देशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
बुद्ध, ख्रिस्त, महंमद व कृष्ण ह्या चार धर्मप्रमुख व धर्मप्रसारकांची तुलनात्मक छाननी

(डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रकाशित लेख – “बद्ध व त्यांच्या धम्माचे भवितव्य”)
पृथ्वीतलावर जेवढे धर्म संस्थापक होऊन गेले आहेत, त्या सर्वांमध्ये केवळ चौघानीच भूतकाळ गाजविला आहे; एवढेच नव्हे तर वर्तमानकाळ सुद्धा खडबडून जागा केलेला आहे. *बुद्ध, ख्रिस्त, महंमद व कृष्ण* हेच ते चार धर्मप्रमुख व धर्मप्रसारक होत. हया चौंघांच्या व्यक्तीमत्वांची व धर्मप्रसार पद्धतीची तुलनात्मक छाननी केली तर परस्परात मात्र बराच विरोध आढळून येतो.
आत्मस्तुती व अहंभाव यांच्यापासूनची अलिप्तता हे खास वैशिष्ट चौघांमध्ये फक्त तथागत बुद्धाच्याच बाबतीत प्रकर्षाने उठून दिसते. *बायबलचे वाचन केले तर त्यात सर्वत्र येशू ख्रिस्ताने स्वतःला परमेश्वराचा खास पुत्र म्हणवून घेतल्याचे व जो कोणी त्याला मानणार नाही अशा व्यक्तीस आकाशातील देवांच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही असे सांगितल्याचे आढळून येते.*
महंमद पैगंबरांनी ख्रीस्तापेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे. *त्याने स्वतःला अल्लाचा (परमेश्वराचा) प्रेषित किंवा दुत म्हणवून घेतले आहे; आणि तो सुद्धा शेवटचाच. त्याच्यानंतर कोणीही ईश्वराचा प्रेषित असणार नाही किंवा होणार नाही. आणि म्हणून ज्या कोणाला संसारापासुन मुक्ती हवी असेल व जन्नत (स्वर्ग) पाहिजे असेल त्याने कोणतीच आशंका न बाळगता महंमद पैगंबरालाच मानले पाहिजे असे त्याने निक्षून सांगितले आहे.*
श्रीकृष्णाने तर येशू ख्रिस्त व महंमद पैगंबर ह्या दोघांवरही ताण केली आहे. ईश्वराचा पुत्र किंवा शेवटचा दूत वगैरे असे काही एक न म्हणवून घेता किंवा मी देव आहे असेही न म्हणवून घेता *श्रीकृष्णाने स्वतःलाच परमेश्वर म्हणजेच देवाधिदेव (देवांचा देव) म्हणवून घेतले आहे.* यास्तव सर्वांनी केवळ त्याचीच पूजा करावयास पाहिजे, त्यालाच भजावयास पाहिजे. म्हणजे सगळ्यांना मुक्ती प्राप्त होऊन स्वर्गलाभ होईल असे त्यांनी सांगितले आहे.
परंतु तथागत बुद्धाने ह्या असल्या कोणत्याच गोष्टीचे प्रतिपादन केलेले नाही. ख्रिस्त, पैगंबर किंवा कृष्ण यांच्यासारखा अहंभाव बुद्धाने मुळीच बाळगलेला नाही किंवा आत्मप्रौढीही गायलेली नाही. *बुद्धाने केवळ आपण एक मानवपुत्र असल्याचे सांगून सर्वसाधारण माणूस म्हणुनच त्याने आपल्या धर्ममतांचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार केलेला आहे. इतरांसारखे त्याने स्वतःचे मुळीच दैविकरण केलेलं नाही किंवा आपण अलौकिक चमत्कार केलेले आहेत असे लोकांना सांगून, त्यांना भुरळ पाडण्याचा किंवा त्याची वंचना करण्याचा अल्पसाही प्रयत्न केलेला नाही. तथागत बुद्धाने ' मार्गदाता ' व ' मोक्षदाता ' यात अगदी स्पष्ट असा फरक केलेला आहे. आम्ही सांगितल्या प्रमाणे वागाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल, स्वर्ग मिळेल, अशी भूमिका ख्रिस्त, पैगंबर व कृष्ण ह्यांनी घेतलेली आहे. उलट मी केवळ एक मार्गदर्शक आहे, त्याप्रमाणे वागणे न वागणे हे तुम्हीच ठरवायचे आहे. माझी तुमच्यावर कोणतीच बाळजोरी नाही, अशी भूमिका तथागत बुद्धाची आहे.* बुद्धाने आपले म्हणणे लोकांनी मानावे म्हणून ख्रिस्त, पैगंबर किंवा कृष्ण यांच्यासारखी मोक्षाची, स्वर्गाची किंवा मुक्तीची लालुच दाखवलेली नाही. *जीवनातील दुःख नष्ट करून सूखप्राप्ती प्रत्येक मनुष्याला करून घेता येते. यावरच तथागत बुद्धाने भर दिलेला आहे.*
अजून एक महत्वाचा फरक या चौघांत आढळून येतो. ख्रिस्त व पैंगंबर हे स्वतःला अनुक्रमे परमेश्वराचा एकुलता एक पुत्र व खास दूत म्हणवून घेत असल्याने त्यांनी सांगितलेले प्रत्येक वचन देवाच्या मुखातील आहे; प्रत्यक्ष देवाने त्यांना सांगितलेले आहे. असा ते दावा करतात. यास्तव ते वचन कधीही खोटे असू शकत नाही आणि म्हणून ख्रिस्ताने किंवा पैगंबराने सांगितलेल्या वचनावर जगातील कोणत्याही व्यक्तीने अविश्वास दाखवू नये किंवा आशंका बाळगू नये असा आग्रह ते दोघेही करतात. कृष्णाच्या बाबतीत सारेच काही निराळे आहे. कृष्ण हा स्वतःलाच परमेश्वर म्हणवून घेत असल्याने, त्याने सांगितलेले प्रत्येक वचन अंतिम सत्य होय आणि म्हणून ते शंकातीत आहे, अचूक आहे, असा तो आदेश देतो. परंतू तथागत बुद्धाने असा कोणताच दावा केलेला नाही.
*"महापरिनिर्वाण सुत्ता" मध्ये तथागत बुद्धाने आनंदाला सांगितले आहे की, माझा धम्म 'बुद्धिवादावर व अनुभवावर ' आधारीत आहे आणि म्हणून माझ्या अनुयायांनी मी सांगतो म्हणून सत्य आहे, असे समजून, अंधानुकरण करू नये, 'बुद्धीप्रामाण्य व अनुभव ' हा माझ्या धम्माचा मूलभूत पाया असल्याने कालमानारुप व परिस्थितीनुसार त्याच्यात त्यांना बदल करता येतो. एवढेच नव्हे तर माझी जी मते काळाशी अनुरूप व परिस्थितीशी सुसंगत वाटत नसतील तर ती मते त्यांना टाकूनही देता येतात. याच कारणास्तव तथागत बुद्धाने बौद्ध धर्म शुष्क, काष्ठ न समजता तो सदाहरित व चिरतरुण मानला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.* त्यासाठी त्याने आपल्या अनुयायांना नितांत गरज भासेल तेव्हा बौद्धमते परिवर्तनशील करण्यास पूर्णपणे स्वतंत्र प्रदान केलेले आहे. *असे स्वतंत्र दुसऱ्या कोणत्याच धर्मगुरूने आपल्या अनुयायांना दिलेले नाही, किंवा तसे स्वातंत्र्य देण्याचे धाडसही दाखविलेले नाही.* कारण त्यांना भीती वाटली असावी की, अशा मुक्त स्वातंत्र्याने त्यांनी प्रस्थापित केलेल्या धर्ममतांचा डोलाराच नेस्तनाबूत होईल व त्यांचे नामनिशाण सुद्धा राहणार नाही. परंतु, अशी भीती बुद्धाला कधीही वाटली नाही. त्यांच्या धर्ममतांची इमारतच मुळात भक्कम अशा पायावर आधारलेली होती. जगातील कोणताच वैचारिक झंझावात आपल्या धम्माला जमीनदोस्त करू शकणार नाही, ह्याची बालंबाल खात्री बुद्धाला होती. हेच तथागत बुद्धाच्या अद्वितीय व्यक्तीमत्वाचे निदर्शक होय.
*तूर्तास एवढेच..!*
राजु सोनडवले
नागपूर
दि. २७-०१-२०२५
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत