निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

आंबेडकरी गढ पार ढासळलाय. जबाबदार कोण?

समाज माध्यमातून साभार
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उत्तर नागपूरच्या भागात फिरणे झाले. अनेक ठिकाणी मोठ्या झोपडपट्ट्या आहेत त्यामध्ये 80% आपल्या समाजचे लोक वास्तव्यास आहेत. तिथली परिस्थिती बघून मन भरून आले. बाबासाहेबांनी आम्हाला ज्या उकिरड्यावरून काढून आणले आज त्याच उकिरड्यात आम्ही आमच्या लोकांना ढकलले आहे.गौतम बुध्द आणि बाबासाहेबांच्या नावावर असलेल्या वस्त्यांमध्ये तर कच-यांचे ढिगारे, फिरणारी डुकरे, कच-याने तुंबलेला नाला, अनेक ठिकाणी तुटलेली नाल्याची भिंत बघून आपण वस्त्यांना आपल्या महापुरुषांची नावे देवून चुक केली असे वाटले.
या वस्त्यांमध्ये फिरतांना बुध्दविहार दिसले पण वंदना घेण्याशिवाय कोणत्याही विहारात बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारा एकही प्रबोधनात्मक, शैक्षणिक, आर्थिक उपक्रमाची दिसला नाही ही अत्यंत खेदाची बाब वाटली.
बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत आपल्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी काॅलेज काढली. बाबासाहेबांना आदर्श माणणा-या समाजाने त्यांचे अनुकरण करुन वस्ती तिथे विहार आणि विहार तिथे शिक्षण हा उपक्रम राबवायला पाहिजे होता कारण केवळ शिक्षणामुळेच आपल्याला चांगले जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. बाबासाहेबांनी आपल्यासाठी तीन कॉलेज काढली होती आजपर्यंत आपण किमान तीनशे शैक्षणिक संस्था काढल्या पाहिजे होत्या पण तसे काही झाले नाही. राखीव मतदारसंघातून निवडून जाणा-या अनुसूचित जातीच्या लोकांनी किमान चांगल्या सरकारी शाळा तरी टिकवून ठेवायला पाहिजे होत्या तर तेही दिसले नाही. उत्तर नागपूर मध्ये एकही चांगली सरकारी शाळा दिसली नाही. अनेक शाळा बंद पडल्यात. ज्या आहेत त्यांची परिस्थिती गंभीर आहे.
उत्तर नागपूर फिरतांना इंदोरा येथील एका ठीकाणी थांबलो. एक गृहस्थ बोलले की या जागेला आंबेडकरी समाजाचा बालेकिल्ला म्हणत असत. चळवळीची सर्व सुत्र इथूनच हालत असत. त्या जागेवर उभे राहून मी त्या सर्व बाबासाहेबांच्या सेनानींना मनातून सलामी दिली. क्षणभर मन अभिमानाने फुलून गेले. पण आज कुठेही त्या आंबेडकरी गढाच्या खाणाखुणा दिसत नाहीत. कुठेही बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहून आपण काम केले पाहिजे ही भावना पण दिसत नाही. बाबासाहेबांचा फोटों भिंतीवर टांगला की आपली जबाबदारी संपली अशा आविर्भावात आम्ही रहातो.
एकेकाळी कांग्रेसच्या लोकांना उत्तर नागपूर मध्ये प्रचार करतांना दहादा विचार करावा लागत असे. जनसंघ/भाजप तर प्रचार करण्याचा विचारही करत नसत पण आज प्रत्येक ठिकाणी कांग्रेस आणि भाजपचे बुथ लागतात आणि या बुथवर पाचशे/ हजार रुपयांसाठी आमच्या बंधू भगिनी दिवसभर बसतात. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तमाशाचा फड चालविणा-या व्यक्तीकडून दान घेण्यास मनाई केली कारण काय तर त्या तमाशाच्या फडात आपल्या समाजाच्या बायांना तो नाचवतो म्हणून. आज स्वतःला आंबेडकरी म्हणवणारी माणसे आपल्याच बंधु भगिनींना कांग्रेस/ भाजपाच्या बुथवर बसण्यासाठी पाचशे हजार रुपये देतांना बघितले आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला सुशिक्षित वर्ग हाच का हा प्रश्न मनाला वेदना देऊन गेला. संविधान चौकात भाजपाने जय श्रीराम नारे दिले म्हणून आपल्याला संताप आला, आपण निषेध व्यक्त केला होता पण आपल्याच वस्तीत आपलीच बांधवं पाचशे हजार रूपयांसाठी भाजपच्या बुथवर वर दिवसभर बसलेली बघून आपल्या संवेदना किती बोथट झाल्या आहेत हे प्रकर्षाने जाणवले.
नागपूरच्या अंबाझरी येथील आंबेडकर भवन रातोरात पाडले, दीक्षाभूमीला सौंदर्यीकरणाच्या नावाखाली खोदुन बळकावण्याचा प्रयत्न केला गेला, नारा येथील 130 एकर जमीनीवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या जागेसाठीचे आंदोलन आजही आमच्या भगिनी करीत आहेत.यावर आमचे नेते, आमच्या समाजाचा अधिकारी वर्ग, विचारवंत एक शब्द बोलत नाहीत‌. ही लाचारी आहे की आप्पलपोटेपणा‌?
निवडणूकीच्या एक दोन दिवस अगोदर बाबासाहेबांच्या नावावर असलेल्या पक्षांनी, संघटनांनी, उत्तर नागपूरच्या बाबासाहेबांच्या नावावर भाषणे देवून समाजात आंबेडकरी विचारवंत असल्याची ख्याती पावलेल्या लोकांनी कांग्रेसला समर्थन दिले होते.
हे वाचून “मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला,” हे बाबासाहेबांचे वाक्य आठवले. एकेकाळी आंबेडकरी समाजाचा गढ आज पार ढासळलाय, जमिनदोस्त झालाय याची खात्री पटली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!