माईसाहेब आंबेडकर एक उपेक्षित आयुष्य……
मंगल मून
‘ रमाई ‘ आणि ‘ माई ‘ ( माईसाहेब ) बाबासाहेबांच्या आयुष्यात दोघीही पत्नीच्या भूमिकेत कमी आणि आईच्या भूमिकेतच जास्त प्रमाणात आपल्याला पहावयास मिळाल्या.त्यामुळे दोघींच्या प्रती सारखाच आदर असावा असे व्यक्तिशः मला वाटते.
रमाई विषयी आदर ठेवून मी माईसाहेबांबद्दल बोलते.माझे मत सगळ्यांना पटेलच असे नाही: परंतु सत्य परिस्थितीवर बोलल्या गेलं पाहिजे.धर्म , पंथ, जातीभेदाच्या पलिकडले जाऊन ज्यांनी समाज क्रांती घडवली, संपूर्ण राष्ट्राची उभारणी ही एकजातीय व एकसंघ स्वरूपाची असावी असे विचार असणा – या बाबासाहेबांना आपण पूज्यनिय मानतो, आमचा ‘ बाप ‘ म्हणतो. मग याच आपल्या बापाच्या पत्नीला ‘ आई ‘ म्हणून स्वीकारत नाही कारण आपण जातीतच बंदिस्त झालेलो आहोत.जातीच्या बाहेर येऊन आपण विचारच करू शकत नाही, म्हणून आपण सत्यही स्वीकारू शकत नाही.
माईसाहेब जातीने ब्राम्हण असणे हा काही त्यांचा दोष आहे का…? ब्राम्हण जातीवर असलेल्या रागामुळे आपण माईसाहेबांचे मोठेपण स्वीकारू शकलो नाही, ही सत्य परिस्थिती आहे.पुर्वीच्या काळी ब्राम्हणांनी आपल्या समाजाला हीन लेखले.वाईट वागणूक दिली म्हणून राग असणे साहजिक आहे.परंतु पुर्वी बाबासाहेबांना सुद्धा त्याच परिस्थिती मधून जावे लागले. किंबहूना त्याही पेक्षा जास्त त्रास सहन करावा लागला हे आपणास माहीत आहे. आपण सर्व बाबासाहेबांचे पाईक आहोत. त्यांच्या विचारसरणी नुसार वागणारे आहोत, त्यामुळे आपण घडून गेलेल्या गोष्टींवर ओरड करण्यापेक्षा बदलणा- या परिस्थितीनुसार बोलले पाहिजे. काळ बदलत जातो काळानुरूप आपणही बदलणे हा निसर्ग नियम आहे.पुर्वी आपल्या पुर्वजांनी जातीचे चटके सहन केले, तशी आता परिस्थिती राहिली नाही म्हणून पुढे जायचे असेल तर, त्याच – त्याच गोष्टींवर बोलणें, भाषणें करणे हे कुठे तरी थांबले पाहिजे.जाती- जातीत गटा – गटात बंदिस्त न रहाता चळवळीला एक व्यापक स्वरूप येणें ही काळाची गरज आहे.
धर्मापेक्षा माणूस मोठा असायला हवा.माणसाचे मोठेपण हे तो कोणत्या जातीत जन्मला यावरून न ठरवता ,त्यानी केलेल्या कामावरून त्याचे मोठेपण सिद्ध झाले पाहिजे.प्रत्येक जाती मध्ये चांगली – वाईट माणसे असतातच.एका वाईट वागणा- या माणसा मुळे संपूर्ण समाजाला दोष देणें बरोबर नाही.व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हटल्याप्रमाणे व्यक्तीच्या कर्मावर आणि वागणुकीवर त्याचे चांगुलण ठरवल्या जावे, त्याला जातीचा निकष लावू नये.
माता रमाई आणि माईसाहेब ह्या दोघीही बाबासाहेबांच्या ‘ सावली ‘ सारख्या सोबत होत्या. दोघींनीही बाबासाहेबांना जीवापाड जपले.दोघीनींही आपले आयुष्य बाबासाहेबांना समर्पित केले होते.रमाबाई जेंव्हा बाबासाहेबांसोबत होत्या तेंव्हाची त्यांची हलाखीची परिस्थिती होती.बाबासाहेब शिक्षण घेण्यासाठी बाहेर देशात रहात होते.बाबासाहेब तरूण होते परंतु पैशाअभावी गरीब होते.अशा परिस्थिती मध्ये माता रमाईने घरची संपूर्ण जबाबदारी स्वतः च्या खांद्यावर घेतली व बाबासाहेबाच्या कामात अडथळा न येऊ देता त्या एकट्याच हिम्मतीने लढत राहिल्या.
माईसाहेब बाबासाहेबांच्या आयुष्यात आल्यानंतर बाबासाहेब नेहरूच्या मंत्रीमंडळात मंजूर मंत्री म्हणून काम करत होते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती.मात्र शारीरिक स्थिती खूप खालावलेली होती.अनेक आजारांनी त्यांना घेरले होते, तेंव्हा या आजारातून सावरण्याचे काम एक डाॅक्टर आणि पत्नी म्हणून माईसाहेबांनी केले.
बाबासाहेबांना त्यांच्या दिन- दुबळ्या जनतेसाठी अहोरात्र झटून कामे करायची होती, आणि नेमके अशा वेळेसच त्यांना जडलेल्या अनेक आजारांमुळे त्यांची ताकद कमी होत चालली होती. माईसाहेब बाबासाहेबांची ताकद बणल्या.त्यांच्या आजारातच नव्हे, तर कामामध्ये सुद्धा जातीने लक्ष घालत होत्या.
अवघे नऊ वर्षाचे वैवाहिक आयुष्य माईसाहेबांच्या वाट्याला आले परंतु या नऊ वर्षात बाबासाहेबांनी नागपूरला हजारों अनुयायांना दिलेली बौद्ध धम्माची दीक्षा, औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना, भारताची राज्यघटना, ‘ बुद्ध आणि त्यांचा धम्म ‘ या ग्रंथाचे लिखाण हे जे महान कार्य केले आहे; या कार्यात पत्नी म्हणून एक काळजीवाहू डॉक्टर म्हणून माईसाहेबांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. अशा या दोन मातांचा स्मृतीदिन एकाच महिन्यात एका दिवसाच्याच फरकाने येतो.२७ मे माता रमाई आणि २९ मे माई. या दोघींच्याही महान कार्याला आणि त्यागाला त्रीवार नमन.विनम्र अभिवादन ????????
मंगल मून
औरंगाबाद
9822694825
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत