महापरिनिर्वाण दिनमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठ

शांत चैत्यभूमी अभियान !

६ डिसेंबर १९५६ हा परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ! मानव मुक्तीच्या लढ्यातील हा एक सर्वाधिक दु:खदायक दिन ! या दिवशी कोट्यावधींच्या संख्येने आंबेडकरवादी जनता चैत्यभूमी येथे जमा होते. जात- भाषा , प्रांत – देश यांच्या सीमा विसरून ही जनता येथे येते व आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करते.

या भावनाप्रधान जनतेसमोर गटतटाचे प्रदर्शन होतेच शिवाय कर्कश आवाजातील भोंगे वाजवून तिच्या भावनांचा अनादर देखील केला जातो. अगदी एक फूट अंतरावर असूनही कोणाला कोणाचे म्हणणे ऐकू येत नाही. बरे , हा कर्णकर्कश गोंगाट करणारे कोण असतात तर आपलेच भाऊ- बहिण ! आपलेच दात आणि आपलेच ओठ !

२०१५ साली एका हाताच्या बोटावर मोजण्याजोग्या काही महिला कार्यकर्त्या पुढे आल्या व हा गोंधळ थांबविण्याचा प्रयत्न करू लागल्या. ‘आजचा दिवस दु:खाचा आहे. म्हणून आपण आपल्या मुक्तीदात्याला शांततेने अभिवादन करू या’ असे विनवू लागल्या. या विनंतीचा तात्पुरता परिणाम दिसे, पण त्या पुढे जाताच पुन्हा गोंगाट सुरू होई ! मग पुढील वर्षी नीट नियोजन करून ‘शांत चैत्यभूमी अभियान’ सुरू केले. प्रथम महिलांची नोंदणी करुन घेतली. नंतर दादर येथील छबिलदास शाळेत वर्ग भाड्याने घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले. आपले म्हणणे शांतपणे कसे समजावून सांगावे , स्वतः शिस्त कशी पाळावी , हे सर्व शिकवले. बॅनर्स , प्लाय कार्ड्स बनवून शिवाजी पार्क येथे स्टॅाल देखील घेतले. मग पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान केलेल्या ५०० प्रशिक्षित महिलांना “शांत चैत्यभूमी अभियान” राबविण्यासाठी मैदानात उतरवले. या महिला दोन रांगा करून व हातात शांततेचे फलक घेऊन शिवाजी पार्क परिसरात शांतता फेरी काढू लागल्या. जिथे जिथे गोंगाट होईल तिथे जाऊन ही शांतता फेरी नम्रतेने हळू आवाजात दु:खद दिवसाची आठवण करून देऊ लागली. या प्रशिक्षित महिलांचे नम्र वागणे – बोलणे , समजावून सांगण्याची पद्धत व एकोपा पाहून गडबड , गोंधळ , गोंगाट करणारे भानावर आले. त्यांना देखील या दु:खद दिवसाची जाणीव होऊ लागली.

हा उपक्रम यशस्वी होत आहे असे बघून काही कार्यकर्त्यांनी ‘स्वच्छ चैत्यभूमी अभियान’ चालू केले. त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळू लागला. अशा तऱ्हेने मागील दहा वर्षे ‘शांत चैत्यभूमी अभियान’ राबविल्यानंतर आज महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्क शांत झाले आहे. काही राजकीय मंच सोडले तर कोणीही भोंग्यांचा आवाज करीत नाहीत. हे राजकीय मंच देखील आज ना उद्या शांततेचे सहकार्य करतील , अशी आशा बाळगू या. हे यश खऱ्या अर्थाने आंबेडकरवादी जनतेचे आहे. प्रगतीची नवी नवी शिखरे काबीज करीत चाललेला हा समाज प्रगल्भतेने आपल्या समस्यांची उत्तरे शोधू लागला आहे. ‘शांत चैत्यभूमी अभियान’ हे याचे एक उदाहरण आहे.

या वर्षी देखील महापरिनिर्वाण दिनी मोठ्या संख्येने आंबेडकरवादी जनता येणार आहे. म्हणून ‘सोशल एज्युकेशन मुव्हमेंट’ व ‘आदर्श जयंती अभियान’ यांच्यातर्फे संयुक्तपणे ‘शांत चैत्यभूमी अभियान’ राबविले जाणार आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या महिलांना तात्पुरते ओळखपत्र , शांतता फलक व उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून टोप्या देण्यात येतात. तसेच त्यांच्या चहापाण्याची व जेवणाची सोय पुरुष कार्यकर्ते आनंदाने करतात. सर्व महिलांना एकाच वेळेस न बोलावतां त्यांचे पाच- सहा गट तयार करून प्रत्येक गटास अर्धा दिवस ठरवून दिला जातो. त्यामुळे नियोजन करणे सोईचे जाते.

खरे तर महापरिनिर्वाण दिनी असे ‘शांत चैत्यभूमी अभियान’ राबविले जाणे हे काही चांगले लक्षण नाही. समाजाची प्रगल्भता एवढी वाढायला हवी की , तिथे येणारी प्रत्येक व्यक्ती ही ‘शांत चैत्यभूमी अभियानाची पाईक’ म्हणून येईल. या जनतेनेच स्वतः पुढाकार घेऊन आपल्या परिघातील गडबड- गोंधळ – गोंगाट थांबवायला हवा. आपण एका दु:खद प्रसंगाला सामोरे जात आहोत , म्हणून गांभीर्य व नम्रता यांचा अंतर्भाव आपल्या वागणुकीत यायला हवा. तसे झाले की, बाहेरचे वातावरण आपोआप शांत होईल. ही शिस्त अंगी बाणली तर हे ‘शांत चैत्यभूमी अभियान’ कालबाह्य होईल.

भविष्यात असे चित्र निर्माण होईल तेव्हा होईल. परंतु सध्या तरी महापरिनिर्वाण दिनी ‘शांत चैत्यभूमी अभियान’ राबवणे गरजेचे आहे. ज्यांना या उपक्रमांत कोणताही सहभाग द्यायचा आहे त्यांनी कृपया समन्वयकांशी संपर्क साधावा.

मुंबईकर जनता दरवर्षीप्रमाणे या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद देईल, असा विश्वास वाटतो.

राजश्री कांबळे (समन्वयक) : 969 933 9850
रिमा ओणकर (समन्वयक) : 959 464 2428
संतोष जाधव (समन्वयक) : 981 915 6543

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!