बुद्ध कोणाला म्हणतात ?

ओळख बुद्धांची
↔️ बुद्ध कोणाला म्हणतात ?
उत्तर :- ज्या बोधिसत्वाने दहा पारमिता पार केल्या आहेत, आणि निर्वाण प्राप्त केले आहे त्यांना बुद्ध म्हणतात.
↔️ बुद्ध हे कोणाचे नाव आहे का ?
उत्तर :- बुद्ध हे कोणाचे नाव नाही, बुद्ध म्हणजे ज्ञान, त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे त्यांना बुद्ध म्हणतात.
↔️ भगवान कोणाला म्हणतात ? का ?
उत्तर :- भग + वान म्हणजे भगवान, भग म्हणजे नष्ट करणे, वान म्हणजे तृष्णा, ज्याने कामतृष्णा, विभवतृष्णा नष्ट केली आहे त्यांना भगवान म्हणतात. सिद्धार्थ गौतम यांनी जेव्हा बुद्धत्व प्राप्त केले तेव्हा त्यांना भगवान असे संबोधण्यात आले. त्यानी तीन प्रकारच्या तृष्णांचा समूळ नाश केला म्हणून त्यांना बुद्ध म्हणतात.
↔️ सम्यक संबुद्ध कोणाला म्हणतात ? का ?
उत्तर :- सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबुद्ध म्हणतात, कारण त्यांनी उत्तम प्रकारची बोधी प्राप्त करून घेतली म्हणून त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात.
↔️ बोधिसत्व कोणाला म्हणतात ? बोधी म्हणजे काय ?
उत्तर :- बोधी म्हणजे ज्ञान व सत्व म्हणजे प्राणी, जो मनुष्य बुद्धत्व प्राप्त करण्याच्या मार्गावर आरूढ झाला आहे, तसा प्रयत्न करीत आहे, म्हणून त्यांना बोधिसत्व म्हणतात.
↔️बुद्धत्व प्राप्तीसाठी बोधिसत्वाला काय करावे लागते ?
उत्तर :- बुद्धत्व प्राप्तीसाठी बोधिसत्वाला दहा पारमिता पार कराव्या लागतात, एक परिमित्ता पूर्ण करावी लागते, दहा स्थित्यंतरे करावी लागतात, तेव्हा बोधिसत्व बुद्ध होतो. एका वेळेस व एका काळात एकच बुद्ध अस्तित्वात असतो.
↔️ जगात किती बुद्ध होऊन गेले आहेत ?
उत्तर :- जगात २८ बुद्ध होऊन गेले आहेत.
↔️ सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्या अगोदर २७ बुद्ध झाले ते जगप्रसिद्ध का झाले नाहीत ? त्यांची माहिती व त्यांची कार्ये काय ?
उत्तर :- सिद्धार्थ गौतमाच्या अगोदर झालेल्या बुद्धांना प्रत्येक बुद्ध म्हणतात. प्रत्येक बुद्ध ज्याने दहा पारमिता पार केल्या आहेत. ज्यांनी निर्वाणाची प्राप्ती केलेली आहे. सर्वश्रेष्ठ व दमणशील पुरुषाचा सारथी, आधार देणार आहे, देव व मनुष्य यांचा मार्गदर्शक आहे, अशांना बुद्ध म्हणतात, बुद्ध म्हणजे प्रबुद्ध मानव होय.
↔️ अरहंत कोणाला म्हणतात ? का ?
उत्तर :- अर म्हणजे शत्रू आणि हंत म्हणजे हनन करणे. पराभव करणे. ज्यांनी दहा प्रकारच्या अकुशल विचारांना विचारांनी नष्ट केले, अकुशल विचार म्हणजे निर्मळ बुद्धीचे, सुखाचे, आनंदाचे शत्रू. अशा शत्रूला जिंकणारा म्हणजे अरहंत ( अर्हत ) होय.
↔️ तथागत कोणाला म्हणतात ?
उत्तर :- यथावादी तथाकारी याचा अर्थ असा की, जसे बोलत होते तसे कार्य करीत असत. ज्यांच्या जन्मात चमत्कार नव्हता, ज्ञानप्राप्ती चमत्कार नव्हता, त्यांच्या परिनिर्वणात चमत्कार नव्हता, जसे महापुरुष जन्माला येतात तसाच त्यांचा जन्म झाला होता, त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा चमत्कार नव्हता, म्हणून त्यांना तथागत म्हणतात. त्यांनी या जगातील सुख-दुःखाचे तथ्य जाणले होते म्हणून म्हणतात, ते मनुष्याप्रमाणे जन्माला आले, संसारी जीवन जगले आणि निसर्ग नियमाप्रमाणे त्यांचे निधन झाले.
↔️ धम्म म्हणजे काय ? धर्म आणि धम्म यात काय फरक आहे ?
उत्तर :- तथागत बुद्धांनी ज्या धम्माचा सुंदर उद्देश केला आहे, ज्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते, जो धम्म आपले फळ ताबडतोब देतो, कोणी ही त्याचा अनुभव घ्यावा, तो निर्वाणाकडे घेऊन जातो तो धर्म विज्ञानावर, सत्यावर आधारलेला आहे. धर्मात देव, कर्मकांड, आरती, प्रार्थना असतात. धम्मात तसे नाही, धम्म जीवनमार्ग आहे.
↔️ बौद्ध धम्माची व्याख्या सांगा ?
उत्तर :- माणसाने माणसाशी माणुसकीच्या सौजन्याने कसे वागावे हे सांगणारे तत्वज्ञान म्हणजे धम्म. धम्म म्हणजे निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग, सदाचारी नितीचा मार्ग, आचरणाचा शुद्ध मार्ग म्हणजे धम्म, त्याला जीवन मार्ग म्हणतात.
↔️ निर्वाण म्हणजे काय ? ते कसे मिळवता येते ?
उत्तर :- निर्वाण म्हणजे निर अधिक वाण बरोबर निर्वाण. निर म्हणजे नाही, वाण म्हणजे तृष्णा, त्यागाने निर्वाण मिळवता येते. आर्य अष्टांगिक मार्गाच्या आचरणाने निर्वाण प्राप्त करून घेता येते. निर्वाण जिवंतपणी अनुभवण्याची अवस्था आहे, ते जिवंतपणी प्राप्त करून घेता येते, निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे, परिनिर्वाण म्हणजे मृत्यू. अरहंत भिक्षुंच्या व भिक्षुणींच्या मृत्यूला परिनिर्वाण म्हटले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत