मी कोण आहे ?
त्या पिंपळवृक्षाच्या घनदाट सावलीत
तथागत बुद्ध क्लांतपणे पहुडले होते
आपली अंतिम घटिका जवळ आलीय
हे त्यांनी अंतर्ज्ञानानेच जाणले होते
सभोवती शोकाकूल भन्तेगण
बुद्धांच्या मुखातून कष्टाने उमटणारे
अंतिम ज्ञानकण कानात प्राण आणून
ऐकण्यासाठी अनावर जमले होते
शिष्योत्तम आनंद शोक आवरुन पुढे झाला
आणि अवघडल्या संकोचाने त्याने विचारले
“हे तथागता,
आता एक शेवटचाच प्रश्न !
ज्याचे उत्तर तुम्ही आयुष्यभर दिलेले नाहीय
त्यामुळे आता यापुढे काही विपरीत घडले
तर त्यानंतर आमच्यासाठी तो प्रश्न
कायमचा अनुत्तरित राहून जाईल
म्हणूनच आत्ता विचारण्याचे धाडस करतो आहे
भगवन् , आम्हाला सांगा —
या जगात परमेश्वर आहे की नाही ?”
बुध्दांचा तेजोमय चेहरा क्षणमात्र झाकोळला
विशाल नेत्र मिटून ते स्तब्ध झाले
आणि मग ओठांतल्या ओठांतच पुटपुटले ,
“भन्ते आनंद ,
उद्या मी नसलो तर उत्तर कसे मिळणार
या आशंकेच्या मुळाशी कोणता प्रश्न असावा
या शंकेने मी क्षणकाल ग्रस्त झालो होतो
तथापि , तो तुझ्या मुखातून ऐकल्यानंतर
माझा संपूर्ण धम्मउपदेश , चार आर्यसत्य
इत्यादी सारे वाया तर गेले नाही ना ,
या कुशंकेने माझ्या मनाला ज्या वेदना झाल्या
त्या अंतिम क्षणाच्या वेदनेपेक्षा जीवघेण्या आहेत
आनंदा , मी तुलाच एक प्रश्न विचारतो
मला सांग , जर जन्मत: तुला
एका दारेखिडक्याविहिन बंदिस्त दालनातच
आयुष्यभर रहाण्याची सक्ती केली असती
आणि देहाच्या पालनपोषणा व्यतिरीक्त
कसल्याही संस्कारांपासून वंचित ठेवले असते
आई, वडील, बंधू, भगिनी, गुरु, देव, धर्म
यासारखे शब्दही कानावर पडू दिले नसते
तर ‘परमेश्वर आहे की नाही’
असा प्रश्न तुला पडला असता का ?”
आता आनंद विचारात पडला
क्षणभराने म्हणाला , “नाही भगवन्
जर मला आई, वडील, बंधू, भगिनी
या संकल्पना कळल्याच नसत्या
तर ‘परमेश्वर आहे की नाही’
हा प्रश्नही माझ्या मनात उमटला नसता !”
यावर बुध्दाने विचारले की ,
“मग त्या अवस्थेत कोणता प्रश्न पडला असता ?”
आनंद अभावितपणे उद्गारला ,
त्या अवस्थेत एकच प्रश्न पडू शकतो
“मी कोण आहे ?”
“हो , अगदी खरे आहे”
तथागत त्याही अवस्थेत म्हणाले
‘मी कोण आहे ?’
हा एकच ‘अस्तित्वगत’ प्रश्न आहे
आणि
हाच प्रश्न निरागस मानवाला पडू शकतो
त्याची निरागसता जसजशी दुषित होऊ लागते
त्याच्या अप्रकट आणि प्रकट मनाचा ताबा
हे असले ‘नस्तित्वगत’ प्रश्न घेऊ लागतात
मनाचे निरागसत्व जपणे
हेच जगण्याचे तत्व आहे
आणि तेच त्याचे तत्वज्ञान !
‘मी कोण आहे ?’ यातला मी गळावा
आणि त्या पुढचा अपरिहार्य प्रश्न असावा
‘या जगाला माझा लाभ काय ?’
या दोनच प्रश्नांची उत्तरे शोधा
तीच तुम्हाला माणूसपणाकडे घेऊन जातील
तेच तेवढे आवश्यक आहे ,
बाकी सगळे व्यर्थ आहे !”
तथागतांनी थकून बोलणे थांबवले
आनंद आणि भन्तेसंघ मूक झाला होता
तथागताने त्यांच्यासमोर अंतिम क्षणी
अंतिम सत्याचाच साक्षात्कार घडवला होता
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत