बौध्द आणि हिंदु सण वार
©️ अनिल वैद्य
नागपंचमी, दिवाळी इत्यादी सनावरून बौद्ध धर्मीय समाज माध्यमातून हे सण साजरे करण्यावरून भांडत असतात. एक छोटा वर्ग नेहमी हिंदू सण याचे समर्थन करतो तर प्रखर आंबेडरवादी गट विरोध करतो. एकदा धर्मांतर केल्यावर जुने सण सोडले असे प्रखर आंबेडरवादी समूहाचे मत आहे. हा वाद सोडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत लक्षात घेणे गरजेचे आहे.
धर्मांतरा पूर्वीच २८ ऑगस्ट १९३७ ला म्हणजे जेव्हा अस्पृश्य हिंदू होते, तेव्हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला अस्पृश्य वर्गाची जंगी जाहीर सभा झाली त्या सभेत हिंदू धर्माचे सणवार, व्रत वैकल्य, धार्मिक आचार पाळायचे नाही असा पहिलाच ठराव मंजूर करण्यात आला. त्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अध्यक्षीय भाषण झाले त्यात ते म्हणाले, “हिंदू धर्मा प्रमाणे आपण जे पाळीत होतो ते सर्व धार्मिक सण वार सोडून दिले पाहिजे.” याच भाषणात त्यांनी शंकरजी व गणपती, दत्तात्रय यांच्या कथा कशा विचित्र आहेत तेही सांगितले (संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड
(१८(२) पृष्ठ ४५ व ४६). डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सभेत म्हणतात, “सभेतील ठराव सर्वांनी पाळावेत. काही थोडे लोक ठरावं मानत नाही असे कळले तेव्हा त्यांना बहुमतवाल्या लोकां प्रमाणे वागावे लागेल.” (खंड १३ (२) पृष्ठ ४५ व ४६) हिंदूंचे सण साजरे करण्यात भूषण मानणाऱ्यानी या उपदेशाचे अवलोकन करावे.
पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदीर पूर्वीचे बुद्ध विहार आहे हे माहीत असताना सुद्धा जेव्हा रमाईने पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली, तेव्हा बाबासाहेबांनी त्यांची ती इच्छा पूर्ण केली नाही. कारण ते पूर्वीचे जरी बुद्ध विहार होते, परंतु आता ते हिंदूंचे विठ्ठल मंदीर आहे, आणि या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता, त्यांच्या सावलीचाही देवाला विटाळ होत होता. दुरूनच दर्शन घ्यावे लागत होते. ही वर्तमान परिस्थिती बाबासाहेबांनी स्वीकारली आणि म्हणूनच त्यांनी आपल्या रमाईची इच्छा पूर्ण केली नाही. परंतु त्यांनी रमाईला अश्वासन दिले की, “आपण नवीन पंढरपूर निर्माण करू, जिथे सर्वांना प्रवेश असेल, कोणाशीही भेदभाव होणार नाही.” हिंदूंचे सण साजरे करणार नाही, असा २८ ऑगस्ट १९३७ ला ठराव मंजूर केला असल्याने तो समाजाचा ठराव असतो.
दिवाळी हा हिंदू सण म्हणूनच जगजाहीर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू संस्कृतीचा पगडा झिडकारून द्यायचा होता, म्हणून त्यांनी हिंदू सण नाकारले, पण शाहू महाराज जयंती सना सारखी साजरी करा म्हणाले, हे समजून घेणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक चळवळ केली व स्वाभिमान जागृत केला.
दिवाळी साजरी करा अशा पोस्ट फिरत आहेत म्हणून माझा प्रश्न आहे की, दिवाळी ही हिंदूंची म्हणून भारतात प्रसिद्ध आहे की नाही?
- डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिवाळी का साजरी केली नाही?
- हिंदूनी अस्पृश्यता लादली, तेव्हा तुम्हाला इतके लाचार केले होते की तुमची कुठली दिवाळी आणि कुठला दसरा?
- हे सर्व अधिकार उच्यवर्णीय लोकांकडे होते. घरात एक दिवा नव्हता, कुना मुळे हा अंधकार होता? गरिबी इतकी होती की, सणवार त्यांनी साजरे करायचे व आम्ही फक्त बघायचो. आपली चळवळ ही सामाजिक परिवर्तन व स्व-सन्मानाची आहे.
दिवाळी हिंदूंची म्हणूनच मान्यताप्राप्त आहे. २८ ऑगस्ट १९३७ ला ‘हिंदूंचे सण साजरे करू नये’ असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथील अस्पृशांच्या सभेत ठराव मंजूर केला व भाषण सुद्धा दिले, हे मी आधी लिहले आहे मला हे लक्षात आणून द्यायचे की, हिंदूंचे सण हा शब्द प्रयोग आहे, यात दिवाळी हाच मोठा व मुख्य सण आहे, बाकीचे किरकोळ आहेत. तर हिंदू सण असे म्हणतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून दसरा दिवाळी नक्कीच सुटणार नाही. दिवाळी साजरी करण्यासाठी आग्रही लोकांनी सामाजिक चळवळ सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. गुलामी नष्ट करणे व स्वाभिमानि समाज बनविण्यासाठी त्यांची चळवळ होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रमाण मानले नाही तर ही चळवळ नेस्तनाबूत होईल हे लक्षात घ्यावे. कुणीही कुणाचे ऐकणार नाही, आपण म्हणता तसे सर्व लोक आपापले म्हणणे खरे करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रमाण असणे वर्तमान व भविष्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे प्रमाण मानणे ही बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी विसंगत नसुन सुसंगत आहे. ज्या बाबी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकर्षाने मांडल्या त्यावर वेगळे मत मांडण्या इतके जगात कुणी विद्वान झाले नाही. बाबासाहेबांची सामाजिक चळवळ व त्यातून धम्म क्रांती अशी संलग्न चळवळ आहे ती लक्षात घेणे गरजेचे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिशा दिली ती पूर्व दिशा न मानणे व दिवाळी साजरी करण्यासाठी अट्टाहास धरणे चळवळीला दिवाळखोरीत नेणे आहे. मी डॉ. भाऊ लोखंडे यांची ‘आवाज इंडिया’ वर मुलाखत ऐकली होती त्यात त्यांनी दिवाळी सण साजरा करणे साफ नाकारले होते. हा विषय समजून घेण्यासाठी आंबेडकरी चळवळ समजून घेणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या उपदेशाचे विरोधात घेतलेली भूमिका व त्यांचे विचार प्रमाण मानायचे नाही ही भूमिका चळवळीला विसंगत आहे. संशोधकांनी जरूर अभ्यास करावा पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खोडण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व सामाजिक कार्य याला समजून घेतले पाहिजे. २८ ऑगस्ट १९३७ च्या ठरावाला बांधील राहा. दुसरा ठराव दिनांक ३१ मे व १ जून १९३६ च्या मुंबई येथील सभेतील. या पूर्वी मी २८ ऑगस्ट १९३७ चा ठराव पोस्ट केला होता, परंतु त्या पूर्वी ३१ मे १९३६ ला मुंबई महार इलाखा परिषदेत मंजूर ठराव असा या ठरावाचे उद्दिष्ट थेट धर्मांतराशी निगडित आहेत व हिंदूंचे सण असा स्पष्ट उल्लेख आहे. काही लोकांच्या मते सणांना बौद्ध परंपरा आहेत, कदाचित असेल, असे जरी क्षणभर मान्य केले, तरी त्याचे हिंदुकरण झाले व म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारले, हेच खरे कारण आहे.
दिनांक ३१ मे १९३६
महार इलाखा परिषद, मुंबई
ठराव १ ला
(अ) मुंबई इलाख्यातील महार जातीचा हा परिषद पुर्ण विचारांती असे जाहीर करते की, महार जातीला समाजात समता, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धर्मांतर करणे हा एकच न्याय आहे. ही परिषद आमचे एकमेव मार्गदर्शक पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निश्चयपूर्वक असे जाहीर आश्वासन देते की, महार समाज सामुिहिक रित्या धर्मांतर करण्यास तयार आहे.
(ब) पूर्वतयारी म्हणून महार जातीने यापुढे हिंदू देवदेवतेची पूजा अर्चना करू नये. हिंदू धर्मातील सण, व्रत वैकल्ये, उपवास वैगेरे पाळू नयेत व हिंदूंच्या कोणत्याही उत्सवात भाग घेऊ नयेत. तीर्थयात्रा वैगेरे करू नये.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड १८(१) पृष्ठ ४९० बौद्ध धम्म विज्ञानवादी व विवेकवादी आहे, सणांचे थोतांड मानत नाही, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.
समाज माध्यमातून साभार !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत