महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
चळवळीचा व्यापक पट: ‘परिवर्तनवादी चळवळी: चिंतन आणि प्रबोधन’-डॉ.प्रतिभा जाधव
कवी,समीक्षक, चिंतनशील लेखक व आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून सुरेश साबळे सुपरिचित आहेत. ‘परिवर्तनवादी चळवळी चिंतन आणि प्रबोधन’ असे शीर्षक असलेल्या त्यांच्या ग्रंथाचा कालिकपट मांडताना ते म्हणतात, ‘आधुनिक काळातील माणसांची मांडणी महात्मा बुद्धांच्या तत्त्वज्ञानांमधून उगम पावते. ज्योतिराव फुले यांच्या चळवळी मार्गाने पुढे जात तिचे शेवटचे टोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र लढ्यात, चळवळीत येऊन मिळते अशा या व्यापक पटांची विषयानुगामी मांडणी ग्रंथात आहे.’ ग्रंथाच्या पहिल्या भागात सुरेश साबळे यांनी विविध परिवर्तनवादी चळवळींचा वेध घेतला आहे. हा वेध घेताना त्यांनी तथागत बुद्धांपासून स्त्री, मुस्लिम आणि शिवधर्मालाही स्पर्श केला आहे.दुसऱ्या विभागात आंबेडकरी प्रेरणेच्या कलात्मक विश्वाचे चिंतन केले आहे तर तिसरा विभाग हा आंबेडकरी विचार ज्यांनी खळाळत्या नदीप्रमाणे प्रवाहित केले अशा जलसा, परिषदा, वृत्तपत्रे, प्रचार इ. प्रबोधन प्रधान यंत्रणांचा परिचय करून दिला आहे.
‘परिवर्तनवादी चळवळी चिंतन आणि प्रबोधन’ या पुस्तकासाठी रवींद्र इंगळे चावरेकर (ज्येष्ठ भाषा संशोधक, साहित्यिक) यांनी पाठराखंण केलेली आहे. त्यात ते लिहितात की, या ग्रंथातील लेखांचा एक-एक विषय हा एका स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे. वैदिकेत्तर व्यवस्था कायम संघर्षरत असूनही आपल्या प्राचीन इतिहासाचा सार्थ अभिमान बाळगण्यात अपयशी का ठरते? त्याचा विचार केल्यास वैदिकत्तर व्यवस्थेप्रमाणे वैदिकेत्तर चळवळीच्या कार्यकर्तृत्वाच्या नोंदी व त्याचे दस्तऐवजीकरण करण्यात वैदिकेत्तर नेहमीच कमी पडतात. परिणामतः वैदिकेत्तर सतत चळवळ करीत असूनही या चळवळींचा इतिहास भावी पिढ्यांना उपलब्ध होत नाही. सुरेश साबळे यांनी घेतलेल्या या समकालीन चळवळीच्या नोंदी पुढच्या पिढ्यांसाठी समर्थ इतिहासाची भूमिका पार पाडतील याविषयी शंका नाही.’
सुरेश साबळे यांचा ‘परिवर्तनवादी चळवळी चिंतन आणि प्रबोधन’ हा ग्रंथ अनेक विषयांची मूलभूत मांडणी करताना दिसतो. भाई बागल, केशवराव विचारे, मुकुंदराव पाटील, भास्करराव जाधव, प्रबोधनकार ठाकरे, आनंद स्वामी, रा. ना.चव्हाण, नागनाथ अण्णा यांच्यापासून थेट अलीकडचे रायभान जाधव, व्यंकटराव रणधीर, अॅड.शेळके यांच्यापर्यंतच्या सत्यशोधकांच्या पिढ्यांची यथार्थ नोंद सुरेश साबळे यांनी आवर्जून घेतलेली आहे. कम्युनिस्ट, सत्यशोधक, शिवधर्म, मराठा महासंघ अशा अनेक केंद्रात परिवर्तनाची चळवळ विभागल्याचे वास्तव अनेक वादाच्या संदर्भाने सुरेश साबळे मांडू पाहतात.
‘प्रत्येक परिवर्तनवादी प्रामाणिक हवा’ या सूत्रावर साबळे यांचा भर दिसतो. कारण एखादा सुधारक आजच्या काळात परिवर्तनवादी असतो पण नंतरच्या काळात तो अडसर बनण्याचा धोका संभवतो अशी वास्तविकता सच्चेपणाने त्यांनी नोंदवलेली आहे. सदर ग्रंथास डॉ. श्रीपाल सबनीस (माजी अध्यक्ष, ८९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण चिंतनशील प्रस्तावना लिहिलेली आहे. ते लिहितात की, ‘आंबेडकरी केंद्राच्या सभोवताली या पुस्तकातील लेखांची सुंदर गुंफण झालेली आहे. या लेखांचे संदर्भमूल्य त्यामुळे वाढले आहे. कामगार चळवळी, आणि वऱ्हाडी भाषेचे विषयही सुटे सुटे महत्त्वाचे ठरत असले तरी ग्रंथाची मूळ नाळ आंबेडकरी प्रबोधनाचीच असल्याचे वारंवार सिद्ध होते. ज्योतीराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांची नाळ बंगाल, ओरिसा, बिहार, मध्य प्रांताच्या प्रबोधन चळवळीशी जुळल्याचे मत लेखक मांडतो. या संदर्भाने सत्यशोधक पुनरुज्जीवन करण्याची त्यांची भूमिका आहे. जातीव्यवस्थेला मूठमाती देण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची यादी या लेखनात सन्मानित झालेली आहे.’
‘प्रबोधनाचा आंबेडकरी तत्वविचार’ अशा शब्दांत ज्येष्ठ लेखक- अनुवादक अरविंद सुरवाडे या लेखनाचा उल्लेख करताना लिहितात की, ‘या संग्रहातील अनेक लेखांचे लेखन संशोधक वृत्तीने झालेले आहे. विषयाचे सत्यान्वेषण करून त्याचा अन्वयार्थ लावत भाष्य करण्याची साबळे यांची शैली एखाद्या अकादमिक पार्श्वभूमी असलेल्या संशोधकाच्या तोडीची आहे.’ साहित्य, समाज, संस्कृती प्रबोधनाच्या विविध चळवळी याविषयीचे प्रश्न वस्तुस्थि, दुरावस्था, त्यावरील उपाययोजना याविषयीचे समग्र चिंतन सदर ग्रंथात दिसून येते. सदर ग्रंथात एकूण ११ अभ्यासपूर्ण असे लेख आहेत; जे आपल्याला चिंतनशील,अंतर्मुख करतात, विचारक्रियेला चालना देतात. भाग १ मध्ये ‘समाज’ या शीर्षकाखाली बुद्ध सिद्धांतातील सद्धम्माविषयीचे चिंतन, नैतिक मूल्यांचे संवैधानिक शिक्षण देणारा बौद्धधम्म, सत्यशोधक समाज: शोध आणि बोध, मानव कल्याणकेंद्री बहुआयामी आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी चळवळीने सावरणे काळाची गरज, भीमशक्ती शिवशक्तीच्या युतीची राजकीय भूमिका, शोषित स्त्रियांच्या विकासासाठी, भारतीय मानस: मुस्लिम समाज, भटके-विमुक्त-आदिवासींच्या विकास वाटा, मानसिक व सामाजिक परिवर्तन आणि शिवधर्म, भारतीय संविधान: संविधान संस्कृती आणि समाजपरिवर्तनातून राष्ट्र विकास ह्या लेखांचा अंतर्भाव आहे.
भाग २ मध्ये ‘साहित्य’ह्या शीर्षकाखाली आंबेडकरी प्रेरणेच्या साहित्य चळवळीची वाटचाल, आंबेडकरवादी रंगभूमी आणि सामाजिक बांधिलकी, विद्रोहाची सजग जाणीव: आंबेडकरवादी कवयित्रींचे काव्यलेखन, मराठी साहित्यामध्ये वऱ्हाडी भाषेचे योगदान, अस्मितादर्श: वाङमयीन आणि सांस्कृतिक चळवळ, फुले-आंबेडकरी साहित्य-सांस्कृतिक चळवळीतील बुलढाणा जिल्हा हे लेख आहेत तर भाग ३ मध्ये ‘प्रबोधन’ या शीर्षकाखाली समाजप्रबोधनाची चळवळ ‘सत्यशोधक जलसा’, सामाजिक प्रबोधनाचा सांस्कृतिक अविष्कार: आंबेडकरी जलसा, समाज विकासाची प्रेरणाभूमी; माणगाव परिषद, मराठी वृत्तपत्रसृष्टीतील पाक्षिक: ‘मूकनायक’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जागतिकीकरण आणि भारतातील कामगार विश्व, महाराष्ट्रातील कामगार चळवळी, व्यापक सामाजिक संदर्भ लाभलेली डॉ. बाबासाहेबांची बुलढाणा जिल्हा भेट अशी लेखयोजना आहे.
एकूणच आज चळवळीला काय गरजेचे आहे? चळवळ कोणत्या दिशेने जावी? आज कसली निकड आहे? या संदर्भात लिहिलेले हे लेख प्रत्येक काळात महत्वाचे ठरावेत असे आहेत. समाज आणि माणूस भयभीत अवस्थेतून प्रवास करताना बुद्ध धम्माचे चिंतन केंद्रीय ठेवून नैतिक मूल्यांवर चर्चा करत मनशांतीसाठी सांप्रतकाळात माणसाचा प्रवास सुखकर शांतीमय व्हावा या अंगाने झालेले हे लेखन आहे. बुद्ध-फुले-आंबेडकर ह्या विचारमार्गाने अर्थात वैज्ञानिक आणि विवेकवादी चळवळीतूनच आजची अशांतता थांबवता,थोपवता येईल यावर लेखकाने दाखवलेला विश्वास सार्थच आहे.
डॉ. प्रतिभा जाधव, नाशिक
pratibhajadhav279@gmail.com
आज रविवार दि.१६ जून २०२४ रोजी दैनिक गावकरी रविवार विशेष आस्वाद पुरवणीत पुस्तक परीक्षण सदरातील आजचे परीक्षण????
पुस्तक- परिवर्तनवादी चळवळी:चिंतन आणि प्रबोधन (वैचारिक लेखसंग्रह)
लेखक-सुरेश साबळे
प्रकाशन वर्ष-२०२१
मुखपृष्ठ-श्रीधर अंभोरे
मूल्य- रु. 300
एकूण पृष्ठ-२१२
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत