प्राध्यापक मधू दंडवते यांनी सांगितलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी…!

कोकण रेल्वेचे संस्थापक, स्कुटरवरून संसदेत शपथविधीसाठी जाणारे पहिले व शेवटचे मंत्री श्री. मधु दंडवते यांचा स्मृतिदिन..!
( २१ जानेवारी १९२४ – १२ नोव्हेंबर २००५ )
विनम्र अभिवादन 🙏🌷🙏
( या आठवणी सांगताना प्रा. दंडवते यांचे डोळे पाण्याने डबडबले होते..)
मी सिध्दार्थ काॅलेजमध्ये भोतिकशास्त्र या विषयाचा प्राध्यापक होतो. यावेळी श्री. पाटणकर हे सिध्दार्थ काॅलेजचे प्राचार्य होते. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्याने मी बरेच दिवस महाविद्यालयात जाऊ शकलो नव्हतो. आपण शिकविण्यासठी महाविद्यालयात न गेल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होतेय, असा विचार करून मी प्राध्यापकीचा राजीनामा देण्याचे ठरविले. प्राचार्य पाटणकर यांनी माझे राजीनामा पत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठविले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पत्र पाहिले आणि ताबडतोब फाडून टाकले. ते प्राचार्यांना म्हणाले की, प्राध्यापक दंडवते हे देशासाठीच खाडे करीत आहेत. चळवळीत सामील होत आहेत. ते काही मौजमजेसाठी किंवा चैनीसाठी रजा घेत नाहीत. तेव्हा त्यांचा राजीनामा मंजूर करू नये. प्राध्यापक दंडवते जितके दिवस महाविद्यालयात आले नाहीत तितक्या दिवसांची हजेरी लावा. त्यांना तितक्या दिवसांचा पगारही द्या. असे होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर…!
प्रा. दंडवते पुढे सांगू लागले की, मी १९४६ ते १९७१ सालापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिध्दार्थ काॅलेजात २५ वर्षे नोकरी केली. फिजिक्सचा प्राध्यापक होतो. इतर अनेक काॅलेजांनी मला बोलाविले. मोठ्या पगाराचे आमिष दाखविले. पण मी दुसऱ्या काॅलेजात गेलो नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे काॅलेज आहे. तिथेच नोकरी करायची असे मी ठरविले होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आनंदी असले की खुप बोलायचे, तासन् तास गप्पा मारायचे. एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर असेच रंगात येऊन मला एक आठवण सांगितली. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की, व्हाइसरॉय व त्यांच्या पत्नी यांना पुरीच्या मंदीरात दर्शनासाठी जायचे होते. तेव्हा व्हाइसरॉय म्हणाले, ” आंबेडकर तुम्हीही चला आमच्याबरोबर.” तेव्हा बाबासाहेब म्हणाले, ” मी तुमच्याबरोबर येणार नाही कारण मला तेथे प्रवेश देणार नाहीत.” तेव्हा व्हाइसरॉय म्हणाले, ” अहो, आंबेडकर, तुम्ही एक्झिक्युटिव्ह मेंबर आहात. तुम्हाला कोण अडविणार ?”
अखेर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना घेऊन व्हाइसरॉय मंदिराच्या दर्शनासाठी निघाले. मंदिरातील एक पुजारी तेथे आला, बाबासाहेबांना म्हणाला, तुम्हाला आत जाता येणार नाही. डॉ बाबासाहेब यांनी विचारले. का ? नाही म्हणाला – कारण तुम्ही अस्पृश्य आहात.
डॉ बाबासाहेब यांना हे अगोदरच माहीत होते म्हणून त्यांनी जास्त वाद न घालता तसेच मागे फिरले, पण त्याचवेळी त्यांनी पुजाऱ्यांना बजावले की, ” तुम्हारे मंदिर में इन्सान नही तो भगवान भी नही है…!
डॉ बाबासाहेब आंबेडकर महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाबाबत सांगत की, आम्ही आंदोलने केली ती पगारवाढीसाठी किंवा महागाई भत्ता वाढीसाठी नव्हे. महाडच्या तळ्यात डुकरे पाणी पीत होती. आम्ही तर माणसे आहोत. आम्हाला का पाणी नाही ? म्हणून मी मानवतेच्या हक्कासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.
प्रा. दंडवते मोठ्या समरसतेने एक आठवण सांगत होते. प्रा. दंडवते म्हणाले की, १९५५ सालची गोष्ट आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, दंडवते, माझ्या समाजबांधवांनी मला पुणे करारावर सही करु नका,असे सांगितले होते. वेगळा मतदार संघ हवाच, असे ते म्हणत होते. परंतु मी माझ्या देशासाठी माझी मागणी मागे घेतली, आणि पुणे करारावर सही केली. एम.के. गांधींनी उपोषण मागे घेतले. त्यामुळे इतिहासात नोंद झाली की, एका अस्पृश्य जातीत जन्माला आलेल्या व्यक्तीने गांधीचे प्राण वाचविले, आणि एक उच्च जातीच्या ( ब्राह्मण ) माणसाने ( नथुराम गोडसे ) महात्मा गांधीजीचे प्राण घेतले…!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत