महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

आटपाडी मध्ये डॉ.शंकरराव खरात साहित्य संमेलन ११जुलै२०२४

मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू, जळगाव,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,थोर साहित्यकार डॉ.शंकरराव खरात, साहित्य संमेलन आटपाडी मध्ये होत आहे,!

११जुलै२०२४

आयु,विलास खरात,

आटपाडी:9

डॉ.शंकरराव खरात यांचा जन्म माणदेशातील आटपाडी या गांवी दिनांक ११ जुलै १९२१ रोजी झालेला आहे. आटपाडी हे गांव त्याकाळी औंध संस्थानात होते. आटपाडी येथील लोकल शाळेमध्ये तारीख २१/०२/१९३१ रोजी इयत्ता १ लीच्या वर्गात घालण्यात आले. तारीख १८/०४/१९३३ साली इयत्ता चौथी पास झाले. इयत्ता चौथी नंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या शालेय जीवनास सुरवात झाली. इयत्ता ४ थी ते ७ वी च्या वर्गात असताना शाळेतील शिक्षकांनी चांगले शिक्षण देवून संस्कार केले होते.त्यामध्ये आटपाडीचे हणमंतराव देशमुख , श्री.कात्रे मास्तर , श्री.गोळेवडेकर सर, श्री.कुलकर्णी सर, श्री. देशपांडे सर श्री.पत्की सर , श्री.रायगांवकर सर यांनी त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून मौलाचे कार्य केले होते. शाळेचे हेडमास्तर म्हणून श्री.नाईक सरांनी शिक्षणाबाबत शाळेत शिस्त व दरारा ठेवलेमुळे व मार्गदर्शन योग्य तऱ्हेने केलेमुळे शंकररावावर शिक्षणाचे संस्कार झालेमुळे शिक्षणाचे महत्व समजले होते. त्यामुळे सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि परगांवाहून पत्र किंवा तार आलेवर वाचून घेणेसाठी समाज्यातील लोकांना काय अडचणी येतात हे माहित असलेमुळे शिक्षणाचे महत्व काय असते त्यांना समजले होते. म्हणून ते हायस्कूलच्या शिक्षणसाठी औंध येथे उंटाच्या मागून ६० ते ७० मैलाचे अंतर चालत गेले होते.
औंध येथील हायस्कूलच्या शिक्षणासाठी त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. अडी – अडचणी , हाल अपेष्ठा सहन करीत त्यांनी मॅट्रिकची परिक्षा ६०% मार्कानी पास झाले होते. कॉलेजच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. परंतु त्या वेळी “ डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ” डिपार्टमेन्टची स्कॉलरशिप मंजूर झालेमुळे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये अॅडमिशन घ्यावे लागले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापना केलेल्या “ युनियन बोर्डिंग ” मध्ये निवासाची व्यवस्था झालेली होती. कॉलेजच्या शिक्षणामुळे स्कॉलरशिपचा मोठा आधार होता.
युनियन बोर्डिंग सोडल्यानंतर लॉ कॉलेजला अॅडमिशन घेऊन एम.एल.बी.चे शिक्षण पुणे येथील गाडी तळ्याच्या जवळील झोपडपट्टीत राहून पूर्ण करीत असताना नातेवाईक गांवी निघून गेल्यामुळे पुन्हा ते “विद्या विकास वसतिगृहात” आसरा घेतला.वसतिगृहात राहून सन १९४७-१९४८ साली त्यांनी एल.एल.बी.ची परीक्षा पास झाले, वकिलीची सनद घेऊन सर्व सामान्य घटकातील लोकांना कायदेशीर न्याय मिळवून देऊ लागले.
डॉ. शंकरराव खरात यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात एक समाज्याचा जानता सुजान नागरिक या नात्याने अनेक प्रश्न सोडविण्यासाठी भाग घेतलेले दिसून येते. त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे, परिसंवाद आणि परिषदामध्ये भाग घेऊन सामाजिक व वैचारिक भूमिका कथन केलेली आहे. अनेक वर्तमान पत्रात अनेक विषयावर लेख प्रसिद्ध झालेले आहेत.
महामानव,डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी स्थापन केलेल्या शेड्युल्ड कास्टस फेडरेशनचा कार्यकर्ता म्हणून सन १९४८-१९४९ साली डॉ.शंकरराव खरातानी काम केलेले आहे. सन १९५४ साली शे.का. फेडरेशन या राजकीय पक्षाचे महाराष्ट्र संघटन सेक्रेटरी म्हणून काम करीत होते. महाराष्ट्रात ज्या राजकीय व सामाजिक चळवळी झालेल्या आहेत त्यामध्ये दलितांचे प्रश्न, झोपडपट्टीचे प्रश्न,तमाशा कलावंताचे प्रश्न, वेश्याचे प्रश्न, आदिवासी व भटक्या-विमुक्ताचे प्रश्न, कामगाराच्या चळवळी, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि भूमिहिनाच्या जमिनीच्या लढाईतील चळवळीत प्रामुख्याने भाग घेतला होता. त्या चळवळीतून आलेल्या अनुभूतीवरून सामाजिक विषमतेचा दाहक अनुभवाच्या व्यथा त्यांनी साहित्यात अंकित केलेल्या आहेत.
‘ नवयुग’ या साप्ताहिकाचे संपादक आचार्य अत्रे यांनी सन १९५६-१९५७ साली डॉ. शंकरराव खरात यांची पहिली कथा “ संतूची पडीक जमीन ” दिवाळी अंकात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर “नवयुग ” या साप्ताहिकामधून बलुतेदाराच्या जीवनावरील एकूण बारा कथा प्रसिद्ध केल्या होत्या,तसेच “माणुसकीची हाक” ही महार बलुतेदारावर लिहिलेली कादंबरी गाजली. त्यामुळे डॉ.शंकरराव खरात यांची लेखक म्हणून ओळख निर्माण झाली. यामध्ये आचार्य अत्रे यांचे योगदान आहे.त्यावेळी डॉ.शंकरराव खरात यांचे वय वर्षे ३५ (पस्तीस) होते. त्यांना आयुष्यात आलेल्या अनुभवावरून त्यांनी साहित्य लेखनाची वाटचाल सुरू केली होती. साहित्याच्या प्रवाहात स्वता:ची ओळख निर्माण केली होती. विशेषता:- परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या “ प्रबुद्ध भारत ” या मुखपत्राचे सन १९५८ साली कार्यकारी संपादक म्हणून काम पाहत होते.
डॉ. शंकरराव खरात यांनी मराठी साहित्यामध्ये मोठे योगदान दिले आहे. मराठी साहित्याच्या परिघावर अस्पृश्य समाज्याच्या व्यथा मांडून गाव कुसाबाहेरील अस्पृश्याच्या जगण्या- मरण्याच्या हयातीची वास्तविकता साहित्यातून मांडणी केली आहे. तराळ – अंतराळ या आत्मचरित्रात सामाजिक जीवनातील विषमतेचे चित्रण घडवणारे म्हणून अत्यंत लोकप्रिय ठरले आहे. दलितांवरील अत्याचार, सामाजिक विषमता सामान्यांच्या कथा- व्यथा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासातून प्रेरणा घेऊन त्यांनी सामाजिक, वैचारिक प्रबोधनकारी लेखन केले आहे. “तराळ-अंतराळ” या आत्मचरित्रास भारताचे राष्ट्रपती श्री. ग्याज्ञी झैलसिंग यांचे हस्ते पुरस्कार घेऊन सन्मान करणेत आला आहे. विशेषता:- परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास डॉ. शंकरराव खरात यांना लाभला होता.
डॉ. शंकरराव खरात यांनी विश्ववंदनीय डॉ.बाबासाहेब यांच्या वाड:मयाचा सखोल अभ्यास, वाचन, मनन , चिंतन करून डॉ. बाबासाहेबावर ग्रंथ लिहिण्याचे महत्त्वाचे कार्य केलेले आहे. डॉ.खरातानी लिहिलेले ग्रंथ:- १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा २) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक व राजकीय विचार ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मात्तर ४) डॉ. आंबेडकरांची पत्रे ५) डॉ.आंबेडकराच्या सहवासात असे ग्रंथ त्यांनी निर्माण केले आहेत. तसेच कुलगुरू, मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, छत्रपती शिवाजी विद्यापीठ , टिळक विद्यापीठ या शैक्षणिक संस्थांमध्ये राज्यपाल नियुक्त म्हणून महत्वाचे काम केले आहे. तसेच भारतीय विद्यापीठ पुणे येथे गर्व्हनिंग कौन्सिलच्या मंडळात सदस्य म्हणून कार्यरत होते. जिल्हा परिषदेच्या मसुदा समितीचे प्रमुख होते. अशा विविध शासकीय, निम शासकीय कमिटीवर प्रामुख्यानी त्यांचे योगदान आहे.
डॉ. शंकरराव खरात यांनी प्रचंड मराठी साहित्याची निर्मिती केली आहे, त्यांची मराठी साहित्य ग्रंथ संपदा खालील प्रमाणे :-
१) वैचारिक ग्रंथ – संपदा :- १) अस्पृश्यांचा मुक्तिसंग्राम २) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मात्तर ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे ४) महाराष्ट्रातील महाराजाचा इतिहास ५) गावकी, भावकी , गाव शिवार ६) सामाजिक चळवळीचा इतिहास ७) भटक्या विमुक्त जमाती व त्यांचा प्रश्न ८)पद – दलितांचा अस्पृश्यांचा मुक्तिसंग्राम ९) संतांची सामाजिक दिष्ट्री १०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार ११) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार १२) गांवचे आलुतेदार आणि बलुतेदार १३)अठराव्या शतकातील मराठा- कालखंडातील सामाजिक परिस्थिती श्री. छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला, पुष्प पहिले (छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) १४) दलितांचे शिक्षण १५) कार्ल मार्क्सचा भारतात पराभव का झाला ? (प्रकाशनाच्या मार्गावर).
२) कांदबरी :- १) झोपडपट्टी २) फुट पाथ नं.१ ३) हातभट्टी ४) मी मुक्त मी मुक्त ५) मसालेदार गेस्ट हाऊस ६) पारधी ७) टिनोपाल गुरुजी ८) टाऊट ९) मी माझ्यागांवाच्या शोधात १०) बन्याची दिंडी
३) कथा – संग्रह :- १) बारा बलुतेदार २) तडीपार ३) सांगावा ४) टिटवीचा फेरा ५) गांवशीव ६) आडगांवच पाणी ७) वारस ८) दौंडी ९) सुटका १०) मुलाखत ११) माझे नांव ? १२) लिलाव १३) देवदासी
४) ललित वाड:मय:- १) तराळ-अंतराळ (आत्मकथा) २) जागल्या (आत्मकथात्मक) ३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा ५) आज इथं उद्या तिथ ६) दलित वाड:मय प्रेरणा व प्रवृत्ती – हिंदी -अनुवाद:- तराळ -अंतराळ (आत्मकथा) व इंग्रजी अनुवाद (प्रकाशनाच्या मार्गावर)
५) पदवी :- महाराष्ट्र शासनाने “ दलित मित्र ” ही सन्माननीय पदवी दिलेली आहे.
६) डॉ.शंकरराव खरात यांना मिळालेले पुरस्कार :-
१) कोलकाता डॉ.भवाळकर पुरस्कार :- “ तराळ – अंतराळ” या पुस्तकाला राष्ट्रपती झैलसिंग यांचे हस्ते (कोलकत्ता)
२) यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संस्कृती पारितोषिक ( २५नोव्हेंबर१९९७).
३) ग्रामपंचायत आटपाडी मानपत्र.
४) श्रीमंत शाहू महाराज पुरस्कार, कोल्हापूर.
५) गवळी पुरस्कार, कोल्हापूर.
६) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कार (७ एप्रिल २००१)
७) टिळक पुरस्कार, राष्ट्रपती के.आर.नारायण यांचे हस्ते.

पारितोषिक व पुरस्कार मिळालेले ग्रंथ – तराळ- अंतराळ, सांगावा , तडीपार अस्पृश्यांचा मुक्तिसंग्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात.
डॉ.शंकरराव खरात यांना केंद्रशासन,राज्यशासन व निमशासकीय समिती वरील पदे:-
१) कुलगुरू, मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद
२) अध्यक्ष, अखिल मराठी साहित्य संमेलन जळगांव .१९८४
३) कार्यकारणी सदस्य :- महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे.
४) डायरेक्टर , बँक ऑफ इंडिया.
५) सदस्य , ऑफिसर्स सिलेक्शन कमिटी बँक ऑफ इंडिया.
६) चेअरमन, ऑफिसर्स सिलेक्शन कमिटी , बँक ऑफ महाराष्ट्र.
७) चेअरमन, रेल्वे सर्व्हिस कमिशन मुंबई.
८) सदस्य, पुणे विद्यापीठ सिनेट.
९) अध्यक्ष, शिक्षक निवड समिती जिल्हा परिषद.
अशा या विविध पदावर कार्य करून सर्वसामान्य लोकांना न्याय देऊन प्रगती पथावर आणणेचे कार्य केले आहे .
थोर साहित्यकार डॉ. शंकराव खरात “तराळ -अंतराळ ” या आत्मकथेत म्हणतात, “ माझा दलित समाज आज ही त्या गर्द अंधारातून बाहेर पडण्याची धडपड करीत असून अद्याप तो त्यातून बाहेर पडू शकला नाही. याचीच खंत त्यांच्या मनास अस्वस्थ करीत होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की, क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले आहे ते पूर्ण फिरल्या शिवाय सामाजिक परिवर्तन होणार नाही. असा प्रगल्भ आत्मविश्वास समाजास देत होते. अशा या थोर साहित्यीकांचे परिनिर्वाण ९ एप्रिल २००१ रोजी पुणे येथे झाले आहे.
त्यांच्या परिनिर्वाणाना नंतर त्यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यासाठी “डॉ.शंकराव खरात साहित्य प्रकाशन समिती ” स्थापन करण्यात आली होती या समितीत मार्गदर्शक म्हणून मा. भाई वैद्य , मा.ग. प्रधान सर , मा.डॉ. मोहन धारिया या विचारवंतांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १० ग्रंथ प्रकाशित करण्यात आले होते. परंतु अद्यापही अनेक ग्रंथाचे प्रकाशन झालेले नाही.
डॉ.शंकरराव खरात यांचे साहित्य एकत्रित रित्या संशोधनासाठी उपलब्ध व्हावे. यासाठी छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे डॉ. शंकरराव खरात साहित्य अध्ययन केंद्र शासनाने सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. दि.५ जून २००५ रोजी आटपाडी येथे साहित्यरत्न डॉ.शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी हे कार्यरत असून प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा म्हणून डॉ. शकुंतला शंकरराव खरात कार्यरत होत्या
डॉ. शंकरराव खरात यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे ११ व १२ जुलै २०२२ रोजी साहित्य संमेलन घेण्यात आले होते. सदर साहित्य संमेलनात माजी आमदार, आटपाडी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मा. राजेंद्र अण्णा देशमुख यांनी स्व :मालकीची एक एकर जमीन डॉ.शंकरराव खरात यांचे स्मारकासाठी देण्याचे जाहीर केलेले आहे त्यामुळे स्मारकाचा महत्त्वपूर्ण विषयी मार्गी लागला आहे.

.आयु,विलास खरात ,सचिव,

साहित्यरत्न डॉ.शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी ता.आटपाडी जि.सांगली महाराष्ट्र राज्य.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!