हिंगोलीत डास निर्मुलनासाठी पालिकेकडून फवारणीला सुरवात.

हिंगोली शहरात मागील काही दिवसांत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. या शिवाय उष्ण व दमट वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी तसेच इतर ठिकाणीही डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांमुळे डेंग्यू, मलेरीया या सारखे आजार पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. शिवाय तापीच्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे. शासकिय रुग्णालयासोबतच खाजगी रुग्णालयात तापीचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. या शिवाय अनंत चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण शहरात डास निर्मुनलासाठी फवारणी करण्याचा निर्णय पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी घेतला आहे. हिंगोली शहरात डास निर्मुलनासाठी पालिकेने सर्व प्रभागात रविवारपासून फवारणीचे काम हाती घेतले असून त्यासाठी आठ जणांचे पथक तसेच दोन ट्रॅ्क्टरच्या मदतीने हे काम केले जात आहे. पुढील चार दिवसांत संपूर्ण शहरात फवारणी केली जाणार आहे
त्यासाठी स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. या शिवाय फवारणीसाठी दोन ट्रॅक्टरची मदत घेतली जात आहे. या पथकाकडून आज सकाळ पासून फवारणीच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. पुढील चार दिवसांत संपूर्ण शहरात फवारणी केली जाणार असल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले.
हिंगोली मुख्याधिकारी अरविंद मुंडे म्हणाले की, शहरातील नागरीकांनी आपापल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये. तसेच नारळाच्या करवंट्या, टायर, कुलर यामध्ये असलेले पाणी तातडीने काढून टाकावे. कचरा इतरत्र न फेकता घंटागाडीमध्येच द्यावा. शहर स्वच्छतेसाठी पालिकेला सहकार्य करावे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत