लोकप्रतिनिधी अभ्यासू व निष्कलंक असला पाहिजे
महाराष्ट्र विधान सभेची निवडणूक जाहीर झाली. नुकत्याच लोकसभेच्या निवडणूका ही पार पडल्या. या निवडणूकीमध्ये विविध राजकीय पक्षाचे उमेदवार उभे राहिले. सद्यस्थितीत विविध राजकीय पक्षाकडून उभे राहणारे उमेदवार त्याची शैक्षणिक पात्रता, त्याचे समाजासंबंधी असलेले प्रश्नाचे आकलन, त्याची निष्कलंकता या संबंधी कोणताही राजकीय पक्ष गंभीर नाही.
बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या राजकीय पक्षाचे उमेदवार निवडताना निवडणूकीस उभा राहणाऱ्या उमेदवारास काही कसोट्या ठेवल्या होत्या. पहिली कसोटी म्हणजे इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान. कारण तेथील सर्व कामकाज इंग्रजीतून चालते. आपआपल्या जिल्ह्यातर्फे, तालुक्यातील जाच, त्रासादी गा-हाण्याचे प्रश्न असेंब्लीमध्ये इंग्रजीतून विचारता आले पाहिजे. म्हणून इंग्रजी जाणणारा पाहिजे. कायदे मंडळात हुशार, चाणाक्ष, समाजदक्ष लोकांची जरूरी आहे. तुम्ही जे प्रतिनिधी कायदे कौन्सिलात पाठवाल त्यांच्यावरच तुम्हालाअवलंबून राहिले पाहिजे.
शेठ, सावकार, पैसेवाले, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कायदे मंडळावर डोळे ठेवून आहेत. या लोकांकडून गरीब जनतेचे मुळीच कल्याण होणार नाही. यासाठी निस्वार्थी व निर्भीड लायक व मतदाराशी इमानी प्रमाणे वागणाऱ्या गोर-गरीबांच्या प्रतिनिधीची आपणास निवड केली पाहिजे.
सध्या आपल्या देशात सधन लोक मते विकत घेतात पण मते ही विकण्याची वस्तू नाही, ती आपले संरक्षणाची साधन शक्ती आहे. मते विकणे हा गुन्हा तर आहेच, शिवाय तो आत्मघातही आहे. निवडून जाऊ इच्छिणारे काही लोक तुम्हास द्रव्याचे आमीष दाखविले जातील. दारिद्र्यामुळे तुम्हास मते विकावे की काय असा मोह उत्पन्न होईल. अशा कोणत्याही मोहास तुम्ही बळी पडू नका.
आपणास मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा जर आपण चांगल्या त-हेने उपयोग केला तर आपण चांगलीच माणसे कायदे मंडळावर निवडून आणू व त्यापेक्षा जास्त आपली उन्नती आपण करू शकू. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाहीचे व्यवहाराचे योग्य प्रशिक्षण मिळावे, यासाठी ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटीक्स’ या नावाची संस्था स्थापन केली होती. संसदीय राजकारण समजून न घेता केवळ पैशाच्या आणि पक्ष प्रचाराच्या बळावर जे उमेदवार असेंब्ली किंवा पार्लमेंटमध्ये निवडून येतात त्यांच्यासाठी हे स्कूल होते. ह्या संस्थेचे बाबासाहेब स्वतः संचालक होते. वर्गाचा अभ्यासक्रम त्यांनी स्वतःच तयार केला होता. त्यात प्रचलित राजकारण, भारतीय राज्यघटना, संसदीय कार्यपध्दती, राष्ट्रीय अर्थकारण, अंदाजपत्रकांचा अभ्यास, मध्यवर्ती व राज्य शासनाचे कार्य आणि संबंध, परराष्ट्रीय धोरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वक्तृत्त्व साधना इत्यादी विषय अंतर्भूत होते.
आज पक्षा-पक्षाच्या आघाडीवर अत्यंत विषण्ण करणारे चित्र आहे. राजकारणासाठी लोकांच्या अंधश्रध्दा व धर्म भावना वेठीस धरणाऱ्या पक्षाची चिंताजनक सरशी झाली आहे. सर्वच पक्षांनी कमी-अधिक प्रमाणात भ्रष्टाचार, काळा बाजार, गुन्हेगारी, दहशतवाद, इत्यादी अपप्रवृत्तीशी जुळते घेतले आहे. संसदीय लोकशाहीचे संकेत सभागृहात किंवा सभागृहाबाहेर कोठेही पाळण्याची कोणाची तयारी नाही. त्यामुळे एका अराजकसदृश पर्वातून हा देश आज जात आहे.
दत्ता गायकवाड, सोलापूर.
७५८८२६६७१०.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत