बापुसाहेब ऊर्फ बी सी कांबळे यांना स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली व विनम्र अभिवादन!
प्रज्ञासुर्य बोधीसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासु निष्ठावान, सहकारी व अनुयायी, उच्चविद्याविभूषित, निस्वार्थी, निर्भीड, स्वाभीमानी, लढावु, झुंझार तसेच शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते. जनता व प्रबुध्द भारत चे संपादक, माजी आमदार, खासदार ॲडव्होकेट बापु चंद्रसेन ऊर्फ बापुसाहेब बी सी कांबळे यांना स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली व विनम्र अभिवादन!
(जन्म १५ जुलै १९१९ निर्वाण ६ नोव्हेंबर २००६)
आज डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासु सहकारी व निष्ठावान अनुयायी १९५२ ते १९५७ बाॅम्बे स्टेट असेंब्ली चे आमदार आणि १९५७ ते १९६२ व १९७७ ला लोकसभा खासदार राहीलेले अभ्यासु अनुभवी, लढावु, झुंझार शेकाफे व रिपब्लिकन नेते उत्कृष्ट संसदपटू ॲडव्होकेट बापुसाहेब बी सी कांबळे यांचा स्मृतिदिन….
त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील पलुस या गावचा व पुढील शिक्षण पुणे येथे झाले. विद्यार्थी दशेपासुनच ते आंबेडकरी विचार व आंबेडकरी चळवळीशी जोडले गेले होते.
१९४४ च्या सुमारास त्यांचा “किर्लोस्कर” मासिकात तत्कालीन राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करणारा एक लेख प्रसिद्ध झाला होता तो डॉ बाबासाहेबांचे वाचनात आला पण त्यात लेखकाचे नावाव्यतिरिक्त पत्ता नसल्याने बाबासाहेबांचे स्नेही किर्लोस्करचे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांचेशी संपर्क साधुन सदर लेखकास मुंबईला भेटण्याबद्दल सांगितले. त्यानुसार बापुसाहेब मुंबईत बाबासाहेबांना भेटले व चर्चा केली. बाबासाहेब हे रत्नपारखी
व्यक्तिमत्व होते. त्यांनी बापूसाहेबमधील कुशाग्र बुध्दी, अभ्यासु प्रवृत्ती, समाजाबद्दलची तळमळ डॉ बाबासाहेबांनी ओळखली व त्यांना “जनता” साप्ताहिकाचे संपादक म्हणून नियुक्त करुन शेड्युल्ड कास्ट फेडरेशन मधे ही सहभागी करुन घेतले.
तेव्हा पासुन बापूसाहेब बी सी कांबळे हे बाबासाहेबाशी, आंबेडकरी चळवळीशी जोडले गेले ते कायमचे व आयुष्यभर ते बाबासाहेबांशी, आंबेडकरी चळवळीशी, शेकाफे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी निष्ठावान राहीले.
१९५२ च्या निवडणुकीत शे का फे पक्षाला विशेष यश मिळाले नाही पण वरळी मुंबई मधुन आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.
१९५४ मुंबईसह महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य निर्मितीसाठी विरोधी पक्षांनी संयुक्त महाराष्ट्र समिती ही आघाडी उभी करून राज्यभर आंदोलन सुरु केले, शे का फे हा त्यातील प्रमुख घटक पक्ष होता.
तेव्हा गुजराथ महाराष्ट्र हे द्विभाषिक मुंबई राज्य होते.
कांग्रेसच्या सरकारचे मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री व गृहमंत्री होते त्यांचा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीला विरोध होता. केंद्रातील पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु व अन्य नेत्यांचा ही विरोध होता.
पण संयुक्त महाराष्ट्र समितीने राज्यभर प्रखर आंदोलन सुरु केले.
मोरारजी सरकारने ते दडपण्याचा प्रयत्न केला.
मुंबईत फोर्ट भागात फ्लोरा फाउंटन जवळ विशाल मोर्चा व धरणे देवुन निदर्शनं केली असता ते चिरडण्यासाठी गृहमंत्री मोरारजी देसाईंनी पोलिसांना गोळीबाराचा आदेश दिल्याने त्या गोळीबारात १०६ आंदोलकांचा बळी जावुन ते हुतात्मा झाले.
त्याच्या निषेधार्थ सर्व विरोधी पक्षांनी आमदारकी चे राजीनामे दिले.
बापुसाहेब ही राजीनामा देण्यास निघाले असता बाबासाहेबांनी त्यांना रोखले व म्हणाले संयुक्त महाराष्ट्र लढा रस्त्यावर तसेच विधानसभेतही लढणे आवश्यक म्हणुन विधानसभेत लढण्याचे आदेश दिले.
तेव्हा विधानसभेत मोरारजी देसाई, त्यांचे मंत्री मंडळ व कांग्रेसचे सर्व आमदार एका बाजुला व विरोधी बाकावर विरोधी पक्षातर्फे शे का फे चे एकटे तरुण अभ्यासु आमदार बापूसाहेब कांबळे हे एका बाजूला असे अभुतपुर्व दृष्य होते.
पण प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे तालमीत तयार झालेल्या बापुसाहेबानी एकट्याने आपल्या लोकशाही, राज्यघटना, संसदीय कामकाज नियम व प्रक्रिया यांच्या सखोल अभ्यासपूर्ण तर्क व युक्तिवाद याचे आधारे विधानसभेचे कामकाज महिनाभर रोखुन धरले. रोज प्रश्न, उपप्रश्न, हक्कभंग ठराव, हरकतीचा मुद्दा इ. संसदीय शस्त्रांचे आधारे त्यांनी मोरारजी देसाई व सरकारची विलक्षण कोंडी केली.
विधानसभेतील ही सर्व माहिती आचार्य अत्रे यांचा मराठा, नवशक्ती, प्रबुध्द भारत व इतर वर्तमान पत्रात महाराष्ट्र व देशभर पोचवत होते त्यामुळे महाराष्ट्र भर बापूसाहेबाबद्दल माहिती होवुन संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात प्रचंड प्रमाणात जनतेकडून पाठींबा मिळुन महाराष्ट्र भर आंदोलन प्रखर झाले. केंद्र सरकारलाही त्यांची झळ पोचु लागली होती.
अखेर मोरारजी देसाई सरकारला नमते घेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीचा ठराव संमत करुन गोळीबाराची न्यायालयीन चौकशीचे आदेश द्यावे लागले.
एकटा अभ्यासु लढावु आमदार काय करू शकतो हे बापूसाहेब बी सी कांबळे यांनी दाखवुन दिले होते….
जनतेच्या व बापुसाहेबांच्या विधानसभेतील या कामगिरीने १९५७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला व शेकाफे पक्षाला अभुतपुर्व यश मिळाले.
महाराष्ट्रातील सर्व मंत्री व आमदार पराभुत झाले, स्वतः मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचा त्यांच्या गुजराथमध्ये पराभव झाला. गुजराथ व विदर्भातुन कांग्रेसचे आमदार निवडून आल्याने कांग्रेसला काठावरचे बहुमत मिळाले.
शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे देशभरातुन लोकसभेवर १२ खासदार निवडून आले त्यात मराठाबहुल, साखरसम्राटांच्या कोपरगाव-नगर मधुन बापूसाहेब बी सी कांबळे प्रचंड मतांनी निवडून आले.
मुंबई विधानसभेत शेकाफे चे ३५ आमदार निवडून आले होते.
त्यांनंतर लोकसभेतही बापुसाहेबांनी महत्त्वपुर्ण कामगिरी केली.
१९६० साली मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
तेव्हा कांग्रेसने बापुसाहेबांना केंद्रात मंत्री पद स्वीकारुन कांग्रेसमधे सामील होण्याचा आग्रह व विनंती केली पण त्याला ठामपणे नकार देत बापुसाहेबांनी डॉ बाबासाहेब आंबेडकराशी, आंबेडकरी विचारांशी, आंबेडकरी समाजाशी प्रतारणा केली नाही.
१९७७ सालीही ते कांग्रेसचा पराभव करुन लोकसभेवर निवडून गेले होते.
आयुष्यभर स्वाभीमानी राहुन रिपब्लिकन पक्षाचे कार्य करत राहिले.
त्यांचेसोबत स्वतः कार्य व चर्चा करण्याची, त्यांच्या सहवासाची मार्गदर्शनाची संधी मिळाली हा आमच्या आयुष्यातील महत्वाचा अविस्मरणीय ठेवा आहे.
अशा ह्या निष्ठावान निस्वार्थी निर्भीड स्वाभीमानी समर्पित लढावु झुंझार, आंबेडकरी बाणा कायम राखणाऱ्या बापुसाहेबांनी ६ नोव्हेंबर २००६ ला मुंबईत अखेर श्वास घेत जगाचा निरोप घेतला.
आदरणीय बापुसाहेब बी सी कांबळे यांना भावपूर्ण आदरांजली व विनम्र अभिवादन!!
ॲड रमेश सपकाळे मुंबई…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत