तथागत भगवान बुध्दाच्या अस्थीधातुंचे पुढे काय झाले ?
धनराज मोहोड
मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये फिल्म अभिनेता गगन मलिक ह्यांच्या प्रयत्नाने व विविध परीवर्तनवादी संघटना तसेच भारतीय बौद्ध महासभेचे भिमराव आंबेडकर यांच्या भगवान बुद्धांच्या थायलंड येथुन आणलेल्या अस्थीधातु व कलशाची परभणी ते दादर चैत्यभूमी पदयात्रा आयोजित करण्यात आली होती...
सदर अस्थिधातुसंबंधी खुप बांधवांकडून क्रिया प्रतिक्रिया आलेल्या होत्या.काहींचे म्हणने होते "भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थी तर राख झालेल्या मग आता ह्या यात्रेत कशा आल्या ?" काहींचे म्हणणे असेही होते की "अस्थीधातु तर मृत असते मग अस्थिधातुची पदयात्रा काढण्याचे प्रयोजन काय ?"
मित्रांनो माणूस हा उत्सवप्रिय व समुह प्रिय आहे. तो त्याच्या आदर्शाप्रती आदर व सन्मान बाळगून असतो. मिरवणूक, घोषणा किंवा विविध समारंभ आयोजित करुन त्यांच्या आदर्शाप्रती आनंद व्यक्त करत असतो व आदर्शांच्या शिकवणुकीची उजळणी करत असतो. तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र स्मृती (अस्थिधातु वगैरे) व त्यांच्या संबंध मानवजात सुखी करण्यासाठीची शिकवण हे त्यांच्या जगभरातील अनुयायांसाठी स्फुर्ती असते. मानवी जिवनात आनंद किंवा स्फुर्ती नसेल तर जिवन निरस होईल.
समाज माध्यमातून विविध वरील क्रिया प्रतिक्रिया आलेल्या होत्या म्हणून हा भगवान बुद्धांच्या अस्थीधातु संबंधाने लेख लिहिण्याचा प्रयत्न केला.
तथागत भगवान बुध्दाचे महापरीनिर्वाण ईसवीसन पुर्वी ४८३ साली मल्ल राजाच्या प्रदेशात कुशीनारा (कुशीनगर) येथे झाले वअग्निसंस्कार पण मल्ल राजांच्या देखरेखीखाली व इतर गणांतील राजांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले होते. अग्निसंस्कारानंतर जेव्हा अस्थीधातु वितरणाचा प्रश्न तयार झाला तेव्हा प्रचंड वाद झाला. ज्या मल्ल राजाच्या गणात महापरीनिर्वाण झाले त्या मल्ल राजाने "ह्या अस्थिधातुवर मल्लाचांच अधिकार आहे सबब अस्थिधातु कोणत्याच गणाला मिळणार नाही" अशी भूमिका मांडली. सदर प्रसंगी मगध सम्राट अजातशत्रुसुध्दा हजर होते. त्यामुळे युध्दासारखाच बाका प्रसंग उभा झाला. ह्यातुन मार्ग काढण्यासाठी द्रोण नावाचा बमन पुढे सरसावला. द्रोणाने मार्ग काढण्यासाठी *बुद्धाच्या शांततेची, अहिंसा , प्रेमाची व करुणेच्या शिकवणुकीची आठवण सर्वांना करून दिली* व तोडगा म्हणून सर्व आठ गणांमध्ये अस्थिधातुचे आठ समान भाग करावेत व वाटुन घ्यावे असे सुचवले व सर्वांनी मान्य केले. वरील तोडग्यानुसार भगवान बुद्धांच्या अस्थीधातु खालील आठ गणांना वितरीत झाल्या होत्या.
मगध – अजातशत्रू
कपीलवस्तु – शाक्य
वैशाली – लिच्छवी
कुशीनगर-मल्ल
पावा – मल्ल
वेथाडिपा-बमण
रामग्राम – कोलीय/कोळी (भगवान बुद्धांचे आजोळ)
अलकप्पा-बुलीज
नववा भाग राखेच्या रुपात ज्याने अस्थिवाटप केले त्या द्रोण नावाच्या बमणाला मिळाला होता.
वरील सर्व आठही गणांनी आपआपल्या गणांमध्ये भव्य अस्थिधातु सोन्याच्या कलशात ठेवुन त्यावर भव्य स्तूप उभारले व अस्थिधातुचे जतन केले.
जेव्हा सम्राट अशोकाने बुद्ध धम्माची दिक्षा घेतली व बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसार करण्यासाठी भव्य स्तूपांची, स्तंभांची, संघाराम (विहारे), कोरीव लेण्यांची निर्मिती करण्याची योजना आखली व त्याचाच एक भाग म्हणून आठपैकी *सहा स्तुपाचे* उत्खनन केले.. (शाक्य व कोलीय/कोळी गणाच्या स्तुपाचे उत्खनन केले नाही कारण ह्या दोन गणांनी उत्खननासाठी प्रचंड विरोध केला त्यांच्या तथागता विषयी भावना जुळलेल्या होत्या.)
सहा स्तुपामधील *तथागत भगवान बुद्धांच्या सोन्याच्या कलशातील अस्थिधातुचे* ८४ हजार भाग केले व संबंध जंबुद्विपामध्ये (जंबुद्विप हे भारताचे सम्राट अशोक कालीन नाव ) म्हणजेच आजचा भारत, पाकिस्तान, अफगाणीस्तान, बांगलादेश, ऊजबेकीस्तान , तुर्कस्तान, नेपाळ, चिनचा काही भाग, श्रीलंका, रशीयाचा काही भाग अगदी इराण ईराकचा काही भाग) एकाच वेळी अस्थिधातु सोन्याच्या/चांदीच्या कलशात ठेवुन त्यावर भव्य स्तुपे, स्तंभांची निर्मिती केली , संघाराम (विहारे) बांधली व लेण्या तसेच धम्मलिपीमध्ये शिलालेख कोरलेत. हे शिलालेख म्हणजे सम्राट अशोकाचे कायदे व आज्ञा होत. त्यामध्ये जनतेने *पंचशीलाचे पालन करणे*, तसेच त्या त्या प्रदेशातील आमात्यांना आदेश होते. उदा.जनतेला कोणत्याही त्रास देऊ नये, सर्व प्रकारच्या प्राणी मात्रावर दया करणे वृध्द अपंगांना , गरजुंना मदत व जनतेसाठी दवाखान्याची व्यवस्था करणे व प्राणी मात्रांसाठीसुध्दा दवाखाने बांधने, हमरस्त्याच्या (हायवेच्या) दोन्ही बाजूला ठिकठिकाणी विहिरी खोदणे व दुतर्फा झाडे लावणे जेणेकरून प्रवासी लोकांना प्यायला पाणी व विश्रांतीसाठी सावली मिळेल इत्यादी इत्यादी.
चिनी बौद्ध भिक्खू फाह्यान, ह्युवान श्वांग व ईत्सिन ह्यांच्या प्रवासवर्णनामध्ये वरील वर्णन आहे. सम्राट अशोकानंतर सम्राट कनिष्कने पेशावर येथे भव्य स्तुप बांधला होता… आजचे अफगाणिस्तान व तेव्हाचे गांधार प्रदेशातील नगरहार (आताचे अफगाणिस्तानातील जलालाबाद) येथे जेव्हा फाह्यान यांनी ४०० साली भेट दिली तेव्हा बुध्दाचे दात, हनुवटी, काठी व चिवर ह्या वस्तु फाह्यानने बघीतल्या तेथील राजाने भव्य विहार बांधुन जतन करून ठेवल्या होत्या. हे विहार सोन्याने मढवलेले व त्यावर माणिक मोत्यांचे नक्षीकाम केलेले फाह्यान यांना आढळून आले. तथागत भगवान बुद्ध हे करुणेचा महासागर होते. त्यांचे हयातीमध्ये ते ज्या एखाद्या प्रदेशात सध्दमाच्या प्रवचनासाठी व प्रचार प्रसार करण्यासाठी जात व तेव्हा तो प्रदेश बुध्दाच्या पावण स्पर्शाने व प्रवचनाने पुण्यांकित व्हायचा तेथील मानवजिवन वेगळ्याच भावनेने गढुन जायचे व सर्व प्रदेश बुध्दमय व्हायचा कारण भगवान बुद्धांचे व्यक्तीमत्व व प्रवचन फारच प्रभावशाली असायचे. तथागत जेव्हा तेथुन पुन्हा दुसऱ्या प्रदेश किंवा ठिकाणासाठी निघण्याच्या तयारीत असत तेव्हा तेथील स्त्री पुरुष अनुयायी व भिक्खू संघ खुप भावुक होत अक्षरशः रडायला लागत तेव्हा तथागत बुद्ध आपली आठवण म्हणून केसधातु , नखधातु , चिवर किंवा भिक्षापात्र तेथील अनुयायांना भेट देत असत व अशा प्रकारे अनुयायी व भिक्खूंच्या विरहाच्या दुःखावर फुंकर घालत. मग अनुयायी त्यावर स्तुप व विहाराची निर्मिती करून बुद्धानी दिलेल्या भेटवस्तू जतन केल्या जात असत.भगवान बुध्दांना जेव्हा ऊरूवेला (बोधगया) येथे झानप्राप्ती झाली त्यावेळी बर्मा (ब्रम्हदेश) देशाचे भल्लिक व तपस्सु हे दोन व्यापारी बंधु ऊरुवेला येथे विश्रांतीसाठी थांबले होते. तेव्हा बुध्दांनी झानप्राप्ती नंतर पहिले प्रवचन भल्लिक व तपस्सु यांना दिले. भगवान बुद्धांच्या प्रवचनाने हे दोन व्यापारी बंधु फारच प्रभावित व सदगदीत झाले. त्या दोन बंधुंनी बरमा देशातील उत्तम प्रतीच्या तांदूळ व मधापासुन बनवलेले लाडु भगवान बुध्दांना भोजनासाठी दिले. ज्ञानप्राप्ती नंतर तथागतांचे हे पहिले भोजन होते.भगवान बुध्दांनी त्यांना केसधातु व नखधातु आठवण म्हणून भेट दिले. भल्लिक व तपस्सु ह्यांनी ब्रम्हदेशात बुद्धांच्या केसधातु व नखधातु जतन करण्यासाठी भगवान बुद्धांच्या हयातीतच प्रचंड मोठा स्तुप व विहार निर्माण केले. भल्लिक ह्यांनी मगध येथे जाऊन भगवान बुद्धांकडुन परीव्रज्जा घेतली व अरहंत झाले तसेच तपस्सु यांनी उपासक म्हणून दिक्षा घेतली. व संपूर्ण आयुष्य बुध्द धम्माच्या प्रचार प्रचारासाठी अर्पण केले व संबंध बरमा देश (आजचा म्यानमार) बुध्दमय झाला. (चिनी प्रवासी भिक्खूंनी ह्या बाबींची वर्णने केली आहे)
फाह्यान, ह्युवान श्वांग व ईत्सिन ह्या चिनी बौद्ध भिक्खुंची प्रवास वर्णने ब्रिटिश पुरातत्व अधिकारी *जनरल कनींघम* ह्यांच्या वाचनात आली. ( सर्व बौध्द अभ्यासकांनी वाचावी अमेझॉन वर ऑनलाईन विकत मिळतात). जनरल कनिंघमनी सम्राट अशोकाने बांधलेले अनेक स्तुप शोधून काढले व उत्खनन केले त्यामध्ये तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थी सोन्याच्या कलशात मिळाल्या. त्यातील अस्थी इंग्रज कालीन बौध्द राष्ट्रांच्या विनंती नुसार त्या थायलंड, ब्रम्हदेश, कंबोडिया, श्रीलंका इत्यादी राष्ट्रांना दिल्या. काही अस्थी इंग्लंडला पाठवल्या व काही अस्थी कलकत्ता व दिल्ली येथील संग्रहालयात ठेवण्यात आल्या व त्या अजुनही आहेत.. दरवर्षी वैशाख पौर्णिमेला अस्थी जनतेसाठी दर्शनार्थ खुल्या केल्या जाते..
भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र अफगाणिस्तान येथील संग्रहालयात आहे..
चिनी बौद्ध भिक्खू फाह्यान , ह्युवान श्वांग व ईत्सिन तसेच इंग्रज पुरातत्व अधिकारी जनरल कनींघम तसेच अशोककालीन शिलालेख व धम्म लिपीची उकल करणारे जेम्स प्रिंसेप ह्या महापुरुषांचे भारतीय बुद्ध धम्मावर खुप ऊपकार आहेत. त्यांनी भारतामध्ये तथागत भगवान बुध्द व सम्राट अशोक शोधून काढले त्यांच्या ईतिहासातील पाऊलखुणा शोधून काढल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान बुध्द अभ्यासल्यावर आपल्या देशाला पुन्हा बुद्ध धम्म दिला. वर्तमान जागतिक अस्थिर, युध्दसदृश, विद्वेषी व धकाधकीच्या जीवनात जगातील सर्व मानव समुहाला तथागत बुद्धांच्या *"करुणा, मैत्री, प्रेम व सध्दमाच्या"* विचारांची नितांत आवश्यकता आहे कारण बुध्दाचा मार्ग हा मानव कल्याणाचा व प्रगतीचा आहे.
(संदर्भ फाह्यानकी भारत यात्रा, ह्येन सांगकी भारत यात्रा व इत्सिनकी भारत यात्रा)
“भवतु सब्ब मंगलम.सर्वांचे मंगल होवो”
धनराज मोहोड (रिटायर्ड इंजिनीयर) करंजाडे पनवेल नवी मुंबई
मोबाईल नंबर 7021563408
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत