“भारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्य”

या ग्रंथाच्या प्रकाशना निमित्ताने साहित्यिक प्रा अरुण कांबळे बनपूरीकर यांचा फोन आला त्याचे प्रकाशन आम्ही सांगली येथील सिध्दार्थ परीसर लुंबिनी प्रतिष्ठान बुध्द विहार येथे केले
सदर ग्रंथ माझ्या हाती पडला तेव्हा मी पान उघडले तर प्रथम अंतरंग पाहिले त्यात सहभागी कवींची नावे पाहिली तर मोठमोठे नामांकित आणि गुरुवर्य आदर्श माझ्या साठी असणारे साहित्यिक दिसले त्याच बरोबर माझ्या अनेक मित्रांचा सहभाग दिसून आला
एवढा छान उपक्रम आणि आम्हा सर्वांचीच माता रमाई म्हटल्यावर त्यावर लिहून आपण भाग्य साध्य करण्याची संधी आली ती आव्हान म्हणून पेलण्यचा छोटासा प्रयत्न करत आहे
संपादकीय मधे प्रा डॉ अशोककुमार दवणे संपादक म्हणतात लिओ द विंची मोनालिसा अजरामर केली पण कर्तृत्ववाने रमाई मोठी आहेच रमाईचा भोळा चेहराच तिच्या विषयी लिहिण्यासाठी प्रवृत्त केले म्हणताना पेजच्या सुरुवातीलाच दोनोळी लिहिताना म्हणतात
तुझी आठवण येता होई मन ओलं ओलं
दु :ख आवरत नाही तेव्हा जातो खोल खोल
पुढे संपादक म्हणतात रमाईच्या चेहऱ्यावरील भावार्थ वेचणे अवघड होते चंदना सारखे झिजून दरवळणे फक्त तिलाच जमले बाबासाहेब यांच व्यक्तीमत्व रमाईचा त्याग यांच्या अतूट समिकरणातून एक एक पात्र साकारत गेले
काल्पनिक कोणीही लिहू शकतो पण वास्तविक पात्र होऊन गेले मरण यातना आयुष्यभर सोसल्या ऐन ऐश्वर्याच्या काळात तिला जग सोडावे लागले ती रमाई साकारायची होती असे संपादक सदर ग्रंथाचे प्रयोजन मांडताना म्हणतात 'भारताच विद्यापीठ रमाई' झाली नसती तर' जगाचं ज्ञानपीठ डॉ बाबासाहेब आंबेडकर' होऊ शकले नसते
सुरुवातीलाच माझे आवडते साहित्यिक प्रा डॉ यशवंत मनोहर यांची 'करुणेची कविता तू' ही रचना रमाईचे जीवन व्यतीत सार्थ सांगते ती या प्रकारे
करुणेची कविता तू मावत नाही कवितेतही
शब्दांशिवाय मैफल तू मावत नाही संगीतातही…
अशी सुरुवात करून रमाईचा त्याग चपखलपणे उपमा देऊन मांडलेला आहे
कवी प्रमोद वाळके आपल्या रचनेत म्हणतात ,
तुझ्यासारखे मी स्वतःला जाळून पाहिले रमाई
मला जळताच आले नाही
तुझे मन जळत होते, पाजळत होते
तुझ्या जळण्यातून सुर्य उगवत होता
अंधार मावळत होता
असंख्य मनात रात्र उजेडात होती….
या रचनेत रमाईचे जीवन अप्रतिम मांडले आहे.
संसार भीमाचा विराट सावरताना
कारुण्य चांदणे फुलून आले होते
काळीज जनांचे काळजात जपताना
ते आपुले जगणे भुलून गेले होते
ही गेय अलंकृत तालबद्ध रचना कवी इ. मो. नारनवरे यानी छान प्रस्तुत केली आहे
शेवटचे कडवे त्यांनी उत्तम मांडले आहे ते असे
ती रमाच होती :क्षमाच होती
ती मानवतेची सीमाच होती….
रमाई या रचनेत शालिक जिल्हेकर म्हणतात..
रमाईच्या किमये मुळे बाबासाहेब घडले त्यामुळे पंखविहिन पक्षांना हत्तीचे बळ आले म्हणून तुझ्या त्यागमय जिवनाचे खडतर प्रवासाचे पोवाडे गायले जातात.
कवी संजय गोडघाटे यांची जाणून घे रमाला ही रचना लक्षवेधी आहे कवयित्री प्रा डॉ विशाखा संजय कांबळे यांच्या रचनेत इतर रचना पाहता वेगळेपण जाणवते ते असे
रमाई…
आयुष्याचं कठोर जगणं
अन् संविधानाच्या
कठोर निर्मितीला घडवणं
डॉ. भूषण भस्मे यांची ‘ग्रंथवेडा धनी माझा’ ही रचना पण छान आहे
ग्रंथवेडा धनी माझा
वेड माझं लाऊ कशी
ओठी, पोटी, उशीत ग्रंथ
सवत माझी जशी
कवयित्री उषा राऊत यांनी ‘रमाई माऊली’ ही अभंग रुपी प्रस्तुती आवडली ‘रमाई ह्रदयात’ ही कवयित्री वीणा मंगेश जुनघरे सुंदर आहे ‘माता रमाई’ हा प्रा. शरदचंद्र काकडे देशमुख यांचा अभंग छान आहे. ‘माय रमाई’ ही माझे मित्र सहकारी सुभाष गवळी यांची रचना सुंदर आहे ती अशी पहिले कडवे,
गहिवरतील लेखण्या
थरथरतील इतिहासाची पानं
ढळतील अगणित अश्रूही आमचे
तू केलेल्या त्यागानं
कवयित्री हेमलता भालेराव यांची ‘महामाता रमाई’ थोडीशी हटके सुंदर कविता वाटली त्या या कवितेतील दुसऱ्या कडव्यात म्हणतात,
शेण गोवऱ्या थापताना
अशोकचक्र साकारत होती
प्रज्वलित आगीत जळताना
समतेचा संदेश जुळवत होती…
आमच्या गृपच्या सहकारी कवयित्री कविता काळे ताई यांची थोटीशी गझलरुपी रचना सुटसुटीत आहे त्यातील दोन ओळीत त्या म्हणतात,
पंढरी विठ्ठलाचीच आली घरी
भिमाच्याच चरणी फुले वाहिली…
कवी शांताराम नरके याची ‘वैभव रमाचे’
सुंदर कविता आहे तसेच भीमराव कांबळे ‘सारजसुत’ यांच्या ही रचनेचा उल्लेख करावा वाटतो माझे मित्र जे जित्याजाली नावाने प्रसिद्ध आहेत ते जितेंद्र सोनवणे आपल्या छानशा रचनेची सुरुवात करताना म्हणतात,
जळली ती वात
म्हणून दिवा पेटला
दिली साथ रमाई म्हणून
भीम आमच्यासाठी झटला
कवयित्री रुपाली तुकाराम भोरकडे यांनी आपल्या रचनेतून रमाईचा इतिहास मांडला आहे कवी प्रा रविचंद्र हडसनकर सरांची रचना मनभावन आहे प्रा डॉ जगदीश कदम सर आपल्या रचनेत रमाईच जीवन म्हणजे मूक संघर्षच आहे म्हणतात आणि ते खरेच आहे प्रा डॉ राजेंद्र गोणारकर सर यांची छोटी पण प्रभावी रचना आहे कवी बी. एम. हातोडे यांची सुध्दा रचना छान आहे कवयित्री विमल शेंडे यांनी छान मुक्तछंद रचना केली आहे प्रा. विनोद कांबळे आपल्या रचनेत सुचवतात आपल्या लेखण्याद्वारे रमाई पुढील पिढीला कळावी कवी संजय कदम यांची उत्साह वर्धक रचना आहे.
‘राईचा त्याग’ या रचनेत दु:खाच सौंदर्य अशी वेगळी कल्पना कवयित्री सावित्री आडकुते-शेवाळकर यांनी मांडली आहे कवी रवी ताकसांडे यांची थोडी मोठी कविता आहे पण छान आहे प्रा ज्ञानेश्वर नागदेवते यांचीही रचना सुंदर आहे ‘ रमाई लाखात एक’ या कवितेत कवी विजय भगत यांनी रमाईची छान मांडणी केली आहे कवी संतोष बारसागडे यांची छोटीच रचना आहे पण छान आहे ‘लंडनवरुन पत्र’ ही भावनोत्कटता निर्माण करणारी रचना संजय लोहकरे यांनी केली आहे.
‘रमाई’ ही विद्रोही कवी नामदेव ढसाळ सर यांची रचना या संग्रहात समाविष्ट आहे ही या संग्रहाचे विशेष आणि जमेची बाजू म्हणता येईल तसेच आंबेडकर चळवळीत शीर्षस्थानी असलेल्या वामनदादा यांची सुध्दा रचना आहे
आदरणीय ज. वि. पवार सरांची -लोळत आलं पंढरपूर’ ही सुंदर रचना आहे सध्या आघाडीचे कवी ज्यांच्या कविता आणि कविता वाचन परदेशात होत आहे ते माझे कवीमित्र दंगलकार नितीन चंदनशिवे यांचीही रचना आहे तसेच कवी पार्थ पोळके यांचीही रचना आहे.
कवयित्री ऊर्मिला पवार यांचीही रचना सुंदर आहे कवयित्री कविता मोरवणकर याची रचना मन वेध घेते ते असे,
अंधाराचं गाठोडं सोडून
माझा बा पेरत होता प्रकाशाचं बीज
तेव्हा त्याचा संसार सांधण्यासाठी
तू थापत होतीस गोवऱ्यांची ठिगळ
काळोखाच्या पोटात शिरुन…
कवी प्रकाश पवार यांची सध्या सर्व ठिकाणी गाजत असलेले सर्वांना ठेका धरायला लावणारे गाणे ‘नांदणं नांदणं .. ‘ समाविष्ट आहे कवी अमोल महिते यांनी आपल्या कवितेतून रमाई बद्दलचे शब्द बाबासाहेब यांच्या तोंडी वापरले आहेत कवयित्री अनुराधा जोशी यांची सहज सोप्या शब्दात सुंदर रचना आहे कवी क. वि. नगराळे यांचा सुंदर अभंग आहे कवी बाबाराव मडावी यांची रचना पंढरपूरच्या दर्शनासाठी… वेगळे पण दाखवते
कवी प्रा. जनार्धन गजभिये आपल्या रचनेतून आजच्या स्त्रियांना रमाईचा आदर्श घ्यायला सांगत आहेत .
प्रा. डॉ. अशोक नामदेव पळवेकर यांची त्यांच्या घरातील बाबासाहेब यांच्या कुटुंब वत्सल फोटो वरुन खूप सुंदर वर्णन केले आहे
प्रा. संजय घरडे यांनी अगदी छोट्या रचनेतून मोठी रमाई मांडली आहे कवयित्री पुष्पा बोरकर यांची रचना सुंदर आहे त्यांच्या रचनेतील दुसरे कडवे असे तशी सर्व कडवी छान आहेत.
अंधारलेल्या मळवाटेची
तेजस्वी वात तू!
माझ्या आयुष्याच्या कवितेची
ऱ्हस्व, दीर्घ, उकार तू!
कवयित्री शालिनीताई मांडवे यांनी आपल्या रचनेतून रमाई आणि मुले व बाबासाहेब यांची परवड मांडली आहे कवयित्री सुनंदा साहेबराव पाटील यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे कवी नंदकिशोर साळवे यांची भावनाप्रधान रचना, आहे रचनेची सुरुवात
आखेरचे श्वास तिने
कुशीत माझ्या घेतले!
अवेळी मरण आले
रमाला अवेळी मरण आले!!
कवी प्रा. गौतम जगताप आपल्या रचनेत म्हणतात ,
जेव्हा संघर्ष झेलतो
तेव्हा रमाई कळते
जीव ओतून लेखणी
शाई रमाई बनते
धार धार लेखणीत
माता रमाई शोभते
क्रांतिसुर्याचा प्रकाश
रमा आभाळ बनते
कवी वाल्मिक सोनवणे लग्न सोहळा हा अभंग लिहिला आहे सुंदर प्रस्तुती केली आहे
कवी राजेश सावंत छोटी पण सुंदर रचना आहे कवी ठकसेनकुमार जाधव यांनी भूत वर्तमान आणि भविष्य अशी आशावादी रचनेची पेशकश केली आहे कवी आतिष घाडगे यांची ही रचना सुंदर आहे कवी रमेश जाधव हे आपल्या शीलवान रमाई या रचनेतून आपल्या मध्ये रमाई कशी असावी हे व्यक्त होताना लिहितात,
गौतमाचा ग शिकवणारी
भीमरायाचा भ शिकवणारी
घरोघरी अशी जन्मणारी
आई ती व्हावी जशी रमाई
कवी युवराज सुरळकर यांघी अगदी छोटी रचना बाबासाहेब रमाईस धीर देताना चपखल मोजक्या शब्दात मांडणी केली आहे तिमिरातून तेजाकडे…..कवयत्री मंगला सुधाकर कुमावत यांनी रमाईचा जीवनसार रचनेत मांडला आहे प्रा. बापुराव जगताप यांची रचना छान आहे प्रा. ना. तु. पोघे यांची सुंदर रचना आहे ते प्रथम ओळींमध्ये आसे म्हणतात ,
जाळून पोळून होरपळून घ्यावे लागते स्वतःला
धगधगत्या उन्हात उभ्या आयुष्याची होते लाही
धरणीनेच करावा सुर्याचा संसार
साक्षात धरणीच होतीस तू रमाई
कवी प्रा. दामोदर मोरे यांचीही रचना सुंदर आहे माझे मित्र रामजी गायकवाड यांची तालबद्ध सुंदर रचना आहे माझे कवीमित्र अजय रामटेके यांची सुंदर शब्द गुंफण रचना आहे कवयित्री स्नेहा मोटघरे यांची रचना उत्साहवर्धक आहे कवी रविंद्र ताजणे रमाई म्हणजे काय हे छान मांडले आहे कवी शालिक वानखेडे रमाई म्हणजे काय हे अप्रतिम पणे सांगताना म्हणतात,
‘भीमाच्या डोईवर झाकलेलं आभाळ
म्हणजे रमाई ‘
कवी आचार्य सूर्यकांत भगत यांनी ‘रमाईचे मार्गदर्शन’ या रचनेत योग्य मार्गदर्शन केले आहे प्रा. डॉ. कवयित्री वनमाला लोंढे यांची रचना सुंदर आहे त्या रचनेचा शेवट करताना लिहितात,
याची जाणीव रामूला
त्यागले स्वतःच्या इच्छेला
तिने संसाररूपी जाळ्यात
अडकवले नाही भीमाला
कवयित्री शबाना मुल्ला यांची साधी सोपी अष्टाक्षरी सुंदर रचना आहे कवयित्री आशा अहिरे यां रमाईची थोरवी मांडताना लिहितात,
नाही कसले शिक्षण
ना कसली होती पार्श्वभूमी
नशिबाने कायमच हिरावली
तिची मांडीवरची तान्ही
कवी किशोर घोरपडे आपल्या कवितेत म्हणतात हिमालयाला मोकळेपणाने रडता येत नाही सूर्याला दु:ख व्यक्त करता येत नाही कवी रमेश बोर्डेकर यांची सुंदर गझल आहे आमच्या सहकारी कवयित्री उमा किशोर गजभिये यांची प्रश्नार्थक रचना छान आहे माझे कवी मित्र प्रा डॉ अरुण कांबळे सर यांची लयबद्ध रचना आहे कवी आबासाहेब उमाप हे आपले रचनेत रमाई सांगताना म्हणतात,
इतकं सोपं नसतं
स्वता:च आयुष्य विसरुन
दुसऱ्यासाठी चंदन होणं
दिव्याखाली वात होऊन
आयुष्यभर जळून
दुसऱ्याचं जीवन उजळवून टाकणं
संग्रहाच्या शेवटची छोटी पण तेवढीच छान रचना कवी विनोद नाईक यांची वाचायला मिळते शेवटच्या कव्हर पानावर बाबासाहेब यांचे वाक्य दिले आहे “रमा खरी धनवान आहे. तिची खूप उधारी आहे माझ्यावर. मी कधीही फेडू शकणार नाही….. “
ग्रंथ बांधणी उत्तम आहे टिकाऊ आहे पानांचा दर्जा उत्तम आहे अक्षर मांडणी अतिउत्तम आहे सदर ग्रंथ संपादक यांनी प्रज्ञा प्रशांत वाघमारे यांना सस्नेह अर्पण केला आहे.
भारताचं विद्यापीठ रमाई
संपादक
प्रा. डॉ. अशोककुमार दवणे
मुद्रक
वर्षा ऑफसेट, औरंगाबाद
मुद्रितशोधक
चंद्रप्रकाश गायकवाड, नांदेड
अक्षरजुळवणी
क्रिएटिव्ह प्रिंट ॲन्ड मीडिया सर्व्हिसेस नांदेड
मुखपृष्ठ
संतोष घोंगडे पुणे
प्रथमावृत्ती – १४ ऑक्टोबर २०२४
किंमत – रु ८००/-
#राजू_वाघमारे
सांगली
8668320104
शेवट माझी रचना जी संग्रहात नाही
तळपतं होता जेव्हा
सुर्य मध्यान्ही
तेव्हा तुलाच चटके
बसले पायी अनवाणी
जेव्हा प्रकाश पडत होता
अंधारल्या राती
तुच जळालीस होऊन
दिव्याच्या वाती
वेशीबाहेर अंधारी
रात होती
तेव्हा चांदण्या रातीला
चंद्राची उर्जा तूच होती
तुझा त्याग करुणा
नाही येत शब्दांत बांधता
उध्दरली कोट्यानूकोटी कुळे
झालीस पुढील पिढ्यांची माता
#राजू_वाघमारे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत