म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो.!
अरुण निकम,
मागील आठवड्यातील शुक्रवारी मध्यरात्री एका व्यक्तीने नाशिक मधील काळाराम मंदिर परिसरातील सत्याग्रह चौकाच्या वस्तीतील परिसरात, मध्यरात्री दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पत्रके टाकून पळ काढला. शनिवारी सकाळी लोकांना समजल्यानंतर खळबळ उडाली. ती बातमी नाशिक शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्याच्या निषेधार्थ नाशिकमधील सर्व आंबेडकरी संघटनांनी एकत्रितपणे काळाराम मंदिराच्या परिसरात जमून घोषणाबाजी करीत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे वातावरण तंग झाले. संबंधित दोषी व्यक्तीला ताबडतोब अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जमावाने पोलीस प्रशासनाकडे केली. त्या संदर्भात माझा दैनिक वृत्तरत्न सम्राट मध्ये संयमित आंदोलन केल्याबद्दल नाशिकमधील आंबेडकरी संघटनांचे अभिनंदन करणारा लेख आला होता.
त्या संदर्भात पोलिसांनी असे सांगितले आहे की, या गुन्ह्यामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याने ही बोगस पत्रके प्रेम प्रकरणातील वैमनस्यातून सूड घेण्याच्या हेतूने संबंधिताला तसेच त्याच्या कुटुंबीयांना त्रास होण्याच्या कुटील हेतूने टाकल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुढे त्यांनी असे ही सांगितले की, अध्याप तपास पूर्ण झाला नसून, चौकशीचे काम सुरू आहे. नाशिक पोलिसांनी ज्या तत्परतेने 24 तासाच्या आत पत्रके टाकणार्या व्यक्तीचा छडा लावून त्याला जेरबंद केले व त्यामुळे पुढील अनर्थ टळला त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.
परंतु पोलिसांकडून गुन्ह्याचे जे कारण सांगितले गेले आहे, त्याचा विचार करता मनात कुठे तरी शंकेची पाल चुकचुकते. कारण आतापर्यंत अशा प्रेम प्रकरणांमध्ये थेट भांडण, हल्ला, प्रतिहल्ला, किंवा पोलिसांत तक्रार करणे असे प्रकार घडले आहेत. परंतु अशा प्रकारची दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याची अभिनव पद्धत पहिल्यांदाच घडल्याचे दिसले. त्या दृष्टीकोनातून विचार केल्यास पहिली शंका अशी येते की, तीन चार वर्षांपूर्वी बंद पडलेल्या हिंदु युवा वाहिनी ह्या संघटनेची कोरी लेटर हेड अटक केलेल्या व्यक्तींकडे कशी आली? तसेच हिंदु युवा वाहिनीच्या पत्रकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कसा असू शकतो ? सध्या समाजा समाजामध्ये वाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या पत्रकात पिवळ्या झेंड्याचा उल्लेख का केला आहे? आणि सगळ्यात गंभीर गोष्ट अशी आहे की, संबंधित तरुण बौद्ध समाजाचा असल्याचे कळते. ही गोष्ट काही केल्या मनाला पटत नाही. कारण जो बौद्ध समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जगामध्ये सर्वश्रेष्ठ देवतुल्य मानतो. अशा समाजाच्या तरुणाकडून असे कृत्य घडले हे काही केल्या गळ्याखाली उतरत नाही.
माझ्या मनात शंका येण्याचे अन्य कारण असे ही आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये धार्मिक उन्माद सुरू आहे. एका विशिष्ट जातीला कल्ला करून टार्गेट केले जात आहे. त्यामुळे देशातील आप पर भाव कमालीचा वाढला आहे. देशात अविश्वासाचे कलुषित वातावरण तयार झाले आहे. हे काम काही धर्मांध शक्ति योजनापूर्वक करीत असल्याचे दिसते. त्यामुळे धार्मिकतेने राजकारणावर घट्ट पकड बसवली आहे. त्यातून पद्धतशीरपणे धर्मद्वेष पसरविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. त्यात सनातनी आणि प्रतिगामी शक्तींच्या धार्मिक उन्माद करणार्या जातीयवादी शक्तींची पिछेहाट झाली. महाराष्ट्रात तर त्यांचा जिव्हारी लागण्याइतपत पराभव झाला. तसेच ह्या निवडणुकीत संविधान बदलू पाहणार्या राजकिय पक्षाविरुद्ध बौद्ध समाजाने एकगठ्ठा मतदान केल्याचा बोलबाला आहे. अशा वातावरणात लवकरच विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने बौद्धांना टार्गेट करण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग तर नाही ना? अशा शंकेला वाव आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्विकारला. ती जखम अध्यापपर्यंत सनातनी लोकांच्या मनात भळभळत आहे. ह्याचे कितीतरी दाखले देता येतील.
त्यामुळे राज्यात मुस्लिमां बरोबर बौद्धांना टार्गेट करण्याचा हा प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ह्या प्रकरणामुळे माझ्या मनात एक वेगळीच भीती तरळून गेली आणि ती म्हणजे पुढील काळात जातीयवादी शक्तींकडून ह्याचा मोठा गैरफायदा घेण्याच्या दृष्टीने वापर केला जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात मुस्लिम दहशतवाद्यांवर ठपका ठेवण्यात आला होता परंतु नंतरच्या काळात ए. टी. एस. प्रमुख हेमंत करकरे ह्यांच्याकडे तपासाची सूत्रे गेल्या नंतर त्याचे धागेदोरे कुठपर्यंत निघाले आणि त्यांनी कुणाकुणाला जेरबंद केले हे जगजाहीर आहे. म्हणुन मला त्याचा सविस्तर उहापोह करण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे पुढील काळात बौद्ध समाजाशी निगडित अनिष्ट घटना घडल्यानंतर, सनातनी प्रवृत्तींना ” हे तुम्हीच केले आहे आणि आमच्यावर आरोप करता काय ?” असे सर्रास उत्तर देण्यास .वाव मिळणार आहे.
ह्या सर्व परिस्थितीचा विचार करता मला असे वाटते की, पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे ह्याचा पुढील तपास ते करतीलच. परंतु पोलिसांवर राजकिय दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा मी पोलिसांवर अविश्वास दाखवित नाही. परंतु ही वस्तुस्थिती आहे.
म्हणुन मी सर्व आंबेडकरी पक्ष, विविध गट , संघटना ह्यांना आवाहन करतो की, ह्या सर्व प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशां मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी कुठल्याही प्रकारचे आंदोलन न करता सनदशीर मार्गाने करण्यात यावी. जेणेकरून सत्य समोर येऊन गुन्हेगारास कडक शिक्षा होण्याच्या दृष्टीने मदत होईल. मग भले तो कुणीही असू देत.
जयभीम.
अरुण निकम,
9323249487.
मुंबई.
दिनांक 27/06/2024.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत