांनी विरोध करण्याच्या मोबदल्यात त्यांच्या सर्व मागण्यांना पाठिंबा देण्याचा गांधींनी केलेला सौदाही बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेतच उघडकीला आणला.तरीही गांधीजींनी “अस्पृश्य एकवेळ मुस्लिम झाले तरी चालतील.परंतु अस्पृश्यांना स्वतंत्र हक्क मिळाल्यास प्राण पणाला लावायची धमकी” दिली.
या गोलमेज परिषदेतील निवाड्यानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ जाहिर होताच.गांधींनी खरोखरच आपले प्राण पणाला लावले.या निवाड्याच्या विरोधात पुण्याच्या येरवडा जेलमध्ये प्राणांतिक उपोषणास सुरवात केली.
अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाविरोधातील हे प्राणांतिक उपोषण मानवी मूल्यांना धरुन होते की, त्यांच्या महात्मेपणाला धरुन होते?
एखादा खंडणी वसुल करणारा जसा एखाद्याच्या भेजावर पीस्तुल रोखुन;”जीव प्यारा असेल तर बर्या बोलाने तुझ्या जवळची मला हवी असलेली वस्तु मला दे,नाही तर तुझा जीव घ्यावा लागेल.”अशी धमकी देतो.तश्याच पद्धतीचे हे वर्तन नव्हते काय?
गांधीजींनी स्वत:च्या भेजावर प्राणांतिक उपोषणाचे पिस्तुल रोखुन बाबासाहेबांना;”डाॅ.आंबेडकर;तुम्हाला मिळालेली स्वतंत्र मतदार संघाची संपत्ती बर्या बोलाने माझ्या स्वाधीन करा.नाही तर मी जीव देतो आणि माझे खूनी म्हणून तुम्हाला घोषित करतो.”अश्याच प्रकारची अहिंसेच्या पूजार्याची दिलेली ही हिंसेची धमकी नव्हती काय?
या प्राणांतिक उपोषणामुळे जर गांधींच्या मृत्यू ओढवला असता तर गांधी अनुयायांकडून अस्पृश्यांचा होवू पहाणारा वंशसंहार थांबवण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदार संघांचा त्याग करुन गांधीजींच्या इच्छेनुसार हिंदु पुढार्यांसोबत आरक्षणाचा करार केला.
हा करार अस्पृश्यांसाठी कवचकुंडले होती की हिंदुच्या अस्पृश्यांप्रती पशुतुल्य वर्तणुकीमुळे हिंदु धर्मातुन बाहेर पडू पाहणार्या अस्पृश्यांना आरक्षणाच्या साखळदंडांत कैद करणारी हिंदु धर्मासाठीची कवचकुंडले होती?;हा गहण प्रश्न आहे.
पुणे कराराद्वारे अस्पृश्यांना हिंदु धर्मातच गुलाम करण्याचा गांधींचा डाव सफल झाला तरी सनातनी हिंदुंना हे आरक्षण आजच्या इतकेच त्याही वेळी अमान्य होते.त्यातुनच नत्थुराम गोडसेने पुणे करारानंतर काही काळाने येरवडा तुरुंगातच गांधीजींचा धीक्कार करण्यासाठी त्यांना तुटक्या खेटराची भेट पाठवली होती.
पाठोपाठच गांधीजींची येरवडा तुरुंगातून सुटका होताच गांधीजींनी काढलेल्या पुणे ते चंपारण्य हरीजन यात्रेत गांधींवर पहिला चाकू हल्ला करुन त्यांच्या खूनाचा पहिला अपयशी कट १९३२मध्येच अमलात आणला नव्हता काय?
१९३२पासून हिंदु अतिरेक्यांनी गांधी खूनाचे जे पाच प्रयास केले.त्यामध्ये ३०जानेवारी१९४८रोजी केलेल्या पाचव्या हल्ल्यात अतिरेकी हिंदू गांधीजींचा खून करण्यात यशस्वी झालेच.
अस्पृश्यांपासुन हिंदु धर्माच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणार्या गांधींचा खूनही हिंदु धर्म रक्षणाच्या नावाने हिंदु अतिरेक्यांनीच केला नव्हता काय?
गांधीजींच्या या खूनाला वेगळे वळण देण्यासाठी या अतिरेक्यांनी “पाकिस्तानला पंचावन्न कोटी द्यायचा गांधीजींचा हट्टाग्रह अमलात आणल्यामुळे गांधींचा खून केल्याचे कारण देण्यात आले.
गांधीजींचा खून जर भारताच्या फाळणीतुन गांधींच्या मुस्लिम अनुनयामुळे केला गेला असेल; तर स्वातंत्र्य दृष्टीपथात नसतांना अथवा पाकिस्तानच्या कल्पनेचा उगमही झालेला नसताना अस्पृश्यांच्या राखीव जागांच्या बाबासाहेब आणि हिंदु नेत्यांमधील करारानंतरच गांधींवर खूनी हल्ल्यांचा आरंभ का झाला?;या प्रश्नाचे उत्तर ना गांधी समर्थक देत, ना सावरकर-नत्थुराम समर्थक देत;हे वास्तव सर्व अभ्यासक नजरेआड का करतात?
या देशातील जाती-धर्म व्यवस्थेने अमानुष अत्याचार करूनही या देशावर गांधी-नेहरुंसह कोणत्याही देशभक्तांपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचे अधिकच उपकार नाहीत काय?
मग,बाबासाहेबांना आजही भारतिय आपला मुक्तीदाता म्हणून का बरं स्वीकारत नाहीत?
बाबासाहेबांच्या समतेच्या विचारावर भारतियांचे उच्चत्व का बरं मात करते?
भारतिय बाबासाहेबांना आजही केवळ अस्पृश्यांचेच नेते का मानतात?
संविधानाने दिलेल्या समता,बंधुता,न्याय आणि धर्मनिरपेक्षतेबद्दल भारतियांना नेहमीच घृणा का वाटत असते?
पुणे कराराद्वारे अस्तित्वात आलेल्या आणि संविधानाने कायम केलेल्या आरक्षणाबाबत भारतियांना घृणा का वाटत असते?
याबाबत १)ज्यांनी घाण काढायची त्यांना लायकी नसतांना आरक्षणातुन मोठ्या पदाच्या नोकर्या मिळाल्या,त्यांच्यातुन डाॅक्टर,अभियंते,अधिकारी झाल्यामुळेच देशाचे वाट्टुळे झाले.हे दलित ब्राह्मण आहेत.यांना अजुन किती काळ आरक्षण द्यायचे?आरक्षण आता संपवले पाहिजे;असे आग्रहाने मांडले जाते.
हे मांडणारे कोणतेही हिंदु मात्र आपल्या उच्च जातींचा विनाश करायला कधीच तयार नसतात.
उलट दलितांच्या आरक्षणाला विरोध करणार्या उच्च जातींतील अनेकजण जातींचे खोटे दाखले बनवून आरक्षित जागा बळकवतांना दिसतात;तर या पैकी अनेकजण स्वत:चे मागासपण सिद्ध करण्याचा अटापीटा करत आरक्षणासाठी रस्त्यांवर उतरु लागले आहेत.
या उलट या आरक्षणाचा शस्रासारखा वापर करत सवर्ण सत्ताधार्यांनी दलित समुहांना अत्याचार सहन करीत हिंदु धर्मात रोखून धरले आहे.
बाबासाहेबांनी १४ऑक्टोंबर १९३५ला हिंदु धर्म त्यागाची घोषणा करुन १४ऑक्टोंबर १९५६ला ती बौद्ध धम्म स्वीकारुन अमलात आणल्यानंतर देशभरातील सर्व अस्पृश जातीच नव्हे;तर हिंदुंमधील शुद्र समुहही बुद्धाच्या धम्मपथाकडे वाटचालीस आरंभ करणार होता.देशातील जातींचे सर्व बालेकिल्ले ढासळण्याची ती सुरवात ठरायला हरकत नव्हती.
पण,अस्पृश्यांमधील केवळ एका जातीच्या धम्मचक्रप्रवर्तनाने हिंदुधर्मत्यागाचा आरंभ झाल्यानंतर दिड दोन महिन्यातच बाबासाहेबांचे निधन झाले आणि हिंदु धर्मवेत्त्यांनी,हिंदु सत्ताधार्यांनी अस्पृश्यांना दिलेल्या आरक्षणाचा हिंदुधर्मरक्षणासाठी कवचकुंडलांसारखा वापर करण्यास आरंभ केला.
हिंदु धर्म सोडला तर तुमचे आरक्षण जाईल;असा भयगंड जोपासत त्यांना जातींच्या/अस्पृश्यतेच्या साखळदंडांमध्ये जखडबंद केले गेले.त्याच वेळी हिंदु धर्म सोडणार्या अस्पृश्यांबाबत हिंदुंच्या वर्तणुकीत बदल न होताही त्यांचे आरक्षण मात्र नाकारण्यात आले.
आज अनेक अस्पृश्य या आरक्षणावर लाथ मारुन हिंदु धर्म त्यागण्यास सज्ज होत असतांना ज्या अस्पृश्यांनी बाबासाहेबांच्या आदेशाने १९५६साली हिंदु धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्म स्वीकारला त्यांच्यात मात्र जाती नाकारण्याबाबत फार मोठा संभ्रम पसरवला जात आहे.
ज्या जातींच्या विध्वंसनासाठी आपण हिंदुधर्म सोडून बौद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार केला,त्या बौद्ध धम्माच्या उल्लेखासोबतच आपल्या पुर्वाश्रमिच्या अस्पृश्य जातींचा उल्लेख जनगणनेत करण्याचा प्रचार केला जात आहे.हा प्रचार करणारे हिंदु धर्माची जातीची कवचकुंडले, हिंदुत्वाचा गळफास हिंदु धर्म त्यागणार्या अस्पृश्यांच्या गळ्याभोवती आवळत तर नाहीत ना?;याचा विचार स्वत:ला आंबेडकरी विचारांचे अनुयायी म्हणवणारे करणार आहेत काय?
त्याच बरोबर २१व्या शतकापर्यंत पाझरलेला जातींचा नरक ज्यांना ज्यांना अस्वस्थ करतोय.ज्यांचा जाती अधारीत अरक्षणाला विरोध आहे.त्या सार्यांनीच आपापल्या जातींच्या गदळ नरकातुन बाहेर पडलेच पाहिजे.आपल्या जातीच्या सर्व ओळखींचा विध्वंस केलाच पाहिजे.हाच समतामुलक समाजाचा आरंभ असु शकतो.हेच भारताचे उद्धारकर्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन असु शकते.
होय ना!शोषणमुक्त बलशाली समतामुलक समाजाचे स्वप्न भारतियांना देणार्या बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन….!
-जयवंत हिरे
“क्रांतिकारी जनता”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत