परित्त सुत्त – रक्षा बंधन
संकलन – अविनाश पवार
लेखासाठी हा विषय घेण्यामागे माझा उद्देश रक्षाबंधनचे समर्थन वैगरे अजिबात नाही, कारण आपल्या काही ढोंगी बौद्धांना काहीतरी कारणच हवे असते सण साजरे करण्याचे त्यासाठी सर्वप्रथम हे स्पष्ट केले. अश्या प्रवृत्तीच्या लोकांचा मि कायम निषेधच करतो. आज हा विषय लेखासाठी घेण्यासाठी प्रमुख कारण हेच आहे की आज बाबासाहेबांचे वाक्य आठवले की, “जो आपला इतिहास विसरतो तो कधीही इतिहास घडऊ शकत नाही”. आपल्या इतिहासाची आपल्याला माहिती हवी, आपल्या सर्वांच्या माहितीमध्ये भर म्हणुन हा लेखप्रपंच.
बऱ्याच अभ्यासु जानकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे तसेच माझ्या आजपर्यंतच्या सारासार अभ्यासाप्रमाणे आजच्या हिंदु धर्मातील बहुतेक सर्व गोष्टी ह्या प्रामुख्याने बौद्ध व काही ईतर संस्कृतीतून घेतले गेले आहेत. कितीतरी बौद्ध विहार आणि स्तुपांवर अतिक्रमण करुन तिथे ईश्वरवादाने आपली दुकाने चालु केली गेली. संस्कृती आणि तत्वज्ञान म्हणण्यासारखे यांच्याकड़े स्वत:चे असे काही नव्हते. त्यामुळे बहुतेक पर्व किंवा सण हे प्रामुख्याने बौद्ध व ईतर प्रवाहातुन घेतले गेले, मात्र त्याचे स्वरूप त्यांच्या स्वार्थानुसार बदलूनच.
कुठलेच पर्व किंवा सण एका दिवसात स्थापीत होत नाहीत तसेच प्रत्येक पर्व व सणाच्या मुळात काहीतरी गुढ कारण किंवा इतिहास दडलेला असतो. रक्षाबंधनचे पर्व सुद्धा याला अपवाद नाही जो श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येतो. मिथकीय कथानक तर बरेच आहेत परंतु ऐतिहासिक तथ्य या पर्वाला थेट भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माशी जोडतात.
पहिली घटना
बुद्ध धम्माच्या थोड्याच जाणकारालाही माहिती आहे की आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी धम्मचक्क पवत्तन केले होते, अर्थात सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्खूंसमोर प्रथम धम्म उपदेश केला होता. याच पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सावनचा महीना सुरु होतो जो पुढील पौर्णिमेला म्हणजेच श्रावण पौर्णिमेला पुर्ण होतो. आषाढ़ पौर्णिमेपासुन भगवान बुद्धांनी सारनाथच्या मृगदाय वनामध्ये पहिला वर्षावास सुरु केला होता. श्रावण पौर्णिमेला भगवान बुद्धांनी कुलपुत्र यशस तसेच त्याच्या ५४ मित्रांना प्रवज्जित केले होते अर्थात दीक्षित केले होते. ई.पु.५२७ मध्ये भगवान बुद्धांसहीत संघाची संख्या ६१ झाली होती. हे इतिहासातील पहिले विवरण आहे की श्रावण पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या संघाचा विस्तार झाला होता. श्रावण पौर्णिमेला भगवान बुद्धांनी आजच्याच दिवशी कुल पुत्र यशस नावाच्या राजकुमाराला शोधत आलेल्या त्याच्या आई वडीलांना प्रथमच तीन सरणाने ( बुद्धं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि) उपासकीय दीक्षा दिली होती. दीक्षा देताना उपासक-उपासिकेच्या हाथाच्या मनगटावर परित्त सुत्त अर्थात परित्राण सुत्र म्हणजेच रक्षा सुत्र बांधण्याची बौद्ध परंपरा आहे. हे सुत्र बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाची उठता, बसता, झोपता आठवण राहावी म्हणुन बांधले जायचे जेणेकरुन या त्रिरत्नाच्या आठवणीने मन जागृत राहून त्याचे जास्तीत अनुसरण केल्या जावे. यालाच परित्त सुत्त म्हंटले जात असे. परंतु हे पर्व आज ज्या स्वरूपात साजरे केले जाते ते आपल्या मुख्य मौलिक स्वरूपा पासुन सर्वथा भिन्न आहे.
पाली भाषेत शब्द आहे परित्त ज्याला संस्कृत मध्ये परित्राण अथवा रक्षा किंवा संरक्षण म्हंटले जाते. आपल्या मौलिक स्वरुपात हा दिवस उपासक-उपासिकीय दीक्षा दिवस तसेच भिक्खूंसाठी प्रवज्जा दिवस आहे. पारंपारिक पद्धतीने ह्या दिवशी उपासक-उपासिका बुद्ध विहारात जाऊन आपल्या धम्म आचार्य किंवा पुज्य भिक्खूंकडून परित्त सुत्त बांधून घेऊन मंगल कामना घेत असत, भिक्खु किंवा आचार्यांना दान देत असत. हे आहे खरे रक्षाबंधन. आज सुद्धा बौद्ध देशांमध्ये हे पर्व आपल्या त्याच मुख्य मौलिक स्वरूपात साजरे केले जाते. भीक्खु-भिक्खुनी अथवा आचार्य स्वत:ही आपल्या श्रद्धाळु उपासक-उपासीकेच्या घरी जातात. या निमित्ताने पूज्य भिक्खु-भिक्खुनी किंवा आचार्य उपासकांच्या मनगटावर परित्त सुत्र बांधताना गाथांचे संगायन करतात ते येणेप्रमाणे-
भवतु सब्ब मंगलं रक्खन्तु सब्ब देवता
सब्ब बुद्धानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते
भवतु सब्ब मंगलं रक्खन्तु सब्ब देवता
सब्ब धम्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते
भवतु सब्ब मंगलं रक्खन्तु सब्ब देवता
सब्ब संघानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते
अर्थ –
तुमचे सर्व मंगल होवो, सर्व देवता रक्षा करो. बुद्ध, धम्म व संघाच्या अनुभवाने सदा सुख शांती राहो.
इथे देवता या शब्दाच्या असा अर्थ होतो की, मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव. ज्यांना या चार देवांचे आशीष प्राप्त आहे त्यांना दुसऱ्या कुठल्या देवाची गरज नाही.
बुद्ध धम्माचा भारतातुन ऱ्हास झाल्यानंतर याच बौद्ध परंपरेला वेगळे स्वरूप देऊन भटांनी त्यांच्या कड़े आलेल्या अंधश्रदद्धाळु भक्तांच्या मनगटावर धागा बांधताना मंत्र म्हणायला सुरवात केली ती येणेप्रमाणे –
येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल:।
तेन त्वामनुबध्नामि रक्षे माचल माचल।।
अर्थ :-
येन बद्धो बली राजा – जसे बळी राजाला बांधले होते,
दानवेन्द्रो महाबल: – जो महाबलवान व दानशूर होता,
तेन त्वामनुबध्नामि – तसेच मि तुम्हाला बांधतो.
रक्षे – माझ्या रक्षेसाठी
माचल माचल – हालायचे नाही डुलायचे नाही.
मुख्य मौलिक स्वरूपात हे पर्व होते भवतु सब्ब मंगलं – सर्व मंगलमय होवो आणि अपभ्रंशीत परंपरा अशी झाली की जसे दानशूर राजा बळीला बांधले होते, कपटाने सर्व हिस्काऊन घेतले होते, तसेच तुम्हाला बांधत आहोत. रक्षेचा पर्व गुलामगिरीच्या बंधनाचा पर्व बनवला गेला.
राजा बळी कोण होता ? दान पारमिताचे महान पालनकर्ता प्रतापी सम्राट ज्यांच्या पारमिता पालनाचे वर्णन स्वत: भगवान बुद्ध दान कथेच्या रुपात करत. याच कथेतील राजाची आजही भाऊबीजेच्या दिवशी आजच्या भारतातील लोक आठवण काढतात, ती अशी –
“ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो.
दुसरी घटना :-
आषाढ़ पौर्णिमेला सुरु होणाऱ्या वर्षावासाला श्रावण पौर्णिमेला एक महीना पुर्ण होतो. या निमित्ताने श्रद्धाळु उपासक-उपासिका संघाला भोजनदान करुन पुण्य लाभ करुन घेत. पुज्य भिक्खुगण उपासक-उपासीकांच्या मनगटावर परित्त सुत्त बांधुन मंगल कामना करत. उपासक अश्या निमत्ताने मुख्यत: धम्म सोहळ्यांचे आयोजन करत. अश्या निमित्ताने म्हणजेच श्रावण पौर्णिमेला उपोसथाच्या दिवशी अनाथपिण्डक नावाच्या सुप्रसिद्ध व्यापारी सुदत्त व्यापाऱ्याने उपासकांना एकत्र करून १६० धम्मसुत्तांचे कथन केले होते. भगवान बुद्धांच्या काळात श्रावस्ती मध्ये अनाथपिण्डक महान श्रुतमय प्रज्ञाने संपन्न होते. त्यांना भगवान बुद्धांच्या १६० सुत्तांचा सखोल अभ्यास व तोंडपाठ होते. हेच एक आदर्श उदाहरण आहे की भगवान बुद्धांनी काळी सुद्धा धम्मकथिक म्हणजेच धम्मोपदेशक फक्त भिक्खुच नव्हे तर उपासक आचार्यही असत. यावरूनच ही पौर्णिमा धम्मसोहळ्यांसाठी धम्मश्रवण करण्यासाठी महत्वाची होती.
तीसरी घटना-
भगवान बुद्धांच्या काळात म्हणजेच ई.पु. ५०४ मध्ये श्रावस्ती येथे श्रावण पौर्णिमेला तीसरी उल्लेखनीय घटना म्हणजे अंगुलीमालची धम्म दीक्षा. अंगुलिमाल श्रावस्तीचा एक कुप्रसिद्ध डाकु होता. याच दिवसाला भगवान बुद्धांनी उत्सव बनवले आणि श्रावण पौर्णिमा हा दिवस अंगुलिमाल सुत्त पठनाचा दिवस झाला. अंगुलिमाल व आम्रपाली प्रसंग महान प्रेरणा देणाऱ्या सत्य घटना आहेत, कुठल्या काल्पनीक कथा नाहीत. त्यांचे जीवन बदलू शकते तर माझे का नाही. कुणी कल्पना तरी करू शकते का की एक डाकु अर्हत आणि एक गणिका थेरी होऊ शकते. त्यामुळे अश्या सत्य कथेतुन कुणीही प्रेरणा घेऊ शकतो. हेच आहे धम्माचे बळ.
चौथी घटना :-
श्रावण पौर्णिमे संबंधित भगवान बुद्धांच्या जीवनातील चौथी घटना सर्वाधिक उल्लेखनीय आणि महान घटना आहे, ती म्हणजे प्रथम धम्म संगीति. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणा नंतरच्या श्रावण पौर्णिमेलाच प्रथम धम्म संगीतिची सुरवात झाली होती. ही संगीति राजगिरच्या सप्तपर्णी गुहेत ५०० अर्हतांच्या उपस्थितीत पार पडली. ह्या संगितित भगवान बुद्धांच्या ८४००० धम्मसुत्तांचे संगायन व संकलन केले गेले. ही संगीति सात महीने चालली. महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली ही संगीति होती. संगीति मध्ये एकमताने सर्वप्रथम विनयाचे संगायन आणि संकलन झाले कारण महाकाश्यपांनी तसे सुचवले होते की, विनयानामबुद्धसासनस्सआयु म्हणजेच विनय हेच बुद्ध शासनाचे जीवन आहे, जोपर्यंत विनय राहतील तोपर्यंत बुद्धशासन राहील. सम्राट अजातशत्रुच्या अधिपत्याखाली श्रावण पौर्णिमेलाच याची सुरवात झाली होती.
भगवान बुद्धांच्या ८० वर्षाच्या जीवनात श्रावण पौर्णिमेशी संबंधित अश्या अनेक घटना आहेत. वेळे अभावी येथे फक्त ४ घटनांचा उल्लेख केला आहे काऱण श्रावण पौर्णिमा एक बौद्ध पर्व आहे. प्रतिक्रियावादी तथाकथित बौद्धांमध्ये एक प्रवृत्ती पाहायला मिळते ती म्हणजे प्रत्येक पर्व किंवा सणाला, हिंदु पर्व किंवा ब्राम्हणवादी पर्व म्हणुन त्याचा बहिष्कार केला जातो व आंदोलन सुरु होते. त्यामुळेच मला आठवण येते त्या बाबासाहेबांच्या वाक्याची,- “जो आपला इतिहास विसरतो तो कधीही इतिहास घडऊ शकत नाही.”
याच क्रिया -प्रतिक्रियेला बाबासाहेब क्रांती -प्रतिक्रांती म्हणत. बहिष्कार करणे खुप सोपे असते, कारण त्याला कसलीही प्रतिभा लागत नाही.
बौद्ध परंपरे नुसार श्रावण पौर्णिमेला ‘परित्त सुत्त पर्व’ म्हणुन साजरे केले जाते. उपोसथ ग्रहण केले जाते, अष्टशीलाचे अधिष्ठान घेतले जाते, सुत्तपठन केले जाते, सामुहीक ध्यान केले जाते, पुज्य भिक्खु संघाला दान दिले जाते व पुज्य भन्ते किंवा आचार्यां कडून परित्त सुत्त बांधून घेतले जाते. या पर्वाच्या लोकप्रियतेमुळे घडले असे की प्रतिक्रांतीवाद्यांनी त्याला नवीन भेसळयुक्त स्वरूप देऊन टाकले.
बाबरने राणा सांगाचा पराजय केल्यानंतर सोळाव्या शतकात राणा सांगाची पत्नी चित्तोडगढची राणी कर्मावतीने ( इतिहासात ह्या नावाचाही उल्लेख आहे ) मुगल साम्राज्याबरोबर मैत्रिपुर्ण संबंध स्थापित करण्यासाठी बाबर पुत्र सम्राट हुमायुला राखी पाठवली होती व हुमायुने जीवनभर ते नाते जपले होते. १९ व्या शतकात कवी रवींद्रनाथ टागोरांनी या पर्वाला स्वतंत्रता संग्रामाच्या भावनीक धारेत उपयोग केला. या पर्वाचा विषय अश्या प्रकारे भिन्न भिन्न स्वरूप घेत गेला आणि जे मुख्य मौलिक स्वरूप होते ते बाजूला पड़त गेले ते म्हणजे,
“भवतु सब्ब मंगलं”
संदर्भ :-
मैत्री संपुर्ण धम्म
राजेश चंद्रा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत