देवेंद्रजी, ‘अणाजी’ पंत व्हायचं की “अन्ना” जी पंत व्हायचं तुम्हीच ठरवा !

दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. 9561551006
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यात महायुतीची सत्ता आली आहे. प्रचंड मोठ्या बहूमताने हे सरकार स्थापन झाले आहे. २०१४ ला अवघ्या देशात मोदींची लाट असतानाही जेवढे बहूमत मिळाले नव्हते तेवढे बहूमत आत्ता मिळाले आहे. हे कसं शक्य झालं ? याच गणित फक्त भाजपाला आणि फडणवीसांनाच माहित आहे. बाकी या निकालाबाबत लोकांच्यात अनेक प्रश्न आहेत. शंका-कुशंका आहेत. लोकांच्यात संभ्रमाची अवस्था आहे. महायुतीचं हे यश लोकांना निखळ वाटत नाही. सामान्य जनता निकालाबाबत सांशक आहे. महायुतीवाले ‘जय श्री रामा’ चा नारा देतात. रामाच्या नावाने राजकारण करतात. राज्यातल्या एका सामान्य व्यक्तीने रामाच्या बायकोबाबत शंका व्यक्त केली तर रामाने बायकोचा त्याग केला. इथं लाखो लोकं आलेल्या सत्तेबाबत शंका व्यक्त करत आहेत पण हे रामाचे तथाकथित भक्त सत्ता सोडणार नाहीत. सत्तेचा त्याग करणार नाहीत. जनतेच्या मनातील संशयाचे निराकारण करणार नाहीत. संभ्रमाच्या स्थितीतच राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस तिस-यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले आहेत. सर्वप्रथम त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा. त्यांच्या हातून खुप चांगले काम घडावे. त्यांच्या हातून राज्याच्या विकासाचा दिपस्तंभ उभारला जावा याच सदिच्छा.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आजवर जेवढे म्हणून चेहरे आले ते तमाम महाराष्ट्राने स्विकारले. त्यात सर्वात जास्त वादग्रस्त ठरले ते देवेंद्र फडणवीस. फडणवीसांची कारकिर्द प्रचंड वादग्रस्त ठरली. राज्याच्या एकूण राजकारणात फडणवीसांची प्रतिमा मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरलेली आहे. राज्यात त्यांचा खुप मोठ्या प्रमाणात तिरस्कार केला जातो. फडणवीस याचं कारण सांगताना म्हणतात की, “मी ब्राम्हण असल्याने माझा तिरस्कार केला जातो किंवा माझ्यावर टिका केली जाते !” खरेतर यात थोडेफार तथ्य असेलही. काही प्रमाणात, काही लोकांना त्यांचा ब्राम्हण असण्याचा रागही असेल पण हे पुर्ण सत्य नाही. कारण या पुर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशींनीही काम केले आहे. त्यांच्याबाबत आजतागायत कुणी तिरस्कार केल्याचे स्मरत नाही. लोकांना कधी त्यांची जात आठवली नाही. ब्राम्हण समाजातले अनेकजण महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. त्यांना भरभरून प्रेम दिले. त्यांची जात लोकांना कधीच आठवली नाही. आचार्य अत्रे, कॉ एस एम जोशी, पु. ल. देशपांडे, कुसूमाग्रज, लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर अशी अजून खुप नावं सांगता येतील ज्यांना महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले आहे. तेंडूलकरला तर लोकांनी क्रिकेटचा देव म्हणून पुजले. फडणवीसांची जात सरसकट सर्वांना नाही आठवत पण काही लोकांनाच का आठवत असावी ? का लक्षात येत असावी ? याचेही चिंतन त्यांनी करावे. सध्या महाराष्ट्रात त्यांना ‘अणाजी’ पंत म्हणून ओळखले जाते. याला फडणवीसच जबाबदार आहेत. त्यांच्या हाती राज्यातल्या सत्तेची सुत्रं आल्यापासून ते ज्या पध्दतीचे राजकारण करत आहेत ते पाहता लोक वेगळं काय बोलणार ? देवेंद्र फडणवीस ज्या वेळी विरोधी पक्षात होते तेव्हा ते एक आश्वासक, उमदा, तडाखेबंद, लढाऊ आणि आपला नेता वाटत होते. त्यांना पाहिले की नेता असावा तर असा असे वाटत होते. त्यांची भ्रष्टाचाराच्या विरोधातली पोटतिडीक, विधानसभेतलं तुटून पडण, आवाज उठवण, जनतेच्या प्रश्नावर सभागृह गाजवण, सत्ताधा-यांना सळो की पळो करून सोडण लोकांना खुप भावत होतं. २०१४ ला ते मुख्यमंत्री झाले आणि राज्यातल्या हजारो लोकांना अपुर्व आनंद झाला. आता हा माणूस राज्यात विकासाची गंगा आणेल, राज्यातला सगळा भ्रष्टाचार खणून काढेल. लोकहिताच्या, लोक कल्याणाच्या योजना कार्यान्वीत करेल. पण झालं उलटच. २०१४ नंतर राज्याच्या राजकारणाचा पुर्ण पोतच बिघडला. १४ नंतरची पाच वर्षे जरा बरी होती त्यानंतर १९ ते २४ राज्याचे राजकारण गटारीच्या लायकीला गेले. राजकारण नासवले गेले. राजकारणाला या लायकीला आणण्यात फडणवीसांचा मोठा वाटा आहे. आरोप-प्रत्यारोप, टिका, द्वेष, तिरस्कार, खुन्नस या गोष्टींनी सगळी मर्यादा सोडली. अत्यंत टुकार लायकीला राजकारण आले. कुणीही उपटसुंभ कुणालाही कसेही बोलू लागला. टिका करताना कसलीच मर्यादा राहिली नाही. राजकारण म्हणजे पारंपारिक शत्रुत्व, वैर आहे अशा पध्दतीन केले जात आहे. भारत-पाकिस्तान वादापेक्षा राज्यातले पक्षीय वाद व मतभेद टोकाला गेेले आहेत. फडणवीसांनी सांभाळलेल्या काही पट्ट्यांनी तर पानपट्टीवरच्या भांडणापेक्षा खालची लायकी आणून ठेवली. महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण अध:पतीत होताना दिसले. एकेकाळी सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणा-या महाराष्ट्राची युपी-बिहार पेक्षा वाईट अवस्था झाली आहे. कुणी काहीही म्हणो पण याची पेरणी देवेंद्र फडणवीसांनीच केली आहे. हे सगळं करताना फडणवीसांनी काहीच तारतम्य बाळगलं नाही. आजवर राजकारणात त्यांच्याइतक्या नैतिकतेच्या गप्पा कुणीच झोडल्या नाहीत. विशेष म्हणजे त्यांच्याइतकी नैतिकता कुणीच फाट्यावर मारली नाही.
देवेंद्र फडणवीसांनी ज्या लोकांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच सोबत घेतले. त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगली. ज्यांच्या विरोधात पुरावे गोळा केले, बैलगाडीने ते विधानसभेत नेले त्यांनाच सोबत घेवून सत्ता मिळवली. सत्तेसाठी जे जे करता येईल ते ते केले. ते हे सगळं करत होते तेव्हा नैतिकतेच्या, साधनशुचितेच्या, प्रामणिकपणाच्या गप्पा मारणारे फडणवीस हेच का ? असा प्रश्न पडत होता. बाकी विकासाच्या योजना वगैरे तर बाबी बोलायलाच नको अशा आहेत. नेमके फडणवीस खरे कुठले ? ते का हे ? असा प्रश्न पडावा इतपत फडणवीसानी रंग बदलले. राजकारणाला चोवीस तास कट-कारस्थानाचा जणू अड्डाच बनवले. त्यामुळेच त्यांची प्रतिमा “अणाजीपंत” अशी झाली आहे. फडणवीस आज मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत पण ते ख-या अर्थाने जनतेच्या मनातले मुख्यमंत्री नाहीत. पाशवी सत्तेने लोकांच्यावर लादलले मुख्यमंत्री आहेत. हे निसंशय सत्य आहे. फडणवीसांनी सत्तेच्या मदतीने लोकांच्यात जाऊन जनमत घ्यावे आणि जनतेला विचारावे. त्यांना समजून जाईल की ते खरच लोकांच्या मनातला मुख्यमंत्री आहेत की नाही ? ते कसेही असले तरी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. राज्याचे प्रथम नागरिक आहेत. त्यांच्या अनेक भूमिका व भानगडी पटत नाहीत, पटल्या नाहीत. पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याबद्दल नितांत आदरच राहिल. जिथं भूमिका पटत नाहीत तिथं लेखणीचा आसुड घेवून समोर खंबीरपणे उभं राहू, मग त्यांनी बेड्या ठोकून तुरूंगात टाकावं, गोळ्या घालाव्यात किंवा फासावर द्यावं. त्या कशाचीच पर्वा न करता ताटपणे उभं राहू. ते तिस-यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. इथून पुढचं राजकारण कसं करायचं ? याचा आता त्यांनीच गांभिर्याने विचार करायचा आहे. आजवर जसं राजकारण केले तसेच करायचे का ? सुडबुध्दीने वागायचं का ? कट-कारस्थानांचा सिलसिला असाच चालू ठेवत राज्य नासवायचे की विकासाचे नवे पर्व सुरू करत राज्याला एका उंचीवर न्यायचे ? लोकांच्या मनातली जात पुसून, राज्यात माजलेला प्रचंड जातीयवाद संपवायचा की तो आक्राळ-विक्राळ करायचा ? राज्यातील जनतेला गुण्या-गोविंदाने एकत्र नांदवत तमाम जनतेचा मुख्यमंत्री व्हायचे की भटा-बामणांचाच मुख्यमंत्री म्हणून मिरवायचे ? हे त्यांनीच ठरवावं. देवेंद्र फडणवीसारखा एक उमदा, हूशार, अभ्यासू व ताकदीचा नेता अशा सडक्या राजकारणात सडून जाताना नाही बघू वाटत. त्यांच्या बुध्दीला, नावाला ‘अणाजी’ पंत हे बिरूद शोभत नाही. ही त्यांची पात्रता नाही. अनाजीपंत नव्हे तर नवमहाराष्ट्राचा “नवा विकासपुरूष” हे बिरूद त्यांच्या नावापुढे लागावे. सत्ता पैशाने, धाकाने आणि प्रेमानेही मिळवता येते. फडणवीसांनी ती त्यांच्या पध्दतीने मिळवली आहे. आता याच मिळवलेल्या सत्तेचा उपयोग करत, लोकांचा व राज्याचा सर्वांगिण विकास करावा. राज्याला प्रथम क्रमांकावर नेत, जनतेचा आशिर्वाद मिळवत कल्याणकारी कारभार करावा. छत्रपती शिवाजी राजांनी, “रयतेस पोटास लावणे आहे !” हा ध्यास घेत स्वराज्य स्थापन केले आणि चालवले. त्यांचे राज्य अवघ्या रयतेचे होते. अठरापगड जाती-जमातीचे होते. शिवरायांचा रयतेच्या विकासाचा मुलमंत्र स्विकारत फडणवीसांनी रयतेच्या कल्याणाचा मार्ग पत्करावा. ते केवळ भाजपाचे, संघाचे, भटा-बामणांचे मुख्यमंत्री नाहीत तर तमाम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. बारा कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहेत. याचे भान ठेवत लोक कल्याणकारी व्यवस्था निर्माण करावी. सत्तेसाठी कुठल्याही थराला न जाता पदाची उंची, गरिमा सांभाळावी. ‘अणाजीपंत’ नव्हे तर जनतेचे प्रश्न सोडवणारा, त्यांना विकासाच्या वाटेवर नेत विकासाचे नवे पर्व सुरू करणारा, लोकांचे पोट भरायला अन्न पुरवणारा लोकांचा पोशिंदा असणारा “अन्ना” जी पंत व्हावे याच त्यांना शुभेच्छा !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत