महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बुद्ध आणि त्यांचा धम्म.. भिमराव रामजी आंबेडकर


एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

तिसरा खंड : भाग चवथा

८. धम्मग्रंथ प्रमादातीत आहेत अशी श्रद्धा म्हणजे अधम्म होय.

१. ब्राह्मणांनी असे घोपित केले की, वेद हे केवळ पवित्र ग्रंथच नाहीत तर ते स्वतःच प्रमाण आहेत.

२. ब्राह्मणांनी वेदांना स्वतःच प्रमाण आहेत एवढेच घोपित केले नाही तर त्यांनी अशीही घोपणा केली की वेद प्रमादातीत आहेत.

३. या मुद्यावर बुद्धाचे मत हे ब्राह्मणांच्या मतांच्या सर्वथा विरोधी होते.

४. बुद्धाने वेद प्रमाण आहेत हे नाकारले. वेद स्वतःच प्रमाण आहेत, वेद वाक्य अंतिम आहे हेही बुद्धाने नाकारले.

५. बुद्धाने या मुद्यावर जी भूमिका स्वीकारली नेमकी तशीच भूमिका त्या काळच्या अनेक आचार्यानी स्वीकारली होती. परंतु काळाच्या ओघात त्या आचार्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी, त्यांच्या तात्विक दर्शनाला मान्यता मिळावी, त्यांना ब्राह्मणांच्या नजरेत प्रतिष्ठा मिळाव, त्यांना ब्राह्मणांच्या स‌द्भावना अर्जित करता याव्यात, यासाठी आपली वेद विरोधी भूमिका त्यागली. बुद्धाने मात्र या मुद्यावर कोणतीही तडजोड स्वीकारली नाही.

६. तेवीज्ज्य सुत्तात बुद्ध घोपित करतो की, वेद म्हणजे निर्जल मरुस्थल होय. पथविहीन अरण्य होय वास्तवात वेदाचा पथ हा विनाशपथ होय. नैतिक आणि बौद्धिक तृष्णेने तृपार्थ कोणताही माणूस आपल्या तृष्णातृप्तीसाठी वेदमार्गाने जाणार नाही. कारण त्या मार्गाने जाऊन आपली तृष्णातृप्ती होईल याची त्याला आशा नाही.

७. वेद प्रमादातीत (निदोंप) असण्याविषयी बुद्ध म्हणतो की, काहीही प्रमादातीत नाही. वेदही प्रमादातीत नाहीत. त्याचे म्हणणे असे की, प्रत्येक बाब परीक्षण आणि पुनर्परीक्षणासाठी खुली असली पाहिजे. प्रत्येक बाबीचे परीक्षण झालेच पाहिजे.

८. ही बाब बुद्धाने कालामांना दिलेल्या प्रवचनात स्पष्ट केली आहे.

९. एकदा तथागत मोठ्या भिक्खू संघासहित कोशल जनपदात चारिका करीत असताना केसपुत्तीय नगरीत आले. केसपुत्तीय नगरी ही क्षत्रिय कालामांची नगरी होती.

१०. तथागत त्यांच्या नगरीत आले आहेत हे कालामांना समजले तेव्हा ते तथागत जेथे विहार करीत होते तेथे गेले. आणि एका बाजूला आसनस्थ झाले. असे आसनस्थ झाल्यावर केसपुत्तीय कालाम तथागतांना म्हणाला:

११. “हे श्रमण ‘गौतमा, आमच्या नगरीत काही श्रमण ब्राह्मण येतात. ते आपआपल्या मतांचे आमही स्पष्टीकरण करतात. ते आपआपल्या मतांची प्रस्थापना करतात. परंतु असे करताना ते दुसऱ्यांच्या मतांचे खंडन करतात. दुसऱ्यांच्या मतांचा विरोध करतात. दुसऱ्यांच्या मतांना हीन लेखतात. दुसऱ्याच्या मतांना धिक्कारतात तसेच हे तथागता, आमच्या नगरीत दुसरेही श्रमण ब्राह्मण येतात. ते सुद्धा आपल्या मतांचे उदात्तीकरण करतात. आपल्या मतांचे गुणगाण करतात परंतु त्याच वेळी ते दुसऱ्यांच्या मतांचे खंडनही करतात. दुसऱ्यांच्या मतांना अपमानित करतात. दुसऱ्याच्या मतांना नष्ट करण्याचा प्रयत्न करूनच ते आपल्या मताचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात.

१२. म्हणून हे तथागता, आम्ही अनिश्चय आणि भ्रमाच्या अवस्थेत आहोत. ह्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोण सत्य आणि कोण मिथ्या हे आम्हाला कळतच नाही.

१३. “हे कालामांनो, तुमच्या अनिश्चयासाठी समुचित (योग्य) कारणे आहेत. तुमच्या भ्रमित अवस्थेसाठी समुचित कारणे आहेत हे कालामांनो, खरेच तुमच्या चित्तात योग्य समयी अनिश्चय आणि भ्रम उत्पन्न झाले आहेत” तथागत कथन करते झाले;

१४. “हे कालामांनो, यावे.” तथागताने आपले कथन पुढे सुरूच ठेविले. “जे काही श्रवण करण्यास मिळाले एवढ्याच कारणास्तव ते स्वीकारू नये. कोणतीही बाब परंपरेनुसार एकाकडून दुसऱ्याकडे आली एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. सर्वसामान्यांना एखादी बाब स्वीकृत आहे एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये. धर्मग्रंथात एखादी बाब लिहिली आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये. एखादी बाब तर्काद्वारा प्रस्थापित आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये. एखादी बाब न्यायशास्त्राला धरून आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये. एखादी बाब सकृद्दर्शनी स्वीकारार्ह वाटते एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये. मान्य श्रद्धा आणि विश्वासाच्या आधारावर कोणतीही बाब आपण स्वीकारू नये. एखादी बाब सकृद्दर्शनी सत्य वाटते एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये. एखादी बाब श्रेष्ठ आचार्यांनी किवा संन्याशानी कथन केली एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये.”

१५. “मग आम्ही काय करावे. एखादी बाब स्वीकारण्यासाठी आम्ही कोणत्या कसोट्या लावाव्यात” कालामांनी विचारणा केली.

१६. “या कसोट्या लावाव्या” तथागत उत्तरले. “स्वतःशीच प्रश्न विचारावा की, हे करणे अकुशल आहे काय ? हे स्वीकारणे अकुशल आहे काय? हे स्वीकारणे निदनीय आहे काय ? ती बाब सुज्ञाद्वारा निषिध्द मानली आहे काय? ती बाब केल्यामुळे, स्वीकारल्यामुळे दुःख आणि कष्ट वाट्याला येतील काय ?”

१७. “कालामांनो, तुम्ही एक पाऊल पुढे जावे आणि विचारणा करावी. जो सिद्धांत मांडला जातो, प्रस्थापित केला जातो तो सिद्धांत तृष्णा, घृणा, मोह, हिंसा यांच्या वृद्धीला तर कारण ठरणार नाही ना ?

१८. “परंतु हे कालामांनो, हेही पर्याप्त नाही. तुम्ही याच्याही पुढे जावे तुम्ही हे जाणून घेण्याचे, समजून घेण्याचे प्रयास करावे की काय हा सिद्धांत माणसाला आपल्या तृष्णांचा दास तर करीत नाही ना ? काय हा सिद्धांत माणसाला जीवमात्राच्या हिसेला तर प्रवृत्त करीत नाही ना ? काय हा सिद्धांत माणसाला चौर्यकर्माला तर प्रवृत्त करीत नाही ना? काय हा सिद्धांत माणसाला काम मिथ्याचाराला तर प्रवृत्त करीत नाही ना? काय हा सिद्धांत माणसाला मिथ्या कथनाला तर प्रवृत्त करीत नाही ना ? आणि काय हा सिद्धांत इतरांनीही तसेच करावे अशी प्रेरणा तर देत नाही ना ?

१९. “आणि सरते शेवटी तुम्ही स्वतःशीच विचारणा करावी. काय या सर्वांचा परिणामअंती दुःखात आणि कष्टात तर होणार नाही ना ?

२०. “आता कालामांनो, तुम्ही काय विचार करीत आहात ?

२१. “काय या सर्व बाबी मनुष्यमात्राकरिता हितकर आहेत की अहितकर आहेत ?”

???? ८. धम्मग्रंथ प्रमादातीत आहेत अशी श्रद्धा म्हणजे अधम्म होय. ????
१ ते ३८ पैकी १ ते २१ क्रमशः

???? संकलन : बुद्धीस्ट भारत टीम, सिद्धार्थ भालेराव आणि सहकारी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!