विहार ही परिवर्तनाची केंद्र बनली पाहिजेत….
राहुल कांबळे
विहार ही परिवर्तनाची केंद्र बनली पाहिजेत अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. ती यासाठीच की बहुजन समाजामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा. आणि समता स्वातंत्र बंधुता आणि न्यायावर आधारित प्रबुध्द भारत निर्माण व्हावा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिक्षा देऊन भारतातील बहुजनांना ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामीतून मुक्त करण्याचा बौद्ध धम्म हा दवा दिला आहे. या मार्गावर बहुजन समाज चालला तर जातीव्यवस्थेची ब्राह्मणी गुलामी नष्ट होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे भाषण ज्या ठिकाणी बुद्धाने आपल्या आयुष्यातील पहिले भाषण दिले त्या सारनाथ याठिकाणी दि.२५ नोव्हेंबर १९५६ रोजी दिले. या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी “प्रत्येक बौद्धांनी आपले आध्य कर्तव्य समजुन दर रविवारी बुद्ध विहारात जावे.” यासोबतच “या देशातील जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी बौद्ध धम्म हाच पर्याय आहे आहे.” अशा प्रकारचे विचार मांडले होते.
त्यानंतर काठमांडू या ठिकाणी झालेल्या जागतिक धम्म संगती मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार कशा पद्धतीने करता येईल; या संदर्भात विचार मांडले होते. त्यामध्ये सुद्धा भारतामध्ये दिल्ली, मुंबई, कलकत्ता, अशा भारतातील प्रमुख ठिकाणी भव्यदिव्य बुद्ध विहारांची निर्मिती चा प्रकल्प सादर केला होता. विहारांचे महत्व विशद केले होते. बाबासाहेबांना भारतात धम्माचा प्रचार प्रसार मिशनरी पद्धतीने करायचा होता. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आज धम्म प्रचारकांनी बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित मिशनरी पद्धत समजून घेतलेले नाही. असे एकंदरीत दिसून येते. ख्रिश्चन बांधव ज्याप्रमाणे दर रविवारी त्यांच्या चर्चमध्ये नियमित जातात. त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या धर्माचे संस्कार आणि धर्माचा प्रचार-प्रसार चांगल्या पद्धतीने होतो. त्याप्रमाणेच बौद्धांनी जर दर रविवारी विहारात गेले तर त्यांच्यावर धम्माचे संस्कार होतील आणि धम्माचा प्रचार होईल. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश आपले बांधव अमलात आणतात असे दिसत नाही.
बौद्धांनी विहारांची निर्मिती करून त्या विहारांमध्ये धम्म प्रचारासाठीचे विविध उपक्रम राबवले पाहिजेत.बुद्धाप्रती श्रद्धा व्यक्त करावी, मन:शांती मिळावी म्हणून विहारांकडे पाहिले जाते. धम्माच्या सद्गुणांचे परिपोषण विहारांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे बौद्ध धम्माच्या अस्तित्वाकरता, मानवाच्या सुखी जीवनाकरता, प्रगतीकरता विहार ही आवश्यक गोष्ट ठरते. बौद्ध धम्म हा वैचारिक, परिवर्तनशील, मानवतावादी धम्म आहे. विहारांतून मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना, परिवर्तनवादी दिशेने प्रवास कसा करायचा, काय सोबत घ्यायचे व काय सोबत घेऊ नये, नव्या परिस्थितीशी सामना कसा करावा, नवे प्रश्न कोणते, परिवर्तनाची ताकद वाढवण्यासाठी सम्यक उत्तरांबरोबर सम्यक आचरणाची जाण असे विविध तऱ्हेचे मार्गदर्शन विहारांतून व्हावे हे अपेक्षित आहे.
14 ऑक्टोबर 1956 नंतर आता गावागावांत, वस्ती-मोहल्ल्यांत विहार बांधले गेले आहेत. मात्र बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर पासष्ट वर्षे झाली, तरी बौद्ध संस्कृती किंवा विहार संस्कृती मात्र निर्माण होऊ शकलेली नाही. संवाद-संबंध जुळले गेलेले नाहीत.प्रज्ञा,शील, करुणा, मैत्री, त्याग, सहकार्य, आपुलकी, अहिंसा या मानवी मूल्यांपासून समाज दूर जाताना दिसत आहे. राग, द्वेष, लोभ, भय, दु:ख, शोक, माया या विकारांनी समाज पछाडला आहे.”विहारांचे जीवनात असलेले महत्त्व न कळल्यामुळे विहार संस्कृती निर्माण होऊ शकलेली नाही.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म प्रचारासाठी जी BSI संघटना बनवली त्या संघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये दोन नंबर चा मुद्दा हा बौद्ध विहारांची निर्मिती करणे घेतला होता. अर्थातच यातुन बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध विहारांच्या निर्मिती ला महत्त्व दिले होते हे दिसुन येते.
तसेच 1954 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांची पहिली मूर्ती देहूरोड याठिकाणी विहारांमध्ये बसवली होती. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध विहार ही भव्यदिव्य असली पाहिजेत आणि विहारा संदर्भात विचार मांडले होते.
भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध धम्माचे नवसंस्कृती निर्माण करण्यासाठी बौद्ध धम्माची प्रतीके वास्तु नव्याने निर्माण करणे आवश्यक आहे. विहार, स्तूप, लेण्या, स्मारके धम्माच्या प्रचार आणि प्रसाराची केंद्रे इतिहास होती आणि वर्तमानात ही असली पाहिजेत. बौद्ध धम्मातील प्रतीकांची निर्मिती ही उपासकांना धम्म प्रचार आणि प्रसारासाठी प्रेरित करण्यासाठी असते. विहार हे धम्माचा प्रचार आणि प्रसाराचे प्रमुख साधन आहे. बुद्ध काळात आणि बुद्धोत्तर काळामध्ये विहाराची निर्मिती झाल्यामुळेच भारतामध्ये आणि जगभरामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार झाला आहे.
बौद्धांनी युवा वर्गाला विहारात येण्यासाठी, धम्म कार्यात सहभागी होण्यासाठी कार्यक्रम, उपक्रम यांचे आयोजन केले गेले पाहिजे. विहारांत धम्म वर्ग, बालसंस्कार शिबिरे, धम्म शिबिरे,महिला शिबीर, पाली प्रशिक्षण, गीतस्पर्धा, काव्यस्पर्धा, निबंधस्पर्धा वगैरेंद्वारा आंबेडकर स्टडी सर्कल तयार करून वाद-संवाद, चर्चा यांमार्फत धम्मज्ञान वर्ग चालवले गेले पाहिजेत. त्यासाठीच बुद्ध विहार आहेत.
विहारांच्या माध्यमातून विशेषत तरुणांमध्ये धम्म विचार रूजविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.
“आपण कसलीही घाई न करता हळू-हळू आपले साध्य साधू. जुनी माणसे ज्यांच्या हाडीमासी हिंदू धर्म भिनून राहिला अशांना हिंदू धर्म ताबडतोब सोडा असे आपण म्हटले तर त्यांना ते जमणार नाही, आणि मीही त्यांना तसे काही सांगणार नाही. परंतु तरुणांच्या बद्दल मात्र मला दांडगा आत्मविश्वास आहे. योग्य त्या मार्गाने जाऊन आपला समाजाचा व राष्ट्राचा उत्कर्ष ते खचित साधतील.”
(डॉ बाबासाहेब आंबेडकर 21 मे 1951 दिल्ली)
बुद्ध विहार ही परिवर्तनाची केंद्र तेव्हाच बनतील जेव्हा या विहारांमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण बहुजन समाजामध्ये केला जाईल. बहुजनांचे दुःख निवारण करण्यास संदर्भात त्यांच्या समस्या संदर्भात या विहारांमध्ये चर्चा झाली पाहिजे. प्रबोधन झालं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने बुद्धांचा विचार विहारांच्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये रुजेल. आणि तो रुजला पाहिजे यासाठीच विहारांची निर्मिती आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म हा फक्त एका समूहाला पुरता मर्यादित ठेवण्यासाठी दिला नाही तर संपूर्ण बहुजनांमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करायला सांगितला आहे.
बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात पहा. “मी माझा प्रचार तुमच्या पुरताच मर्यादित न ठेवता सार्या हिंदूधर्माला या नव्या क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करीन. यश कितपत येते हे पाहू. मानवतेचे संरक्षण होण्यासाठी भारतालाच काय पण सार्या जगाला शेवटी बौद्ध धम्माची कास धरावी लागेल.”
- डॉ बाबासाहेब आंबेडकर 27 मे 1953 मुंबई
बुद्ध विहाराच्या निर्माण कार्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका नेमकी काय होते हे त्यांनी 24 मे1956 रोजी मुंबई मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बुद्ध जयंती निमित्त दिलेल्या भाषणामधून दिसून येते. बाबासाहेब म्हणतात “धर्म स्थापनेसाठी विहारांची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु आपल्या स्वकष्टाने मला एक असे विहार बांधावयाचे आहे की जे तुम्ही कधी पाहिले नसेल पण त्याकरिता मी कोणा धनीकाकडे लाचार होऊन हात पसरणार नाही. तुम्ही पैसे जमवुन देत असाल तर बांधीन व चांगले बांधीन. आपल्या स्वपराक्रमाने बांधीन. दुसर्याच्या ओंजळीने बांधणार नाही.”
बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी विहारांची निर्मिती ही अत्यंत आवश्यक आहे. बुद्ध काळामध्ये बुद्धोत्तर काळामध्ये बुद्ध विहार अहि प्रामुख्याने बुद्ध विचारांचा धम्माचा प्रचार आणि प्रसाराची केंद्र होती. या विहारांमध्ये बौद्ध भिक्खू राहायचे आणि लोकांच्या मध्ये प्रबोधन जागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवायचे. वर्षावास काळामध्ये विहारांमध्ये कार्यक्रम व्हायचेत. बुद्धांना आणि संघाला अनेक उपासकांनी बुद्ध विहारांचे दान दिल्याची उदाहरणे आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पहावयास मिळतात.
बुद्ध विहार ही परिवर्तनाची केंद्रे होती म्हणून तर पुष्यमित्राच्या प्रती क्रांतीनंतर ब्राह्मणवाद्यांनी सर्वप्रथम भिक्खूंच्या कत्तली करून विहारे आपल्या ताब्यात घेतली. आणि विहारांवर कब्जा केला. “बौद्ध धम्माच्या र्हासा चे मूळ कारण म्हणजे ब्राह्मणांचे विहारांवर कब्जा करणे आणि भिक्खूंच्या कत्तली करुन धम्म प्रचाराची यंत्रना नष्ट करणे हे होते. असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.”
बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन भारतामध्ये पुन्हा बौद्ध धम्माचा विचार पुनर्जिवित केला आहे. आणि हा विचार पुढे चालवणे हे प्रत्येक बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे. वर्तमानात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर धम्मप्रचारासाठी आवश्यक साधने आणि संसाधनांची निर्मिती करावी लागेल. या आवश्यक साधन आणि संसाधनांमध्ये बुद्ध विहार आणि धम्म प्रचारक ही प्रमुख साधने आहेत. या साधनांच्या निर्मितीला बौद्ध धम्म उपासक-उपासिका, बौद्ध संघटना यांनी प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी दान दिले पाहिजे. धम्म प्रचार-प्रसारासाठी विहार आणि प्रचारक निर्माण झाले नाही तर धम्माचा प्रचार कसा होईल? आणि विहार म्हणजे फक्त एक इमारत नाही तर ते बुद्ध विचारांचा प्रचार करण्याचे केंद्र असले पाहिजे. सम्राट अशोकाने या देशांमध्ये बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसारासाठी 84000 विहार म्हणजे प्रचाराची केंद्र बनवली होती. म्हणून त्या काळात प्रबुद्ध भारत निर्माण झाला. आज आपण त्या विहारांचा फक्त इतिहास सांगतो.
परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती केली त्या क्रांती नंतर विहार संस्कृती निर्माण व्हायला पाहिजे होती. त्या संदर्भात आपण गांभीर्याने विचार करत नाही. तो केला पाहिजे.
तूर्तास एवढेच
(भाग -१)
राहुल कांबळे (धम्म प्रचारक)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत