आंबेडकरी चळवळीचा ‘अकोला पॅटर्न’– राजेंद्र पातोडे.

अखेर चार वर्षांत पूर्ण झाले
“आंबेडकरी चळवळीचा ‘अकोला पॅटर्न’ (१९२० ते २०२४) ह्या ऐतिहासिक पुस्तकाचे लेखन लवकरच प्रकाशन – राजेंद्र पातोडे.
आंबेडकरी चळवळीचा ‘अकोला पॅटर्न’ (१९२० ते २०२४) ह्या १०५ वर्षाच्या इतिहासाचे लेखन मी पूर्ण केले आहे.हा दस्तऐवज अधिकृतपणे पुस्तकरूपात आणायची दोन कारणे आहेत.एक तर अकोला पॅटर्न, बहुजन महासंघ, भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी ह्याबाबत मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती कार्यकर्त्या मध्ये आहे.सोशल मीडियावर कॉपीपेस्ट आणि फॉरवर्ड ते देखील न वाचता फॉरवर्ड करणे ह्यामुळे बरेचदा चुकीचा इतिहास फॉरवर्ड होत राहतो.चळवळीचा इतिहास आहे तसा नव्या पिढी समोर येणे गरजेचे आहे,हे लक्षात घेऊन मी १९८० ते २०२१ असे लिखाण करायला सुरु केले होते. “भारिप ते वंचित – १९८० ते २०२१” ह्या शिर्षकाखाली लिहायला घेतले असता एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की, ज्याचा ‘अकोला पॅटर्न’ म्हणून उल्लेख केला जातो. तो ‘अकोला पॅटर्न’ १९९२ च्या जिल्हा परिषदेतील भारिप आणि बहुजन महासंघाच्या यशा पुरता मर्यादित नाही.अकोला पॅटर्न म्हणून केवळ १९९२च्या जिल्हा परिषद निवडणुकीतील यशाला अधोरेखित केले जाते.ती मांडणी चुकीची आहे.१९९२ जिल्हा परिषद निवडणुकीच्या किती तरी दशका पासून अकोला जिल्ह्यात आंबेडकरी चळवळ कार्यरत आहे.नुसती कार्यरत होती असे नाही, तर तिने आपला ठसा १९२० पासून राजकीय, सामाजिक पातळीवर ठसठसीतपणे उमटविला होता.१९२० ते २०२४ मात्र त्यात एक समान धागा आहे तो म्हणजे अकोला जिल्हा कायम आंबेडकरांच्या नेतृत्वात कार्यरत राहिला आहे.हा अकोला पॅटर्न जगासमोर आलाच नाही.जो काही आलाय तो तुकडया तुकड्यात होता.
१९२० ते २०२५ ह्या एकशे पाच वर्षात अकोला जिल्ह्यात राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पातळीवर प्रचंड घडामोडी झाल्या आहेत.हे शब्दबद्ध करने, मोठा डेटा गोळा करणे, त्यातील नेमके आहे ते तपासून त्यावर लिखाण करता करता २०२१ निघून गेले.आणि २०२४ उजळले.काम काही संपत नव्हते.
१९८० च्या काळातील चळवळीतील एका पिढीचे नेतृत्व मी एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्वात करीत आहे.माझ्या आधीच्या पिढ्यांचे चळवळीचा जागर करीत, माझ्या समकालीन पिढीची चळवळ जगत जगत मी मोठा झालोय.त्यातील ३० वर्षापेक्षा अधिक काळ मी प्रत्यक्ष ह्या चळवळीत सक्रिय आणि जोमाने काम केले आहे.जवळ जवळ ९ वर्षे पत्रकार म्हणून काम केल्या सोबतच भारिपच्या कृषी नगर वॉर्ड शाखा क्रमांक १२ चा वॉर्ड शाखाध्यक्ष पदापासून मी राजकीय इनिंग सुरुवात केली होती.त्यानंतर भारिप बहुजन महासंघाचा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, भारिप बहुजन महासंघाच्या युवक आघाडीचा पहिला जिल्हाध्यक्ष, अमरावती विभागीय युवक आघाडीचा दोन वेळा विभागीय अध्यक्ष, पक्षाच्या निवडणूक सुकाणू समिती सदस्य, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा वर्धा नागपूर आणि यवतमाळ जिल्हाचा संपर्क प्रमुख, वंचित बहुजन आघाडीचा राज्य प्रवक्ता, वंचितच्या राज्य युवा आघाडीचा विद्यमान प्रदेश महासचिव आणि वंचित बहुजन आघाडीचा विद्यमान ‘मीडिया पॅनलिस्ट’, स्टार प्रचारक असा माझा पक्षातील राजकीय प्रवास आहे. समकालीन चळवळीवर सहसा उतार वयात लिहिले जाते, असा संकेत आहे.मात्र मी उतारवयातच चळवळीवर लिहिण्याच्या अलिखित नियमाला छेद दिला आहे.कारण ह्या वर्षी अकोल्यातील आंबेडकरी चळवळीने एकशे पाच वर्षे पूर्ण केली आहेत.त्या चळवळीचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन होणे, काळाजी गरज आहे.हा इतिहास नव्या पिढीसमोर मांडून त्यांना चळवळीचा अधिकृत दस्तऐवज उपलध करून देणे, हे माझे कर्त्यव्य समजतो.कारण चळवळीत काम करताना लिहिणारा हा अनेक घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असतो.परिणामी त्याचे लिखाणाला बरीच अधिकृतता असते.त्यामुळे घडलेल्या इतिहासाचे लेखन आहे मांडता येते.म्हणून मी जोमाने हा कालावधी लिहून पुर्ण केला आहे.त्यासाठी खूप सारे पुरावे गोळा केले.अनेकांची पुस्तके धुंडाळली, आकडेवारी जमवली,इतिहासाचा शोध घेतला आणि त्यातून हे पुस्तक पूर्ण केले आहे.
लिहिताना मी १९२० साला पासून सुरुवात केली आहे.कारण १९२० हे वर्षे बाबासाहेबांच्या सामाजिक आणि राजकीय क्षितिजावरील उदयाचा आहे.१९२० ते २०२५ ह्या कालावधीत मोठ्या प्रेरणादायी घटना अकोल्यात घडल्या आहेत.त्याचे पडसाद देशावर आणि राज्यावर पडले आहेत.अकोला जिल्हा हा सातत्याने अश्या घटनांचा केंद्र बिंदू राहिला आहे.
१९२० सालाची निवड करण्याचे मुख्य कारण म्हणजे बाबासाहेबांना शाहू महाराजांनी आर्थिक साहाय देऊन एक पाक्षिक काढावयास लाविले.ते ‘मूकनायक’ नावाचे पाक्षिक ३१ जानेवारी १९२० या दिवशी प्रारंभ झाले आहे. त्या दिवसापासून बाबासाहेबानी मूक समाजाचे नायकत्व स्वीकारले.ह्या मूकनायकाचे संपादक म्हणून पांडुरंग नंदराम भटकर यांना नेमले होते. पांडुरंग भटकर हे अकोला जिल्ह्यातील केळीवेळी ह्या गावचे होते.मॅट्रीक पर्यंतचे त्यांचे शिक्षण सरकारी हायस्कुल मधून आणि पुण्यातील डी. सी. मिशनमधून त्यांचे इंटरमिजिएट शिक्षण झाले होते. बाबासाहेबांनी सुरू केलेल्या चळवळीचे मुखपत्र चालविण्यापासून अकोला जिल्ह्याची नाळ जोडली गेली.त्याअर्थी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायकाला आवाज देण्यात अकोला जिल्ह्याचे योगदान आहे.
१९२० ची दुसरी महत्वाची बाब म्हणजे माणगाव येथे कोल्हापूर संस्थानची अस्पृश्यांची पहिली परिषद मार्चमध्ये भरली. शाहू महाराज तेथे आपल्या लवाजम्यासह उपस्थित होते. ‘माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील.हे भाकीत शाहू महाराजांनी ह्याच परिषेदेत केले होते.तिसरा महत्वाचा टप्पा होता १९२० च्या मे महिन्याच्या शेवटी नागपूर येथे संपन्न झालेली अखिल भारतीय बहिष्कृत परिषद्.समाजक्रांतीचे महान प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हि परिषद पार पडली होती.बाबासाहेब आपल्या काही प्रतिनिधींसहित नागपूर परिषदेत सहभागी झाले होते.१९२० मध्ये नागपूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय विदर्भाला झाला व पुढे पश्चिम विदर्भातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व सर्वमान्य झाले.बाबासाहेबानी स्वीकारलेल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय धोरणाला पश्चिम विदर्भातील जनतेने पूर्ण समर्थन दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उदय आंबेडकर चळवळीतील सर्वात महत्वपूर्ण घटना होय. डॉ. बाबासाहेबानी चळवळीचे नेतृत्व करतांना चळवळीला नैतिक अधिष्ठान दिले. तसेच सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय पातळीवर शोषितांच्या चळवळीला नवी दिशा दिली आहे.बाबासाहेबांच्या भूमिकेमुळे शोषितांच्या चळवळीचे स्वरूप आमूलाग्र बदलले. एकूण वंचितांच्या अस्तित्वासाठी आणि आत्मसन्मानाबरोबर सामाजिक समतेसाठी लढल्या जाणाऱ्या चळवळीचे केंद्रबिंदू बाबासाहेब हेच होते.त्यामुळे १९२० पासून अकोला जिल्ह्याचा मानवमुक्तीच्या चळवळीत असलेला सहभाग हा मूकनायक पासून थेट बाबासाहेबांच्या सावलीत प्रारंभ होतो हि सर्वात मोठी घटना ठरते.
“अकोला पॅटर्न” चा उदय १९८४ साली झाला, असे माध्यमं आणि लेखक लिहितात, हे विश्लेषण अर्धवट आहे.”अकोला पॅटर्न” हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून उदयास आला होता.तो मांडण्याचा प्रयत्न झालाच नाही.ज्यांनी लिहले त्यांनी दलित चळवळ म्हणुन मर्यादित केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्वात सामाजिक आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी लढत असलेला सर्वहारा समूह हा स्वातंत्र लढ्यात देखील सहभागी होता.हे जाणून नवल वाटल्या शिवाय राहत नाही.हजारो वर्षे ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्यांच्या मनात स्वातंत्र्यासाठी उर्मी निर्माण होणे ही असाधारण किमया आहे.अकोला जिल्हयातील तत्कालीन दलीत स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र लढ्यात सहभाग घेऊन कारावास भोगला होता.त्याची देखील माहिती पुस्तकात नमूद आहे. शैक्षणिक सुधारणा साठी १८८४ साला पासून “जाणोजी फ्री बोर्डिंग” पासून उदयास आले होते.त्याकाळच्या बहुतेक घडामोडी समाविष्ट केल्या आहेत.१९३७ सालच्या प्रांतिक विधी मंडळाच्या निवडणुका पार पडल्या होत्या.त्यावेळी स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख हे अमरावती तहसील मधून उमेदवार होते तर त्यांच्या पत्नी सौ विमला पंजाबराव देशमुख ह्या अकोला अमरावती महिला राखीव गटातून स्वतंत्र मजूर पक्षाच्या उमेदवार होत्या.एवढेच नव्हे डॉ पंजाबराव देशमुख हे स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्य प्रांत व-हाड शाखेचे अध्यक्ष होते.हा इतिहासच मांडला जात नव्हता.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे काँग्रेसचे नेते म्हणूनच मांडले जातात.आणि बाबासाहेबांशी त्यांचा संबंध केवळ अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशा बद्दल सांगितला जातो.स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख हे अमरावती तहसील मधून उमेदवार होते तर त्यांच्या पत्नी सौ विमला पंजाबराव देशमुख ह्या अकोला अमरावती महिला राखीव गटातून स्वतंत्र मजूर पक्षाच्या उमेदवार असणे हा अकोला पॅटर्न पुढे आलाच नव्हता.
व-हाड प्रांतिक शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे अधिवेशन १९४५ साली बाबासाहेबांच्या उपस्थितीत अकोल्यात संपन्न झाले होते.हि अकोल्यातील राजकीय सामाजिक चळवळीला बळ देणारी मोठी घटना आहे. १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपूर येथील धम्मदीक्षा सोहळ्या नंतर दुसरा धम्मदीक्षेचा सोहळा १६ ऑक्टोबर १९५६ ला चंद्रपूर येथे तर तिसरा धम्मदीक्षेचा सोहळा १८ ते २५ ऑक्टोबर १९५६ साली अकोला जिल्ह्यात संपन्न झाला होता.अर्थात बाबासाहेबांच्या आदेश बरहुकूम हा जिल्हा किती तत्पर होता ह्याची साक्ष धम्म दीक्षा सोहळ्यातून पटते.रिपब्लीकन पक्षाच्या प्रेसिडियमची पहिली बैठक अकोल्यात १९५७ साली पार पडली होती.त्याकाळात स्वतंत्र मजूर पक्ष असो की शेड्युल्ड कास्ट फेडरेशन किंवा रिपब्लिकन पक्ष अकोल्यात सातत्याने निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी केली जात होती.अकोला जिल्हयात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक चळवळ खूपच प्रभावी होती.त्या चळवळीला राजकीय यशात परावर्तित करणे, सामाजिक एकोपा साधने आणि सांस्कृतिक आयाम सर्वोच्च शिखरावर नेण्याचे अष्टपैलू कार्य एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्वात झाले ते १९८४ पासून.बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी देशात मृतप्राय झालेलया राजकीय आणि सामाजिक शक्तीला नवी दिशा दिली आहे.फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून चळवळ जिवंत केली आहे.त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांचा पॅटर्न हा नुसता ‘अकोला पॅटर्न’ नसून तो डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे संकल्पनेतील सर्वसमावेशक रिपब्लीकन पक्षाचा, सर्वहारा आणि वंचित समूहाच्या राजकीय सामाजिक उत्थानाचा व्यापक पॅटर्न आहे.अकोला जिल्ह्याने त्याला नवी दिशा दिली आहे.नवे मापदंड सेट केले आहेत.
पश्चिम विदर्भातील दलित चळवळीतील महत्वपूर्ण घटना म्हणून अमरावतीच्या अंबादेवी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह होय.आम्ही हिंदू असून हिंदू मंदिरात इतर हिंदूप्रमाणे आम्हाला प्रवेश मिळावा म्हणून पश्चिम विदर्भातील जनतेने १९२६ पासूनच मंदिर प्रवेश लढा सुरू केला. पश्चिम विदर्भातील दलितांच्या स्वाभिमानाचा हा पहिला लढा अस्पृश्य समाजात चैतन्य निर्माण करणारा होता.अस्पृश्य समाज सामाजिक, धार्मिक, राजकीय हक्काचा लढा लढण्यासाठी नव्या जिद्दीने उभा राहिला.१९२१ ते १९३५ या कालखंडात दलितांचे सामाजिक सुधारणांचे प्रश्न, हिंदुधर्मात समानतेची, मानवतेची वागणूक मिळण्यासाठीची आंदोलने, महार बलूतेदार व वतनदारीचा प्रश्न, मंदिर प्रवेश आंदोलन, महाड तळे सत्याग्रह, पुणे करार, गोलमेज परिषद इत्यादी प्रश्नांवर आंदोलने झाली. या आंदोलनांमुळे महाराष्ट्रातील समाजजीवन ढवळून निघाले. हा लढा दलित समाजाच्या अस्मीतेचा व अस्तित्वाचा असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अस्पृश्य वर्गाने विशेषत महार जातीने या लढ्यात स्वतःला झोकून दिलेले दिसते.अस्पृश्य मुक्ती लढा लढत असतांना पश्चिम विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा व यवतमाळ ह्या चारही जिल्ह्यांत विविध प्रश्नांवर अस्पृश्य समाजाच्या सभा व परिषदांचे आयोजन करण्यात येत होते.त्यामुळे १९२१ पासून अकोला जिल्ह्यात सुरु झालेल्या सुधारणावादी लढया पासून सुरुवात झाली आहे.मुळात अकोला जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे जन्माच्या सात वर्षे आधी गरीब अस्पृश्य मुलां करिता पारस गावचे श्रीमंत व्यक्ती जाणोजी खंडारे ह्यांनी १८८४ साली अकोल्यातील खोलेश्वर येथे “जाणोजी फ्री बोर्डिंग” सुरु केले होते.१८९४ साली स्वखर्चानें वस्तीगृह देखील बांधले होते.बाबासाहेबांच्या उदयानंतर देशात अभूतपूर्व क्रांती झाली.त्यामुळे आंबेडकरी चळवळीत आत्मभान जागे होऊन कार्यरत झालेल्या अकोला जिल्ह्यातील तत्कालीन सुवर्ण इतिहासाला टाळून लिहिणे ही इतिहासाची प्रतारणा ठरेल, म्हणूनच १९२० ते २०२१ कालखंडातील बहुतांश बाबींचा ह्या पुस्तकात समावेश केला आहे. ह्या शंभर वर्षा पेक्षा अधिकच्या काळात अकोला जिल्ह्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय पातळीवर अनेक बदल झालेत.त्याचे टप्पे वेगवेगळे होते.दरम्यान एकच नेतृत्व सार्वकालिक नेतृत्व आहे, ते म्हणजे “आंबेडकर” ह्या आडनांवाचे.बाबासाहेब केवळ एकदा अकोल्यात आले होते.मात्र भैय्यासाहेब हे आठ वेळा विविध कार्यक्रमासाठी अकोल्यात आले होते.त्यानंतर १९८० पासून मिराताई आणि बाळासाहेब ह्याचे सानिध्य लाभले आहे.त्यांचा राबता ह्या जिल्हयात आहे.१९२० ते २०२१ डॉ बाबासाहेब आंबेडकर, भैय्यासाहेब आंबेडकर, मिराताई आंबेडकर आणि आता बाळासाहेब आंबेडकर, प्रा अंजलीताई आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर आणि सुजात आंबेडकर असा सलग आणि थेट आंबेडकरांच्या नेतृत्वात आणि सानिध्यात हा जिल्हा सर्व पातळीवर घडत गेला आहे.
त्या अर्थाने ‘आंबेडकरी चळवळीचा हा “अकोला पॅटर्न” बाबासाहेबा पासून बाळासाहेबां पर्यंत घेतला आहे.फुले शाहू आंबेडकर समतावादी चळवळीत अकोला जिल्ह्याने आधी बाबासाहेब मग भैय्यासाहेब आंबेडकर त्यांचे नंतर मिराताई आंबेडकर आणि १९८४ ते २०२१ एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्व स्विकारूनच अकोला जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय क्रांती घडविली आहे.राजकीय पक्ष म्हणून कितीही गट उभे राहिले, तरी अकोला जिल्हा हा मात्र कायम आंबेडकर कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिलेला दिसतो.त्याकाळी नेतृत्व करणारे अमरावती जिल्ह्यातील रावबहादूर गणेश आकाजी गवई असो कि महामहिम रा. सु.गवई अगदी नजीकच्या जिल्यातील नेतृत्वाचा देखील अकोला जिल्ह्याने स्विकार केला नाही.१९२० ते २०२५ हा कालखंड पूर्णतः आंबेडकरमय आहे.म्हणून हा कालखंड “आंबेडकरी चळवळीचा – अकोला पॅटर्न” ठरतो.कारण सर्व पातळीवर ह्या जिल्ह्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.ह्या सर्व वैशिष्ठांचा समावेश करताना इतिहासातील अनेक महत्वपूर्ण माहिती नमूद केली आहे.सोबतच भारिप आणि बहुजन महासंघ, भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी ह्यावर देखील संपूर्ण अधिकृत माहिती समाविष्ट आहे.ह्यातील अनेक बाबी पुढच्या काळात इतिहासकार, लेखक, विश्लेषक, पत्रकार आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी महत्वपूर्ण ठेवा असेल.किंबहुना पुढच्या काळात आंबेडकरी चळवळीसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून उल्लेख केला जाणारा महत्वाचा दस्तऐवज ह्या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध असेल असा मला सार्थ विश्वास आहे.
लिखाण पुर्ण केले आणि आता त्याचे लवकरच प्रकाशन करण्याचा प्रयत्न आहे.
राजेंद्र पातोडे
अकोला
९४२२१६०१०१
वंचित #अकोलापॅटर्न #अकोला #इतिहास
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत