महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-४१ (१८ जुलै २०२४)

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,


(बौद्ध धर्म आणि ब्राम्हणवाद यांच्या संघर्षातूनच अस्पृश्यतेचा जन्म झाला. या संघर्षानेच भारताचा इतिहास घडविला.)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या अस्पृश्यतेच्या उत्पत्ती संबंधीच्या सिद्धांताचे परीक्षण डॉ. शेख शब्बीर व डॉ. भांडारकर यांनी, ‘भारतीय सामाजिक समस्या’ या पुस्तकात केले आहे. समाजशास्त्राच्या या संशोधकांच्या मते, वैदिक, जैन, बौद्ध आदि धर्मांना बरोबरीचे स्थान होते. त्यामुळे केवळ बौद्ध असल्यामुळे त्यांना हीन लेखले गेले असे म्हणणे योग्य नाही. परंतु, गोमांस भक्षणामुळे अस्पृश्यता निर्माण झाली हे डॉ. आंबेडकरांचे दुसरे कारण मात्र काही प्रमाणात योग्य समजल्या जावू शकते.’ जाहीरपणे गोमांस खाणे हे देखील जातीतून बहिष्कृत होण्याचे एक कारण आहे, असे श्री. भट्टाचार्य यांनी नमूद केले आहे.

गोमांस भक्षणामुळे अस्पृश्यता निर्माण झाली, अशा प्रकारचे विश्लेषण करून अस्पृश्यता कोणत्या काळात जन्माला आली असेल, याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शोध घेतात. या संबंधी ते म्हणतात की, ‘अस्पृश्यतेच्या जन्माची स्थिति व गोहत्या आणि गोमांस भक्षण बंदीची तिथी यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध आहे. गोमांस भक्षणावर बंदी कधी आली असावी यांचा विचार करीत असतांना सुप्रसिद्ध संशोधक डॉ. डी. आर.भांडारकर यांच्या मताचा बाबासाहेब आधार घेतात. डॉ. भांडारकर यांच्या मते, ‘गुप्त राजांनी साधारणतः ई. स.च्या चौथ्या शतकामध्ये गोहत्येला देहांत शासन देणारा गुन्हा ठरविले होते’. डॉ. भांडारकर यांच्या विधानाचा आधार घेऊन बाबासाहेब आत्मविश्वासपूर्वक म्हणतात की, अस्पृश्यतेचा जन्म अंदाजे ई. स. ४०० च्या दरम्यान झाला. बौद्ध धर्म आणि ब्राम्हणवाद यांच्या संघर्षातूनच अस्पृश्यतेचा जन्म झाला. या संघर्षानेच भारताचा इतिहास घडविला.

अस्पृश्यतेच्या उत्पत्ती सिद्धांताच्या सविस्तर विश्लेषणावरून या सिद्धांताचा सारांश पुढील प्रमाणे मांडता येईल.
१. हिंदू आणि अस्पृश्यांमध्ये कोणताही वंशभेद नाही.
२. अस्पृश्यतेच्या निर्मितीपूर्वी त्यांच्यात केवळ स्थायी आणि वाताहत झालेले लोकं असाच फरक होता. केवळ वाताहत झालेले लोकच अस्पृश्य बनले.
३. अस्पृश्यता ही वंशभेदाप्रमाणेच व्यावसायिक आधारावर निर्माण झाली नाही.
४. केवळ खालील दोन कारणांमुळेच अस्पृश्यतेची निर्मिती झाली.
अ. वाताहत झालेल्यांविषयी अर्थात बौध्दांविषयीची घृणा व तिरस्कारची भावना.
ब. वाताहत झालेल्या लोकांनी गोमांस भक्षण करणे सुरू ठेवणे.
५. अस्पृश्यता ही ई. स. च्या ४०० च्या दरम्यान जन्माला आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचे प्रमुख कारण म्हणजे गोमांस भक्षण होय, असाच निष्कर्ष काढला आहे. नाग लोकं हे बौद्ध धर्मीय होते. अस्पृश्यांमध्ये नाग जमातीच्या संदर्भात काही पुरावे देखील उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील महार लोकांच्या नावासमोर, “नाग”, हा शब्द लावला जायचा. उदा. रायनाक, शिदनाक, इत्यादि. नाग या शब्दाचा अपभ्रंश म्हणजेच नाक हा शब्द होय, असे आढळून येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या उत्पत्ती संबंधीचा सिद्धांत वस्तुनिष्ठ अशा गोष्टींवर आधारलेला आहे. बाबासाहेबांपुर्वी अस्पृश्यतेच्या निर्मिती विषयीचे सखोल असे अध्ययन कोणीही केले नाही. म्हणूनच त्यांचे अध्ययन समाजशास्त्रीय दृष्ट्या विशेष महत्वाचे आहे. बाबासाहेबांच्या सिद्धांतामुळे अस्पृश्य मुळचे कोण?

अस्पृश्यतेची निर्मिती का झाली? या संबंधीची सामाजिक अध्यायनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची तथ्ये समोर आलीत. त्यातूनच अस्पृश्यतेच्या निर्मितीची गुंतागुंत स्पष्ट होते.

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!