आर्थिकदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट का केली ?

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

शिवाजी महाराजांच्या ५ जानेवारी १६६४ रोजीच्या सुरत वरील स्वारीला आणि छाप्याला बरेच जण ‘सुरतेची लूट’ असे म्हणतात. किती मूर्खपणा आणि अज्ञान आहे हे. सुरतेची लूट करायला शिवाजी महाराज काय लुटारू होते का? तेव्हा सुरत मुघलांच्या अंमलात होते. मुघलांनी स्वराज्याची केलेली लूट नि नुकसान भरून काढण्यासाठी नि स्वराज्य अधिक बळकट करण्यासाठी शेवटी महाराजांना शेवटचा निर्णय घेणे भाग पडले.

छ. शिवाजी महाराजांच्या चरित्रात सुरत प्रकरण खूप महत्त्वाचे आहे. कारण सुरतेवरची महाराजांच्या मोहीमेने महाराजांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली. मुघल साम्राज्यात दिल्ली खालोखाल महत्त्व असलेले सुरत शहर एक जागतिक व्यापारी केंद्र होते. मुघल साम्राज्याची शान असलेल्या या शहरावर महाराजांनी छापा टाकून जबरदस्त खंडणी वसूल केली. शाइस्तेखानाने तीन वर्षे स्वराज्यात धुमाकूळ घातला होता. सलग तीन वर्षे स्वराज्यात मुघल फौजा नासधूस करीत होत्या. त्यामुळे स्वराज्याची आर्थिक घडी विस्कटली. शिवाजी महाराज प्रजावत्सल होते. अशा बिकट प्रसंगी ते प्रजेकडून कसा कर वसूल करतील? परंतु पैशाशिवाय कार्य कसे होईल? स्वराज्यापुढे भरपूर प्रश्न होते. अनेक मोहिमा पुढे होत्या. स्वराज्याचे आरमार बळकट करायचे होते. नवीन किल्ले बांधणे वा किल्ल्यांची डागडुजी करणे, फौज उभारणे, तोफा, दारूगोळा विकत घेणे, अशा कामांसाठी भरपूर निधी पाहिजे होता. त्यामुळे शत्रुराज्यात छापा टाकून खंडणी वसूल करणे काही गैर नव्हते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्यातील वैभवशाली अशा सुरत वर हल्ला करून खंडणी वसूल करण्याचे ठरविले.

बहिर्जी नाईक सुरतेकडे रवाना
महाराज कोणतेही काम तयारीनिशी करीत. जी कोणतीही मोहीम ते ठरवीत असत त्याबाबतची माहिती अगोदर मिळवून त्यानुसार अंमल बजावणी करीत. महाराजांनी आपला सर्वात कुशल हेर बहिर्जी नाईक यांना सूरतेकडे रवाना केले. कारण राजगड पासून सुरत सुमारे दीडशे कोस होते. मुघल साम्राज्यात आत खोलवर सुरत वसलेले होते. एवढ्या आत शिरून सुरते वर छापा टाकून खंडणी वसूल करून सहिसलामत परत येणे कठीण. त्यामुळे अगोदर सुरतेची इत्यंभूत माहिती काढण्यासाठी बहिर्जी नाईक यांच्या कडे जबाबदारी महाराजांनी दिली.

सुरत मधील परिस्थिती
सुरत हे एक जागतिक व्यापाराचे केंद्र होते. सुरतेच्या बंदरातून भारताचा उर्वरित जगाशी व्यापार चाले. कापड, मसाल्याचे जिन्नस, चंदन, कस्तुरी, हस्तिदंताच्या सुशोभित वस्तू, अत्तर रेशीम, जरीचे कापड, नक्षीदार भांडी, गालिचे याशिवाय गुलाम आणि स्त्रियांचा खरेदी विक्रीचा व्यापार येथे होता. सुरतची तत्कालीन लोकसंख्या सुमारे २ लाख होती. सुरत शहर जवळून तापी नदी वाहत होती. सुरत मध्ये इंग्रज आणि डच यांच्या वखारी होत्या. औरगजेबाने सुरतेच्या रक्षणासाठी पाच हजार सैनिकांची तजवीज केली होती. मात्र सुरत चा सुभेदार इनायतखान याने केवळ १ हजारच फौज ठेवली होती. सुरत मध्ये हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा असे श्रीमंत व्यापारी होते.

सुरते कडे प्रयाण
सुरतेची खडानखडा माहिती घेऊन बहिर्जी नाईक राजगडावर येऊन पोचले. महाराज देखील बहिर्जींची आतुरतेने वाट पाहत होते. बहिर्जी नाईक यांनी महाराजांना सुरतेची सर्व माहिती दिली. आणि महाराजांचा बेत पक्का झाला. सुरतेवर छाप मारून खंडणी वसूल करायचीच. सर्व जंगी तयारी झाली. सुसज्ज लष्कर घेऊन महाराज ६ डिसेंबर १६६३ ला राजगडहुन सुरतकडे निघाले. महाराजांच्या लष्कराचा आकडा काही ठिकाणी ५ हजार आहे तर काही ठिकाणी ८ हजार आहे. महाराज अगोदर त्रंबकेश्र्वर येथे गेले. तेथे गेल्यावर त्यांनी त्रंबकेश्र्वराची विधिवत पूजा केली. महाराजांनी तेथे हुल उडवून दिली की आपण औरंगाबादला जाणार आहोत. त्यामुळे औरंगाबाद कडील सर्व ठाणे सुसज्ज झाले. आणि महाराजांचा विरोध करण्यास सज्ज झाले. त्याचा परिणाम असा झाला की, सुरतेचा रस्ता बिनधोक झाला. महाराज सहसा दिवसा मुक्काम करीत आणि रात्री प्रवास करीत.

सुरतवर हल्ला
४ जानेवारी १६६४ ला रात्रीच्या सुमारास महाराज सैन्यासह सुरत पासून ३० कोस असलेल्या घण देवी या ठिकाणी येऊन पोचले. ५ जानेवारी ला सगळीकडे बातमी पसरली की, ही शिवाजी महाराजांची फौज असून खुद्द शिवाजी महाराज सोबत आहेत. त्यामुळे सगळीकडे गोंधळ निर्माण झाला आणि लोकांची धावपळ सुरू झाली. महाराज नंतर सुरत पासून दोन ते तीन कोस असलेल्या उधना या गावी आले. तेव्हा तर सुरत मध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली. महाराजांनी लगेच आपला वकील इनायतखान कडे पाठविला. स्वतः इनायतखान आणि सुरत मधील बडे व्यापारी यांनी महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन खंडणी ठरवावी असा वकीला सोबत निरोप दिला. इनायतखानाने शिवाजी महाराज फौज घेऊन आल्याचे अजिबात मनावर घेतले नव्हते. मुघल साम्राज्यात इतक्या आत महाराज येतील यावर त्याला विश्र्वासच बसत नव्हता. त्यामुळे त्याने सुरतेच्या रक्षणाची काहीच तयारी केली नाही. आता मात्र खुद्द शिवाजी महाराज जातीने फौजेसह आले आहेत, आणि आता तर वकिला मार्फत खंडणीचा निरोपही पाठविला. मग मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने सुरतेच्या काही बड्या व्यापाऱ्यांकडून रुपये घेऊन त्यांना सुरतच्या किल्ल्यात आश्रय दिला. स्वतः किल्ल्यात राहून पूर्ण सुरत लावारिस सोडली. परंतु इंग्रज अधिकारी जॉर्ज ऑक्से डन याने आपल्या अडीचशे शिपायाांंसह मोर्चा काढला. इनायतखान मात्र किल्ल्या मध्ये दडून बसला. इनायतखान कडून काहीच निरोप न आल्याने महाराज सुरतच्या बऱ्हाणपूर दरवाज्याच्या बाहेर येऊन शामियाना टाकला. इनायत खानाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मावळ्यांना सुरत मध्ये घुसण्यास सांगितले. हातात मशाली घेऊन मावळे पूर्ण सुरत शहरात फिरत होते. बहिर्जी नाईक यांच्या इशाऱ्यानुसार केवळ श्रीमंत असलेल्या घरांकडेच मावळ्यांचा मोर्चा वळत होता. दरवाजे तुटत होते, तिजोऱ्या फुटत होत्या. सोने, चांदी, दागदागिने भराभर बाहेर काढले जात होते. शामियान्यात महाराजांच्या पुढे सुरतेतील लक्ष्मी जमा होत होती. मावळ्यांचा सुरत मध्ये वृध्द, स्त्रिया, मुले, गरीब, देवस्थाने, साधू, संत, फकीर यांना अजिबात त्रास झाला नाही. दोन डच व्यक्ती फकिरांच्या वेशात सुरत मध्ये फिरत होते. त्यांना मावळ्यांचा अजिबात त्रास झाला नाही. याच वेळी महाराजांनी इंग्रज आणि डच वखारीकडे खंडणी मागितली. परंतु त्यांनी खंडणीस नकार देऊन आपापल्या वखारी सुसज्ज ठेवल्या. महाराजांनी सुध्दा त्यांच्याशी लढून वेळ आणि माणसे गमावण्या पेक्षा सुरतवर लक्ष केंद्रित केले. सुरत बेसुरत होत होती. इनायतखान किल्ल्यातच दडून  होता. मात्र त्याने आपला वकील महाराजांकडे पाठविला. या वकिलाला शामियाण्याकडे मावळे घेऊन आले. शामियान्यात आल्यावर त्याने महाराजांना इनायत खानाचा निरोप सांगण्याच्या बहाण्याने जवळ येत अचानक महाराजांवर कट्यारीने वार केला. परंतु जवळच असलेल्या मावळ्याने त्या वकिलाचा उगारलेला हात हवेतच छाटला. महाराजांवर झालेल्या हल्ल्याने मावळे चिडले आणि त्या वकिलाच्या चींधड्या उडविल्या. शामियान्यात असलेल्या कैद्यांच्याही मुंडकी उडाविण्यास सुरुवात केली. महाराजांनी मात्र लगेच आपल्या मावळ्यांना थांबविले. खानाच्या या हल्ल्याने मात्र पूर्ण सुरत वर राग निघाला. सुरत बेसुरत झाली. शहरात मोठमोठ्या वाड्यांना मावळ्यांनी आगी लावल्या. सुरत मधील छाप्यात सोने, चांदी, हिरे, मोती भरपूर सापडले. एकुण तीन हजार थैल्या भरल्या. संपूर्ण सुरत बेचिराख झाली. महाराजांनी अगोदर मोजकीच खंडणी मागितली होती. मात्र ती न देता उलट महाराजांवर कपटाने हल्ला केला. त्यामुळे महाराज आणि मावळ्यांनी सुरत बेसुरत केली. महाराजांनी सुरतेच्या आजूबाजूच्या परिसरात आपले गुप्तहेर पाठविले. त्या हेरांनी खबर आणली की, मुघल सरदार महाबतखान मोठी फौज घेऊन सुरतकडे येत आहे. त्यामुळे महाराजांनी आपल्या मावळ्यांना काम आटोपते घेण्यास सांगितले आणि रविवार दिनांक १० जानेवारी १६६४ ला सुरत सोडली.

शिवाजी महाराजांच्या सुरत वरील स्वारीला आणि छाप्याला बरेचजण सुरतेची लूट असे म्हणतात. किती मूर्खपणा आणि अज्ञान आहे हे. सुरतची लूट करायला शिवाजी महाराज काय लुटारू होते का? शिवाजी महाराजांनी अगोदर दुरूनच खंडणी मागितली. ती जर मिळाली असती तर सुरत ही बेसूरत झालीच नसती. आणि महाराजांनी केवळ श्रीमंताच्याच घरातूनच पैसा काढला. कोणत्याही गरिबांकडून त्यांनी पैसा वसूल केला नाही. शत्रुराज्यातून खंडणी वसूल करणे ही तर त्यावेळची राजनीती होती. काय चुकीचे केले महाराजांनी? मुघलांनी स्वराज्याची केलेल्या नासाडीची एक प्रकारे भरपाई केली महाराजांनी. महाराजांना सुरत मधून अगणित संपत्ती मिळालीच. त्यातून स्वराज्याची घडी नीट करता आली. पुढील मोहिमांची तयारी करता आली. महाराजांनी अगोदर शाइस्तेखानाची बोटे कापली व त्यानंतर मुघल साम्राज्याचे नाक कापले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!