देशनोकरीविषयकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

उच्चशिक्षणाची न सांगितलेली कहाणी: ‘प्रोफेसरची डायरी’

-डॉ.प्रतिभा जाधव

         डॉ. लक्ष्मण यादव हे अभ्यासक, बुद्धिजीवी आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. भारतीय समाजात संघर्ष करणाऱ्या लोकांची बाजू घेणाऱ्या प्रवाहांना एका मंचावर आणण्याचा ते प्रयत्न करतात. समाजवाद, आंबेडकरवाद, स्त्रीवाद आणि आदिवासींचा संघर्ष, सामाजिक न्याय हे त्यांच्याबाबतच्या मोठ्या लढ्याचे वेगवेगळे रंग आहेत. त्यांना अलाहाबाद विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त आहे. दिल्ली विद्यापीठातून ‘तुलसीदासविषयक टीका’ या विषयांवर त्यांनी विद्यावाचस्पती पदविसाठीचे संशोधन केलेले आहे. जवळपास दीड दशक डीयू(दिल्ली विद्यापीठा)च्या जाकीर हुसेन महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. ‘संत तुलसीदास’ यांच्यावरील त्यांचे एक पुस्तक प्रकाशित आहे. 
      त्यांच्या दीड दशकांच्या काहीशा संघर्षशील पर्वाचा वास्तववादी प्रवास त्यांनी आपले आत्मकथन ‘प्रोफेसरची डायरी’ मधून मांडला आहे. वयाच्या बेचाळीशीत प्रस्थापित व्यवस्था आणि उच्च शिक्षणक्षेत्र यांचा आलेला सूडबुद्धी व विषमतावादाचा अनुभव ते 'प्रोफेसरची डायरी’ मधून मांडला आहे. शिक्षणक्षेत्रासारख्या पवित्र व जनकल्याणवादी क्षेत्राचे सांप्रतकाळातील हिडीस,भयकारी वास्तव त्यांनी जिवंत शब्दांकित केले आहे. विश्वविद्यालय असो वा अगदी ग्रामीण भागातील विविध कार्यालये तिथपर्यंत हे राजकारण आणि ‘स्लो पॉयझनिंग’ वाढताना दिसते आहे. अन्याय आणि शोषण यांची शिकार होणारे कितीतरी जीव असतात. पण सारेचजण त्यांना आलेले अनुभव मुखर करण्याची हिंमत, निर्भयता दाखवत नाहीत. कारण ते जगासमोर आणले म्हणजे ही व्यवस्था त्यांची वाट अजूनच काट्यांची करत जाते व त्यांना हयातभर संघर्षच करावा लागतो. त्यांचा वा त्यांच्या कारकिर्दीचाच बिनदिक्कतपणे ही दमनकरी व्यवस्था घास घेते हे वास्तव आहे. प्रस्थापित व्यवस्थेला स्वयंभू, बुद्धिमान व वरचढ लोक झेपत नसतात. हे लोक सरळमार्गी असूनही अनेकदा बळी ठरतात. हीच कहानी डॉ. डॉ.लक्ष्मण यादव आपल्याला सांगत आहेत. 
      ‘प्रोफेसरची डायरी’ हे आत्मकथन म्हणजे ‘आजवर उच्चशिक्षणाची न सांगितलेली कहानी’ आहे. रोहित वेमुला आणि त्याच्यासारख्या अधुऱ्या राहून गेलेल्या असंख्य शक्यतांना डॉ.लक्ष्मण यादव यांनी हे आत्मकथन अर्पण केले आहे. ‘प्रोफेसरची डायरी’ या आत्मकथनामध्ये डॉ. लक्ष्मण यादव यांच्या आयुष्याचा आणि अनुभवांचा ऑगस्ट २०१० ते डिसेंबर २०२४ पर्यंतचा वास्तवदर्शी लेखाजोखा आहे. एकूण ५३ डायरीची पाने यात आपल्याला वाचायला मिळतात.‘प्रोफेसरची डायरी’ हे आत्मकथन म्हणजे आजमगडमधल्या एका साध्यासरळ, बुद्धिमान, संघर्षशील, विवेकवादी तरुणाची कथा आहे. पीएच.डी. बरोबरच ॲडव्हॉक प्राध्यापक पदासाठी दिल्ली विद्यापीठात प्रयत्न करणाऱ्या ह्या तरुणाला ‘ॲडव्हॉक’ हा शब्दच नवखा होता. वरिष्ठ असणाऱ्या रघुदा हे ॲडव्हॉकसंदर्भात लेखकाला माहिती देतात.
      दिल्लीत दरवर्षी पावसाचा जून महिना ‘ॲडव्हॉक’ होण्याची शक्यता घेऊन येतो. दिल्ली विद्यापीठाची सर्व कॉलेजेस प्रोफेसर होण्याच्या करिअरच्या दृष्टीने सुपीक जमिनीसारखी आहेत. तिथे जूनमध्ये खूप सारे प्राध्यापक सुट्टीवर जातात. त्यांच्या जागी हंगामी प्राध्यापक निवडले जातात. चार महिन्यांसाठी घेतलेल्या प्रोफेसरांना इथे ‘ॲडव्हॉक’ म्हणतात. तिथे एकदा तुम्ही ॲडव्हॉक प्रोफेसर झालात की लवकरच परमनंट होता अशी मान्यता आहे. मौलाना आझाद दिल्ली कॉलेजमध्ये डॉ. लक्ष्मण यादव २०१० मध्ये चार महिन्यांसाठी ॲडव्हॉक प्रोफेसर म्हणून रुजू होतात. हा चार महिन्यांचा खेळ किती खतरनाक होणार आहे? याची त्यांना जाणीव नसते. त्या काळात ते जे.आर.एफ. ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी सुद्धा पात्र ठरले. अंगणवाडीत काम करणारी त्यांची आई त्यांच्या शिक्षणाबद्दल नोकरीबद्दल खूप आशावादी होती. ॲडव्हॉक म्हणून रुजू  झाल्यानंतर ते त्याबद्दल ते म्हणतात की, ‘माझा आजचा दिवस म्हणजे जसं काही भूमिहीन कामगाराला जमिनीचा तुकडा मिळावा असा होता.’ कारण त्यांच्यासारख्या अगणित तरुणांना सध्याच्या व्यवस्थेतील अगणित परीक्षा ठेचून घरी परतायला लावतात. त्यांच्याबरोबरचे राकेश, संगीता, मनोज, अभिनव, रेणू आणि फुलबदन त्यांचे बॅचमेट घरी परतून मजुरी, रोजंदारी करत असताना लेखक दिल्ली विद्यापीठात एका कॉलेजमध्ये शिकवतो याचे त्याला हायसे वाटते. 
    ह्या पुस्तकाच्या लेखनामागील भूमिका मांडताना डॉ.लक्ष्मण यादव लिहितात की, “लेखणी आणि पुस्तक ही माणसाची दुष्प्राप्य कामगिरी आहे. कष्टकरी हाताने जगाला आकार दिला तर लेखणी असलेल्या हाताने त्यात रंग भरले. आज आपण ज्याला भारत म्हणतो ती बहुरंगी संस्कृती शेतकरी, कामगार, शिल्पकार आणि बुद्धिजीवी यांनी हजारो वर्षांमध्ये रचली आहे. बुद्धिजीवी हे शेतकरी, कामगार, वर्गातून येतात आणि शेवटी त्यांच्यासाठीच बोलतात. ‘विश्वगुरू’च्या प्रतिमेतील जे काही रंग आहेत तेही आम्हीच भरलेले आहेत. या विश्वगुरू भारताच्या प्रतिमेत गुरूंची खरी स्थिती काय आहे? आणि या गुरूंमध्ये शेतकरी, कामगार, शिल्पकार आणि दलित वंचित घटकांची भागीदारी किती आहे? आपल्या शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांचे दरवाजे आपण सर्वांसाठी उघडू शकतो आहोत का? लेखणी आणि पुस्तक प्रत्येक हातात पोहोचवलं आहे का? आपल्या देशातल्या शिक्षण संस्था आजही अभिमान वाटण्यासारख्या राहिल्या आहेत का? या प्रश्नांवर प्रामाणिकपणे चर्चा करणे हे विश्वगुरू होण्याच्या शक्यतेला खरोखर न्याय देणे आहे. दृष्टेपणाच्या प्रामाणिकपणासाठी सत्ता दाखवते तितकेच वास्तव न पाहणे आवश्यक आहे. दडपलं जात असलेलं वास्तव माहीत असणं ही जागरूक नागरिक असण्याची अट आहे. इतिहास बहुतांशी सत्तेच्या बाजूने लिहिला जातो. तो खरंतर परिपूर्ण नसतो. इतिहास लेखनात किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष केले जातं पण इतिहासातील बहिष्कृत भाग आपल्या न सांगितलेल्या भागासह येऊन आढळतो अशी एक वेळ येते.”
      नायजेरीयन लेखक समीक्षक चिनुवा अचेबे यांच्या शब्दात सांगायचं तर, “जोपर्यंत हरीण आपला इतिहास लिहिणार नाही तोपर्यंत हरणांच्या इतिहासात शिकाऱ्याच्या शौर्याचे किस्सेच सांगितले जात राहतील.” ‘प्रोफेसरची डायरी’ मध्ये विद्यापीठ ते शाळा यांमध्ये काम करणाऱ्या असंख्य हंगामी शिक्षकांना रोज सहन करावे लागणारे अनुभव आहेत. या हंगामी शिक्षकांना ॲडव्हॉक प्रोफेसर, गेस्ट टीचर, शिक्षण मित्र, कंत्राटी शिक्षक अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. हे पुस्तक म्हणजे या वेगवेगळ्या नावांची प्रातिनिधिक गोष्ट आहे. त्यांचे काम एकच आहे ‘शिकणं आणि शिकवणं! हा असा व्यवसाय आहे जिथे शिक्षक सोडून सारे काही ‘परमनंट’ आहे. अभ्यासक्रम, विद्यार्थी, लिहिणे वाचन, नोट्स, खडू-डस्टर, मार्कर, बिल्डिंग, परीक्षा कार्यक्रम, कर्तव्ये असं सारं काही परमनंट मात्र त्यांच्या मुळाशी उभा असलेला ‘शिक्षक’ मात्र ‘परमनंट नाही’. आज व्हेंटिलेटरवर असलेल्या आपल्या देशाच्या शिक्षणव्यवस्थेला हंगामी शिक्षकांच्या माध्यमातून ऑक्सिजन दिला जात आहे.
      डॉ. लक्ष्मण यादव आपल्या संघर्षाची कथा अगदी नैसर्गिक भावाने महत्वाच्या तारखेनुसार सांगतात. देशाच्या राजधानीतील एका प्रतिष्ठित केंद्रीय विद्यापीठात जवळपास चौदा वर्षे हंगामी सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. गर्दी होऊन जाणं त्यांच्या काळाची नियती झाली आहे. परंतु त्या गर्दीचा भाग होण्यास नकार देत हे पुस्तक डॉ. लक्ष्मण यादव यांनी वाचकांच्या हातात दिले आहे. त्यांना ही कल्पना आहे की, यानंतर त्यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढतील पण त्यांना ती जोखीम घ्यायची आहे. कारण त्यांचा संबंध आताच्या या पिढीच्या भविष्याशी आहे. बहुसंख्यांक दलित, मागास, आदिवासी आणि वंचित शोषित घटकातील मुलं पहिल्यांदा उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात तेव्हा त्यांना नियोजनबद्ध पद्धतीने उध्वस्त केले जाते. लेखणी आणि पुस्तक यांनी एक सोनेरी भविष्य घडतं, ही उपेक्षित मुलं चांगलं शिक्षण घेतील तेव्हा चांगलं आयुष्य भविष्य स्वतःला व कुटुंबाला देऊ शकतील. शाळा. महाविद्यालये, विद्यापीठे येथे जाऊन हे समजून घेतील तेव्हाच प्रश्न विचारतील, तरच लढतील. त्यामुळेच विद्यापीठाची उंची कमी केली जात आहे जेणेकरून धर्मसत्ता कायम टिकून राहील. विद्यापीठे जर्जर होतील तेव्हाच तरुणांना भावनिक वा धार्मिक संभ्रमात गुंतवून ठेवण्याचे षडयंत्र यशस्वी होईल. नवी विद्यापीठे सुरू करणे काळाची काळजी असायला हवी परंतु मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून नवीन प्रार्थनास्थळे बांधली जात आहेत. शिक्षणावरील आर्थिक बजेट कमी कमी होत आहे. 
      देशातील बहुतांश शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची निम्म्यापेक्षा जास्त पदं रिक्त आहेत. त्यातही राखीव कोट्यातील ९० टक्केपेक्षा जास्त पदांवर परमनंट नियुक्ती झालेल्या नाहीत. तुम्ही तुमच्या गावखेड्याच्या आजूबाजूला सरकारी शाळांची दुरावस्था पाहात असालच, विद्यापीठ आणि पदवी महाविद्यालयांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. मोजकी केंद्रीय विद्यापीठे आणि काही पदवी महाविद्यालये वगळल्यास भारतातील शिक्षणसंस्था आपल्या सर्वात वाईट काळातून जात आहे असे चित्र आहे. इमारती नाहीत, शिक्षक नाहीत केवळ सारं कागदावर आहे असेही अनेक ठिकाणी घडत आहे. कागदावरील इमारती, शिक्षक, शिक्षण आणि वाटल्या जाणाऱ्या पदव्या. शिक्षणाचे क्षेत्र कुटुंब, शाळा, महाविद्यालये ते विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे. शिक्षणक्षेत्राची परिपूर्ण परिस्थिती मांडत असल्याचा दावा ‘प्रोफेसरची डायरी’ हे पुस्तक करत नाही. लेखकाच्या वाट्याला जितकी आली तितकीच वस्तुस्थिती यात आहे. प्रत्येक हंगामी शिक्षकाची गोष्ट अगदी अशीच असेल असं नाही. एखाद्या महिला शिक्षकाची गोष्ट यापेक्षा जास्त त्रासदायक असेल, एखाद्या वंचित-शोषित पहिल्या पिढीतील हंगामी शिक्षकाची स्थिती यापेक्षा जास्त भयानक असू शकेल. देशाची राजधानी दिल्लीमध्ये अनेक अडचणींमध्ये हे पुस्तक लेखकाने लिहिले आहे.
     सध्याच्या काळात बोलण्याची किंमत मोजावी लागते, प्रश्न निर्माण करणाऱ्या जागाच कमजोर कराव्यात असे प्रश्नांना घाबरणाऱ्या सत्तांना वाटतं त्यामुळे शिक्षक घाबरून राहिला पाहिजे असा सत्तांचा प्रयत्न आहे. ‘घाबरलेला शिक्षक त्याच्या वर्गात कणाहीन विद्यार्थी घडवतो आणि त्याचे समाजात गेल्यावर मुर्दाड नागरिकात रूपांतर होतं.’ असे म्हणत लेखक संत कबीरांचा पुढील दोहा उद्रृत करतात, 

‘साधो देखो जग बौरानाI
सांची कहौ तो मारन धावै झुठे जग पतियानाII’
सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपला विश्वास गमावलेल्या राष्ट्रीय मीडियामध्ये आता शिक्षणाची चिंता उरली कुठे? शिक्षणसंस्थांच्या इमारती कोसळल्याची माहिती मिळाल्यावर किंवा पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठीमार केल्याचा आवाज आल्यावर शिक्षणसंस्थांच्या बातम्या येतात. वृत्तपत्र आणि पत्रकारच आपली सद्सद्विवेकबुद्धी वाचवू शकले नाहीत तर ते शिक्षण आणि शिक्षक यांना काय वाचवणार? हे पुस्तक वाचताना दिवस महिने वर्ष क्रमशः मागे जात असल्याचा अनुभव येतो. काही वर्षांच्या गोष्टी महिन्यात, काही महिन्यांच्या गोष्टी काही दिवसात सांगितल्या आहेत. वाचताना वर्ष मागे कशी पडली? हे कळतही नाही पण त्या क्षणी लेखक जे जगत होते ते तसेच रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकात बहुतांश संस्था आणि व्यक्तींची नावे बदलण्यात आली आहे. लेखकास विशिष्ट प्रकारची भीती किंवा भय हे त्याचे कारण नाही तर असं करण्याचा हेतू असा की, एखाद्या वादापेक्षा लोकांचे लक्ष मूळ मुद्द्यांकडे आणि प्रश्नांकडे जावं, ते विचलीत होऊ नये.
आपण सांस्कृतिकच नाही तर साहित्यिक आणि सामाजिक या स्तरांवरही अनेक भेदभाव जगत असतो. कणा ताठ ठेवल्यास वाकताना खूप त्रास होऊ लागतो. कणा ताठ ठेवल्यास स्वतःच्या आणि लवचिक झाल्यास सिस्टीमच्या फायद्याचं असतं. कणा वाईट गोष्ट आहे. यशस्वी होण्याच्या अटी त्याला वाकवतात पण जोपर्यंत तो टिकून राहतो तोपर्यंत धनुष्याच्या प्रत्यंचेसारखा ताणलेला राहतो. लवचिक होतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी फिट होता येते हे अनेक उदा. देऊन लेखक सांगतो.ज्या पायाखाली मान दाबली गेली असेल त्या पायावरून हळुवार हात फिरवणे शहाणपणाचे. अशाचप्रकारे आपल्या मानेवर पडलेल्या पायावर हळुवारपणे हात फिरवायला कंत्राटी लोकांना भाग पाडले जाते. ॲडव्हॉक असिस्टंट प्रोफेसर आपल्या आजूबाजूच्या एखाद्या शक्तिमान प्रोफेसरपासून प्रिन्सिपल, वाईस चान्सलरच्या पायावर हळुवार हात फिरवत असतो. त्या सर्वांचे पाय वजनदार आहेत. वजन म्हणजे काय माहिती आहे ना? असा प्रश्न लेखक करतो.
डॉ. वीरेश्वर राय हे लक्ष्मण यादव यांचे सुपरवायझर नॉर्थ कॅम्पसच्या बिरसा मुंडा कॉलेजमध्ये हिंदी शिकवतात. ते लेखकास म्हणतात कि, ‘खूप मन लावून शिकव. शिक्षक कोणत्याही विविध वनस्पतींमधून ज्ञान आणि विवेक यांचे औषध ओळखण्याची कला शिकवणाऱ्या वैद्यासारखा असतो.’ पीएच.डी. मार्गदर्शक असणारे राय सर लक्ष्मण यांची बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता पाहून प्रभावित आहेत व खूप आशावादीदेखील आहेत. रामबन हा लेखकाचा मित्र मात्र त्याला उलगडलेलं एक वेगळं तत्वज्ञान सांगतो, ‘उच्च शिक्षण आता विषयात्मक किंवा विचारात्मक नाही तर जुगाडात्मक झाले आहे. जुगाडांनी विचारांना हरवले आहे, आता विचारवंत संशोधन संचालक राहिलेले नाहीत आणि अशा संशोधनाचे शैक्षणिक महत्त्वही राहिलेले नाही. विद्यापीठ म्हणजे किराणा मालाची दुकानं झाली आहेत आणि पीएच.डी.च्या डिगऱ्या म्हणजे त्या दुकानातला महागडा व्यवहार.
फ्रेशर्स पार्टी त्यानंतर यादव यांच्या अध्यापनाने प्रभावित झालेली विद्यार्थी, मौलाना आझाद दिल्ली कॉलेज स्टाफरूम अशी सफर लेखक घडवून आणतो. स्टाफ रूममध्ये किती लोक बसलेत? हे पाहून येण्यासाठी प्रिन्सिपल ऑफिसमधून कर्मचाऱ्याला पाठवतात, तो कर्मचारी सांगतो कि, ‘दोन लोक आणि तीन ॲडव्हॉक बसलेत.’ म्हणजे माणसापेक्षा वेगळ्या व्यवस्थेच्या दृष्टीने आम्ही एक संख्या आहोत ही जाणीव यादव यांना होते. डाव्या आणि उजव्या विचारसरणीमध्ये होणारा संघर्ष, द्वंद्व त्यातून मिळणाऱ्या नोकऱ्या याबद्दल लक्ष्मण यादव लिहितात की, “विचारधारेचा रुमाल स्वार्थाला गुंडाळून शक्तीची खुर्ची हवी असलेली व्यक्ती सर्वात आधी तो रुमाल दुसऱ्या रंगाने रंगवते. खुर्चीचा लोभ शैक्षणिक हत्या करतो. परमनंट असिस्टंट प्रोफेसरची प्रत्येक मुलाखत त्या शैक्षणिक हत्यांचा निर्लज्ज समारंभ असतो.’’
हळूहळू रोजगार आणि शिक्षण यांचं नातं तुटू लागलं शिक्षणाचे स्वरूप समाजवादी ते भांडवलवादी होत गेलं. विवेक या आपल्या प्रतिकूल परिस्थितीतून पीएच.डी. संशोधन करणाऱ्या मित्राचे गाईड प्रो.अभिनंदन कुमार फेलोशिपसाठी त्याच्या अर्जावर सही करण्यास टाळाटाळ करतात. अभिनंदन कुमार यांच्या घरी संशोधक विद्यार्थी वेगवेगळे घरगुती कामं करतायेत, त्यांना वस्तू भेटी देत आहेत. त्यावरून प्रा.राय या आपल्या गाईडला लक्ष्मण यादव म्हणतात, “सर, तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्या घरी येऊ का? त्यावर राय सर ओरडून म्हणतात, “वाचन लेखनाचे सगळे काम माझं कॉलेज ते तुमची लायब्ररी इथपर्यंतच असलं पाहिजे. घरी येण्याची काही गरज नाही. घरी येण्याजाण्यामुळे लेखन वाचण्यापेक्षा चापलूसगिरी होते. मी माझ्या कोणत्याही संशोधकाला घरी बोलवत नाही.कणा टिकवून ठेवण्यासाठी संशोधक होणे गरजेचे आहे घरचं होणं नाही.” असे गुरु आता दुर्मिळच!
‘प्रोफेसरची डायरी’ बद्दल प्रसिद्ध लेखक कांचा इल्लैया म्हणतात की, “हे अशा प्रकारचं पहिलं पुस्तक आहे. ही शिक्षकाची तसेच उच्च शिक्षणाची कथा आहे. विद्यापीठ ही ज्ञान आणि धोक्याची एक व्यामिश्र जागा आहे. विद्यापीठ शिकवतं नियंत्रित करतं आणि हेराफेरीही करतं. डॉ. लक्ष्मण यादव यांच्यासारखा प्रामाणिक शिक्षकच ही व्यामिश्र कथा सांगू शकत होता.” तर डॉ.विजेंद्र चौहान लिहितात की, “प्रामाणिकपणे लिहिल्यास प्रत्येक डायरी आपल्या खाजगी गोष्टीबरोबरच आपल्या काळाचा एक दस्ताऐवजही असते. डॉ. लक्ष्मण यांना रघुवीर सहा यांच्या रामदासप्रमाणे जाणीव होती की, त्यांची हत्या होईल आणि ती होते. ही डायरी त्या सत्याला नागडं करते, जे आपल्याला माहित आहे पण ते मान्य करत नाही. हे पुस्तक आपल्या शिक्षण व्यवस्थेची गटारगंगा उघडी पाडतं हे पुस्तक म्हणजे मंडल ते प्राणप्रतिष्ठेपर्यंत कॅम्पसचा इतिहास आहे.”
‘जात नाही ती जात’ हे अधोरेखित करताना डॉ. लक्ष्मण यादव हे रमेश कुमार निर्मोही यांचे उदाहरण देतात. त्यांचे शिक्षणही डीयुतच झालं त्यामुळे ते सर्वांना आणि सर्वजण त्यांना ओळखतात. आपल्या जातीबाबत सजग असलेल्या रमेशच्या कुटुंबियांनी आडनाव काढून त्याच्या नावापुढे कुमार असे लावलं, नंतर रमेश ‘निर्मोही’ हे तकल्लूस लावून घेतलं. कित्येकदा जात लपवून बिघडलेली परिस्थिती सुधारू शकतं हे यादव यांना कळलं कारण रमेशने जात लपवली आणि त्याचं परमनंट काम होऊ शकलं अशीही घटना आहे. जेव्हा कायमस्वरूपी प्राध्यापकाच्या जागेसाठी डॉ. यादव प्रयत्न करत होते त्यावेळी त्यांना अशी अनुभूती आली की, प्रोफेसर होण्यासाठी कित्येकदा पेन, पुस्तक आणि क्षमता यांच्या जोरावर मिळवलेल्या पदव्याही साथ सोडून देतात. वशिला, ओळखी, सत्तेशी संबंध कमी येतात. पण त्यांना आपल्या प्रतिभेवर विश्वास होता. त्यांनी नोकरीसाठी इतर कोणताही मार्ग अवलंबला नाही.
हंगामी प्राध्यापकां’चे ते चार प्रकारात वर्गीकरण करतात. १.संस्कारी २.सहनशील ३.उदासीन आणि ४.बिघडलेला. ‘संस्कारी ॲडव्हॉक’ या व्यवस्थेसाठी सर्वाधिक आदर्श असतात. हे जिकडे वारा तिकडे वाहतात. दुसरे सारं काही सहन करणारे ‘सहनशील ॲडव्हॉक’ असतात. नोकरी मिळाल्यावर कोणतीही किंमत मोजून ते नोकरी टिकवण्याच्या मागे असतात. नेहमी तडजोड करणार आणि कोणत्याही परिस्थितीत गप्प राहून विरघळून जाण्यासाठी तयार म्हणजे त्यांना कॉम्प्रोमाइझिंग ॲडव्हॉक म्हणणे योग्य. तिसरा प्रकार ‘उदासीन ॲडव्हॉक’ म्हणजे नाईलाजाने किंवा टाईमपास म्हणून नोकरी करणारे असतात दुसरं काही नाही जमलं म्हणून ते ॲडव्हॉक होतात. चौथे ॲडव्हॉक ‘बिघडलेले’ म्हणजे सर्वसाधारणपणे क्षमता असलेले पण उपेक्षित. ते कोणालाही आवडत नाहीत. त्यांची संख्या खूप कमी असते. त्यांचं बोलणं आणि लण्याढचा फायदा सर्वांना होतो. त्यामुळे ते सर्वाधिक निशाण्यावर असतात. त्यांच्याकडे कणा आहे म्हणून जीवही आहे अशा व्यवस्थेत ते बिघडणार नाहीत तर काय होईल? असा प्रश्न लेखक उपस्थित करतो. ॲडव्हॉकीजमची ही वर्णव्यवस्था आहे असेही म्हणता येईल. कोणत्याही कॉलेज किंवा विद्यापीठाच्या स्टाफरूममध्ये हंगामी आणि परमनंट प्रोफेसर कोण? कसे ओळखायचे? हेही लेखक सांगतो.
जातधर्म बघून नोकरी देण्याची पद्धत व कुलगुरू मार्कंडेय सरांची हाजी हाजी करून त्याच्या जातीचे किती तरी लोक नोकरीत कायम झाले म्हणून लेखकाचा मित्र लेखकाला सल्ला देतो कि, “मित्रा, तू सुद्धा एखादा यादव प्रोफेसर किंवा एखाद्या आझमगडवाल्याला पकड.” पण लेखक तेही नाकारतो. उच्चशिक्षण विजेत्यांना पदक देणारी व्यवस्था आहे जे मागे राहिले त्यांना पुन्हा कुणी आठवत नाही. हेच इथल्या व्यवस्थेचं खरं रूप आहे. तुम्हाला एखाद्या समाजाला गुलाम बनवायचं असल्यास त्यातील प्रत्येक प्रकारच्या विरोधाच्या शक्यतांना दाबून टाकावं लागतं. संपूर्ण समाजाला प्रत्येक क्षणी असुरक्षिततेने आणि अनिश्चिततेने जगायला लावणे हा विरोध संपवण्याचा मार्ग आहे. अस्तिकांचा तर्क नशीबापर्यंत तर नास्तिकांचा तर्क सिस्टीमपर्यंत जाऊन प्राण सोडतो आहे असे ते म्हणतात. तत्वांशी तडजोड करून जगल्याने माणूस स्वतःच्या नजरेत पडतो.
एखाद्या विद्यापीठ गटात संशोधक हा सर्वसामान्य विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील सर्वात महत्त्वाचा आहे. संशोधकांचे ते चार प्रकार सांगतात. ते म्हणजे चरम, परम, नरम, आणि गरम. चरम संशोधक म्हणजे संशोधनाला प्रवेश घेण्यापूर्वीच ॲडव्हॉक होणे ज्याच्या आयुष्याचा उद्देश असतो. परम संशोधकांची सगळी लक्षणे चरम संशोधकाचीच असतात पण हे चापलुसीबरोबरच लेखन-वाचन देखील करतात. नरम जास्त प्रमाणात पेन-पुस्तकाशी संबंध असणारे संशोधक असतात, आपल्या करिअर बाबत थोडे सजग असतात. गरम हा चौथा संशोधनाचा प्रकार नावाप्रमाणेच गरम. हा संशोधक शिक्षणात संशोधन करते. यात बहुतांशी सुशिक्षित तरुण असतात जे आपला कणा ताठ ठेवतात. सजग नागरिक, फटकळ असतात. उच्च शिक्षणाला मूडद्यांचा कब्रस्तान होण्यापासून वाचवणारे असतात.
‘प्रोफेसरची डायरी’ या आत्मकथनामध्ये ‘डुटा’ ही प्राध्यापकांची बलशाली व्यावसायिक युनियन आहे तिच्या निमित्ताने उत्तरार्धातील सर्व घटनाक्रम घडतो. ‘डुटा’सोबत जुळल्यानंतर लेखकातील नेतृत्वगुणाची त्याला जाणीव झाली. त्याच्यातील एक अभ्यासू, चिंतनशील व प्रभावी वक्तृत्व शैलीचा कार्यकर्ता जन्माला येऊ लागला. सरकारच्या विविध अन्यायकारी धोरणांबाबत शिक्षक-विद्यार्थी आंदोलन सुरू झालं. लक्ष्मण यादव हे जरी हंगामी प्राध्यापक होते तरीही विद्यार्थ्यांप्रती पूर्ण समर्पित शिक्षक होते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी योग्य प्रगतीमार्गावर चालायला शिकवले त्यांची कारकीर्द घडविली. ‘कष्ट सुरूच ठेवा, कष्ट कधीही वाया जाणार नाही. मेहनत आणि प्रामाणिकपणा कधीही अयशस्वी होत नाही.” असे ते विद्यार्थ्यांना सांगत. आपला समाज लेखणी आणि पुस्तकाला कुदळ फावड्यापेक्षा श्रेष्ठ मानतो त्यामुळे फालतू माणसंही लेखणी-पुस्तकाच्या नावावर प्रतिष्ठा मिळवतात तर कष्टकरी सर्वसामान्य लोकांना आणि त्यांनी केलेला कष्टांना त्यांचा हक्क असू नये? असा खडा सवाल ते करतात?
हत्तीवर बसून आलेले दिल्ली विद्यापीठाचे तत्कालीन कुलगगुरु व अधिकारी स्तरावरील लोकांनी ‘डुटा’ वर बंदी यावी अशी भूमिका घेतली होती. सर्व विद्यापीठांमध्ये शिक्षक संघटन संपवण्यात आले किंवा अर्थहीन करण्यात आलेले दिसते. दहा हजारांच्या आसपास असणाऱ्या शिक्षकांचा आवाज मानली जाणारी ‘डुटा’. लक्ष्मण यादव यांचे वडील समाजवादी कॉम्रेड होते. आजमगडसारख्या कमी संसाधन असलेल्या छोट्या जिल्ह्यात ते काम करायचे. लेखकाला ते कित्येकदा शेतकऱ्यांच्या आंदोलनात घेऊन जायचे. प्रागतिक विचारवंतांविषयी सांगायचे. तो संस्कार डॉ.लक्ष्मण यादव यांच्यावर होताच.
रोज वर्ग घेणारे, नोट्स तयार करून शिकवायला जाणारे, सुट्टी तर कधीच न घेणारे, विभागाच्या, कॉलेजच्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडणारे डॉ.लक्ष्मण यादव यांचे संशोधन लेख प्रकाशित झाले होते. एक पुस्तकही आलं होतं. कायमस्वरूपी होण्यासाठी जे काही निकष लागतात त्याहीपेक्षा अधिक चांगले काम त्यांचे होते. पण कायमस्वरूपी होण्यासाठी खूप ताणतणाव होते. अशा प्रसंगी त्यांचे बाबा फोनवर म्हणाले, “कोणाच्याही दबावाखाली कधीही दबून जाऊ नकोस. बेटा नोकरी आहे आयुष्य थोडंच आहे. विवेक अन सन्मान यापेक्षा काही मोठे नाही.” त्यांचे काका कबीरपंथी सद्गुरू शिष्य ते म्हणाले, “जे होईल ते चांगलं होईल फक्त तुझं काम करत राहा. जिवंत विवेक, आत्मसन्मान महत्वाचा.” त्यामुळे लेखकाने ठरवून टाकले कि, “कुणाचे दैवत ठरलो नाही तरी चालेल पण आणि कुणासमोर झुकणार नाही.स्वतःच्या बळावर आजपर्यंतचा प्रवास केला आहे आणि असाच पुढेही चालत राहील.” ते अनेक प्राध्यापक आंदोलनांमध्ये सहभागी होऊ लागले.त्यांनी विरोधाला आयुष्याचा एक भाग केलं आणि स्वतःची ताकद ओळखली. लिहिणं-वाचणं आणि बोलणं यांना स्वतःचे चिंतन असते. त्यामुळे विवेक आणि जीभ यात तडजोड करणार नाही हे त्यांनी ठरवून टाकले. काही दिवसांनी त्यांचे वडील गेले.
रोहित वेमुलाच्या संस्थात्मक हत्येमुळे देशव्यापी आंदोलन झाले. आजपर्यंत या देशातील कॅम्पस लोकशाहीकरण झालेलं नाही हे यावरून लक्षात येत होतं. रोहित वेमुलाच्या हत्येनंतर जी श्रद्धांजली सभा झाली त्यात पहिल्यांदा डॉ.लक्ष्मण यादव यांनी जाहीरपणे भाषण केले. संवेदनशील व भावपूर्ण असे पत्र रोहितला उद्देशून लिहिले. बाबू खदरेन कॉलेजसारखी बोगस महाविद्यालये, तेथील प्राध्यापकांची कैफियत, व्यथा ऐकून लक्ष्मण यादव यांना धक्काच बसला. त्यान वाटत होते कि, आम्ही सर्वाधिक अन्यायाचे बळी आहोत पण उच्चशिक्षणाचा खरा खेळ तर छोटे जिल्हे आणि गावांमध्ये सुरू आहे. अगणित पात्र तरुण स्वतःला गहाण ठेवून या देशाचे भविष्य लिहीत आहेत. एक नेता, एक कंत्राटदार किंवा शिक्षण माफिया यांनी पाळलेले गुंड या देशाला विश्वगुरू करताय. हाच आहे आजचा विश्वगुरु असे लेखक म्हणतो.अभिज्ञान या ॲडव्हॉक प्रोफेसरच्या लग्नाची गोष्टही ते सांगतात. लास्ट वर्किंग डेला ॲडव्हॉकला रजा मिळत नाही,त्याच दिवशी त्याचे लग्न मग सर्व तास घेऊन दिल्लीहून रात्री आठला लखनौला पोहचून तो एकदम बोहल्यावारच उभा राहिला. ॲडव्हॉकची अशीही एक फरफट इथे मांडली आहे.
यूजीसी ने थर्ड अमेडमेंटची अधिसूचना प्रसिद्ध केली आणि त्यात दररोज अध्यापन तास वाढवणे, सर्व कॉलेजमध्ये बायोमेट्रिक अटेंडन्स असेल, शिक्षकाला कॉलेजात किमान पाच तास उपस्थित राहावेच लागेल हे सगळं त्यात होतं. प्रोफेसर यशपाल समितीने उच्च शिक्षणाला स्वातंत्र्य देण्याचा आग्रह धरला होता आणि दुसरीकडे शिक्षकांना ऑफिस कर्मचारी करण्यात येत आहे या विरोधात डुटाने लढायची सुरुवात केली. दिल्ली विद्यापीठ संघाने पुन्हा कंबर कसली. महाराजा सोहेलदेव कॉलेजमध्ये इतिहासाचे असो.प्रोफेसर रुपेंद्र चौधरी यांच्याशी लक्ष्मण यादव यांचे एक वैचारिक घट्ट नाते तयार झाले. सरकारच्या धोरणांबाबत नेहमीच त्यांच्याशी यादव यांचा संवाद व्हायचा. “या सगळ्यांना मिळून आता उच्चशिक्षणाला किराणा मालाचे दुकान करायचे आहे. हे तेच करतायेत. खरं तर उच्चशिक्षणाला आता खुल्या बाजारात नफा कमवणारा कारखाना करण्याची संधी मिळालेली आहे. आधीच्या सरकारने जे काम हळूहळू करायला सुरुवात केली होती तेच आताचे सरकार करत आहे. यामध्ये परकीय गुंतवणूक लागू करण्यासाठी सरकारने डब्ल्यू.टी.ओ.च्या सोबत करार केले. सगळे त्या दिशेने चालले आहे जेणेकरून शिक्षण एक बिझनेस होईल आणि भांडवलदार त्यातून मोठ्या प्रमाणात नफा कमावतील” असे रुपेंद्र सर यांचे मत होते. त्यांचे स्पष्ट बोलणं, वचनबद्धता आणि आंदोलनांमध्ये जनवादी घोषणांसाठी ते प्रसिद्ध होते.
३१ मे २०१६ रोजी मंडी हाऊस ते संसद मार्गावर सरकारच्या परिपत्रकाविरोधात डुटाची रॅली निघाली. यादव यांच्या महाविद्यालयातूनही आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढू लागली आणि अशा कोणत्याही आंदोलन, सामाजिक चळवळीत आपलं हित असूनही सहभागी न होणारे कातडी बचाव, स्वार्थी आणि मतलबी शिक्षक असतातच. ते अशावेळी म्हणतात की, ‘मी एक शिक्षक आहे. वर्ग घेणे हा माझा धर्म आहे. मला कोणतेही राजकारण करायचं नाही व त्यात सामील व्हायचे नाही.’ हे साक्षर खरे तर केवळ पोटार्थी असतात, त्यांना मत भूमिका नसते. ज्याला ते राजकारण म्हणतात ते खरे तर एक सजग नागरिकत्वाचे लक्षण असते. डॉ.लक्ष्मण यादव स्वतःला ‘बिघडलेले ॲडव्हॉक’ या कॅटेगिरी मध्ये मानतात. तिथे गेल्यानंतर यादव यांना समजते कि, कोणत्याही हंगामी कर्मचाऱ्याला स्वतःचा विचार नसतो आणि त्यांची कोणतीही संघटना नसते. ज्यांचे सरकार असतं ते त्यांच्याबरोबर असतात. ऋतूप्रमाणे बदलायचं फक्त. अर्थात ही गोष्ट बहुतांश प्रोफेसरांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनाही तितकीच लागू पडते. ३१ मे २०१६ रोजीची रॅली मात्र या गोष्टीला आव्हान देण्याचा प्रयत्न होता.
नोकरीत कायम करताना प्रांतवादाचा नंबर जातिवादानंतर येतो हे सांगताना लेखकास त्याचा लहानपणाचा मित्र राजू जो दलित वस्ती (चमकोटी) मध्ये राहायचा तो आठवतो. सुंदर अक्षर, खेळत अव्वल असणाऱ्या राजूच्या झोपडीत डॉ.आंबेडकरांची प्रतिमा आणि एका कोपऱ्यात दोन चार पुस्तके असायची. त्याने कित्येक वेळा गावच्या क्रिकेट टीमला जिंकून दिले पण मुख्य प्रवाहाने त्याला कधीच स्वीकारले नाही. दिल्ली विद्यापीठाच्या एका कॉलेजमधल्या संगीत विभागात काम करणारा ॲडव्हॉक मानसिक तणावाखाली आला व हृदय गती थांबल्याने त्यांचे निधन झालं. त्याचवेळी रोहित वेमुलाच्या संस्थात्मक हत्येस सुद्धा एक वर्ष पूर्ण झाले होते.
यादव यांच्या ॲडव्हॉक मैत्रिणीला प्रसूतीसाठी रजा न मिळाल्याने तिला अनिच्छेने नोकरी सोडावी लागते. ॲडव्होकिझमच्या सिस्टीमने आज तरुणांच्या स्वप्नांची केवळ चेष्टा केली आहे असे लेखक म्हणतो. त्यातही या सिस्टीममध्ये तुम्ही जर वंचित घटकातले असाल तर एकाचवेळी कितीतरी प्रकारचे शोषण एका वेळी सहन करावे लागते. हंगामी महिला शिक्षिका किंवा कुमारिकांना परमनंट कायमस्वरूपी करण्यासाठी त्यांचे टी.आय.सी. शारीरिक मानसिक शोषण करतात त्याचं उदाहरण सुद्धा विमला नावाच्या ॲडव्हॉक मैत्रिणीच्या निमित्ताने लक्ष्मण यादव यांनी दिले आहे. “उद्या मुलाखत आहे. आज रात्री माझ्या घरी ये. परमनंट होशील. नोकरी नक्की समज” अशी ऑफर तिचे टीआयसी तिला देतात. हे ऐकून तर ती संवेदनशील मुलगी नैराश्यात गेली आणि तिने शिक्षणक्षेत्रास कायमचा निरोप दिला. अशा पद्धतीने एका कर्तबगार आणि तळमळीच्या प्राध्यापिकेचा टीआयसी कडू बळी घेण्यात आला. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मुली अव्वल असतात. मुलांपेक्षा मुली जास्त संख्येने उत्तीर्ण होतात पण १२ वी नंतर त्या मुली कुठे गायब होतात? ह्या प्रश्नाचे उत्तर जणू इथे मिळते.
डीयूच्या कॅम्पसमध्ये आधी खूप कार्यक्रम व्हायचे पण २०१२ नंतर अनेक साहित्यिक, सामजिक, सांस्कृतिक कार्यक्रम बंद करण्यात आले होते. एक विद्यापीठ सेमिनार आणि परिषदा याशिवाय कसं जगू शकतं? हा प्रश्न लेखकास पडतो. ‘डुटा’ या शिक्षक संघटनेमध्ये ॲडव्हॉकपासून परमनंट, पेन्शनपर्यंतचे मुद्दे एकमेकात गुंतलेले होते. ऑगस्ट २०१७ सालच्या डायरीमधील पानावर लेखक लिहितो कि, “उच्च शिक्षणाचं सुवर्णयुग कधीही नव्हतं. पेन आणि पुस्तकं स्वतंत्र राहिली पण कधी राजदरबारांनी तर कधी सत्तेने त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न केला. देशभरात उच्चशिक्षण सर्वात वाईट काळातून जातंय. कोणत्याही एका सरकारने त्याला या वाईट काळात ढकललेलं नाही, या उध्वस्त होण्यात सर्वांचा हात आहे. कोणाचा कमी तर कोणाचा जास्त. स्वतंत्र भारतात चांगली विद्यापीठे निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं गेलं पण आता ती विद्यापीठे आतून खचत आहेत.”
काशी हिंदू विद्यापीठातील मुलींनी कॅम्पसमध्ये होत असलेला भेदभाव, होस्टेल टाईमच्या पिंजऱ्याविरोधात, दररोज होणाऱ्या छेडछाडीविरोधात आंदोलन करत मेन गेट अडवून धरलं. यातल्या बहुतांश मुली आपल्या आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या आंदोलन निदर्शनात सहभागी होत होत्या आणि गाणं म्हणत होत्या की,
“तेरे कांधे पे आचल बहुत खूब है लेकिन,
तुम इस आंचल को परचम बनाले की तो अच्छा होता!”
त्या मुलींवर बेदम लाठीमार झाला. त्यातल्या बऱ्याचजणी जखमी झाल्या. अलाहाबादमध्ये मुलींनी केलेल्या अशाच आंदोलनाची आठवण यावेळी लक्ष्मण यादव यांना होते. एका शहराला एक विद्यापीठ घडवतं आणि एक विद्यापीठ आपले शहर आणि समाज बदलतो. तसेच काही वारे इथे वाहत असल्याचे यादव यांना वाटते.
दिल्ली विद्यापीठात सभा-परिषदा अलीकडे बंद झाल्या होत्या केवळ सत्ता प्रायोजित कार्यक्रम होत. धर्म, मंदिर आणि हिंदुत्व यावर कार्यक्रम होत. अशा वातावरणात सर्व प्रोफेसर आणि संशोधक मिळून जनवादी आयोजन करावं असे ठरते. त्यात साहित्य, समाज, राजकारणाशी संबंधित विषय असावेत. दोन-तीन वक्ते असावेत, गटचर्चा व्हाव्यात असे निश्चित होते. यादव व त्यांचे सहकारी यांची ह्या कामासाठी एक टीम तयार होते.स्वप्नातील विद्यापीठ घडताना दिसत नसल्याने यादव यांच्यासह काही लोकांनी मिळून भागीदारीने ते घडवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. ह्या स्टडी सर्कलमध्ये कबीर, फुले, मागासांचे प्रश्न, फुलनदेवी, रामशंकर यादव विद्रोही यांच्यापासून अनेक साहित्यिक सांस्कृतिक प्रश्नांबाबत उत्तम चर्चा होऊ लागली. एकावेळी १५० लोक सहभागी झाले. या उपक्रमामुळे कॅम्पसमधला रितेपणा भरला जाईल अशी लेखक व मित्रांना आशा वाटू लागली.
ऑनलाईन आरटीआय दाखल करून देशभरातल्या विद्यापीठांमध्ये किती एस.टी., एस.सी. ओबीसी प्रोफेसर? किती कुलगुरू? आणि किती कर्मचारी आहेत? ही माहिती लेखक मागवतो. त्यातून समजते कि, देशातील ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये एकही ओबीसी प्रोफेसर नाही. एस.सी., एस.टी.नाममात्र आहेत. म्हणजेच स्वातंत्र्याच्या सहा-सात दशकांनंतरही विद्यापीठाचे कॅम्पस ‘सर्वांचे’ कॅम्पस होऊ शकले नाही ही गोष्ट लेखकास अस्वस्थ करू लागते. या विषयावर लेख लिहिणं, आरटीआयमधून आकडेवारी मिळवणं, लोकांना जागृत करणे इ.आता त्यांच्या सामान्य सजगतेचा भाग होतो. त्यासाठी त्यांनी हाती लेखणी घेतली. न्याय आणि हक्क यासाठीची लढाई त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी धोका ठरेल आणि आगामी काळात लेखकास त्याची किंमत मोजावी लागेल याची त्याला अजिबात कल्पना नव्हती.
त्यानंतर उच्च शिक्षणात धक्कादायक निर्णय म्हणजे २०० पॉईंटच्या जागी १३ पॉईंट रोस्टर लागू करण्यात आलं. हा सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सर्वात क्रूर निर्णय. त्याचा परिणाम म्हणजे देशभरात विद्यापीठातील वंचित शोषित जमातींसाठी प्रोफेसर होण्याची संधी जवळपास संपणे असा होतो. आता प्रोफेसरांच्या आरक्षित वर्गातील पदं नगण्य होणार अशा चर्चा सुरु झाल्या. हा खूप अडचणीचा विषय आहे आणि त्यावर प्रोफेसर मिलिंद बाबू या तज्ञ प्राध्यापकाशी यादव यांच्या चर्चा होऊ लागल्या. त्यांनी रोस्टर बिंदू नामावली समजून घेतली. त्याबाबत आता ते विविध मंचांवर लिहू बोलू लागले. डुटाच्या ऑफिसमध्ये बहुजन घटकाच्या शिक्षकाची बैठक झाली. रोस्टरच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरावं लागेल अशी योजना ठरली. सर्वोच्च न्यायालयाच्या आडून हे जातीवादी पाऊल टाकण्यात आले. या मुद्द्यावर लोकांच्या आक्रोशाला दिशा द्यावी लागेल. हा सामाजिक अन्याय होऊ द्यायचा नाही असं लोकांनी ठरवलं. आंदोलनाची तयारी झाली. लेखकाने स्वतः रोस्टरच्या अडचणी आणि बारकावे समजून घेत ते सोप्या भाषेत समजावण्याची भूमिका निवडली. डझनावारी लेख लिहिले. आकडेवारी मिळवली, ग्राफिकचा चार्ट केला. डीयू आणि जेएनयुच्या काही मित्रांनी हे काम आणखी छान पद्धतीने केलं आणि सातत्याने बैठका घेतल्या. यूआरडीएफच्या सहकाऱ्यांनी बिरसा फुले , आंबेडकर, पेरियार, भगतसिंह यांचे विचार जोडून एक पाया रचला. हे आंदोलन अगणित लोकांचं आंदोलन होऊ लागलं आणि त्यानंतर शासनविरोधात बोलणाऱ्यांना बाहेर काढून फेकतील असे काही लोक यादव यांना बोलू लागले.
आवडत्या डीयूमध्येच नोकरी करायची म्हणून भागलपूर येथे तिलका मांझी विद्यापीठात मिळालेली नोकरी ते नाकारतात. त्यांना असे वाटत होते कि, डीयू मध्ये शिकवायला लागून आपल्याला दहा वर्ष झालेली आहेत. असं शैक्षणिक वातावरण दुसरीकडे नाही. कॉलेज चांगले आहे व आपले मेरीटदेखील. त्यामुळे कायम करताना आपल्यावर अन्याय होणार नाही.पण उच्च शिक्षणाला ज्या हाताने धरले हे हात कोणाचे आहेत? हे समजायला उशीर झाल्याचे यादव म्हणतात. रोस्टर आंदोलनात ‘इन्कलाब जिंदाबाद’ या घोषणेबरोबरच ‘जय जय जय जय भीम’ ही डुटामध्ये पूर्वी कधीही न ऐकलेली घोषणा यादव यांनी प्रथमतःच ऐकली. सवर्ण नेतृत्ववाले सर्व शिक्षक संघटनांचे मोठमोठे शिक्षक नेते पहिल्यांदाच ‘जयभीम’ च्या घोषणा देत होते. आंदोलन व्यापक झाले. स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर संविधान कागदावरून जमिनीवर किती उतरू शकले? याची हे आंदोलन म्हणजे लिटमस टेस्ट होती असे यादव म्हणतात. २९ जानेवारी २०१९ ला रोस्टरबाबत केंद्र सरकारची याचिका कोर्टात तिसऱ्यांदा फेटाळण्यात येते तोपर्यंत रोस्टर आंदोलन गावोगावी पोहोचू लागले होते. रोस्टर आंदोलनाचा लोकांचा ऐतिहासिक मोर्चा जंतर-मंतरवर पोहोचला. भारत बंदचे आवाहन करण्यात आले. एका विद्यापीठाच्या कॅम्पसमधून सुरू झालेल्या लढाईच्या हिशोबाने मागच्या दशकातली ही भारतातली सर्वात मोठी घटना होती. रोस्टर आंदोलन गावखेड्यात पोहोचलं. शासनावरही दबाव आला व नवीन अध्यादेश काढू असे शासनाने सांगितलं.
त्याच काळात हजारो ॲडव्हॉक शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकल्यामुळे डीयू कुलगुरूंच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आलं. हजारोच्या संख्येने शिक्षक-विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.हजारो लोकांच्या मोर्चाने कुलगुरू कार्यालयाकडे कूच केले. गेटवर कंत्राटी प्रोफेसर आंदोलन रोखण्यासाठी कंत्राटी सिक्युरिटी गार्ड उभे होते. दोन्ही कंत्राटी गटांमध्ये मग संघर्ष सुरू झाला. देशाच्या विद्यापीठांना सत्तेचा अड्डा बनवण्यापासून रोखणारे त्या नावाखाली सत्ता करू लागले आहेत असे चित्र होते. प्रत्येक बजेटमध्ये शिक्षणावर होणारी आर्थिक तजवीज कमी कमी होत चाललेली दिसते. त्याचकाळात जामिया मिलीया विद्यापीठात दिल्ली पोलिसांनी लायब्ररीमध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांवर लाठीचार केला. सर्वत्र प्रतिकूलता निर्माण झाली. या सर्व आंदोलनात डॉ.लक्ष्मण यादव हा कार्यकर्ता अधिकाऱ्यांच्या डोळ्यात आला. अनेक मुलाखतीत केवळ आडनाव ‘यादव’ असल्यामुळे अनेक यादवांना मेरीट असूनही नाकारले जाऊ लागले. कुणी आपले फेसबुक खाते डिलीट करून मुलाखती देत, ज्यांचा लक्ष्मण यादव यांचेसमवेत फोटो दिसेल त्यांना नोकरी नाकारली जाई. असे वातावरण तयार झाले.
काही दिवसांनी डीयुच्या मुलाखती झाल्या. डॉ.लक्ष्मण यादव वगळता ज्यांची खात्री होती ते सर्वजण कायमस्वरूपी झाले. स्वप्न पाहिलेल्या तरुणांसाठी देशभरातली विद्यापीठं म्हणजे कब्रस्तान झाले आहे असे लेखक म्हणतो. पीएच.डी.ची ऍडमिशनही आधीच फिक्स होताना दिसते. डुटाही बदलली. डीयूच्या कुठल्याच कॉलेजवर मुस्लिम प्रिन्सिपल उरला नाही. त्याचवेळी एक विचित्र घटना समोर आली. मानसशास्त्र विभागाच्या डॉ.नीतू सिंह या एका दलित कुटुंबातल्या प्राध्यापिकेला जातीवादी शक्तींनी कट करून निलंबित केले. आजहि ती संविधान हातात घेऊन ह्या कोडग्या व्यवस्थेशी लढते आहे.
डीयुच्या लखीमल कॉलेजमध्ये निवड होऊनही अनामिक दबावामुळे शेवटच्या क्षणाला यादव यांचे नाव निवडयादीतून वगळण्यात आले. त्यानंतर २० नोव्हेंबर २०२३ रोजी आपल्या महाविद्यालयाकडून लक्ष्मण यादव यांना हिंदी विभागाचा एक मेल आला. परंतु त्यांच्याविरुद्ध त्यांच्याच एक वेळच्या सहकारी लोकांनी खूप नकारात्मक वातावरण करून ठेवले असल्याने ते कायमस्वरूपी होऊ शकले नाही. तेव्हा केवळ वैचारिक विरोध असणे हा अपराध असू शकतो का? असा प्रश्न लेखकास पडला. ‘हा अहंकारी, संघविरोधी, डावा आहे, नंतर कंट्रोलमध्ये राहणार नाही ,त्रास देईल अशा चर्चा त्यांच्याबाबत हितशत्रूंनी सुरु केल्या व व्हायचे तेच झाले. ‘पक्षाकडून त्याचं झाड काढून घेता कामा नये’ पण नियतीला हेच मान्य होतं. कायमस्वरूपी भरतीसाठी सम्राटाच्या सरदारांनी लक्ष्मण यादव यांची मुलाखत घेताना तुलसीच्या शोधासंदर्भात शेवटी एक प्रश्न ‘ताडना’बाबत विचारला. या प्रश्नाचे खोल राजकीय अर्थ होते हे समजून घेऊन लक्ष्मण यादव यांनी संतुलित दिले. उत्तर देताना कमिटीवरच्या लोकांचे डोळे ते वाचत होते. ३ डिसेंबर २०२३ रोजी हिंदी डिपार्टमेंटचा निकाल जाहीर झाला. त्यात त्यांची निवड झालेली नव्हती. त्यांनी कुणाच्या पाया पडल्या नव्हत्या वा कुणाचा ओळख सांगितली नव्हती. त्यांचं काळीज धडधडलं. दुर्बल व्हायचं नाही. खूप दिवसांपासून स्वतःला सक्षम केलं होतं आणि ही वेळ आपल्यावर कधीतरी येईल अशी त्यांना कल्पनादेखील होती. १४ वर्षा ज्या कॉलेजला दिली ते कॉलेज त्यांच्याकडून खेचून घेण्यात आले होते.
२१ वर्षांच्या एका नवख्या व्यक्तीला ज्या कॉलेजने घडवलं त्याच कॉलेजमधून बाहेर काढण्यात आले. कारण सांगण्याचा काही नियम नाही आणि गरजही नाही. व्यवस्थेला घाबरून त्यांच्या सहकाऱ्यांनीही त्यांना साथ दिली नाही. त्यांची आई म्हणते “जास्त बोलत जाऊ नको म्हणाले होते. असो,चिंता करू नको सगळं काही चांगलं होईल” काका म्हणतात, “तू ही लढाई लढतो आहेस त्यासाठी ही कुर्बानी खूप छोटी आहे. तू बरोबर आहेस, तुझा संघर्ष बरोबर आहे. अन्याय करणाऱ्यांच्या जन्माचा अंत एक ना एक दिवस नक्कीच येईल. अजिबात काळजी करू नको. आम्ही आहोत ना!” यादव कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर अनेकांचे सांत्वनपर हजारो फोन आले, हजारो लोकांनी सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ लिहिलं. शेकडो ठिकाणी आंदोलने झाली. राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलं. प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासोबत आहोत हि खात्री लोक त्यांना देत होते. त्यावर लक्ष्मण यादव आपली माझी चूक मान्य करताना म्हणतात की,
“मेरे लहजे मे जी हुजूर न था
और मेरा कोई कसूर न था!”
आता या मुद्द्याला वैयक्तिक लढाई करण्यापेक्षा उध्वस्त होत असलेल्या उच्चशिक्षणाशी जोडून त्यांनी आपला संघर्ष राजकीय पटलावरून पुढे सुरू केला आहे. अन्याय होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी त्यांचा आवाज पोहोचतो आहे. त्यासाठी ‘प्रोफेसरची डायरी’ हे आत्मकथन प्रभावी ठरते आहे. हे आत्मकथन सारे प्रसंग-घटना आपल्यासमोर उभे करते. लोकशाहीवर आलेले, मुलभूत अधिकारांवर आलेले सावट अधोरेखित करते.
लक्ष्मण यादव यांच्या लेखनात, तर्कसंगतता, निर्भयता, विद्रोह आहे तद्वत काव्यात्म शैलीही दिसून येते. अखेर संवेदनशील माणसेच तर बदलाची लढाई लढू शकतात. त्यांनी नाविन्यपूर्ण उपमा, प्रतीकं, प्रतिमा वापरल्या आहेत. काही प्रातिनिधिक उदा. एखाद्या नाराज नातेवाईकासारखं नाराज ऊन त्या खोलीत यायचं नाही./आई माझ्याबरोबरच तर आहे प्रत्येक क्षणी. रोज कणिक मळताना, भाजीत मीठ हळद घालताना, जेवताना./झाड काढून घेतलं आणि पक्षी उडून गेला./एक भयभीत शिक्षक आपल्या वर्गात कणाहीन विद्यार्थी घडवतो./ज्या खोल्या घरमालकासाठी भाडं मिळविण्याचं साधन होत्या त्याच भिंती.-दरवाजांनी आमच्यासारख्यांच्या सर्वात सुंदर आठवणी साठवल्या होत्या. शक्य असतं तर प्रत्येक विद्यार्थ्याने यशस्वी झाल्यावर त्या भाड्याच्या खोल्या विकत घेतल्या असत्या. अयशस्वी तरुणांकडे तर असे शौकही नसतात आणि स्वप्नही नसतात./प्रोफेसर होण्यासाठी कित्येकदा पेन पुस्तक आणि क्षमता यांच्या जोरावर मिळविलेल्या पदव्याही साथ सोडून देतात./ मूल्य आणि व्यवहार परिस्थितीनुसार बदलण्यात तरबेज असलेल्यांना ‘हुशार’ म्हणतात./ माणसापेक्षा वेगळ्या व्यवस्थेच्या दृष्टीनं आम्ही एक संख्या आहोत./कोणत्याही विविध वनस्पतीमधून ज्ञान आणि विवेक यांचे औषध ओळखण्याची कला शिकविणाऱ्या वैद्यासारखा असतो शिक्षक./जुगाडांनी विचारांना हरवलं आहे./प्रोफेसरची प्रत्येक मुलाखत त्या शैक्षणिक हत्यांचा निर्लज्ज समारंभ असतो./उच्चशिक्षण विजेत्यांना पदक देणारी व्यवस्था आहे, जे मागे राहिले त्यांना कोणी विचारत नाही./आरशात त्याच व्यक्तीचं प्रतिबिंब दिसतं जी त्या आरशासमोर उभी असते. सर्व चेहऱ्यांवरची दु:ख दाखवणारे आरसेच मिळत नाही. इ. एकूणच ‘प्रोफेसरची डायरी’ हे पुस्तक म्हणजे सांप्रत काळातील एक मह्त्वाचा दस्तऐवज आहे.
(आज १५ सप्टेंबर २०२४ रोजी दैनिक गावकरी आस्वाद पुरवणीतील साप्ताहिक सदरात प्रसिद्ध झालेले पुस्तक परीक्षण
आत्मकथन-प्रोफेसरची डायरी
लेखक- डॉ.लक्ष्मण यादव
मराठी अनुवाद- चिन्मय पाटणकर
प्रकाशन-मधुश्री प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष- २०२४
एकूण पृष्ठ-१७२
मूल्य- रु.२५० )

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!