महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

रमाई

वानखडे दादाराव श्रीपत

दिनांक सात फेब्रुवारी 2024 जागतीक कीर्तीचे साहेब घडवणारी रमाई आंबेडकर यांची जयंती.
जयंतीनिमित्त रमाईच्या विचारांचा नितांत आदर करून, अनुसरन करून त्यांना त्रिवार अभिवादन करतो.
लॉकडाऊन मध्ये मी रमाईच्या जिवणातील काही प्रसंगावरील लिहीलेला लेख प्रसारित करत आहे.

[ साहेब ! !
कधी रमा शिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत !

प्रकांडपंडित , महामानव, मानवतेचे कैवारी , विश्वभुषण, विश्वरत्न, बुद्धाच्या जन्माने पवित्र झालेल्या भारताच्या मातीवर जिवापाड प्रेम करणारे, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, आरबीआयचे जनक, नदीजोड प्रकल्प — छोट्या -छोट्या राज्यांचे व हिंदू कोड बिलाचे पुरस्कर्ते , आपल्या ज्ञानाच्या जोरावर रक्ताचा थेंबही न सांडता कोट्यवधी भारतीयांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे महान क्रांतिकारक , जगातील सर्वोत्तम संविधानाचे शिल्पकार, सिम्बॉल ऑफ नॉलेज, परमपूज्य , बोधिसत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व आपल्या डोंगराएवढ्या दुःखाचे घोट, घटा–घटा पचवून कोट्यवधी भारतीयांची आई रमाई यांच्या विचारांना व कृतीला वानखडे डी एस व परिवाराकडून कोटी कोटी विनयशील अभिवादन.!
वाचकांना क्रांतिकारी सविनय जय भीम.!
माझ्याप्रमाणेच आपण सर्वजण कोरोणा महामारी च्या विषाणूमुळे महत्त्वाचे काम धंदे सोडून; घरातच बसलेलै आहात. या मिळालेल्या वेळेचे संधीत रूपांतर करून 15 वर्षापूर्वीच्या लिखाणाच्या छंदाला आज रमाई व बाबांच्या जीवनातील काही निवडक प्रसंगावर मी लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे . बाबासाहेब रमाई यांच्या वर जीवापाड प्रेम करणारे , त्यांचे जीवन चरित्र वाचणारे , अभ्यासू वृत्तीचे– भारतातच नव्हे तर जगात कोट्यवधी लोक आहेत. म्हणून माझ्या कुवतीप्रमाणे लिहीत असताना अनेक चुका होण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. चुकीबद्दल मला क्षमा करून योग्य त्या सूचना कराव्यात . मी आपले स्वागत करतो.

बाबासाहेब हे नाव इतकं जिवंत आहे की, एखाद्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या माणसाला बाबासाहेब आंबेडकर एवढे नांव जरी ऐकायला आले तरी तो स्फुरस्फुरतो. ताजातवाना होतो . म्हणून एखादा प्रसंग लिहीतांना — वाचतांना किंवा सांगताना आपल्या समोर ते चित्र उभं राहाते , आणि आपण त्या गोष्टीचे जिवंत साक्षीदार आहोत असे वाटू लागते. बाबासाहेबांचे जीवन संघर्षमय तर होतेच पण त्यापेक्षाही बाबासाहेब घडवण्यासाठी रमाईचा जीवन संघर्ष काही कमी नव्हता . हा संघर्ष , हा त्याग , वाचतांना डोळे आणि मन उघडे ठेवा. म्हणजे लक्षात येईल .
ज्या दिवशी बाबासाहेबांना गोलमेज परिषदेसाठी लंडनला जायचे होते अगदी त्याच दिवशी त्यांचा आवडता मुलगा राजरत्न यांचे निधन झाले होते . बाबासाहेब भिंतीला डोके टेकून ढसाढसा रडत होते . त्यांच्याकडे कफन आणायला पैसे नव्हते . या विचाराने साहेबांचे मन सुन्न झाले होते . रमाईची अवस्थाही रडून-रडून वाईट झाली होती . काही क्षणात स्वतःला सावरून बाबासाहेब म्हणाले ! जर मी लंडनला पोहोचलो नाही तर ! तेवढ्यात बाबासाहेबांचे मोठे बंधू बाबासाहेबांना म्हणाले भिवा —- ओ — भिवा — तू कुठे चालला आहेस ? राजरत्न आता राहिला नाही . त्याला कफन आणायला पैस पाहिजे ! बाबासाहेब हूंदका आवरत म्हणतात, बाळा दादा तुम्ही पुढील सोपस्कार पार पाडा ! कारण मी लंडनला पोहोचलो नाही तर —- भारतातील करोडो अस्पृश्य, आदिवासी , भटके-विमुक्त जनतेच्या हक्काची आणि अधिकाराची हत्या होईल . मी एका मुलासाठी माझ्या करोड मुलांना मारू शकत नाही . हा प्रसंग जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा वाचकांचे डोळे डबडबल्या शिवाय राहत नाहीत.
बाबासाहेबांना वाचनाची एवढी आवड होती की, त्यांना जेवण व झोपेसाठी वेळ मिळत असे . रमा काळजीने खंगत होती . एके रात्री बाबासाहेब घरात वाचत बसले होते. रमाईला कंदिलाच्या प्रकाशाने व साहेबांच्या काळजीने झोप येत नव्हती.
रमाई उठली, कंदिलाची वात कमी करत खोलीभर पसरलेला लख्ख प्रकाश मंद केला . आणि बाबासाहेबां समोरील पुस्तक उचलून घेतल.साहेब म्हणाले ,! अगं रामू ! एक पान वाचू दे —-! रमाई हसत — हसत म्हणाल्या झोपा आता थोडं शांत! झोपा. साहेबांनी डोळ्यावरील चश्मा काढत रमाईकडे पाहिले. आणि म्हणाले , रामू —- अग — रामू अग मलाही वाटतं की, शांत. झोपावं . पण रामू , लहानपणी जातीमुळे वर्गात बसता आले नाही ; वर्गाच्या बाहेर बसून शिकाव लागलं ग मला ….! शाळेच्या माठातील कधी पाणी पीता आलं नाही. केवळ जातीमुळे , बाल मित्रासोबत सहभोजन करता आलं नाही. हो ssss हो ssssकेवळ जातीमुळे ! आणि हो रामू, ह्या माझ्या साऱ्या समाजाचा आक्रोश ssss ! त्यांच्यावर झालेले अमानुष अत्याचार —- , त्यांच्या किंकाळ्या , मी डोळे बंद केले की, मला ऐकू येतात ग ! मला न्याय मागतात . मला स्वस्थ झोपू देत नाहीत — मग तूच सांग रामू , अशावेळी मी शांत झोपू शकेन ! बाबासाहेबांच्या शब्दात, त्यांच्या मनात , समाजाप्रती अतोनात प्रेम होते . ते रमाईला दिसलं ssss ! रमाईने परत खोलीत मंद केलेला कंदिलाचा प्रकाश लख्ख केला . पुस्तक उचलून साहेबांच्या हातात दिले. आणि वाचा म्हणाली.
रमाई म्हणजे त्यागमूर्तीच sss ! पोटची चार पोरं नजरेसमोर मिली — , उपाशी राहिली, पण कधी साहेबांच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होऊ दिला नाही. शिक्षणात व्यत्यय येऊ दिला नाही.! रमाईने दिलेल्या पुस्तकातील पाने वाचत असतांना, साहेबांच्या चेहऱ्यावर मंद स्मित हास्य आलं . रमाई झोपी गेली असताना साहेब आपल्या निरागस रामूच्या चेहऱ्याकडे पाहत असताना डोळे डबडबलेले, आणि साहेब मनाशीच म्हणाले —- रामू ssss रामू ss तू सोबतीला आहेस , म्हणून मला कसलीही चिंता नाही.. . ! रमाईच्या डोक्यावरून हात फिरवत असताना साहेबांना गहिवरून आलं. आणि हळूच रमाईच्या अंगावरील पांघरून व्यवस्थित केल.!! व राहिलेले पुस्तक वाचू लागले .
साहेब म्हणतात — मला अजून आठवतो तो, भायखळ्यातील मच्छी बाजारातील दिवस — ज्या दिवशी रामू माझ्या आयुष्यात आली .त्या दिवशी नुकतच आमचं लग्न लागलं व पाऊस सुरू झाला . रामी भिजली होती. मी एक रिकामी माशाची टोपली डोक्यावर घेतली. आम्ही दोघे तिथेच ऊभे होतो —- ! नऊ वर्षाची कोळी रामी माझ्याकडे बघत होती ; आणि मी तिच्याकडे. आम्ही घरी आलो . बायकांनी नावे विचारली तेव्हा त्या अनाथ पोरीने रामी असे नाव सांगितले . मला कसेतरी वाटले, आणि म्हणून तिला विचारले की, तुला रामी ऐवजी रमा म्हणलेलं चालेल का ? ती आनंदाने होय म्हणाली . आमचा संसार सुरू झाला .
तशी हळूहळू रमा मला कळत गेली. माझी रामू म्हणजे रामूच .! तिने माझ्या आयुष्याचे सोने केले. मी परदेशात शिकायला गेलो असता ,—- साऱ्या संसाराचा गाडा एकटीनेच ओढला . मला आयुष्यात कधीच दागिना मागितला नाही. राब — राब राबून माझी रामू मला शिक्षणासाठी पैसे पाठवत राहिली . खूप नम्र स्वभाव आहे तिचा, नेहमी काळजी करत माझ्याभोवती सावलीसारखी राहत होती.
एकदा ती तापाने फणफणत होती . मी विचारलं गोळी वगैरे घेतली घेतली का ? तर ती नाही म्हणाली ! बाहेर पावसाचा कहर चालू होता . तसाच तिचा ताप वाढत चालला होता. मी तसाच छत्री न घेता बाहेर पडलो! मेडिकल वर गेलो, गोळी आणली. रामूला म्हटले sss रामू — रामू —- गोळी घे. रामू म्हणाली —- एवढ्या पावसात का गेले ? तुम्ही आजारी पडले तर ! नाही sss नाही sss मी कल्पनाही करू शकत नाही ! मी नाही घेणार गोळी ! एवढ्या पावसात जाण्याची काय गरज होती का ? ती रुसली साहेबांवर —- आणि रुसणार तरी कोणावर ? हक्काचा माणूस रामूचे साहेब ! साहेब सुद्धा रागानेच म्हटले , गोळी घे ? रामू गोळी घे ! जर तू गोळी घेतली नाहीस तर मी माझे ओले कपडे बदलणार नाही . रामू हळूच हसली — आणि म्हणाली तुमच्या सोबत मला भांडताच येणार नाही . तुम्ही खूप जिद्दी आहात साहेब !
साहेब म्हणतात जेव्हा ईंदू गेली, तेव्हा मी परदेशात होतो . तिने मला पत्राने कळविले. पण आईला काय वेदना होतात हे , आई झाल्याशिवाय कोण जाणार आहे? रमा मला कायम म्हणतो स्फुर्ति देत आली आहे. साहेब तुम्ही शिका ! मोठे व्हा ! अन् समाजाच्या बरोबर देशाचं भलं करा —- ! मी तुमच्या यशात लई खुश आहे बघा …..मला बाया म्हणतात काय ग रमा , तू बॅरिस्टरा ची बायको? तुझा साहेब खूप मोठे साहेब आहेत , आणि तुझ्याकडे सोन्याचा फुटका मनी देखील नाही ? पण sss एक सांगू का साहेब, तुम्ही इतके शिकला आहे ना —– तुमच्यासारखा शिकलेला माणूस दुजा नाही ! मला लय अभिमान आहे साहेब तुमचा ! साहेब म्हणतात माझ्या रामू चे हे शब्द आठवले की पोट भरल्यासारखं वाटतं . सद्गगदीत झाल्यासारखं वाटतं. मन भरून येतं sss . रामू मन भरून येते!
रामू आजारी असल्यापासून मी दर क्षनाला तिची विचारपूस करत आहे . तिच्या काळजीने माझे काळीज तिळतिळ तुटत आहे . माझ्या रामूला काही होणार तर नाही ना! तिला जर काही झालं तर हा भीम पोरका होईल ! एकटा होईल ! नाही sss नाही sss मला ही कल्पना सहन होत नाही . माझ्या रामूला काही होणार नाही , मी तिला एकटीला असं सोडून जाऊ देणार नाही. …..
नाहीss ती वेळी मला सोडून जाऊ शकत नाही! मला सोडून जाण्या अगोदर तिने शंभर वेळा विचार करावा . तिला चांगलं माहीत आहे की , तिचा हा साहेब, तिच्या शिवाय अपूर्ण आहे . रमा नसेल तर — भीमाला काय अर्थ आहे ! खरंच मी एकटा तर होणार नाही.
रामूने खूप त्रास सहन केला आहे. मी तिची ओंजळ चवदार तळ्याच्या पाण्याने भरणार आहे. ती सुखावणार आहे. होय ती सुखावणार आहे! असे म्हणून साहेबाने रामूच्या खोलीचा दरवाजा उघडताच रामू हसली . साहेब तिच्याजवळ जाऊन खाटेवर बसले . रामूचा साहेबांनी हातात हात घेतला. माझे डोळे भरून आले . रमाईचा ताप वाढला होता , डॉक्टर निदान करत होते. तपासणी झाल्यावर गोळ्या देऊन डॉक्टर निघाले . तेवढ्यात मी उठलो , त्यांची बॅग घेतली . आणि विचारलं , डॉक्टर साहेब , बरी आहे ना तब्येत रामूची. दीर्घ श्वास घेऊन डॉक्टर म्हणाले sss आंबेडकर , रमाबाई अर्धपोटी उपाशी राहून , त्यांची रोगप्रतिकारशक्ती नष्ट झाली आहे . काळजी घ्या!
डॉक्टर आले आणि गेले, पण साहेबांचे विचार चक्र काही थांबेना ! एकामागोमाग चार मुले गेली , माझ्या रामूने खूप खूप कष्ट केले , तुझे उपकार कसे फेडायचे कळत नाही. खरंतर मला तिला सुख देता आले नाही . मी रामू जवळ गेलो. पाहतो तर काय! रामू फक्त माझ्या आणि माझ्याच विचारांनी रडत होती ! मी तिचा हात हातात घेतला, आणि म्हटलं लवकर बरी हो ! तुला अजून चांगल्या दवाखान्यात न्यायचे आहे.
रामू म्हणाली साहेब, आता त्याची आवश्यकता नाही ? माझी जाण्याची वेळ झालेली आहे .
साहेब,
मी अनेक मृत्यू पाहिले आहेत ? मला मृत्यूची अजिबात भीती नाही . माझे आई-वडील , तुमचे आई-वडील! आपली चार मुले, असे मृत्यू मी पाहिलेले आहेत.
‌. भायखळ्याच्या बाजारात पाऊस सुरू होता तेव्हारामीचा हात — माझ्या हातात होता.
आजही पाऊस सुरू आहे , तेव्हा पाऊस सुरू होता, रमाने माझा हात घट्ट पकडला होता . आणि आज तोच हात थरथरत होता. जिथून तिच्या आणि माझ्या जगण्याचा प्रवास सुरू झाला होता — तेथून तैल चित्रासारखा एक एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोरुन सरकत होता .
मी कुठेही गेलो तरी अगदी मानाने ओवाळण्याचे ताट घेऊन ओवाळणारी माझी रामू माझ्या डोळ्या समोर येत आहे . असे वाटते की, खूप आक्रोश करावा ! आणि ओरडून sss ओरडून sss सांगावं की , रामू — उठ , उठ रामू , उठ! अजून तुझ्या साहेबाला खूप जिंकायच आहे . अजून तुझी गरज आहे मला . उठ आणि हस — एकदाच पाठीवर हात ठेवून म्हण , साहेब — मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या डोळ्यातून अश्रु वाहत होते , थरथरत्या हाताने रामूने ते अश्रू पुसले. मला धीर देत कातर आवाजात म्हणाली , साहेब — मी जेव्हा नसेल — तेव्हा निराश होऊ नका sss ! साहेब निराश होऊ नका !
आपला जो समाज आहे , आपला जो उद्देश आहे, त्याच्यासाठी खूप काही करा ! कारण हा समाज आपल्या चार मुलांचं बलिदान कधी विसरणार नाही ?
रामू बोलत होती . तिचा आवाज क्षीण होत चालला होता . बोलता —- बोलता रामू शांत झाली! .
मी क्षणभर स्तब्ध झालो, काय झाले काही कळेना ! जणू काही माझा कोणी गळा दाबला . माझा शब्द फुटेना , मी सारी शक्ती एकवटून ओरडलो ssssss रामू !!!! रामू !!! ए माझी लाडकी रामू !!!! ये ना! माझी रामू. बोल ना गं रामू! मि रमाला गदगदा हलवले, पण ती काही माझ्याशी बोलली नाही . मी ढसाढसा रडू लागलो ! मी पोरका झालो! माझा यशवंत पोरका झाला ! माझं सर्वस्व मला सोडून गेलं. साहेब , थोडी विश्रांती घ्या . असं म्हणणारी माझी रामू कायमची शांत झोपली आहे. मी हरलो होतो . माझे जगच पोरके झाले . सगळं सुनं—– सूनं — वाटू लागलं . जिवन निरस झाले. जीवनातील गोडी संपली .कारण ? साहेब कधी रमा शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पूर्ण होऊ शकत नाही !!! पूर्ण होऊ शकत नाही.!!!

    वाचकांनीही अगदी मन लावून वाचल्याबद्दल त्रिवार धन्यवाद . 
           वाचकांना विनंती आहे की लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही शब्द खाडाखोड करून प्रसारित करू नये . आवडला तर आहे तसा पुढे फॉरवर्ड करा.

काही सूचना असल्यास कळवावे.
आपले स्वागतच आहे .
जय भीम ! जय बुद्ध ! ! जय भारत!!!

लेखक :– वानखडे दादाराव श्रीपत
मुक्काम पोस्ट माटरगाव बुद्रुक
तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा
सध्याचा पत्ता :— भिम ज्योती निवास
नालंदा कॉलनी , आदर्श नगर
दिघी पुणे 15
फोन नंबर : — 86 0 56 60 704.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!