
जिल्ह्यातील २०२२-२३ या वर्षातील केळी व इतर खरीप पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
जळगाव जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे, अशा मंडळांमध्ये अग्रिम पीकविम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेशही कृषिमंत्री मुंडे यांनी दिले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात पावसाने २१ दिवसांपेक्षा अधिक खंड दिला असल्याने पीकविम्याची २५ टक्के रक्कम अग्रिम देण्याची मागणी केली. यावर कृषिमंत्री मुंडे यांनी याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. दसरा ते दीपावलीदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम रक्कम जमा होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत जळगाव जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षातील केळी व इतर खरिपाच्य पीकविम्याचे पैसे मिळाले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याबाबत मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत मंत्री मुंडे बोलत होते.
पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षांमध्ये ७७ हजार ८६० शेतकऱ्यांनी पीकविम्याचे अर्ज दाखल केले होते.
त्यामधून ८१ हजार ५१० हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले. त्यापैकी केवळ ४६ हजार ९४९ अर्जांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे पीकविम्यापासून हजारो शेतकरी वंचित राहिले होते.
बैठकीदरम्यान कृषिमंत्री मुंडे यांनी इतक्या मोठ्या क्षेत्राला पीकविम्यापासून वंचित ठेवल्याबद्दल तसेच ज्या शेतकऱ्यांचा विमा नाकारला आहे, त्यांना विमा नाकारण्याची कारणे लेखी कळविली नसल्याने विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच या कालावधीतील पीक परिस्थितीचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मागवून फेरपडताळणी करून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा देण्याचे निर्देश दिले.
जिल्हा पीकविमा व शेतकरी समितीचे सीए हितेश आगीवाल, मोहाडीचे सरपंच धनंजय सोनवणे, कृषी सचिव अनुपकुमार यादव व कृषी आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत