हा केवळ मुस्लिमांचा प्रश्न काय ?
० रणजित मेश्राम
भाजपचा एक प्रभावी आमदार ध्वनिक्षेपकावरुन, लोकांच्या उपस्थितीत विशिष्ट धर्मियांना उद्देशून भयंकर असे बोलला. ती ‘क्लिप’ सर्वत्र सतत फिरतेय. ते बोलणे कायदा व सुव्यवस्थेला सरळ धुडकावणे दिसते. तरीही त्यावर मुस्लिमेतरांनी फारसे व्यक्त होऊ नये हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण वाटत नाही.
राजकीय पक्षही यावर गप्पगार आहेत हे त्याहून चिंताजनक आहे. त्या आमदाराचे वडील आज केन्द्रात मंत्री आहेत. ते आमदार सरळ सरळ धमकावतांना म्हणतात .., ‘हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगो ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदोके अंदर आकर तुम्हे चुन चुनके मारेंगे इतना ध्यान मे रक्खो. तुम्हारे कौम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछभी बोलनेका नही. वरना वो जबान हम लोग कहीपे रखेंगे नही ये बात तुम लोग याद रखना’.
हे असे भयंकर बोलणे. बिनधास्त धमकावणे. लोकांनी टाळ्यांचा गजर करणे. ती ‘क्लिप’ फिरणे. कशाचे द्योतक आहे ? हे कायद्याच्या राज्यात कोणत्या कोपऱ्यात बसतेय ? तरीही ते आमदार बिनधास्त फिरतायत. ‘मी हिंदूंचा गब्बर’ असेही सांगतायत.
म्हणजे आचारसंहिता कुठे जातेय हे यातून स्पष्ट होतेय.
प्रश्न पडतो ही बाब काय आहे ? कळते असे की संबंधित महाराजाने एका प्रवचनात, 'महंमद पैगंबरांनी वयाच्या ५० व्या वर्षी एका ६ वर्षाच्या मुलीशी लग्न केले' असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावर मुस्लिम बांधवांनी रोष व्यक्त केला. ते खोटे असल्याचे ते म्हणतात.
त्यानंतर या आमदाराचे आगमन आहे. आमदाराने कायद्याला चौफेर लाथा हाणल्या.
पोलिस याप्रकरणी सुस्त दिसतात. सरकार मौन आहे. दोन धर्मियात तेढ लावणे वगैरे कितीतरी कलम आहेत. त्यांनाही ठाऊक आहे. कुणाची तक्रार न येता ते ताब्यात घेऊ शकतात. पण राज्यकारभारात अजब कैफ सध्या सुरू आहे.सत्ता या कैफाच्या आधीन दिसतेय.
माध्यमे लक्ष देत नाहीत. ज्यांच्या वक्तव्याला भान आहे ते फारसे व्यक्त होत नाहीत. अजब कोंडी झालीय.
यावर बाबासाहेबांनी एक उपाय सूचविला आहे. याला ते लोकनिष्ठा म्हणत. जसे, रंगभेदाची विघातिका काळ्यांसाठी कष्टदायक होती. पण गोऱ्यांनी पुढाकार घेऊन ती मिटविली. हीच ती लोकनिष्ठा ! तुमचा तो प्रश्न नसेलही. पण जर तो प्रश्न वाटतो तर तो मिटवायची कर्तव्यनिष्ठा पाळायला हवी.
भारतात ही लोकनिष्ठा फार कमी असण्याकडे बाबासाहेब लक्ष वेधायचे.
लोकनिष्ठेनुसार ही बाब एका धर्मियांपुरती नाही. ती प्रवृत्तीचाही एक भाग झालीय. वेळीच लोकदबाव न वाढल्यास ही प्रवृत्ती कशीही घसरेल. पसरेलही. पोलिस मनोबल तसे अभ्यस्त होईल. बहुसंख्याक राजकारणाची विषवल्ली इथे जन्म घेतेय.
प्रारंभ छोटा असला तरी हलक्यात घेऊ नये.
या घटनेनंतर अशा घटना वेगाने वाढतांनाचे दिसतेय. अप्रत्यक्ष सरकारचा अभय असाच संदेश येतोय. जागोजागी अशी प्रवृत्ती भेटायला येत आहे. नवी स्पर्धा दिसतेय. एक घडली की दुसरी अशी लडी लागलीय.
वेळीच लोकआवर झाला नाही तर ‘सरकारमान्य स्वैर’ होईल.
एका अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू यांची नियुक्ती रद्द झाली तर माध्यमे व मान्यवर भरभरून व्यक्त झालेत. इथे तर समुदायाची जीभ छाटण्याची बात होतेय. ती बात वेगवेगळ्या रंगरुपात पसरतांना दिसतेय.
व्यक्ततेची ती तन्मयता इथेही हवी आहे.
लागवड भयंकर आहे. आता उपाय एकच. लोकनिष्ठा जागावी. ताकदीने व्यक्त व्हावी.
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत