महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

वरळीचे जपानी बौद्ध विहार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सूर्यकांत खरात

वरळीचे जपानी बौद्ध विहार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर Japanese Buddha Vihar (Worli) and Dr. Babasaheb Ambedkar

मुंबईत वरळी पोद्दार हॉस्पिटललसमोर एक जपानी बौद्ध विहार असून त्याचे नाव निप्पोन्झान म्योहोजी असे आहे. येथे गगनाला भिडणार्‍या इमारती उभ्या राहिल्या असून त्यांच्या गराड्यात हे अप्रतिम छोटेसे बुद्धविहार लक्ष वेधून घेते. या विहाराच्या आवारात मोठमोठे वृक्ष असून उत्तराभिमुख असलेल्या या विहारातील सफेद संगमरवरी बुद्धमूर्तीचे दर्शन रस्त्यावरून जाताना सुद्धा होते. सन १९३१-३८ दरम्यान जपानी निचिरेन पंथाचे फुजी गुरुजी भारतात आले असता भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी वरळी येथे टेकडीखाली बुद्ध विहार बांधले. सन १९५० च्या दरम्यान याचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले व दोन वर्षात पूर्ण करण्यात आले. ( त्यावेळेचे फोटो सोबत जोडण्यात येत आहेत ) नवीन आकर्षक चैत्यगृहासारखे बुद्ध विहार बांधण्यास त्यावेळी उद्योगपती जुगल किशोर बिर्ला यांनी मदत केली. या विहाराचे नूतनीकरणाचे काम चालू असताना स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे भेट दिली होती. तसेच तेथे त्यांनी सभा सुद्धा घेतली होती. सन १९५० मधील त्यांच्या कार्यव्यापाचा थोडक्यात वृत्तांत खालील प्रमाणे आहे.

सन १९५० च्या दरम्यान भारतीय संविधानाचे काम पूर्ण होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिलाच्या मागे लागले. २ जानेवारी १९५० रोजी ते दिल्लीवरून मुंबईस परतले. त्यावेळी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी मुंबई प्रदेश शेड्युल कास्ट फेडरेशन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. २९ जानेवारी १९५० रोजी महाराष्ट्र मंडळ आणि इतर मराठी संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर १४ एप्रिल १९५० रोजी त्यांचा जन्मदिवस सर्व भारतभर साजरा करण्यात आला. २५ मे १९५० रोजी ते विमानाने कोलंबो (सिलोन) येथे गेले. तिथे त्यांनी भारतातील बौद्धधर्म या विषयावर भाषण दिले. तिथून येताना त्रिवेंद्रम आणि मद्रास येथे त्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर दिनांक २९ सप्टेंबर १९५० रोजी त्यांनी वरळी येथील बुद्ध विहारात भाषण दिले व लोकांना बौद्धधर्म स्वीकारण्याचे आवाहन केले. तसेच बौद्ध धर्माच्या पुनरुत्थनासाठी व प्रसारासाठी यापुढील आयुष्य व्यतीत करीन असे त्यांनी जाहीर केले. ते हेच बुद्ध विहार आहे, जे नूतनीकरणानंतर जपानी बुद्ध विहार म्हणून प्रसिद्ध झाले आहे. ही एक आता पवित्र ऐतिहासिक वारसा वास्तू आहे जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला आहे. त्यानंतर पुन्हा १३ महिन्यांनी म्हणजे दिनांक २२ डिसेंबर १९५१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईत पुन्हा वरळीला आले असताना या नवीन बुद्धविहारात येऊन त्यांनी बौद्ध धर्मासंबंधी भाषण दिल्याचा उल्लेख आढळलेला आहे. याप्रमाणे वरळीच्या बुद्ध विहारात त्यांनी २९ सप्टेंबर १९५० व २२ डिसेंबर १९५१ साली भाषण दिल्याने हे विहार बौद्ध बांधवासाठी एक प्रेरणास्थान झाल्याचे दिसून येते.

सद्यस्थितीत या विहाराची अंतर्गत देखभाल जपानची ‘निप्पोन्झान म्योहोजी’ ही संस्था करते. १९७६ मध्ये जपानचे भिक्खू ‘टी मोरिता’ येथे आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विहारात दररोजची वंदना व पोर्णिमेचे कार्यक्रम करण्यात येतात. या विहारात बुद्धांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित मोठी तैलचित्रे असून अनेक वर्षांनी देखील त्यांची चकाकी कमी झालेली नाही. येथील बुद्धमूर्ती ही अलौकिक कारागिरीचा एक उत्कृष्ट नमुना असून तिची प्रसन्न मुद्रा पाहताच सर्वकाही विसरून नवचैतन्य प्राप्त झाल्याचा आनंद मिळतो.

सूर्यकांत खरात..⚛⚛⚛

 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!