डॉ. भीमराव एकनाथ गोटे
जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काही तरी कारण असते आणि त्याचा परिणाम असतो. मग कोजागिरी मागे काय कारण आहे? कोणती परंपरा आहे?
कोजागिरी = कोजा + गिरी
कोजा = अश्वीन पुनवेच्या रात्रीचे जागरण
गिरी = टेकडी, पर्वत
अडीच हजार वर्षापुर्वी बौद्ध भिक्कू वर्षावासाच्या शेवटच्या रात्री एखाद्या उंच टेकडीवर एकत्रीत येऊन जो उत्सव करायचे; त्याला कोजागिरी असे म्हटले जाते. बुद्ध काळात आजच्या सारखे इलेक्ट्रीकचे प्रकाशमान दिवे नव्हते. त्यामुळे बहुतेक कार्यक्रम पोर्णिमेच्या शीतल प्रकाशात होत असत. म्हणूनच बौद्ध धर्मात पोर्णिमेला महत्वाचे स्थान आहे. कोजागिरी ही पावसाळ्याच्या शेवटी वर्षावास समाप्तीच्या अश्वीन पोर्णिमेला असते.
त्या काळात आजच्या सारखे रस्ते नव्हते. जंगल, नदी पार करून भिक्कू धम्मप्रचारास जावे लागत असे. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यास भिक्खूंना पावसाळ्यात अडचण जात असे. भिक्खूकडे फक्त दोन किंवा तीन चिवर असायचे. ते जर पावसात ओले झाले तर सर्दी, खोकला, ताप रोगराईचा भिक्खूंना त्रास व्हायचा. अंधाराचे व रोगयुक्त वातावरण आणि नैसर्गिक जिवघेण्या श्वापदांचा त्रास यामुळे वर्षाऋतूत धम्माच्या प्रचार प्रसाराला बुद्धाने मनाई केली होती. पावसामुळे धम्म प्रचार शक्य नसल्यामुळे वर्षाऋतूत भिक्खू संघाने एकाच ठिकाणी निवास करावा; असा नियम भिक्खू संघाने ठरविला होता. या निमित्ताने सर्व भिक्खू एकत्र येत असत आणि पावासाळ्यातील या तीन महिन्यात धम्मावर चर्चा करीत असत. बौद्ध धम्मावर भिक्खू संघात चर्चा (डिबेट) होत असे. वर्षाऋतूतील भिक्खूंच्या या निवास काळाला ‘वर्षावास’ म्हटले जाते. कोजागिरीची रात्र ही वर्षावास काळाची शेवटची रात्र असते. दुसऱ्या दिवसापासून निसर्गात पुन्हा पोषक वातावरण तयार होते.
वर्षावासातील तीन महिन्याच्या या काळात भिक्खूंमध्ये होणाऱ्या चर्चेमुळे अनेक वादग्रस्त मुद्धे स्पष्ट होऊन मतभेद दूर केले जात असत. या पौर्णिमेच्या रात्री सामुहिकरित्या दूध तापवून त्याची गोड खीर बनवून प्राशन करायचे. या वेळी होणाऱ्या चर्चेतून अनेक भिक्खूंचे मत परिवर्तन सुद्धा होत असे. काहींचे मन दुखावले गेले असेल तर चर्चेनंतर सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असे आणि कुणाच्याही मनात शंका, द्वेष वा ईर्षा न राहता या कोजागिरीच्या रात्री प्रसन्न मनाने हा कार्यक्रम पार पडत असे.
दूध हे पूर्ण अन्न आहे; असे म्हणतात. त्यात शरीराला आवश्यक असणारे सर्व प्रकारचे अन्नघटक असतात. म्हणूनच नवजात जीवास इतर कोणत्याही अन्न पदार्थाची गरज नसते. दूध हे शांत आणि ऊर्जा देणारे पेय आहे. हे पेय चंद्राच्या शीतल किरणात तापविले; तर त्यात एक प्रकारचे तेज प्राप्त होत असते; असा एक समज आहे. वर्षावासातील चर्चेत मतभेदाने तापलेल्या मनास शांत करण्याची त्यात क्षमता असते. म्हणूनच या सामुहीक आनंदोत्सवात असे दुध प्राशन करुन दुसऱ्या दिवसापासून सर्व भिक्खू शुद्ध अंतकरणाने धम्म प्रचारास प्रयाण करीत असत.
डॉ. भीमराव एकनाथ गोटे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत