मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांची पुन्हा धमकी.

नक्षलवाद्यांनी गट्टा परिसरात पत्रक टाकले असून यात धर्मरावबाबा, त्यांचे जावई आणि काही लोकांना धमकी दिली आहे.
मागील दोन वर्षांपासून सूरजागड येथे लोह खाणीत खनिजांचे उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे. यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम जबाबदार असून त्यांना किंमत चुकवावी लागेल, अशाप्रकारची धमकी देणारे पत्र गट्टा परिसरात आढळून आले. हे पत्रक पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास यांच्या नावे असून यात आत्राम यांचे जावई, त्यांचे भाऊ व कंपनीत कार्यरत काही लोकांची देखील नावे आहेत.
वर्षभरात आत्राम यांनी तिसऱ्यांदा नक्षल्यांनी धमकी दिली आहे. हिवाळी अधिवेशनात देखील अशाप्रकारची धमकी मिळाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आत्राम यांची सुरक्षा वाढविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु उलट सुरक्षा कमी केल्याचे कळते. त्यामुळे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे.
‘मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी आम्ही घेत आहो. त्यांना सद्यस्थितीत ‘झेड’ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. नक्षल्यांच्या धमकीपत्राबाबत आम्ही तपास सुरू केला आहे’ – नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली ‘कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्ह्यात आता कुठे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. सूरजागड प्रकल्पामुळे हजारो हातांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्याचा विकास हेच माझे ध्येय आहे. त्यामुळे अशा धमक्यांकडे मी लक्ष देत नाही’, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत