पारध्याचे तित्तर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला धर्मांतर करून आम्हाला तथागताच्या ओटीत टाकले. आमचा पुनर्जन्म झाला. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय या मानवी मूल्यांची ओळख झाली. मानवतेचा महामंत्र घेऊन नागपूर दिक्षा भूमिवरून परतलेल्या नवतरुण गावी परतताच ताठ मान करून जगू लागली. गावकी सोडली जोहार सोडला, येसकरकी सोडली, बोन्दा खोदने सोडले. महारवाड्याचे बुद्धवाड्यात रूपांतर झालेले पाहून अख्या गावाला नवल वाटले. जरी झोपडेच असले तरी घराघरात तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा विराजमान झाल्या. बोलण्या चालण्यात बदल झाला उपासतपास, देवपूजा, लग्नविधी सारं काही बदलून गेले. हा सारा बदल खेड्यापाड्यातील रूढी परंपरेला, जातीव्यवस्थेला सुरुंग लावणारा ठरला. याच कारणामुळे गावागावातून बौद्ध समाज जातीवाद्यांच्या अत्याचाराचा बळी ठरला. पोचिराम कांबळे हा मातंग समाजाचा स्वाभिमानी क्रांतियोद्धा जयभीम म्हणू लागला. आमचा बाजीराव गुमडे 16-17 वर्षाचा हा मातंग पोरगा गावोगावी भाषण देत फिरू लागला. त्याच्या भाषणात एक गीत नेहमी असायचे
हमे भीम बाबा, बताते यही
सर कटाते मगर, सर झुकाते नाही
गावोगावी जयंतीचे सोहळे होऊ लागले कार्यकर्ते जिवतोड मेहनत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश मनामनात पेरू लागले. वामन दादा कार्डक, आत्माराम साळवे यांची क्रांतिकारी गीते गाऊन कवी गायकांनी चळवळीला गती देण्याचा प्रयत्न करू लागले. आत्मभान, स्वाभिमान जागृत झालेली माणसे कोणापुढे न झुकता स्वकष्टाने आपली उपजीविका करू लागले. आत्मभान जागृत झालेला समाज वाड्या साठी अडचणीचा ठरत चालला होता. बौद्ध समाजाने देव धर्म सोडला. लग्न समारंभात फुकट रबणारी माणसे आता मिळेनात.मुलं शाळेत जात असल्यामुळे वाड्यावरची गुरे ढोरे चरण्यासाठी मुलं मिळेनाशी झाली. मोठी माणसे शहरात जाऊन नवीन रोजगार शोधू लागली. मालकाच्या शेतीवर काम करण्यासाठी सालगडी मिळेनासे झाले. त्यामुळे गावागावत बौद्ध समजविषयीं रोष निर्माण झाला
नामांतराच्या लढ्यात अख्खा मराठवाडा होरपळून निघाला होता. पोचिराम कांबळेची शहादात तरुणाईला लढण्यासाठी प्रेरित करीत होती. अन्याय, अत्याचारच्या विरोधात कार्यकर्त्यांचे मोर्चे, आंदोलन सुरु होती..आदमपूर ता. देगलूर येथील एक कार्यकर्ते नारायण हतगाले हे देगलूर तालुक्यातील मोर्चे, आंदोलनातील एक आघाडीचे नाव… तालुक्यातील अनेक गावातून जयंतीच्या निमित्ताने भाषणे देणे, अत्याचारच्या विरोधात तहसीलदार देगलूर यांना निवेदन देणे, गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करणे या कामी ते धावून जात. बोलणे, चालणे राहणीमान अगदी साहेबांसारखे त्यामुळे सारा गाव त्यांच्यावर जळत होता. कायद्याचा अभ्यास असल्यामुळे ते अनेकांना कायद्यापुढे झुकण्यास मजबूर केले होते.
गावातील बडी बडी मंडळी त्याच्यावर दात खाऊन होती… संधी शोधत होते. सारा बौद्धवाडा एकजूट असल्यामुळे संधी सापडत नव्हती…..
मात्र आमचा मल्हारी म्हणजे आमच्यातला बिभीषण. घर का भेदी. सारा बौद्धवाडा एका बाजूला आणि मल्हारी एका बाजूला. बौद्धवाड्यात काय चाललंय याची खडाणखडा माहिती वाड्यावर द्यायचा…
एकेदिवशी मल्हारी फाट्यावरून एकटाच येत असल्याचे पाहून मालकाने त्याला गाठले. पैसा, शेती वगैरे चे अमिश दाखवून नारायणला पकडून देण्याविषयी गळ घातली… भावकीत अनेक ठिकाणी बेबनावं असतो तसा इथे ही होता…. त्याचा फायदा मालकाने घेतला… सर्व कट कारस्थान ठरले. ठिकाण, वेळ ठरली…
कधी न बोलणारा मल्हारी अलीकडे फारच गोडी गुलाबीने वागू लागला… दिवस रात्र नारायण सोबत राहू लागला. नारायणला वाटले बरे झाले एक पाठीराखा भाऊ मिळाला… त्याच्या हिमतीवर नारायण बिनधास्त वावरू लागला. काही कामानिमित्त नारायणचे नेहमी नांदेडला जाणे येणे असायचे. काम आटोपून तो सूर्यास्तापूर्वी घरी येत असे. कधी उशीर झालाच तर तो फाट्यावर उतरून चालत न येता सरळ देगलूरला जाई. लॉज वर मुक्काम करून सकाळी घरी येई….
एके दिवशी कलेक्टर ऑफिसला काही कामानिमित्त नारायण नांदेडला आला असता त्याच्या सोबत मल्हारीही आला होता … दिवसभर काम करून चार वाजताच्या बसने गावी जायचे. पण मल्हारीच्या मनात आज काही वेगळाच डाव होता. तो विनाकारण अढे वेढे घेत चार वाजतची बस चुकविली.. आता सात वाजताची बस… फाट्यावर दहा वाजता जाणार. अंधार पडलेला असणार म्हणून नारायण म्हणाला, “
भाऊ आजची रात्र इथेच नांदेड ला लॉज वर थांबू. उद्या सकाळी गावी जाता येईल. “
यावर मल्हारी म्हणाला, ” अरे दादा कशाला भीतोस तू. हा वाघासारखा भाऊ तूझ्या पाठीशी असताना? तुला कोणाची भीती वाटते? कोणी आलाच तर त्याचा मुकाबला करायला मी आहे ना. तू बिनधास्त रहा “
भावाने दिलेली हिम्मत नारायणच्या मनातील रुख रुख घालविण्यास उपयोगी पडली. तो बेसावध राहिला. संध्याकाळी सात वाजता गाडी लागली… दोघे बसमध्ये बसले…काळोखा अंधार चिरत भरधाव वेगाने बस देगलूरकडे निघाली. काळोख्या अंधारात कोणते गाव आले हे काही समजत नव्हते… उतारू प्रवाशी मात्र आपापल्या स्थानकावर बरोबर उतरत होते. रात्री साडे – दहाच्या सुमारास बस आदमपूर फाट्यावर आली. बस थांबताच मल्हारी उतरण्याची घाई करू लागला… बाहेर काळा कुट्ट अंधार होता. नारायण म्हणाला, ” भाऊ अशा अंधारात घरी जाण्यापेक्षा सरळ देगलूरला जाऊ. उद्या सकाळी घरी जाता येईल. “
पण मल्हारीचा प्लॅन ठरलेला होता.. त्याने नारायणचा हात धरून खेचत म्हणाला, “मी आहे ना. तुला कोणाची भीती वाटते? कोणी आलाच तर पाहिलं मला खाईल नंतर तुला…. चल.. दहा पंधरा मिनिटात घरी पोहचतो “
इच्छा नसतानाही नारायण मल्हारी वर विश्वास ठेऊन निघाला. यापूर्वी तो अशा अंधारात कधीच आलेला नव्हता. रातकीड्यांची किरकिर चालू आहे. अमावशेचा अंधार असल्यामुळे जवळचेही काही स्पष्ट दिसत नव्हते….. अर्धा किलोमीटर चालून झाल्यावर मल्हारी लघवी करतो म्हणून बसला अन गायबच झाला… नारायणने आवाज दिला, “शंकर, शंकर “
शंकरचा काही पत्ताच नाही. एवढ्यात सात – आठ मुस्टंडे समोर उभे… त्यांनी तलवारी घेऊन नारायणला घेरलं.नारायण म्हणाला, “मल्हारी काय केसाने गळा कापला गा, एवढा विश्वासघात करशील असे वाटले नव्हते “
त्या मारेकऱ्यांनी नारायणला पकडून हात पाय बांधले..रस्त्यापासून थोडं दूर जाऊन एकाने तलवारीने नारायण चा मनगटातून हात तोडला. अचानक वीज कोसळवी तसे झाले नारायण चक्कर येऊन धाडकन जमिनीवर कोसळला.
तासभरानंतर तो शुद्धीवर आला… पाणी.. पाणी म्हणू लागला… नशेत चुर्र असलेले मारेकरी म्हणाले “जयभीमवाला पाणी मागतंय मुता रं कोणीतरी त्याच्या तोंडात. बिचारा तानेजलाय “
एकाने आदेशाचे पालन केले. केविलवाना जीव तळमळत होता. एवढ्यात दुसरा हात कोपरातून तोडला….. नारायण ओरडला ” मान कापून टाका रं माझी “
पण मारेकऱ्यांना तडफडून मारायचे होते ते कसे त्याचा एकदम जीव घेतील….?
जयभीम म्हणतो का?
भासन करतो का?
सायबावनी कापडं घालतो का?
पोरं साळत घाला म्हणतो का?
असे शेकडो सवाल त्या असाहाय जीवाला विचारले जात होते. शुद्धीवर असेल तर नारायण ने उत्तरे दिली असती… एक एक प्रश्न विचारून एक एक घाव घातला जात होता.. रात्री बारा एक वाजताच्या समारास दोन्ही पाय एकदा घोट्यातून एकदा गुडघ्यातून तोडण्यात आले…. दारू संपली होती नशा उतरू लागली तसे दोन, तीन वाजण्याच्या सुमारास डोके धडापासून अलग केले गेले.. एका एका झुडपात एक एक आवएव फेकून देण्यात आला.मांजरा नदीच्या पात्रत घोंगड्यात गुडाळून धड फेकून दिले…..डोक मालकाच्या पायरीला पुरलं आणि एका भीमसैनिकाचा शेवट झाला…..काही दिवसांनी नारायण बेपत्ता आदल्याचा रिपोर्ट पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला… कुटुंबातील लोक शोधा शोध करून थकले पण काहीच सुगवा लागला नाही. एके दिवशी भोई मासे पकडण्यासाठी नदीत जाळे टाकतात तर काय प्रेत त्यांच्या जाळ्यात अडकले… पोलिसांना बातमी देण्यात आली. तपासाचे चक्र फिरू लागले. पोलिसांनी सर्व आरोपी शोधून काढले पण सबळ पुराव्या अभावी सर्वांची सुटका झाली… मात्र सारे देशोधडीला लागले… मल्हारी तर पागल झाला… शेवटचे पाच सहा वर्ष तर तो मागून खात फिरला… सडून सडून मेला…
आपलाच माणूस घरभेदी असतो ... पारधी एक तित्तर पोसतो. त्याला प्रशिक्षण देतो आणि शिकारीला गेल्यानंतर ते तित्तर ओरडते. जंगलातल्या इतर तितरांना वाटते आपलाच जातिबांधव आहे म्हणून ते त्याच्याकडे येतात आणि पारध्याच्या जाळ्यात अडकतात.... सच्च्या आंबेडकरवाद्यांनो हरिजन तित्तरापासून सावध रहा. ते कधी तुम्हाला वाड्यावर घेऊन जातील आणि तुमची कंदुरी करतील याचा नेम नाही... अलीकडे वाड्यावरच्या वफादर सालगड्यांची तुकड्याच्या लालसेपोटी कोल्हेकुई चालू आहे.. आपली झोपडी मोडून ते मालकाच्या वळचनीला जाण्यासाठी अतूर झालेले आहेत.... सावधान!!!!!
गणपत गायकवाड नांदेड
9527881901
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत