मनुस्मृती इसवी सनापूर्वी सुमारे दीडशे ते पावणेदोनशे वर्ष या कालखंडात निर्माण झालेला एक ग्रंथ.
मनू हे प्राचीन भारतातील जनमाणसांत आदराचं स्थान असलेलं एक नाव.
मनू अनेक झाल्याच्या कथा आहेत.
पण आपल्यापुढं असलेली मनुस्मृती ही त्यापैकी कोणत्याही मनूनं लिहिलेली नाही.
मनूच्या नावाचा बुरखा घेतलेली ही स्मृती प्रत्यक्षात भृगू नावाच्या लेखकानं लिहिली आहे.
हे सध्याच्या मनुस्मृतीमधील काही श्लोकांतूनच स्पष्ट होते.
तात्पर्य, आपल्यापुढं आहे, ती मनुस्मृती नावाची भृगुस्मृती होय.
हा ग्रंथ म्हणजे भारताच्या इतिहासातील सामाजिकदृष्ट्या बहुधा सर्वात अधिक विकृत ग्रंथ होय.
हाच तो ग्रंथ, की ज्यानं सर्वसामान्य लोकांच्या किमान शंभर पिढ्यांना अज्ञानाच्या अंधारात गाडलं.
त्यांच्या वाटेवर खाचखळगे-खड्डे खणून ठेवले, काटे कोरून ठेवले, त्यांच्या आशा-आकांक्षांना जाळून खाक करणारे वणवे पेटवून ठेवले. त्यांच्यासाठी अपमान आणि तिरस्कार, लाचारी आणि गुलामगिरी यांचा वारसा ठेवला.
थोडक्यात, म्हणजे त्यांचा सर्वांगीण अधःपात घडवून आणला.
हे करीत असताना कर्म-सिद्धांताच्या आधारे एक दूरगामी आणि भीषण असं ध्येयही या ग्रंथानं साध्य केलं.
लाचारीचं जिणं जगणं हाच आपला धर्म आहे, हीच आपली नीती आहे आणि हे आपल्याच पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ आहे असे विचार मनुस्मृतीनं या लोकांच्या डोक्यात शिरले.
शोषितांच्या डोक्यात शोषकांचा मेंदू काम करू लागला.
वेगळ्या भाषेत सांगायचं, तर शोषकांचे हितसंबंध हेच आपले हितसंबंध आहेत असं शोषितांना वाटू लागलं.
या शोषितांच्या डोक्यात मनुस्मृतीनं अगदी व्यवस्थितपणे आपल्या विचारांचं कलम केलं. ज्या झाडावर कलम केलं जातं, ते जमिनीतून अन्नरस घेत राहतं. पण तो अन्नरस दुसऱ्याच कुणाची तरी धन करीत असतो. अन्नरस घेण्यासाठी कष्ट न करणाऱ्या दुसऱ्याच कुणाची तरी फुलं फुलतात, फळे बहरतात. जमिनीतून अन्नरस घेणाराला मात्र वाटत असते, की आपलीच फुलं उमलत आहेत, आपलीच फळं पक्व होत आहेत या भ्रमापोटी तो राबत राहतो.
आपली फक्त राबण्याची शक्तीच शाबूत ठेवली आहे आणि फुलण्याची शक्ती खच्ची करण्यात आली आहे हे त्या बिचाऱ्याला ठाऊकच नसतं.
भृगूनं बहुजन समाजाच्या बाबतीत हेच घडवून आणलं. त्याची राबण्याची शक्ती शाबूत ठेवली आणि फुलण्याची शक्ती नष्ट केली. त्याच्या शंभर पिढ्या बिनतक्रार आनंदानं, समाधानानं आपल्या शंभर पिढ्यांची सेवा करतील अशी समाजव्यवस्था निर्माण केली.
ज्या ग्रंथाच्या द्वारे त्याने हे सगळं घडवून आणलं तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती होय.
अनेक जणांना असं वाटतं, की आता मनुस्मृती कालबाह्य झालेली आहे. ती कशाला उकरून काढायची?
प्रत्यक्षात मात्र मनुस्मृती कालबाह्य झालेली वा मरण पावलेली नाही. ती जिवंत आहे. मनुस्मृती अजूनही अनेक जणांच्या नसानसांतील रक्तामधून वाहत आहे. त्यांच्या श्वासोच्छासातून गतिशील आहे.
सहृदय समाजसुधारकांनी ती पुनः पुन्हा खुडली, जाळली; तरी तिला अजूनही नवी पालवी फुटत आहे. तिचा गौरव करताना अनेकांच्या उरात आनंदाचं भरत येतं.
आणि गौरवामुळं सांस्कृतिक अहंकार आजही सुखावतो. किंबहुना अनेकांना मनुस्मृतीची व्यवस्था या देशात यावी म्हणून सध्या आपल्या देशात एक जबरदस्त मोहीमच चालू आहे हे ध्यानात घेतलं पाहिजे.
वेदाचं अध्ययन करताना शूद्र ( ओबीसी, एससी, एसटी इत्यादी बहुजन ) जवळपासही असू नये, अशी खबरदारी घ्यायला मनुस्मृती सांगते..
क्षत्रिय आणि वैश्य यांनाही हीन लेखलं जात होतं, मग शूद्रांना किती तुच्छ लेखलं जात असेल, हे उघड आहे.
शूद्रांना ज्ञान झालं, तर ते आपल्या शोषणव्यवस्थेच्या विरुद्ध बंड करतील हे ब्राह्मणांना ठाऊक होतं..
ब्राह्मणानं शूद्राकडून खुशाल धन घ्यावं ( मनुस्मृतीनुसार कलियुगात क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण नष्ट झाले आणि ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण शिल्लक उरले ).
शूद्राची स्वतःची अशी काही संपत्ती नसतेच. त्याच्या मालकाला त्याच्या धनाचा हरण करण्याचा अधिकार असतो. त्याच्या संपत्तीचा हरण करण्याचा ब्राह्मणाचा अधिकार अधिक स्पष्ट व्हावा म्हणून मनुस्मृती म्हणते, “धन मिळविण्याचं सामर्थ्य असलं, तरीदेखील शूद्रानं धनसंचय करू नये. कारण शूद्रानं धन प्राप्त केलं, तर तो ब्राह्मणांनाच बाधक बनतो.”
ब्राह्मणाला इतरांच्या संपत्तीचं खुशाल हरण करण्याचा अधिकार दिला;
- परंतु इतरानं मात्र ब्राह्मणांच्या संपत्तीचं हरण केलं असता भीषण परिणामांना तोंड द्यावं लागेल असा धाक मनुस्मृतीनं घातला आहे.
- उदाहरणार्थ, ब्राह्मणांच्या संपत्तीचं अपहरण केल्यास मनुष्य ब्रह्मराक्षस बनतो.
- एखाद्याला कोणीच वारस नसेल, तर त्याची संपत्ती ब्राह्मणानी घ्यावी; परंतु ब्राह्मणाला असा कोणी वारस नसला; तर त्याची संपत्ती कोणत्याही परिस्थितीत राजानं घ्यायची नाही, दुसऱ्या ब्राह्मणानीच घ्यायची. अशा परिस्थितीत इतर वर्णांतील व्यक्तींची संपत्ती मात्र राजा घेऊ शकतो.
मनुस्मृतीनं कर्जाच्या बाबतीत मांडलेले विचार लक्षात घेण्यासारखे आहेत.
धनकोनं ऋणकोकडून व्याजाचा दर काय घ्यावा याविषयी मनुस्मृती म्हणते चार वर्णांकडून अनुक्रमे दोन, तीन, चार आणि पाच टक्के इतकं व्याज दरमहा घ्यावं.
याचा अर्थ ब्राह्मणांकडून दोन टक्के आणि इतरांकडून क्रमशः एक एक टक्का जास्त व्याज घ्यावं. व्याजाची ही आकारणी पक्षपाताची आहे.
कर्जाची परतफेड करण्याच्या बाबतीत मनुस्मृती जो नियम घालून देते तोही पाहण्यासारखा आहे.
ऋणको धनकोच्या कर्जाची परतफेड करू शकत नसेल, आणि तो त्याच्या अथवा त्याच्यापेक्षा खालच्या जातीतील असेल, तर त्यानं काम करून कर्जाची फेड करावी;
परंतु तो वरच्या जातीतील असेल, तर मात्र त्यानं काम करण्याऐवजी कर्जाची फेड सावकाशीनं करावी. सावकाशीनं म्हणजे केव्हा, ते मात्र मनुस्मृती सांगत नाही. स्वाभाविकच माझी आता कर्ज फेडण्याची ऐपत नाही असं म्हणून उच्चवर्णीय मनुष्य कितीही काळपर्यंत कर्ज परत करण्याचं टाळू शकतो. एवढंच नव्हे, तर कर्ज बुडवूदेखील शकतो. आणि त्यानी तसं केलं, तरी त्याच्या हातून धर्मशास्त्राचा कोणताही नियम मोडला गेला असं होतं नाही. त्यामुळं त्याला दंड होण्याचा किंवा त्याला पाप लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
मनुस्मृतीचे आर्थिक विषयावरचे अशा प्रकारचे नियम पाहिले, म्हणजे मनुस्मृतीची आर्थिक सुचिता कोणत्या दर्जाची आहे, ते स्पष्ट होऊन जातं.
मनुस्मृतीचे समर्थक भारतीय संस्कृती आणि भारताचा प्राचीन इतिहास यांचा खूप गौरव करीत असतात.
ते संस्कृती आणि इतिहास यांचं किती खोटं चित्र उभं करतात हे प्रस्तुत विवेचनावरून स्पष्ट झालं आहे. म्हणूनच ज्यांचे पूर्वज हजारो वर्ष शोषणाला बळी पडत आले, त्यांनी तरी इतिहास आणि संस्कृती यांच्याविषयी स्वतःचा वेगळा स्वतंत्र दृष्टिकोन तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. मनुस्मृतीच्या वारसदारांनी सांगितलेला इतिहास आपणही आंधळेपणानं, चिकित्सा न करता खरा म्हणून स्वीकारू लागलो, तर आपण आपली सांस्कृतिक आत्महत्या करून घेणार यात मुळीच शंका नाही.
बहुजनांनी अशी सांस्कृतिक आत्महत्या करणं बंद करावं, ही माझी मनापासूनची भावना आहे.
मनुस्मृती म्हणजे भारतीय समाजाची विटंबना.
मनुस्मृती म्हणजे त्याच्या प्रतिभेचं खच्चीकरण होय. मनुस्मृती म्हणजे त्याच्या अनंत सुप्त शक्तींना बिजावस्थेतच जाळून टाकण्याचा प्रकार होय.*
मनुस्मृतीच्या समर्थनाचा मार्ग हा भारतीय समाजाला अंतर्गत यादवीच्या दिशेनं घेऊन जाणारा, द्वेषाच्या खाईत ढकलणारा, एकमेकांचा घात करायला लावणारा मार्ग होय.
हा मार्ग कोणत्याही प्रकारे शहाणपणाचा नाही.
त्या मार्गानं निघायचं याचा अर्थ भारताच्या ऐक्याला स्वतःच्या हातानं आग लावायची. म्हणूनच मनुस्मृतीच्या समर्थकांना अभिप्रेत असलेली संस्कृती हे एक राष्ट्रीय संकट आहे. तो भारतीय समाजाचं ऐक्य आणि समृद्धी यांच्यावरचा घाला आहे.
मनुस्मृतीच्या समर्थकांची ही तथाकथित संस्कृती म्हणजे राष्ट्रीय आपत्ती आहे, सामाजिक विपत्ती आहे. कारण स्वतः मनुस्मृती हाच भारतीय संस्कृतीवरचा भला मोठा कलंक आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत