लाडक्या बहिणींना लाभ मिळवून देणा-या अंगणवाडीताईंना मानधन कधी मिळणार?
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत अर्ज भरुन देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रत्येक लाभार्थीमागे ५० रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अंगणवाडी सेविकांनी दिवस-रात्र योजनेतील लाभार्थीचे अर्ज भरले.
मात्र, योजनेचे श्रेय लाटण्याचा आनंदात हा मोबदला देण्याचा विसर महायुती सरकारला पडला आहे.
अंगणवाडी सेविकांना हा मोबदला कधी देणार ?,
असा सवाल लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केला आहे.
लातूर तालुक्यातील चिंचोलीराव येथे अंगणवाडी सेविकांनी निवेदन देऊन आमदार देशमुख यांचे त्यांना मोबदला न मिळाल्याकडे लक्ष वेधले.
आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिण नाहीत का?,
असा प्रश्नही त्यांनी आमदार देशमुख यांच्याकडे गा-हाणे मांडताना उपस्थित केला.
त्यावर अंगणवाडी सेविकांचा हक्काचा मोबदला मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार देशमुख यांनी दिले.
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर घाई गडबडीत सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु करुन योजनेच्या लाभासाठी सुरुवातीला कमी दिवसाची मुदत दिली.
या मुदतीत व त्यानंतर वाढवून दिलेल्या मुदतीत गाव व शहरांतील अंगणवाडी सेविकांनी खूप मेहनत घेतली.
पात्र लाभार्थीना लाभ मिळवून देण्यासाठी कागदपत्र व लाभासाठी मार्गदर्शन केले.
किंबहुना अंगणवाडी सेविकांच्या योगदानामुळेच तळागाळातील वंचित व दुर्लक्षित महिलांना योजनेचा लाभ मिळाला.
योजनेचा प्रचार व प्रसार करुन ही योजना यशस्वी करण्यात अंगणवाडी सेविकांचा सिंहाचा वाटा आहे.
याचा विसर योजनेचे श्रेय लाटण्यात दंग असलेल्या सरकारला पडला असल्याची टीका आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली.
राज्यभरातील हजारो अंगणवाडी सेविकांचा लाखो रुपयांचा अर्ज भरलेला मोबदला शासनाने अडवून ठेवला असून तो कधी देणार ?,
यावर कोणी चकार शब्द बोलायला तयार नाही.
यामुळे हा मोबदला मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत