आंदोलनात भाग घेताय?
शांताराम ओंकार निकम
बदलापूरमधील आदर्श शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने चार व सहा वर्षांच्या मुलींवर दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी दुष्कर्म केले.
मुलींनी घरी तक्रार केली. पालकांनी १७ ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन गाठले. पण बदलापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास तब्बल बारा तास लावले.
सद्या सामाजिक माध्यमे अतिशय सक्रिय आहेत.जरासे खट्ट झाले की लगेच ती गोष्ट सामाजिक करून टाकतात.एकाने मोबाईलवर प्रसारित केलेली बातमी पसरायला क्षणाचाही विलंब लागत नाही,अशाच प्रकारे पोलीस स्टेशनची तक्रार नोंदवून घेण्याची बातमी तिथल्याच कोणीतरी मोबाईलवर प्रसारित केली.ती इतक्या वेगाने प्रसारित झाली.की त्या बातमीची दखल सर्व टीव्ही चॅनेलने घेतली,ती बातमी ब्रेकिंग न्यूज झाली.बातमी वाचणाऱ्यांचा आणि बघणाऱ्यांचा संताप अनावर झाला.अशावेळी प्रत्येकाला काहीतरी करावेसे वाटते.पण कोणीतरी सुरुवात करावी याची प्रत्येक जण वाट बघत असतो.ही बाब एखादा भडक डोक्याचा किंवा राजकीय फायदा बघणारा हेरतो.आणि एकच ठिणगी टाकतो.आणि क्षणात त्या ठिणगीचा वणवा होतो.तो वणवा किती जणांचे बळी घेईल सांगू शकत नाही.
बदलापूरमध्येही असेच झाले.सकाळी कामावर जायला निघालेले चाकरमानी.बदलापूर रेल्वे स्टेशनवर लोकलची वाट पाहत असताना,कोणीतरी ठिणगी टाकली.ठिणगीने पेट घेतला .थोडयाच वेळात भडका उडाला.शेकडोच्या संख्येने फलाटावर उभे असलेले चाकरमानी आंदोलक झाले.आंदोलन जोरात सुरू झाले. होणार कसे नाही,विषयच अतिशय संवेदनशील आणि संताप निर्माण करणारा होता.
आंदोलनात ९५% टक्के तरी चाकरमानी असतील,३% विदयार्थी व उरलेले २% इतर काही कामानिमित्त लोकलने प्रवास करण्यासाठी आलेले असतील.पण त्यातील जवळजवळ बहुतेक लोक आंदोलनात सामील झाले.गोंधळ झाला.रेल्वे रोखण्यात आली. बदलापूर स्थानक मध्य रेल्वेवर असल्याने मध्य रेल्वेच्या लोकलचा गोंधळ झाला, इतकेच नाही तर पुण्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही खोळंबल्या.
महिला पुरुष,विद्यार्थी विद्यार्थिनी आंदोलनात सामील झाले.
आंदोलन जवळजवळ ८ तास चालले.आंदोलक ऐकायलाच तयार नव्हते,आरोपीला आमच्या ताब्यात आम्ही त्याला फाशी देतो. अशी आंदोलक मागणी करत होते.पण भारत हा लोकशाही असलेला देश आहे.घटनेने कोणाही निरपराधाला शिक्षा होणार नाही याची तरतूद करून ठेवली आहे.आरोपीला आपली बाजू मांडण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे.मुंबई हल्ल्यात शेकडो निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या अतिरेक्यांपैकी ,हल्ल्याचा एकमेव जिवंत पकडलेला अतिरेकी अजमल कसाब यालाही कोर्टाने त्याची बाजू मांडण्याची परवानगी दिली होती.
1992 च्या मुंबई सिरीयल बॉम्बस्फोटच्या आरोपीनाही आपली बाजु मांडण्याची मुभा घटनेने दिली होती.
त्यामुळे पोलीस आरोपीला आंदोलकांच्या ताब्यात देणे शक्यच नव्हते. तरीही शेवटपर्यंत आंदोलक ती मागणी लावून होते.त्यांनी स्टेशनवर फासही तयार करून ठेवला होता.
रेल्वेवर सुरू झालेले आंदोलन शहरभर आणि शहराच्या बाहेर पसरण्यास वेळ लागला नाही.टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या आणि संपूर्ण देशभर ही घटना पोहचली.
अनेक आंदोलक आपापल्या अँड्रॉइड मोबाईलमधून व्हिडिओ काढून ते समाज माध्यमांवर पसरवत होते. त्यामुळे ही बातमी पसरायला वेळ लागला नाही.
आपण खूप चांगले काम करत आहोत असे आंदोलकांना वाटणे सहाजिकच होते. पण त्याचा दुष्परिणाम काय होईल याचा कोणीही विचार केलेला नव्हता.आपण आयतेच पोलिसांना पुरावा देत आहोत हा विचार त्यांना जराही शिवला नाही.
29 सप्टेंबर 2006 रोजी खैरलांजी मध्ये घडलेल्या भोतमांगे कुटुंबाच्या निर्घृण हत्याकांडाची बातमी देशभर वाऱ्यासारखी पसरली .ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरले.आंदोलन सुरू झाले, तोडफोड,जाळपोळ सुरू झाली.त्यातलाच एक भाग म्हणून उल्हासनगरही पेटले.उल्हासनगर मधील असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले,जाळपोळ, तोडफोड सुरू झाली.गर्दी आवरायला पोलीस कमी पडले,आंदोलक इतके चिडले की, त्यांनी विनाकारण सिंधी नागरिकांची दुकाने फोडली.सिंधी नागरिक आंदोलकांच्या विरोधात गेले,सिंधी आणि दलित असे चित्र निर्माण झाले.
आंदोलक इतके पेटले होते की त्यांनी पुणेकरांची आवडती गाडी ,डेक्कन क्वीनचा डबा पेटवून दिला. गाडीतील फोमला आग लागली आणि भरभर डबा पेटला.आंदोलक आपण मोठे शौर्य गाजवले या पावित्र्यात गाडीच्या पेटलेल्या दरवाजात उभे राहून इतर आंदोलकांना चेतवू लागले,घोषणा देऊ लागले,’हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा’.ही बातमीही शहरभर वाऱ्याच्या वेगाने पोचली. पत्रकार आले,त्यांनी फोटो काढले.त्याकाळी अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकांकडे नव्हता.पण पत्रकारांच्या फोटोच्या साहाय्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.
उल्हासनगर कॅम्प नंबर चार नंबर येथील भाटिया चौक येथील पाच दुकान जवळील बेकरी संतप्त आंदोलकांमधील अविचारी लोकांनी पेटवली.त्या घटनेची फोटोग्राफी झाली.
पोलिसांनी त्याठिकाणी उपस्थित लोकांपैकी फोटोमध्ये जे ओळखु येतील अशांना पकडले त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी मार वाचवण्यासाठी आणखी कोण कोण होते त्यांची नावे सांगितली.पोलिसांनी अशा लोकांना घराघरातून उचलले.त्यांच्यावर केसेस भरल्या.
रेल्वे पोलिसांनी फोटो बघून एकेकाला घरातून उचलून नेले.त्यांच्यावर केसेस भरल्या.
जे पकडले त्यातील एखाद्याने विध्वंस केला असेल पण सर्वांवर मालमत्तेची विध्वंस करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे,जाळपोळ करणे असे आरोप लावले गेले.
त्यातील बऱ्याच लोकांना काही दिवस जेलमध्ये राहावे लागले. काही दिवसांनी एकेकाला त्यांच्यां नातेवाईकांनी जामिनावर सोडवून आणले.ना समाज कामी आला न राजकारणी कामी आले.समाजाने हात मागे घेतले.राजकारण्यांनी कागदोपत्री,पोलिसांना भेटून जमेल ती मदत केली. पण नाहक पैसा खर्च झाला तो गरिबांच्या घरच्यांचाच.कारण आंदोलक हे गरीब घरातले होते.
आंदोलन पेटल्यावर बघ्यांची गर्दी होते. त्यात ज्याने कधी कोणाला चापटही मारलेली नसते.अशी व्यक्तीही मग वाघाचे रूप धारण करते.गर्दीचा फायदा घेऊन असामाजिक कृत्ये करते.
मानसशास्त्र सांगते की,गर्दी भित्री असते, गर्दीला अक्कल नसते,आकस्मिक झालेल्या गर्दीला नेता नसतो.गर्दी अविचारी असते.गर्दीत असलेली एखादी भित्री व्यक्ती अतिशय धीट होते,ज्या व्यक्तीने कधी कोणाला उलट बोलण्याची हिम्मत केली नसेल ती व्यक्ती गर्दीत लाथा बुक्क्या मारून आपला राग व्यक्त करते.
विनाकारण गर्दी करणारे बरेच असतात.त्यांना घटनेबद्दल गांभीर्य नसते,गम्मत बघायला आलेले असतात.
याच गर्दीत जमलेल्या आणि काय झाले हे बघायला गेलेल्या लोकांची नावे पोलिसांना मिळतात.त्यांनाही हकनाक जेलमध्ये जावे लागते.
जेलमधून केंव्हा सुटणार हे गुन्ह्याच्या स्वरूपावरून ठरते.
खैरलांजी प्रकरणात आमची बरीच मुले आत गेली आणि बऱ्याच मुलांना वाचवण्यात आम्हाला यश आले.
फोटो बघून संशयित आरोपींना रात्री २ वाजता घ्यायला घरी आलेल्या पोलिसांना आम्ही घरात घुसू दिले नाही.’ तुम्हाला हवे असलेले लोक सकाळी पोलीस स्टेशनला हजर करतो ‘सांगून पोलिसांना परत पाठवले. नगरसेवक असल्यामुळे पोलिसांनी मान ठेवला.
पोलीस गेल्यावर संबंधित संशयितांना रात्रीच काही दिवसांसाठी घर सोडण्यास सांगितले. ते गेले.ते वाचले. पण ज्यांना अगोदरच पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल केले होते, त्यांच्यासाठी त्यांच्या घरच्यांचे आणि त्यांचे मनोबल वाढवण्याशिवाय आम्ही काही करू शकलो नाही.
पण निरपराध नागरिकांना पकडू नये असे एक आंदोलन छेडून पुढची कारवाई रोखण्यात यश मिळवले.पण ज्या लोकांवर केसेस झाल्या ते सगळे गरीब घरातलेच होते.आणि त्याची झळ गरीब कुटुंबियांना बसली.समाजातील श्रीमंत लोक ,त्यांना आंदोलनासाठी उचकवणारे लोक आर्थिक मदत करायला पुढे आले नाहीत.
अजूनही ते जामिनावर सुटलेले लोक कोर्टाच्या तारखांना हजेरी लावत आहेत.
त्यांना कुठे नोकरीसाठी चरित्राचा दाखला हवा असेल तर तो पोलीस स्टेशन मधून मिळत नाही.त्यामुळे मिळेल ते काम करावे लागते.
बदलापूरच्या प्रकरणातसुद्धा असेच घडले आहे.बदलापूरचे आंदोलन आकस्मिक घडलेले आहे.ते कोणी ठरवून केलेले नाही.रेल्वे स्टेशनवर जमलेले प्रवासीच आंदोलक झाले होते.त्यामुळे विरोधी पक्षाच्या लोकांनी ट्रक भरून लोक आणले हे म्हणणे म्हणजे ज्वलंत प्रश्नावर प्रामाणिकपणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची क्रूर थट्टा आहे.
आरोपीच्या घराची,तो राहत असलेल्या त्याच्याच गावच्या लोकांनी तोडफोड केली, मग त्यांनाही ट्रक भरून आणले गेले होते का?
राजकारण राजकारणाच्या ठिकाणी शोभते,अशा भावनिक ठिकाणी कोणी राजकारण करू नये,हेच खरे.
एखादी भावनिक घटना घडल्यानंतर हिंस्र होणे अतिशय चुकीचे आहे.रागाच्या भरात
राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे ,जाळपोळ करणे,आपले रक्षण करणाऱ्या पोलिस आणि तत्सम कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणे हे अतिशय चुकीचे आहे.
आंदोलन समजून त्यात भाग घेतला पाहिजे अंधपणे आंदोलनात भाग घेऊ नये,
शांततेतही आंदोलन करता येते.सरकारला वेठीस धरता येते,तो मार्ग अवलंब केल्यास हकनाक आंदोलकांना पोलीस पकडणार नाहीत.आणि त्यांचे करिअर खराब होणार नाही.
बदलापूर आंदोलनात ५०० च्यावर आंदोलक आरोपी,त्यातले ७२ पोलिसांच्या ताब्यात.
कडू डोस
आंदोलन करणे हा आपला अधिकार असला तरी त्यातून सामाजिक हानी होणार नाही, राष्ट्रीय नुकसान होणार नाही.याकडे लक्ष दिले पाहिजे.
एखाद्या नेत्याच्या भडकवण्यातून तर कधीच हिंसक आंदोलन करू नये,कारण आंदोलकांवर केसेस झाल्या तर नेता बघायला तर सोडाच पण साधी दखल ही घेत नाही.सगळी ओढाताण कुटुंबीयांना करावी लागते.आर्थिक भार कुटुंबियांना सहन करावा लागतो.
त्यामुळे आंदोलनात भाग घेताना जरा सबुरीने.
शांताराम ओंकार निकम
21 ऑगस्ट 2024
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत