सुप्रसिद्ध नाटककार आदरणीय प्रा. दत्ता भगत सरांनी आज वयाच्या ८० व्या वर्षात पदार्पण

मराठीतील सुप्रसिद्ध नाटककार आदरणीय प्रा. दत्ता भगत सरांनी आज वयाच्या ८० व्या वर्षात पदार्पण केले आहे.
त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी मी यापूर्वीच त्यांच्याशी साधलेला पत्रात्मक संवाद आपल्यासमोर ठेवत आहे.
सर,आपणास आपल्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास या शुभेच्छा देत असताना मनाला फार आनंद होतोय. आपण आपल्या स्वभावाप्रमाणं बोलत राहावं, लिहीत राहावं, हिंडत फिरत राहावं असं करता करताच आपण आपल्या या जीवनाचं शतक ओलांडावं असं मला वाटतं. आणि ओलांडाल आपण नक्कीच.
सर, भारताचा स्वातंत्र्यलढा आणि बाबासाहेबांच्या संदर्भात आपण अलीकडंच जे काम हाती घेतलं होतं ते पूर्ण झालं ना? आता कुठला नवा प्रकल्प हाती घेतताय? आपण कुठला तरी नवा प्रकल्प हाती घेणारच, आणि घेतलाच पाहिजे. मराठी साहित्य आणि संस्कृतीचं सेवाव्रत आपण सोडणारच नाही. आणि सोडायचं तरी कशासाठी? असं सारं निर्मितीचं काम करण्यातच तर खरा आनंद असतो, नाही का?
मी वयानं आपल्यापेक्षा वीस वर्षांनी लहान आहे, पण असं असूनही मला आपला एक सहकारी म्हणून बरीच वर्षे आपल्या सहवासात राहता आलं, ही माझ्या आयुष्यातली मला मिळालेली फार मोलाची संधी होती असं मी समजतो. आपला सहवास आनंददायी, ज्ञानदायी, संस्कारदायी असायचा. आपण अगदी हाडामासाचे शिक्षक. जीव ओतून शिकवणारे. आपलं शिकवणं म्हणजे अखंडितपणानं वाहणारी खळाळत्या नदीची धो धो धारच. अर्थात मी काही आपल्या वर्गात बसून आपल्याकडून शिकलेलो नाही, तरी अंदाज येतोच ना. आपण एखाद्या वर्गात शिकवत असताना व्हरांड्यातून आपला आवाज मी काही कमी वेळा ऐकलेला नाही. आणि आपली व्याख्यानं मी काय कमी ऐकलेली आहेत का? आपला व्याख्यानाचा टोन आणि वर्गात शिकवण्याचा टोन यात मला काही फारसा फरक जाणवलेला नाही.
आपण महाराष्ट्रातले एक प्रभावी वक्ते.
खणखाणीत आवाज, सुस्पष्ट शब्दोच्चार, मांडणीत प्रभावी असे चढ उतार, या चढ उताराला प्राप्त होणारी एक आगळीच लय. व्याख्यान विषयाची व्यापक आणि सखोल जाण, मांडणीची तार्किकता, स्वतंत्र विश्लेषणक्षमता, मुद्देसूदपना, तटस्थपणाननं प्रत्येक घटकाला योग्य तो न्याय देण्याची भूमिका ही आपल्या व्याख्यानाची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये मला जाणवलेली आहेत. मी आपलं पहिलं व्याख्यान ऐकलं ते १९९० मध्ये पीपल्स कॉलेजच्या मराठी विभागातला आपला सहकारी होण्याच्या आधीच. तत्कालिन मराठवाडा विद्यापीठामध्ये. आपण ‘गांधी आणि आंबेडकर’ हा विषय घेऊन बोलला होता. मला आपली ती मांडणी फार आवडली होती; आणि त्यानंतर आपली कितीतरी व्याख्यानं मी ऐकलेली आहेत. आपलं कुठल्याही कार्यक्रमातलं प्रत्येकच व्याख्यान अगदी प्रभावी व्हायचं. आपल्या व्याख्यानांचा नकळतपणानं माझ्याही मनावर प्रभाव पडलेला आहे. कारण मला आपली शैली फार भावलेली आहे.
आपलं बाह्य व्यक्तिमत्वही प्रभावीच. नाक डोळे आणि एकूणच चेहऱ्याची सौंदर्यपूर्ण ठेवण. गुळगुळीत दाढी मिशी, गोरापान रंग. राहणी मात्र अत्यंत साधी. साधा शर्ट,साधी पॅन्ट. आपण लुनावर कॉलेजला यायचात. हातात एक साधीशी पिशवी घेऊन. नंतर नंतर ती पिशवी अणनं कमी केलं. हॅन्ड बॅग आणू लागलात. मी पीपल्समध्ये आलो तेव्हा आपण मराठी विभाग प्रमुख होता. माझी मुलाखत घ्यायला आपण होताच. माझ्या मुलाखतीचं अनेकदा आपण कौतुक केलेलं आहे. विषयतज्ञ माझे गुरुच होते. त्यांनीही कसं कौतुक केलं हेही मला आपण अनेक वेळा सांगितलेलं आहे. ते जाऊ द्या. आपण पुढे उपप्राचार्य झालात, प्रभारी प्राचार्य झालात. आपल्या साहित्य क्षेत्रातील कर्तृत्वाबद्दल आपणाला अनेक पुरस्कार मिळाले. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही आपण भूषलत. परंतु आपल्या वागण्या-बोलण्यात अहंभावाचा लवलेशही मला कधीच जाणवला नाही. आपल्या स्वभावातील विनयशीलता मला फार भावलेली आहे. कुणाबद्दलही बोलत असताना पूर्वग्रह ठेवून बोलायचं नाही. एखादा व्यक्ती समोर येऊन काहीसं गैर पद्धतीनं बोलला तर त्याचा लगेच गैरअर्थ काढायचा नाही. त्याच्या बोलण्याचा विचार नकारात्मक पद्धतीने नाहीतर सकारात्मक पद्धतीने करायचा, आपली ही पद्धती मी पाहिलेली आहे. मला ती आवडलेली आहे. कॉलेजमध्ये आपण सतत काम करायचात. काम कुठलंही असो मन लावून करायचं. ही आपली पद्धत. एम.ए. मराठीच्या प्रवेशासाठी चारशे साडेचारशे अर्ज यायचे. या अर्जांची छाननी करण्यासाठी आपल्याला एकत्रित बसावं लागायचं तेव्हा आपण किती तरी काम करायचात आणि इतरही ठिकाणी सतत कामच करायचात. आपली निष्ठेनं काम करत राहण्याची वृत्ती मोलाचीच. पण आपण उपप्राचार्य नाही,तर प्राचार्य व्हायला पाहिजे होतं, असं मला वाटायचं. आपण प्राचार्य का झाला नाही त्याबद्दल एकदा गप्पा मारता मारता ज्या पद्धतीचं विश्लेषण आपण केलं होतं ते मला पटलेलं नाही. आपल्या सार्याच भूमिका पटल्याच पाहिजेत असं थोडंचंय? काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून आदर थोडाच कमी होत असतो?
आपण ब्राम्हणाळलेले आहात असा एक आपल्यावर आरोप केला जात असतो. असा आरोप अनेकांवर केला जाऊ शकतो. काही जुजबी बाबतीत त्या आरोपात काहीसं तथ्यही असू शकतं. याचा अर्थ आपण उच्च-नीचतावादी उतरंडव्यवस्थेचे समर्थक बनलात असा मात्र मी मुळीच काढू शकत नाही. आपण आपल्या वाणी आणि लेखणीचा जो वापर केलेला आहे, तो तळस्तरकेंद्री, परिवर्तनवादी व समतावादी वैचारिक भूमिका घेणाराच आहे, आणि ही भूमिका अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा प्रगाढ असा कृतज्ञताभाव आपल्या मनात आहेच. तळस्तरातून वर आलेल्या कुणाच्या मनात तो नसतो? तो सर्वांच्याच मनात असतो. तो असलाच पाहिजे. आणि स्वातंत्र्य, समता,न्याय,बंधुतावादी, बुद्धिवादी व विज्ञानवादी भूमिका ही घेतलीच पाहिजे. यासंदर्भात आपलं लेखन मी जेव्हा तपासतो, तेव्हा आपल्या या भूमिकेपासून आपण तसूभरही ढळलेला नाहीत हेच मला जाणवतं,आणि हे फार मोलाचं आहे. आपलं 'वाटा-पळवाटा' जातिव्यवस्थेची अन्यायकारकता व निरर्थकताच अधोरेखित करतं. जातिअंताची दिशाच दाखवतं. अनेकविध मानवी भावभावनांचे कंगोरे प्रभावीपणे आविष्कृत करतं. अवर्त, अश्मक,खेळिया या आपल्या नाट्यकृती तळस्तरकेंद्रीच आहेत. त्या विषमतावादी जातिव्यवस्थेचे अनेकविध शोषणकारी कंगोरेच आविष्कृत करतात. महात्मा ज्योतीराव फुले यांचं 'तृतीय रत्न' हे नाटक संपादित करून हे मराठीतलं पहिलं आधुनिक नाटक आहे हा जो निष्कर्ष आपण मांडलात तो फार महत्त्वाचा आहे. मराठी नाट्य वाङ्मयाचा इतिहास नव्याने मांडण्याची दिशा देणारा आहे. आपलं 'दलित साहित्य दिशा आणि दिशांतर', 'समकालीन साहित्य आणि साहित्यिक, 'साहित्य समजून घेताना' यातलं समीक्षालेखन असो... हे लेखन परिवर्तनवादी वैचारिक भूमिका घेणारंच आहे. 'निळी वाटचाल' 'पिंपळ पानांची सळसळ' देखील समता वादाच्या, मानवतावादाच्या, प्रज्ञा, शील,करुणेच्याच मूल्यमय दिशा देते. आपण मांडत असलेली ही वैचारिक दिशा घेऊनच या देशातल्या प्रत्येक मानवतावादी माणसाला जावं लागेल.
सर, आपण आपल्या वाणीचा वापर फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आपण विचार मंचावर तर भरभरून बोलताच,पण खाजगीमध्येही तसेच भरभरून बोलता. अगदी बारीक सारीक गोष्टीवरसुद्धा सविस्तर बोलत राहता. इतक्या बारीक-सारीक गोष्टीवर इतकं तपशीलवारपणानं आपण बोलू नये असं माझं मत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या घशावर बराच परिणाम झालेला आहे. आवाज बिघडलेला आहे. असं असूनदेखील आपण खाजगीमध्ये आजही बारीक-सारीक गोष्टीवरही फार वेळ बोलत राहता. आपणाला माझी नम्र विनंती आहे, की आता आपण बारीक-सारीक गोष्टीवर बोलणं थांबवावं. आपला आवाज आणखी किमान पंचवीस वर्षे चांगला राहणं आवश्यक आहे. आपण वैचारिक आणि मूल्यात्मक गोष्टींबद्दल बोलण्यासाठीच आपला आवाज आता खर्च केला पाहिजे.
आज मी आपणाला आपण ७५ वर्षाचे झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी फोन केला, तेव्हाही आपण सविस्तरपणे बोललात. माझ्या युगांतरबद्दल चौकशी केलीत. त्याला नाटक आणि अभिनयाची आवड आहे. त्याला त्या क्षेत्रात कसं गेलं पाहिजे याबद्दलही काहीसं बोललात. पण आपला आवाज बराच खोल गेलेला होता. घसा बसलाय म्हणालात. सर डॉक्टरांना लवकर दाखवलं पाहिजे आणि आपण बोलणं कमी केलं पाहिजे. कृपया हे कटाक्षाने पाळावं. आपली वाणी, आपली लेखणी आणखी खूप काळपर्यंत रससरती राहो अशी मी पुन्हा एकदा माझी मनोकामना व्यक्त करतो. सर, आपण जुजबी गोष्टी सोडून मूल्यवान ते बोलत राहा, लिहीत राहा, फिरत राहा. आपण माझ्या काही पुस्तकांवर लिहितो असं म्हणाला होता. मुद्दाम वेळ काढून तेही लिहा ना सर.
आपला नम्र
अनंत राऊत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत