महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

“महाराष्ट्राच्या सर्कशीत… जनता जोकर!”

समाज माध्यमातून साभार

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या सहा महिन्यांत एवढे प्रकार घडले की, सामान्य माणसाने काय बघू आणि काय सोडू? असा प्रश्न पडला आहे. एकीकडे महागाईने कंबर मोडलीय, बेरोजगारी वाढलीय, शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत आणि दुसरीकडे नेते मंडळी आपले नाट्य सुरू ठेवून जनतेच्या बुद्धीची परीक्षा घेत आहेत. चला तर मग, या सर्कशीतले काही खेळ पाहूया!

खेळ क्रमांक १: मराठा आरक्षणाचा जुगाड!

मराठा आरक्षण हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणातला कायमचा हुकमी एक्का! “मी देतो,” “त्याने अडवले,” “आम्ही सत्तेत आलो की पहिला निर्णय आरक्षणाचा!” अशा घोषणा प्रत्येक निवडणुकीला ऐकायला मिळतात. यावेळी सरकारने १०% आरक्षण जाहीर करून “तुम्ही खूश आहात ना?” असा प्रश्न विचारलाय. पण सुप्रीम कोर्टाची ५०% मर्यादा, इतर समाजांचे आरक्षणाचे हक्क याकडे पाहायचं की फक्त राजकीय घोषणांची जत्रा करायची?

खेळ क्रमांक २: शेतकऱ्यांचा आत्महत्या महोत्सव!

दररोज सात शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार “सोपस्कार” करतंय. कधी एक रुपयात विमा योजना, कधी अनुदानाची घोषणा, पण प्रत्यक्षात कर्जमाफीचं काय झालं, उत्पादन खर्च आणि हमीभावातल्या तफावतीचं काय? शेतकऱ्यांसाठी ‘नमो योजना’ आणि बड्या उद्योजकांसाठी “नमो हक्क” असाच प्रकार सुरू आहे.

खेळ क्रमांक ३: बेरोजगारीचा बॅलेंसिंग अ‍ॅक्ट!

लोकांना रोजगार द्यायचा सोडून सरकार नुसते “आम्ही एवढ्या नोकऱ्या दिल्या!” असे आकडे सांगतंय. बेरोजगार तरुण हा मतदार म्हणून महत्त्वाचा असतो, पण त्याला काम द्यायचं असतं का? यावर कोणीच बोलायला तयार नाही. महागाई इतकी वाढली की नोकरदार माणसालाही पगार पुरत नाही, मग बेरोजगारांचं काय?

खेळ क्रमांक ४: पक्ष फुटीचा जुगलबंदी!

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आता “पक्ष सोडा योजना” चालवतायत. एक गट सरकारमध्ये, दुसरा विरोधात, पण खरी झुंज सत्ता आणि फायदा मिळवण्यासाठी आहे. कधी मातोश्री विरुद्ध वरळी, कधी बाप विरुद्ध मुलगा – महाराष्ट्राच्या राजकारणात वडिलोपार्जित संपत्तीपेक्षा पक्ष संपत्तीचा वाद जास्त रंगतोय!

खेळ क्रमांक ५: धार्मिक तणाव आणि गोंधळाचा तमाशा!

नागपूरमध्ये १७व्या शतकाच्या बादशहाच्या थडग्यावरून दंगली पेटल्या, आणि नेतेमंडळींना “नवीन विषय” सापडला. राजकीय अपयश झाकण्यासाठी धार्मिक विषय पेटवायचा, सोशल मीडियावर टिळा लावलेला फोटो टाकायचा आणि जनतेला रस्त्यावर आणायचं, हा नव्या राजकारणाचा फॉर्म्युला आहे.

खेळ क्रमांक ६: विनोद सहन होत नाही!

महाराष्ट्र कधी विचारवंतांचा गड होता, पण आता “कोणाचा विनोद सहन होतो आणि कोणाचा नाही?” यावर कारवाई ठरते. कधी जोक मुळे क्लब फोडले जातात, कधी कलाकारांना धमक्या दिल्या जातात. पण सरकारी निर्णयांवर हसणं, बोलणं हेच आता गुन्हा झालाय. आणि हो, यावर गप्प बसलं नाही तर “देशद्रोही” किंवा “संस्कृतीविरोधी” ठरवायचं!

आणि शेवटी… जनतेचा टाळीवाला रोल!

सगळ्या राजकीय नेत्यांचे हे प्रयोग सुरू असताना सामान्य माणूस फक्त प्रेक्षक म्हणून टाळ्या वाजवत बसतोय. कुणी आरक्षणाचं नाटक करतंय, कुणी मतांसाठी धर्म पेटवतंय, कुणी बेरोजगारांना आश्वासनांची भूल घालतंय, आणि जनता मात्र दर निवडणुकीला नव्या तमाशाला हजर राहतेय!

“कधी हे प्रेक्षक जोकर होणं थांबवतील?”
हा प्रश्न सर्वांनी स्वतःला विचारायला हवा!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!