स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम मांडणाऱ्या बंडखोर लेखिका ताराबाई शिंदे
स्त्री शोषणाविरुद्ध लढा देणान्या, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील स्त्री समाजसुधारक, स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम मांडणाऱ्या बंडखोर लेखिका, तसेच स्त्री-पुरुष समानतेच्या पुरस्कर्त्या ताराबाई शिंदे यांचा बुलडाणा येथे १८५० मध्ये जन्म झाला. मराठा समाजातील श्रीमंत जमिनदार बापूजी हरी शिंदे हे ताराबाईचे वडील. ते राष्ट्रपिता फुले व सावित्रीमाई फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. सत्यशोधक संस्कारातूनच त्यांनी ताराबाईला घडविले. ताराबाई करारी, धाडसी व निर्भिड स्वभावाच्या होत्या. गावात आणि परिसरात त्यांचा दरारा होता. कोर्ट-कचेरीच्या कामासाठी त्या घोड्यावर बसून जात असत. त्यांच्या धाडसी कृत्यांना त्यांच्या वडिलांनीही पाठिंबा दिला. ताराबाई शिंदे यांना मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांचे उत्तम ज्ञान होते. त्यांचे वाचन चौफेर होते. लग्रानंतर त्या सासरी माकोडी या गावी गेल्या. परंतु, नवऱ्याची व त्यांची वैचारिक तार जुळली नाही. ताराबाई माहेरी परतल्या. त्यांनी ताराबाई शिंदे हेच माहेरचे नाव पुढे आयुष्यभर लावले. आधुनिक भारताच्या इतिहासात आपल्या वडिलांचे नाव पुढे चालू ठेवणारी स्त्री म्हणजे ताराबाई शिंदे.
सुरत येथील विजयालक्ष्मी नावाच्या ब्राह्मण विधवेने व्यभिचार करून गर्भपात केला म्हणून सुरत न्यायालयाने त्या विधवेला फाशीची शिक्षा सुनावली. तिने मुंबई कोर्टात अपिल केल्यानंतर ती शिक्षा पाच वर्षाच्या सक्तमजुरीत बदलण्यात आली. २६ मे १८८१ रोजीच्या दैनिकात ताराबाईंनी ही बातमी वाचून ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ५२ पानी निबंध लिहिला. १८८२ मध्ये तो पुस्तक रुपाने प्रसिद्ध झाला. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्त्रियांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडणाऱ्या या ग्रंथावर त्या काळातील सनातनी लोकांनी टीकेची प्रचंड झोड उठवली. राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी त्या ग्रंथावर लेख लिहून ताराबाईंना जाहीर पाठिंबा दिला.
ताराबाईनी भारतातील रुढी, परंपरा, मूल्यांची चिकित्सा केली. पुरुषसत्ताक नियमांना आव्हान दिले. स्त्रियांच्या असणाऱ्या दुहेरी मापदंडाला विरोध केला. स्त्रियांसाठी असणाऱ्या दुय्यमत्वावर प्रहार केला. स्त्री-पुरुष विषमता व शोषणावर हल्ले चढविले. विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, स्त्री हिंसा, धर्मसंस्कृती इत्यादी प्रश्नांना चिकित्सकपणे ताराबाईने हात घातला. भारतीय पुरुष सत्तेवर फटकारे ओढले.
एकूणच स्त्री जातीवर आरोप करणाऱ्या व आक्षेप घेणाऱ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेवर आसूड ओढणाऱ्या आणि स्त्री समानतेचा व स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या स्त्रीउद्धारक ताराबाई शिंदे या नवरंग उधळणाऱ्या किती हिंदुस्थानी महिलांना माहित आहेत? आज अमूक रंगाचे कपडे परिधान करा असे कुणीतरी सांगितले म्हणून रंगाची, संपत्तीची व अज्ञानाची उधळण करणाऱ्या हिंदुस्थानी महिलांनो याबाबतची चिकित्सा कधी केली आहे का? ती का कराविशी वाटली नाही? हा ताराबाई शिंदे यांचा अवमान नाही का? आजही पुरुषसत्ताक संस्कृतीत स्त्रीया गुदमरत आहेत, काही जणी मरत आहेत. त्यांना या अंधार गुहेतून बाहेर काढण्यासाठी बंडखोर विचारांची उधळण करणाऱ्या ताराबाई निर्माण होणार आहेत की नाही?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत