पत्रकार आंबेडकर
दत्ता गायकवाड
मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासात वृत्तपत्राला महत्त्वाचे स्थान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकजागृतीसाठी ध्येयवादाने प्रेरित होऊन मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुध्द भारत ही पत्रे निर्माण केली. बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्यासंबंधीचा पुरस्कार हा केवळ एका वर्णाचा, वर्गाचा अथवा समाजाचाच विचार करणारा पुरस्कार नव्हता, तर जो जो गुलाम असेल, बहिष्कृत असेल, तुच्छ मानला गेला असेल, त्या प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगता आले पाहिजे; ही त्यांची मनोभूमिका होती. “गुलामांना त्याच्या गुलामगिरीची जाणीव झाली पाहिजे म्हणजे ते आपोआप बंड करतील” यासाठी त्यांनी लेखनप्रपंच केला. “दिसामाजी काहीतरी लिहावे” या लेखनक्रियेतून त्यांनी आपली लेखणी वापरली नाही.
बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे प्रतिक्रिया म्हणून किंवा केवळ हिंदू धर्माचा विरोध करण्यासाठी जन्माला आली नव्हती. कुणाशी स्पर्धा करण्यासाठी ती निर्माण केली नाही. अस्पृश्यांमध्ये सूडाची भावना भडकविण्याचा तो प्रयत्न नव्हता. निषेध होता तो मानवी दास्याचा. अस्पृश्यांना मिळणा-या क्रूर वागणुकीचा. चीड होती ती. विषमतेची, भेदाभेदाची. बाबासाहेबांचा मूळ पिंड विचारवंताचा आहे. त्यामुळे त्यांचे सर्व लेखन विचारप्रवर्तक आहे. अस्पृश्यांमध्ये विचारजागृती करीत असताना हे लेखन स्पृश्यांना अवधान देण्याचे आवाहन करते.
खरे स्वातंत्र्य कोणते यासंबंधी बाबासाहेब लिहितात, “सत्याग्रह आणि दुराग्रह या ग्रहांनी हिंदी राष्ट्र आज ग्रासलेले आहे. हे राहू-केतू दोन्ही सारखेच अनिष्ट ग्रह आहेत. त्यांच्या मगरमिठीतून हिंदी राष्ट्राची सोडवणूक करणे म्हणजेच स्वातंत्र्यरवीचे स्वागत करणे होय”. अशी अनुप्रासात्मक वाक्यरचना बाबासाहेब करतात. त्यांनी आपल्या लेखनात मराठी-हिंदी वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर केला आहे. संस्कृत व संत वचनाचांही त्यांनी वापर केला आहे.
३१ जानेवारी १९२० साली त्यांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरू केले. पत्रकाच्या शीर्षस्थानी संत तुकारामांचा –
“काय करू आता धरूनिया भीड । निःशंक हे तोंड वाजवीले ।
नव्हे जगी कोणी मुकीयाचा जाणे। सार्थक लाजून नव्हे हीत ।”
हा अभंग होता तर ‘बहिष्कृत भारत’ च्या शीर्षस्थानी संत ज्ञानेश्वराची “आता कोदंड घेऊनि हाती । आरूढ पां इथे रथी । देई आलिंगन वीरवृत्ती। समाधाने” ही ओवी होती.
दर शनिवारी हा अंक प्रकाशित होत असे. त्यांची किंमत दीड आणा होती. हा अंक महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात जात असे. अंक हाती येताच वस्ततील चावडीतून त्याचे सामुदायिक वाचन होई. बाबासाहेबांच्या लेखनामुळे समाजामध्ये जाणीव निर्माण झाली, आत्मभान आले, संघर्षासाठी मनोबल तयार झाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांना मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले.
दलित आणि बहुजन समाजात वर्तमानपत्र चालविणे आजच्या काळातही अशक्य होत आहे. त्याकाळी बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक झळ सोसून हा पत्रप्रपंच चालविला. बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढा स्वार्थत्याग करता येईल तेवढा केला. पैसा, वेळ, बुध्दी याचा वापर करून त्यांनी हे व्रत स्वीकारले. ते म्हणतात की, “मी संस्थानिक नाही, जहागीदार नाही, लोकजागृतीसाठी मी हे पत्रक चालवत आहे. विपन्नावस्थेत माझी प्रिय पत्नी रमा हिने शेणाच्या गोण्या डोक्यावरून वाहून संसार चालविला. अशा अत्यंत ममताळू, सुशील व पूज्य पन्तीच्या सहवासात दिवसाच्या २४ तासांपैकी अर्धा तासही मला देता येत नाही. लौकिक ऋणाच्या भावनेने मी हे पत्रक चालविले. समाजातील लोकांनीही या लौकिक ऋणाचं भान ठेवावं.” सगळे मिळून आपण हा बोजा उचलू असे बाबासाहेबांनी आवाहन केले होते.
३१ जानेवारी १९२० पासून ते ६ डिसेंबर १९५६ पर्यंत ‘बहिष्कृत भारत’ चा हा मूकनायक जनतेला प्रबुध्द भारताकडे नेण्यासाठी अविश्रांत झटला.
बाबासाहेब आंबेडकरांनी आपली पत्रकारिता सामाजिक परिवर्तनासाठी वापरली, एक प्रभावी माध्यम म्हणून आपल्या नियतकालिकाचा प्रभाव सिध्द केला. म्हणूनच त्यांची पत्रकारिता ही सामाजिक, समतावादी परिवर्तनाच्या लढ्यातील संघर्षकारक युगपरिवर्तनशील लोकपत्रकारिता होती.
भारतीय समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी निर्भीड अशी लोकपत्रकारिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. सामाजिक विषमतेवर त्यांनी कठोर प्रहार केले. धर्म, जात, पंथ यांना छेद देणारी ही पत्रकारिता मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या ‘विकासासाठी कटिबध्द होती.
दत्ता गायकवाड, सोलापूर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत