68 व्या धम्मचक्क पवर्तन दिवसाच्या निमित्ताने……..शाम शिरसाट
सर्व जन्माने व कर्माने बुद्धिवादी असणाऱ्या आंबेडकरी बंधू आणि भगिनींना सम्राट अशोक विजया दशमी व 68 व्या धम्मचक्क पवर्तन दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
लाखो रुपयांच्या थैल्या अथवा आमिषे समोर असतांनाही प. पू. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन शीख, मुस्लिम अथवा ख्रिस्ती धर्म नाकारले व तत्कालीन परिस्थितीमध्ये भारतामध्ये शून्यवत भूमी असणाऱ्या बुद्ध धम्माचा स्वीकार केला,त्याची दोन प्रमुख कारणे होती.
पहिले म्हणजे बाबासाहेबांनी या सर्व धर्मांचा गहन अभ्यास केला होता, त्यामुळे या धर्मातील तात्विक अथवा मूलभूत अंगभूत दो्षांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता.हे दोष त्यांनी वेळोवेळी आपल्या विविध भाषणांमध्ये अधोरेखित केले होते.
दुसरे कारण म्हणजे सद्यस्थित्तीमध्ये विशेषतः भारतामधील जाती व्यवस्थेमुळे या धर्मामध्ये शिरलेले दोष त्यांनी डोळसपणे पाहिले व अनुभवले होते. त्यामुळे धर्मांतर करून आगीतून फुफाट्यात पडण्याची त्यांची इच्छा नव्हती. आज जगामध्ये केवळ पंथामध्ये विभाजीत असणारे वरील सर्व धर्म भारतामध्ये मात्र जातींमध्ये विभाजीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या दूरदृष्टीला मानाचा जयभीम.
त्यामुळे तत्कालीन प्रलोभने नाकारून, देशात कुठल्याही प्रकारे अस्तित्व उरलेले नसलेला बुद्ध धम्म त्यांनी स्वीकारला.अगदी बौद्ध धम्म स्वीकारताना सुद्धा बुध्दाचे मूलभूत तत्वज्ञान मान्य असूनही प्रचलित काळातील या धर्मामधील दोष ही त्यांना माहित होते.त्यामुळे हे दोष टाळून 22 प्रतिज्ञा देताना त्यांनी नव्या प्रकारे धम्माची मांडणी म्हणजे “नवयानाची ” निर्मिती केली.
राजा मिलिंद व भंते नागसेन यांच्या चर्चेमध्ये कोणत्याही धर्माच्या प्रसारामध्ये धर्माची मुलतत्वे, राजाश्रय, प्रसारासाठी चांगले व अभ्यासू प्रवक्ते व अनुयायी यांची आवश्यकता प्रतिपादन केली आहे.आज त्यांनी दिलेल्या धम्माची मूलतत्वे चांगली आहेत, आज जरी या धम्माला भारतामध्ये राजाश्रय नसला तरी जागतिक मान्यता आहे. तेव्हा “सारा भारत बौद्धमय करीन ” या बाबासाहेबानी केलेल्या प्रतिज्ञेची पूर्तता करण्यासाठी चांगले अनुयायी व या अनुयायांमधून चांगले प्रवक्ते निर्माण करण्याची गरज मोठया प्रमाणावर निर्माण झाली आहे.
आज प्रतिक्रांती एकीकडे हिंदुत्वाच्या नावाखाली मोठया प्रमाणावर धार्मिक द्वेषाच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे जोरदार प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे हिंदुत्वाच्या आड ब्राम्हणवाद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लोकांमध्ये विशेषतः “नाही रे” वर्ग म्हणजे गरीब, मागास वर्गामध्ये आपल्या सामाजिक अथवा आर्थिक हलाखीची जाणीव निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये रूढी -परंपरा, दैववादाचा जोरदार प्रचार प्रसार करत आहेत. त्यासाठी येणारा प्रत्येक सण, उत्सव व देवाच्या नावाने नवनवीन प्रथा- परंपरा सुरु करून त्यांना त्या नशेमध्ये गुंतवले जात आहे. त्यासाठी प्रचलित राजकीय पक्ष, सोशल मीडिया अथवा भांडवली वर्गाचा पद्धतशीर पणे वापर करून घेतला जात आहे. यामध्ये सर्व जाती धर्म अगदी जन्माने बौद्ध असणारे सुद्धा याला बळी पडत आहेत,ही मोठी काळजीची बाब आहे.
तेव्हा समाजाला योग्य दिशा दाखवण्याची सर्व समाजातील सुशिक्षित,आर्थिक व सामाजिक सुस्थितिमधील विशेषतः स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या बुद्धिवादी वर्गाची फार मोठी जबाबदारी आहे. परंतु हा वर्ग भौतिक चंगळवादाच्या आहारी गेल्याने निराशा अथवा औदासीन्यामुळे त्याची समाजापासून नाळ तुटत चालली आहे, ही बाब काळजी वाटणारी आहे.
तेव्हा केवळ जन्माने नव्हे तर कर्माने बुद्धिवादी असणाऱ्या समविचारी लोकांना एकत्र घेऊन या देशामध्ये आर्थिक व सामाजिक लोकशाहीची लवकरात लवकर स्थापना करण्यासाठी धर्मनिरपेक्ष भारतीय समाजमन तयार करणे, हीच खरी उद्याच्या धम्मचक्क पवर्तन दिवशी एकमेकांना शुभेच्छा व बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली असेल.
💐💐💐💐
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत