महाराजा सयाजीराव आणि पाली भाषा
-डॉ. राजेंद्र मगर, सोलापूर
(मोबाईल : ९४२०३७८८५०)
बडोद्याचे नृपती महाराजा सयाजीराव गायकवाड ‘प्रज्ञावंत’ होते. त्यांनी मातृभाषा मराठी बरोबर इतर भाषांचे रक्षण, संवर्धन आणि विकासाठी मोठी मदत केली. भारत सरकारने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यानिमित्ताने महाराजांनी ■पाली भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी केलेली मदत पाहूया.
आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (९ ऑक्टोबर १८७६ ते ४ जून १९४७) बौद्ध धर्म व पाली भाषेचे अभ्यासक होते. त्यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला होता. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. त्यांनी मराठीतून लेखन केले. बौद्ध धर्म आणि पाली भाषेचा प्रसार आणि प्रचाराच्या निमित्ताने त्यांची आणि सयाजीराव महाराजांची ओळख झाली.
महाराजांनी डिसेंबर १९०६ मध्ये कलकत्ता येथे काँग्रेस अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित औद्योगिक परिषदेचे उद्घाटन केले. याकाळात धर्मानंद कोसंबी कलकत्ता येथे राहत होते. त्यांनी महाराजांची धावती भेट घेतली. महाराजांनी त्यांना बडोद्यास येऊन सविस्तर भेटावे म्हणून सुचवले. त्यानंतर दोघांची यांची सविस्तर भेट इ.स. १९०७ मध्ये झाली; परंतु महाराजांच्या कुटुंबातील व्यक्तीचा (चुलती) मृत्यू तीन दिवसांपूर्वीच झाल्याचे त्यांचे व्याख्यान राजवाड्यात झाले नाही. त्यावेळी पाली भाषा आणि बौद्धधर्म याबद्दल चर्चा झाली. महाराजांनी त्यांना मदत केली. महाराजांनी त्यांना जाण्यायेण्याच्या खर्चासाठी १६० रुपये खानगीतून दिले. पुढे त्यांनी कलकत्ता सोडून बडोद्यात येऊन पाली भाषा आणि बौद्ध धर्म प्रसार करावा म्हणून महाराजांच्या वतीने तार करण्यात आली. त्याच काळात कलकत्ता विद्यापीठाने त्यांचा पगार १०० रुपयांवरून २५० रुपये केला. ‘एकीकडे भरमसाठ पगार आणि दुसरीकडे महाराजांना दिलेला शब्द’ या द्विधा मनस्थितीत कोसंबी अडकले; परंतु श्रेष्ठ व्यक्ती आर्थिकदृष्ट्या विचार न करता फक्त आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करतात याप्रमाणे त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी बाजूला ठेऊन पुन्हा एकदा बडोद्याकडे प्रयाण केले.
महाराज नेहमीच गुणवान लोकसंग्रह करण्यात माहीर होते. त्यामुळेच कोसंबी यांनी बडोद्यात राहून नियोजित कार्य करावे असे सुचवले; परंतु ही अट कोसंबी यांना आवडली नाही. तरीही महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात राहून कार्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी कळवले. त्याबद्दल कोसंबी यांना बडोद्याहून पुढीलप्रमाणे तार आली. ‘तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही शहरी राहत असाल तर तुम्हाला बडोदे सरकारातून दरमहा ५० रुपये मिळतील, ही मदत तीन वर्षेपर्यंत चालू राहील. मात्र वर्षांतून एखादे पुस्तक बडोदे सरकारसाठी तुम्ही लिहून तयार केले पाहिजे.’ अशा प्रकारे महाराजांनी पाली भाषा आणि धर्मप्रचारासाठी कोसंबी यांना मदत करण्याचे ठरवले. त्यामध्ये साहित्यनिर्मितीची अट महत्त्वाची आहे. वरील मदतीचा उपयोग घेत कोसंबींनी बौद्ध धर्म प्रसाराचे कार्य सुरू केले.
महाराजांनी मासिक मानधन सुरू केल्यामुळे धर्मानंद कोसंबी हे कार्य करण्याकरिता पुण्यात येऊन राहिले. या काळातील स्वतःच्या कार्याबद्दल लिहितात, ‘इ.स. १९०९ मध्ये ‘विशुद्धिमार्गाचा’ बराचसा भाग मी देवनागरी लीपीत लिहून काढला. ‘बोधिचर्या-अवतार’चे मराठी भाषांतर तयार केले. एक लहानसे पाली व्याकरण संस्कृत भाषेत लिहिले आणि बडोदे येथील निरनिराळ्या ठिकाणी पाच व्याख्याने दिली. त्यातील तीन व्याख्याने ‘बुद्ध, धर्म आणि संघ’
नावाच्या पुस्तकरूपाने छापून प्रसिद्ध झाली आहेत.’ (सुखठणकर, संपादक, २०१५, पृ.१५६) महाराज साहित्यप्रेमी असल्यामुळे ग्रंथनिर्मितीस कायमच साहाय्य करत होते. पुढे कोसंबी यांना ‘बुद्ध, धर्म आणि संघ’ ग्रंथासाठी ५०० रुपयांची देणगी दिली. त्या ग्रंथाच्या काही प्रती पुन्हा विकत घेतल्या. कोसंबी यांनी कराराप्रमाणे साहित्य निर्माण केले. महाराजांनी त्यांना साहित्य प्रकाशनासाठी पुन्हा मदत केली.
पुढे धर्मानंद कोसंबी यांना अमेरिकेतील डॉ. वूडस (डॉ. वूडस आणि धर्मानंद यांची मुबई इथे ओळख झाली होती.) यांच्याकडून तातडीचे पत्र आले. त्यामध्ये ‘हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील माजी प्रोफेसर मि. वारन यांनी ‘विशुद्धिमार्गाचे संशोधन’ सुरू केले आहे. त्यांना संशोधन साहाय्य करण्यासाठी अमेरिकेला यावे.’ कोसंबी यांना ही एक नामी संधी मिळाली. परंतु पुन्हा ‘बडोदा मानधनाचा करार आणि अमेरिकेतील संधी’ या द्विधा स्थितीत अडकले; त्यावेळी महाराजांनी त्यांना प्रोत्साहन दिले. महाराजही त्यावेळी अमेरिकेला जाणार होते. त्यांना सोबत घेऊन जाण्याची तयारी दर्शवली; परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शक्य झाले नाही; परंतु महाराजांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन त्यांच्या कायमच पाठीशी राहिले.
कोसंबी यांनी अमेरिकेतील संशोधन पूर्ण झाल्यावर पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात नोकरी सुरू केली. त्याबद्दल महाराजांना आश्चर्य वाटले; परंतु विनापरवाना नोकरी केल्याबद्दल रागावलेही नाहीत. उलट कोसंबी यांच्या विनंतीनुसार महाविद्यालायत शिष्यवृत्त्या सुरू केल्या. त्याबद्दल सुखठणकर लिहितात, ‘फर्ग्युसनमध्ये शिकणाऱ्या पालीच्या विद्यार्थ्यांस काही स्कॉलरशिप द्याव्यात अशी या वेळी धर्मानंदांनी केलेली विनंती महाराजांनी मान्य केली आणि परत गेल्यावर दर महिन्याला पंधरा रुपयांच्या दोन आणि दहा रुपयांच्या दोन अशा चार स्कॉलरशिप दिल्याचे पत्र प्रि. परांजपे यांस पाठवले.’ (सुखठणकर, संपादक, २०१५, पृ.१९३). सर्व शिष्यवृत्त्या धर्मानंद कॉलेजात असेपर्यंत सुरू होत्या. महाराज अशा प्रकारे गुणी व्यक्तीचे कार्य समजले की त्यांना भरपूर मदत करत.
धर्मानंद यांच्या ठायी महाराजांबद्दल कायमच आदर वसत असे. त्यामुळे ते आपल्या आत्मचरित्रात लिहितात, ‘दरमहा २५० रुपयांची नोकरी सोडून श्रीमंत गायकवाड महाराजांनी दिलेल्या ५० रुपयांच्या वेतनाचा स्वीकार केल्याबद्दल मला कधीही पश्चात्ताप झाला नाही. हे वेतन स्वीकारले नसते, तर डॉ. वूडस यांची गाठ पडली नसती आणि अमेरिकेला जाण्याची संधी सापडली नसती. पुण्याला येऊन राहिल्यामुळे डॉ. भांडारकर यांचा निकट संबंध जडला व त्यांच्या प्रयत्नाने मुंबई युनिव्हर्सिटीत पाली भाषेचा प्रवेश करवून घेता आला. महाराजांच्या मदतीमुळे महाराष्ट्र देशबांधवांची सेवा करण्याची माझी उत्कट इच्छा अंशत: तरी तृप्त होण्यास श्रीमंत गायकवाड महाराजांचाच आश्रय कारणीभूत झाला आहे, आणि या प्रांतात पाली भाषेच्या प्रसाराचे पुष्कळसे श्रेय त्यांना देणे योग्य आहे.’
( सुखठणकर, संपादक, २०१५, पृ.१५६-१५७). महाराजांची योग्य निवड आणि मदतीमुळे या देशात अनेक सुधारणांचा पाया घातला गेला.
महाराजांना बौद्ध धर्म आणि पाली भाषेतील साहित्याविषयी आस्था होती. पाली भाषेतील साहित्य, तत्त्वज्ञान आणि जीवनमूल्ये याविषयी कमालीची उत्सुकता होती. महाराजांच्या मदतीमुळे आणि धर्मानंद कोसंबी यांच्या प्रयत्नामुळे शेवटी पाली भाषेचा मुंबई विद्यापीठात प्रवेश झाला. त्याबद्दल दि. १९ जानेवारी १९२४ रोजी हिंदू विश्वविद्यालय, काशी येथे ‘पदवीदान समारंभ’ समारंभ प्रसंगी महाराज म्हणाले, ‘मी माझ्या राज्यात बौद्ध विद्येच्या अभ्यासाला उत्तेजन मिळावे असा प्रयत्न केला आहे. मुंबई विद्यापीठात जरी यंत्रविद्या व व्यापारविद्या यांचा गलबला विशेष ऐकू येत असतो, तरी त्यातही मधूनमधून सांस्कृतिक विद्या धडपड करून आपली दाद लावून घेत असते. त्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात नुकताच पाली भाषेच्या अभ्यासाचा समावेश करण्यात आला आहे. दक्षिणेकडे जो बौद्ध धर्म पसरला त्याचे उपलब्ध वाङ्मय (साहित्य) बहुतेक सर्व पाली भाषेतच आहे. अशा रीतीने मुंबई विद्यापीठाचे लक्ष बौद्ध वाङ्मयाकडे वळत आहे हे सुचिन्ह आहे. शिवाय सर्व गुजरात व दक्षिण विभागांतही लोकांना वाङ्मयाविषयी वाढते कुतूहल वाटत आहे ही गोष्ट महत्त्वाची व समाधानाची आहे. माझ्या राज्यात उत्तरेकडे पाटण नावाचे एक प्राचीन शहर आहे. तिथल्या जैन लोकांच्या एका जुन्या ग्रंथसंग्रहात बौद्ध धर्माच्या महायान पंथाचे दोन महत्त्वाचे ग्रंथ नुकतेच सापडले आहेत. ते ग्रंथ गायकवाड प्राच्यमालेच्या द्वारा प्रसिद्ध करविण्याची व्यवस्था चालू आहे. त्यापैकी एकाचे संपादनकार्य इथले आपले एक उपकुलगुरू यांनीच करण्याचे कबूल केले आहे. हिंदू धर्माच्या अभ्यासक्रमाचे पूरक अंग म्हणून बौद्ध व जैन वाङ्मयाचे संशोधन कार्य हाती घेणे अवश्य आहे आणि या हिंदू विद्यापीठातल्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश लवकरच होईल, अशी आशा मला आहे.’ धर्मानंद कोसंबी यांचे पाली भाषा आणि बौद्ध धर्म प्रसार हेच जीवनकार्य होते. त्यास सयाजीराव महाराजांसारख्या साहित्यप्रेमी आणि धर्मांचा तौलनिक अभ्यास करणाऱ्या चिकित्सकाची मदत मिळाली. या दोन इच्छाशक्ती एकत्र आल्याने कोसंबी यांना मोठे कार्य उभारण्यास मदत झाली.
संदर्भ : सुखठणकर जगन्नाथ सदाशिव, धर्मानंद, दि गोवा हिंदू असोसिएशन, मुंबई, १९७६, पुनर्मुद्रण २०१५
(टीप- लेख प्रस्तुत लेखकाच्या ‘महाराजा सयाजीराव साहित्यातील योगदान’ ग्रंथांतून घेण्यात आला आहे.)
बहुजन हिताय, बहुजन सुखाय, निरंतर आपलाच मा. चंद्रकांत फडतरे, संस्थापक अध्यक्ष – शिवराय फुशांबु ब्रिगेड. संपर्क क्रमांक 9869696290.
🌈🌹🙏🌹 🌈
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत