महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

बौध्द व हिंदू महार नोंदीबाबत एक पत्रप्रपंच

सन २००५ व २००६ साली आमच्या विभागातील हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या काही मुलांना केंद्र सरकारच्या शैक्षणिक शिष्यवृत्या मिळत होत्या तर काही मुलांना मिळत नव्हत्या.

ज्या मुलांना शिष्यवृत्या मिळत नव्हत्या त्या मुलांच्या पालकांनी माझ्याशी संपर्क करुन ह्याबाबत विचारणा केली.आमची बौध्द विकास मंडळ नावाची ट्रस्ट आहे. त्यावेळी मी मंडळाचा सरचिटणीस होतो.सरकारी सेवेत असल्याने आपल्या बंधू भगिनींनी माझ्याशी संपर्क साधला होता.

मी स्वत: सबंधित पालकांना बरोबर घेऊन नवजीवन विद्यामंदिर ह्या मुंबईतील भांडुप येथील शाळेत जाऊन चौकशी केली असता मला अशी माहिती मिळाली की,ज्या विद्यार्थ्यांनी शाळेत हिंदू-महार अशी नोंद आहे त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही तर ज्यांची नोंद बौध्द आहे अशा विद्यार्थ्यांनाच अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मिळते.

मी ज्यांना शिष्यवृृत्तीेेेचे लाभ मिळत नव्हते ,अशा विद्यार्थ्यांना मंडळाचे बौध्द सभासद असल्याचे प्रमाणपत्र दिले माझ्या ओळखीच्या वकिलांनी ॲफेडॅविट करुन दिले व ज्यांची हिंदू-महार अशी नोंद होती त्या विद्यार्थ्यांची पालकांनी तहसिलदार कार्यालय मुलुंड मुंबई येथून ‘बौध्द’ असे दाखले प्राप्त केले, त्या मुलांना अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे लाभ मिळाले. जवळपास वीस पंचवीस मुलांची नोंद शासकीय अभिलेखांवर बौध्द अशी नोंद झाली.

आपण दरवर्षी एवढ्या लोकांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली तेवढ्या लोकांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली ह्या दीक्षा समारंभाचे फोटो पाहतो बातम्या वाचतो. अनेक धम्मदेसनात बौध्द (?) समाजाचे मोठ मोठे कार्यक्रम बघतो. बुध्द विहारात जन्मजात वेडपट लोकांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमांच्या बरोबर अठरापगड जातीतील हिंदू आदर्शांचे फोटो लावून बुध्द व बाबासाहेबांचे अवमूल्यन व बौध्द धम्माचे हिंदुत्वकरण केलेले आहे. शासकीय अभिलेखांनुसार बौध्द समाजाची लोकसंख्या वाढताना दिसली पाहिजे धम्मदेसनात व धार्मिक कार्यक्रमात नाही. असे माझे ठाम मत आहे.

माझा जन्म १९५९ चा आहे,माझ्या वडिलांनी माझे BMC शाळेत नाव घालताना माझी ‘बौध्द’ अशी अभिमानाने नोंद केलेली आहे. माझी विक्रीकर खात्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या परीक्षेेत खुुल्या प्रवर्गात १९८२ साली लिपिकपदी व नंतर २००० साली विक्रीकर निरीक्षकपदीही खुल्या प्रवर्गात निवड झाली होती, पुढेअधिकारी पदावर पदोन्नतीसाठी मला २००२ साली वैध्यता प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले.मी आवश्यक ती कागदपत्रे पुणे कार्यालयास सादर केली.सहा सात महिन्यांनी पुणे कार्यालयाने ही कागदपत्रे जात पडताळणी कार्यालय बेलापूर येथे पाठवली तेथे चौकशीसाठी गेलो तेथील कार्यालयातील लिपिकाने वैध्यता प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जांची नोंदवही दिली व माझा अनुक्रमांक शोधण्यास सांगितले, मी माझा अनुक्रमांक शोधत असताना मला धक्कादायक माहिती मिळाली ज्यांचा जन्म १९७० वर्षानंतर झालेला आहे; अशा बर्‍याच जणांच्या अर्जात धर्म/जातीच्या रकाण्यात ‘हिंदू महार’ लिहिल्याचे आढळून आले.

माझ्या अशिक्षित बापाने माझे शाळेत नाव घालताना धर्म बौध्द असे लिहायला सांगितले होते परंतु,जे उच्चशिक्षित व शासकीय सेवेत कार्यरत होते,त्यांनी केंद्र सरकारमधील सवलती मिळाव्यात ह्या एकमेव हेतुने आपल्या मुलांच्या हिंदू महार अशा नोंदी शाळेत केलेल्या होत्या. मला माझ्या अडाणी वडिलांच्या गर्व वाटतो.त्यांनी कधी बौध्द धम्म चळवळीचे काम केले नाही.पण,बाबासाहेबांचा आदेश शिरोधार्य मानून माझे शाळेत नाव घालताना धर्माच्या रकाण्यात ‘बौध्द’ लिहायला सांगितले.

माझ्या असेही निदर्शनास आलेले आहे की,जे लोक समारंभांत बौध्द म्हणून मिरवितात बौध्द धम्माच्या धम्मदेसनाच्या कार्यक्रमाला जातात त्यांनी जाणीवपूर्वक स्वत:च्या मुलांना हिंदू-महार बनवलेले आहे. हे तर असे झाले की,शिवजयंतीत ९६ कुळी मराठा आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कुणबी मराठा…

आतातर भारतीय बौध्द महासभेनेच जनगणनेत धर्माच्या रकाण्यात बौध्द व जातीच्या रकाण्यात महार लिहा अशी तळटीप धम्मयान दिनदर्शिकेत दिलेला आहे. भारतीय बौध्द महासभेचा फतवा झुगारुन बौध्द बांधवांनी स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. माझे असे मत आहे की, बौध्द धम्माचे आचरण महत्वाचे आहेच.पण, किंंबहुना त्याहूनही शासकीय अभिलेखांवर बौध्द अशी नोंद असणे अधिक महत्वाचे आहे.जर बौध्द नोंद असेल तर केंद्र सरकार अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मिळते हिंदू महार अशी नोंद असेल तर ह्या शिष्यवृत्तीचे लाभ मिळत नाहीत. ह्याशिवाय जर भारतात बौध्द समुदायांवर अन्याय अत्याचार होतो अशा बातम्या आल्या तर जगातील बौध्द राष्ट्रे भारत सरकारवर हे अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी दबाव आणू शकतात! सध्या आपल्या समाजावर कितीही अन्याय अत्याचार झाला तरी हा हिंदू धर्मातील अंतर्गत प्रश्न अशी जगातील बौध्द राष्ट्रांची भावना होते.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील शासकीय सेवांत ज्यांची नोंद बौध्द आहे अशांना स्पर्धात्मक परिक्षेत बसता येत नाही.ह्या परिक्षेत बसण्यास फक्त हिंदू महार नोंद धारकालाच संधी मिळते. ‘सारे दुनिया के बोझ हम उठाते है।’ असा गैरसमज झालेेले व समस्त आब्राह्मण समाजाचे स्वयंघोषित नेते/कार्यकर्ते १९९० साली जाहीर झालेल्या बौध्द समाजाला केंद्र सरकारमधील नोकऱ्या मिळाव्यात, ह्यासाठी काही करत नाहीत,ते दलित, बहुजन,मुलनिवासी आलुतेदार व बलुतेदार यांच्या कल्याण करण्यात तसेच त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यात मग्न आहेत.

आपण कंपनीला/कार्यालयाला सांगतो की, मी तापाने आजारी आहे आठवडाभर कामावर येऊ शकत नाही.कामावर हजर होते वेळी आपल्याला डाॅक्टरांचे आजारी असल्याचे व फिटनेसचे प्रमाणपत्र द्यावे लागते.हे प्रमाणपत्र दिल्यानंतरच आपल्याला कामावर रुजू करुन घेण्यात येते व आपल्याला वैद्यकीय रजा मंजुर होते. तद्वत आपण धर्माने बौध्द आहोत, हे शासकीय अभिलेखांवर आपण कोणत्या धर्माचे आहोत ह्या नोंदींनुसार सिध्द होते.आपण समाजात बौध्द म्हणून मोठ मोठे बौध्द धम्मातील उत्सव साजरे केले म्हणून बौध्द आहे.हे सिध्द होत नाही.

It seems to me that We can not be called ourselves Buddhists as well as Non Buddhists will not call us Buddhists; only because, we perform Buddhist rituals and celebrate Buddhist festivals; We have to have Government’s certified documeations to be called ourselves the Buddhist.

✍️
शरद आढाव,
राजपत्रित अधिकारी (से.नि.)
महाराष्ट्र शासन, मुंबई
दि.२८ ऑक्टोबर,२०२४

टीप
The Profession of the Religion (धर्माचे आचरण) is important. But, the Registration of the Religion (धर्माचे नोंदणीकरण) is more important.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!