काळरात्र महा परिनिर्वान दिवस
डॉ बाबासाहेब, आपणास कोटी कोटी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
14 आणि 15 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्म दिक्षेचा कार्यक्रम अती भव्य दिव्य स्थितीत संपन्न झाला. जगाच्या इतिहासात अशी किमया करणे कुणालाच शक्य झाले नाही. ह्या धम्म क्रांतीची ज्योत या भूतलावर किर्तीमान अशीच झाली. “नागपुरातील धम्म दिक्षेमुळे” साऱ्या जगात धम्माची पताका फडकू लागली. धम्माची ज्योत प्रकाशमान झाली. जगाच्या कानाकोपऱ्यात डॉ. आंबेडकर हे नाव प्रकाशमान झाले. भारतात नाहीसा झालेला बुद्ध धम्म 2500 वर्षानंतर तेजोमय झाला. त्याच प्रमाणे साऱ्या भारतात दिक्षाचा कार्यक्रम राबवायचा होता. संपूर्ण भारत बौद्धमय करायचा आपला संकल्प होता. म्हणून आपण 16 डिसेंबर 1956 रोजी धम्म दीक्षेचा कार्यक्रम मुंबईत राबवणार होते.
सारा भारत बौद्धमय करीन अशा आपल्या भिमगर्जनेमुळे आपले सारे विरोधक खडबडून जागे झाले, हा धर्मांतराचा झंझावात कसा रोखता येईल? याचे डावपेच लढवायला सुरुवात करण्यात आली. ह्या धम्मदिक्षेच्या लाटेमध्ये आपल्या हातातील सत्ता आणि जनतेवरील पकड नष्ट होणार तर नाही ना? अशा भयाण काळजीने त्रस्त झाले. काय करावे हेच त्यांना कळत नव्हते. त्यांची झोप उडाली होती. जिकडे तिकडे त्यांना डॉ. आंबेडकर दिसत होते. कसेही करून डॉ. आंबेडकरांचा दिक्षारुपी वादळ थांबवायचा होता.
अचानक टोळधाडी प्रमाणे अक्राळ विक्राळ काळरात्र आली आणि काळाने कारस्थान करून 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांना आमच्यापासून हिरावून नेले. दगा फटका करून काळाने घात केला. गरिबांचे उद्धारकर्ते, देशाचे घटनाकार, दिनाचे मशीहा आणि रजल्या गांजल्यांचे तारणहार, अशा महान विद्दवत्तेच्या विद्वानाला आमच्यापासून हिरावून नेले.
अरे, काळरुपी सैताणा, तुला लाज तरी कशी वाटली नाही? ज्या डॉ.बाबासाहेबांनी झोपलेल्या माणसांना जागे करून त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली. भारतातीलचं नव्हे जगाच्या पाठीवरील पद-दलितांना कल्याणाचा मार्ग दाखवून त्यांच्या जीवनात मंगलमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करून स्वतंत्र जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. अशा उपकारकर्त्या महामानवाला आमच्यापासून ताटातूट करण्याचा तुला काय अधिकार होता?
त्या काळरात्री (5 डिसेंबर 1956) डॉ.बाबासाहेबांचा विश्वासू आणि शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारा नानकचंद रत्तू रात्री 11/12 वाजेपर्यंत बाबासाहेब बरोबर काम करत होते . डॉ.बाबासाहेब “बुद्ध आणि त्यांचा धम्म” ह्या पवित्र ग्रंथाची प्रस्तावना लिहीत होते. “टंकलेखन” कऱण्यात नानकचंद रत्तु कार्यरत होता. बरीच रात्र झाल्यामुळे बाबासाहेबांच्या सांगण्यावरून नानकचंद घरी निघुन गेला. बाबासाहेब लीहण्यात तल्लीन होते. सकाळी निरोप ऐकताच नानकचंद ताबडतोब आपल्या घरून निघून आला. येताच बाबासाहेबांच्या कमऱ्यामध्ये जाताच बाबासाहेब झोपले असल्याचे त्याला जाणवले. मात्र शरीराची हालचाल न दिसल्यामुळे त्यांच्या मनात शंका आली. त्यांनी बाबांच्या शरीराला हात लावताच त्याला थोडे थंड वाटले म्हणून त्याने शरीराची मालिश करण्यास सुरुवात केली असता त्याला जाणवले की बाबासाहेब जगाचा निरोप घेवून निर्वाण पदास प्राप्त झाले. असे लक्षात येताच नानकचंदनी टाहो फोडला. “बाबासाहेब मी आलो आहे. तुम्ही मला सोडून का गेलात? मला न सांगताच का बरे गेलात? जायचे होते तर रात्री मला का बरे पाठविले? मला आपली सेवा करायला संधी का दिली नाही? नानकचंद ओक्साबोक्सी रडू लागला. अश्रुंच्या धारा थाबेनाशा झाल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहत होत्या. नानकचंद आक्रोश करून धाय धाय रडत होता.
ही दुःखद वार्ता वाऱ्याच्या वेगाने चोहीकडे पसरली. हया बातमीवर लोकांचा विश्र्वास बसत नव्हता असे अचानक झाले कसे? असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला. मृत्यूची वार्ता खरी की खोटी पडताळून पाहण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी दिल्लीमधील बाबांच्या बंगल्याकडे येवू लागल्या. इकडे मुंबईतील ‘ राजगृह ‘ हया बंगल्याकडे लोकांची अफाट गर्दी जमू लागली. जिकडे तिकडे बाबासाहेबांच्या मृत्यूची बातमी (वार्ता) ही खरी असल्याचे कळताच सारी जनता दुःखात बुडाली, व्याकूळ झाली. आक्रोश करू लागली. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू झाल्यास घरातील सर्व कुटुंब दुःखाने व्याकूळ व्हावी त्याचप्रमाणे सर्व जनाच्या मनात दुःख निर्माण झाले.
विमानतळावर दिल्लीवरून येणाऱ्या विमानाची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत होते. तहानभूक विसरून आपल्या उद्धारकर्त्या बाबाचे शेवटचे दर्शन घ्यावे ही अंतरिम इच्छा होती. तळमळ होती. रात्रीचे 1.40 वाजले होते. त्यावेळी दिल्लीवरून मुम्बई विमानतळावर विमान उतरले. बाबासाहेबांचा मृतदेह पाहताच लोक रडायला लागले. टाहो फोडून रडत होते. अश्रूंचा सडा पडत होता.
पार्थिव देह ‘राजगृहात ‘ येताच सर्वांच्या डोळ्यातील अश्रुंच्या धारा वाहत होत्या. बाबासाहेबांचे दर्शन व्हावे म्हणुन रांगा लावून दर्शन घेत होते. समता सैनिक दलाचे जवान जागता पहारा देऊन चोख व्यवस्था पाहात होते.
बाबासाहेबांचे प्रेत एका ट्रकवर ठेवून फुलांनी सजविला होता. दुपारी ठीक 1.40 वाजता प्रेतयात्रा राजगृहातून निघाली. जशी जशी प्रेतयात्रा सरकत होती तस तसे लोकांच्या अश्रुंच्या धारांचा सडा जमिनीवर पडत होता. हुंदके अनावर होत होते. “जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा .” अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे.” अशा गगनभेदी गर्जना देण्यात येत होत्या. लोकांची संख्या इतकी मोठी होती की प्रेतयात्रा मुंगीच्या पावलासारखी सरकत होती. ठीक 5.30 वाजता प्रेतयात्रा दादर चौपाटीवर पोहचली होती. दादर चौपाटीचा परिसर लोकांच्या गर्दीमुळे सागरा प्रमाणे भासत होता. अंत विधीची तय्यारी सुरु होती.
थांबा, थांबा, लोकांमधून आवाज आला. बाबासाहेब 16 डिसेंबरला मुंबईत येणार होते, आम्हाला दीक्षा देणार होते. परंतु ते आज 6 डिसेंबरलाच आलेत. त्यांना अग्नि न देता प्रथम आम्हाला त्यांच्या साक्षीने दीक्षा देण्यात यावी. दीक्षा दिल्याशिवाय अंतविधि करू नका. लोकांच्या इच्छेला मान देवून दीक्षा देण्याचा कार्यक्रम अंतयात्रेत भंते उपस्थित होते. 10 लांखाचा जनसमुदाय दीक्षा घेण्याकरिता आतुरतेने वाट पाहत होता.
भदंत आनंद कौशल्यान यांनी प्रथम त्रीसरण पंचशील वदवून सर्वांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. दीक्षा समारंभ संपल्यानंतर श्रध्दांजली अर्पण केली.
श्रध्दांजलीचा कार्यक्रम संपताच बाबांचा देह चंदनाच्या चितेवर ठेवण्यात आला. चितेला अग्नि देण्यापूर्वी पोलीस दलाच्या जवानांनी मानवंदना देणयासाठी सज्ज राहिल्यावर मुलगा यशवंत आणि पुतण्या मुंकुंदराव यांनी चीतेला अग्नि देताच पोलीस जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. चितेने पेट घेताच लोकांच्या हृदयातील ज्वाला धडधडू लागल्या. जमलेले लोक ओक्साबोक्सी रडू लागले. बाबांची चिता जळत होती. जनसागराच्या डोळ्यातील अश्रू अविरत वाहत होते.
14 एप्रिल 1891 उगवणारा सूर्य आयुष्यभर तळपून समाजाकरीता चंदनासारखा झिजून चंदनाच्या चितेवर कायमचा विश्रांतीसाठी निसर्गाच्या सानिध्यात विलीन होण्यास सज्ज झाला. आकाशातील सूर्य नित्य उगवेल परंतु हा प्रज्ञासुर्य कधीच कुणाला दिसणार नाही. परंतु आकाशातील हा महामानव चंद्र-सूर्य असे पर्यंत अजरामर राहणार आहे. अमर राहणार आहे. सूर्यासारखा तेजोमय होवून जगाला प्रेरणा देणार आहे. प्रत्येकाच्या अंतकरणांत सामावून जाणार आहे.
जन सागराचे स्पंदन ऐकून कवि वामनदादा कर्डक म्हणतो,
हळू या न ग लाटांनो, भिमाला त्रास होईल ना!
इथे निजला भीम माझा, तयाला जाग येईल ना!!
अशा किती रात्री गेल्या, तयाला झोप ना आली!
जरासा लागला डोळा, अधुरी झोप राहील ना!!
हळू या न ग लाटांनो, भीमाला त्रास होईल ना!!
सवास तयाचा कशाला जाळता!
आयुष्यभर तो – जळतचं…. होता!!
*संकलन*
राजु सोनडवले
नागपूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत