पद्मपाणी, वज्रपाणी आणि अवलोकितेश्वर आहेत कोण ?
संतोष पट्टेबहादूर
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी क्रमांक १ मध्ये पद्मपाणि यांचे चित्र आहे. या चित्रात त्यांनी पंकज (कमळ) हातात धरले असून मान थोडी एका बाजूला कलली आहे. जसे लोकांचे म्हणणे ते शांतपणे ऐकून घेत असावेत असे वाटते. तशीच प्रतिमा वेरूळ येथील लेणी क्रमांक ७ मध्ये आणि कान्हेरी लेणी क्रमांक ९० मध्ये आहे. या दोन्ही ठिकाणी प्रतिमेंच्या आजूबाजूस अग्नी, चौर्यकर्म, राक्षस, हत्ती, सिंह, सर्प, मर्कट आणि जहाज यांच्या प्रतिमा आहेत. ही आठ मोठी संकटे (अष्ट महा भय) दर्शविली असून त्याकाळी व्यापाऱ्यांना प्रवास करताना त्यांचे मोठे भय वाटत होते. म्हणून पद्मपाणी / अवलोकितेश्वर यांना पुजल्यास अष्ट महा भयापासून सुरक्षा प्रदान होते अशी धारणा तेव्हा प्रचलित झाली होती. आणि याच कारणामुळे सहाव्या शतकात बौद्ध महायान पंथाचे बोधिसत्व व्यापाऱ्यांच्या मार्गावर लेणीमध्ये, पाषाणावर आणि स्तूप कमानीवर कोरले गेले.
निब्बाण प्राप्त न करता बहुजनांचे कल्याण करीत राहणे अशी धारणा असलेला बोधिसत्व गांधार संस्कृतीतून तिसऱ्या शतकात उदयास आला असावा. हाती कमळ धारण केलेल्या या पद्मपाणि बोधीसत्वाची प्रतिमा नेहमी शस्त्र धारण केलेल्या वज्रपाणी बोधिसत्व प्रतिमेबरोबर दिसून येते. पद्मपाणि हा सुखाची भरभराट करणारा सुखकर्ता होता तर वज्रपाणी हा दुःखाचा नायनाट करणारा दुःखहर्ता होता म्हणजेच सुरक्षा देणार होता. बुद्धांच्या मूळ तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध असलेली ही धारणा त्याकाळी जनमनात विशिष्ट वर्गाने रुजवत नेली. लोभ, मोह, आसक्ती असे विकार नष्ट करून दुःखमुक्त होण्याचा बुद्धांचा मार्ग होता. परंतु बोधिसत्वाच्या पद्मपाणी, वज्रपाणी आणि अवलोकितेश्वर प्रतिमांनी विकारांना दूर करण्याऐवजी सुरक्षा प्रदान करण्याचा मंत्र दिला. ध्यान, चिंतन, मनन ऐवजी बोधिसत्वाच्या करुणेला महत्त्व प्राप्त झाले.
सहाव्या शतकात हाती कमळ असलेल्या पद्मपाणी बोधिसत्वाचा प्रसार दक्षिण भारतातून आग्नेय देशांत जीवन सुरक्षित राखणारा बोधीसत्व म्हणून समुद्री व्यापाऱ्यांनी केला. अवलोकितेश्वर या लोकप्रिय बोधिसत्वाचा उगम यातूनच नंतर झाला. करुणेमुळे लोकांची अनेक दुःख ग्रहण केल्याने त्यास अनेक भुजा आणि डोकी प्राप्त झाली. म्हणूनच कान्हेरी लेणींमध्ये ११ शिरांचे अवलोकितेश्वराचे शिल्प आढळते. १४०० वर्षांपूर्वी महायान पंथात असा बदल व्यापारी आणि श्रेष्ठी वर्गामुळे झाला. म्हणूनच एकेकाळी बुद्धिझम हा सागरी व्यापारांचा मुख्य धर्म होता असे म्हटले जाते. याचा पुरावा म्हणजे प्राचीन व्यापारी मार्गांवर स्थापित झालेली बौद्ध संस्कृतीची ठिकाणे होय.
अनेक प्राचीन बौद्ध संस्कृतीच्या स्थळी बुद्धांच्या गोष्टी कोरलेल्या दिसून येतात. काही ठिकाणी बुद्धांच्या शिल्पा बरोबर अनेक भुजा असलेल्या बोधिसत्वांची शिल्पे देखील दिसतात. अनेक ठिकाणी अवलोकितेश्वर शिल्पांच्या डोक्यावरती बुद्धांच्या प्रतिमा दिसतात. ती नुसतीच बुद्ध प्रतिमा नसून महायान पंथातील अमिताभ बुद्धांची प्रतिमा आहे, ज्याचे वास्तव्य वेगवेगळ्या स्वर्गलोकी असते असे मानले जाते. कान्हेरी आणि वेरूळ लेण्यांमध्ये अवलोकितेश्वरांचे स्त्री रूप पहायला मिळते. त्याला तारा असे देखील संबोधले जाते. बुद्ध धर्मातील महायान पंथात असे बदल बुद्धांच्या नंतर एक हजार वर्षांनी झाल्याचे दिसते. ओरीसातील रत्नागिरी विहारात आठव्या शतकातील तारा देवतेचे शिल्प असून तिथून तीचा प्रसार बंगाल, तिबेट, चीन येथे झाला. बंगालमधील दुर्गा तिचेच उग्र रूप आहे आणि चीनमध्ये अवलोकितेश्वराचे स्त्री रूप गुन्याण देवता म्हणून पहायला मिळते.
अशा तऱ्हेने आज आपण पहात असलेल्या इतर धर्मातील अनेक देवी-देवतांचा उगम हा महायान पंथातील बोधिसत्वांच्या प्रतिमेवरून झाल्याचे दिसते. त्यावर पौराणिक कथा लिहून पिढ्यानपिढ्या समाज मनावर त्याचे दृढ संस्कार केले गेले आहेत. आज पद्मपाणी बोधिसत्वाचे शिल्प हे विष्णु म्हणून पुजले जात आहे. शस्त्रधारी वज्रपाणी याचे रूपांतर उग्र महादेवात झाले आहे तर अवलोकितेश्वर अनेक डोकी आणि भुजांमुळे ब्रह्मदेव म्हणून ओळखला जात आहे. काय सांगावे, अजून हजार वर्षानंतर अनेक नवनवीन देवीदेवता तयार होतील. पण हे मात्र खरे की, या पृथ्वीवर मानव असेपर्यंत भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान त्रिपिटकाच्या रूपाने मानवाचे कायम कल्याण करीत राहील.
✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत